Sunday, May 31, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४५ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४५ –

खडीसाखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही; तसे, आपण सतत नामात राहिलो की सद्गुरू आपण होऊन आपल्याकडे येतील.

श्रीराम!
गोड खडीसाखरेसारखेच गोड वचन!
“जेथे नाम तेथे माझे प्राण” म्हणणाऱ्या श्रीमहाराजांनी हे सांगावे यात काय नवल! भक्तिमार्गातील सर्व अधिकारी सत्पुरुष हेच सांगतील. यात तीन गोष्टी आहेत –
१) जीवाच्या अपूर्णतेचे यथार्थ दर्शन आणि त्यामुळे शरणागती
२) नामाच्या संलग्नतेने येणारी सूक्ष्मता आणि नामाची शक्ती
३) संत - सद्गुरूंची आत्यंतिक करुणा

मनुष्य प्राणी संपूर्ण ईश्वराचा अंश असून देखील मायेच्या पडद्याने मूढता आली व मायिक वस्तुपदार्थांशी मेळ होऊन तो अपूर्ण बनला. त्याच्या पूर्वजन्मीच्या संस्कारानुसार व याही जन्मीच्या संस्कारानुसार आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर त्याच्या उद्धाराचा मार्ग जर त्याला गवसला व तो केवळ सांसारिक विषय चिंतन न करता या ईश्वरप्रदत्त आयुष्याबद्दल विचार करू लागला, तर त्याच्या लक्षात येते की सर्व काही केले तरी माझ्या मनीची अस्वस्थता का जात नाही? ‘मी पूर्ण समाधानी आहे’ असे मी का म्हणू शकत नाही? आयुष्यात काहीही घडले तरी माझ्या मनाचे समाधान टिकेलच याची ग्वाही मी का देऊ शकत नाही? असे अनेक प्रश्न अशा थोड्या ‘जाग्या’ झालेल्या माणसाच्या मनातही येतातच आणि मग शोध सुरु होतो अशा गोष्टीचा जी मला संपूर्ण समाधान देऊ शकेल. समर्थ रोखठोकपणे म्हणतात, “या संसारी सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले!” यापुढे जाऊन म्हणतात, “परम मूर्खामाजी मूर्ख जो संसारी मानी सुख!” सर्व संत सांगतात की, तुम्ही संसारात अनेक दुःखे आहेत असे म्हणता; वास्तविक संसार हा परमेश्वरानेच बनवलेला आहे. श्रीमहाराज तर म्हणायचे, की चोरापासून आणलाय का प्रपंच? त्यात वाईट काय आहे? आणि म्हणून ते म्हणतात, ‘संसारात’ दुःख नाही; संसार हेच दुःखमूळ आहे. इथे संसार म्हणजेच संसाराची, त्यातल्या वस्तुपदार्थ – व्यक्तींबद्दलची - देहाबद्दलची आसक्ती. ती सोडा, मग संसार दुःखमय नाही. परंतु हे समजणे देखील अजून मुमुक्षुत्व प्राप्त न झालेल्यास अशक्य आहे. पण तळमळ तर जात नाही, मग करायचे काय? अशा प्राथमिक अवस्थेकरिता देखील आजचे वचन आहे. कारण मायेत अडकलेल्या जीवाची ताकद नाही की मी अशा कुणा सत्पुरुषाकडे जाईन आणि ते मला मार्गदर्शन करतील. खरोखर संत संग मिळणे ही या भूमीवरची सर्वात दुरापास्त गोष्ट आहे. “बिनु हरिकृपा मिलहि नही संता!” एक वेळ भगवंत भेट होईल पण संतभेट होणे हे केवळ आणि केवळ कृपेनेच घडते! मग ही कृपा मिळवायची कशी? ते महाराज सांगतात, नामस्मरणाने! अमुक ठिकाणी साखर टाकली आहे असे म्हणून आपण मुंगळ्यांना आमंत्रण देतो का? त्यांना जसे साखरेचा गंध आपसूकच त्या जागी ओढून आणतो तसा नामाचा सुगंध संतांना – सद्गुरूंना त्या ठिकाणी खेचून आणतो. खऱ्या मुमुक्षु जीवांना याची पूर्ण कल्पना असते आणि म्हणूनच ते गुरु-शोधाआधी नामाला सुरुवात करतात. अनेक साधक भक्तांचा हा अनुभव आहे की गुरूंची भेट होण्यापूर्वीचे नाम किती तळमळीचे होते! आपल्याला नाथांची गोष्ट माहित आहे. गुरु जनार्दन स्वामींची भेट व्हावी याची लहानग्या एकनाथाला किती तळमळ लागली होती! श्रीमहाराजांनी नवव्या वर्षी घर सोडले; कशासाठी? गुरुभेटीसाठी! आता हे लोक ईश्वरकोटीचे असले तरी सामान्य साधकांना देखील हा अनुभव येतो, जर तळमळ खरी असेल तर!

हे केवळ प्राथमिक साधकांसाठी आहे असे मात्र समजू नये. सद्गुरू भेट ही खरे तर देहाने किंवा अमुक स्थानावर अशी व्हायची नसतेच. ‘सद्गुरू आपल्याकडे येणे’ याचा खरा अर्थ आहे, सद्गुरूंचे आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात पदार्पण होणे. किंवा असे म्हणता येईल की जे तत्त्व हृदयमंदिरी आधीपासूनच विराजमान होते त्याची चाहूल लागणे! सर्व मानसपूजेचे सार या परिणतीमध्ये आहे. जिथे हृदयापासून घेतलेले नाम आहे, तिथून सद्गुरू दूर राहू शकत नाहीत. आम्हाला खरोखर त्यांच्या नामाच्या प्रेमाची कल्पना येऊच शकत नाही. एक थोर संत राहतात वृंदावन मध्ये, श्री हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज. ते दिवसभर अनेक मुमुक्षु साधकांच्या उद्धारासाठी सत्संग चर्चा वगैरे चालवतात. पण म्हणतात, यासाठी ठराविक वेळ ठेवलेली आहे, त्याबाहेर ते कुणाला भेटत नाहीत. आपल्या कुटीमध्ये नामात दंग असतात. म्हणतात, नाम हा माझा खुराक आहे. तो मिळाला तरच हे बाकी सर्व चालू शकेल. पोचलेले संत बरं हे! पण नामाचे प्रेम बघा. महाराज म्हणतात ना, एकदा का ते प्रेम आले, की त्याच्या आड इतर काहीही येऊ शकत नाही!

हे ज्या साधकांना गुरुकृपेने समजते, त्यांना असे अनेकानेक अनुभव सतत येतात की संत सद्गुरूंची भेट त्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून होत राहते. भेट म्हणजे प्रत्यक्ष भेटायला हवे असे नाही. वर म्हटल्याप्रमाणे नामाने जी मनाला सूक्ष्मता येते त्यामुळे त्या सूक्ष्मतेत निरनिराळ्या तऱ्हेने ही भेट होते. कुणाला भावदशेत होईल, कुणाला कोणत्या श्रवणाच्या माध्यमातून, कुणाला स्वप्नातून होईल. जो नामात राहतो, त्याला या भेटींपैकी आपले मनाचे खेळ कोणते खरी भेट कोणती हे बरोबर समजते!  हे सूक्ष्म अनुभव शब्दात कुणाला कसे सांगता येतील?  

आणि गंमत अशी की ज्याला अशी ही भेट घडत राहते त्याला असे चुकूनही वाटत नाही की ही भेट माझ्या नाम साधनामुळे झाली. ज्याला माझे नामसाधन चांगले सुरु आहे असे वाटते तो अजून नामाच्या सूक्ष्म वातावरणात पूर्णपणे आला नाही असे संत म्हणतात. नामाच्या शक्तीची पूर्ण जाणीव असून देखील ‘जीवदशेत करून करून मी किती साधन करू शकतो?’ असा लीनतेचा भाव असलेल्या साधकाच्या हृदयदेशातच सद्गुरूंचे निवासस्थान असते, कारण तो स्वतःची शक्ती हरून संपूर्ण शरणागत असतो! आणि म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे सद्गुरू आपण होऊन जेव्हा अशा साधकाकडे येतात, तेव्हा त्याला त्यात केवळ अकारण करुणा दिसते!

त्यामुळेच ह्या वरच्या वचनातल्या नामाच्या खडीसाखरेत शरणागती अनुस्यूत आहे. शरणागती शिवाय गोडवा कसला? गंमत अशी आहे, लौकिकात जवळ काहीही नसले तर माणसाला एक प्रकारची दैन्यावस्था जाणवते. माझ्या जवळ अमुक गोष्ट आज असती तर मी सुखी असतो असे वाटते. मात्र शरणागत साधकाला याच्या बरोब्बर उलट ‘माझ्या’कडे काही आहे’ हा भाव चुकून सुद्धा मनात आला की पोटतिडीक उठते. तो सर्वस्वी लहान लेकराप्रमाणे सद्गुरूंवर – भगवंतावर निर्धास्तपणे अवलंबून असतो, त्याला त्यात कमीपणा नव्हे तर अभिमान वाटतो. नित्य नैमित्तिक कर्म तो निश्चितच करतो पण त्याचा मीपणाचा भावच पुसून गेल्याने प्रत्येक गोष्टीत त्याला केवळ कृपा दिसते!

कृपा श्वास कृपा उच्छ्वास| कृपेचीच काया कृपेचीच माया|
कृपेवीण नाही साधन क्षणाचे| कृपेने दुःखही सुखरूप साचे||
गुरू कृपेचा महामेरू| गुरू कृपाधिष्ठित करुणा पूरु|
गुरू कृपेचेच सगुण रूप| कृपा-गुरू दोन्ही एकरूप||
वेष्टन ज्याने ल्याले कृपेचे| नामात ध्यान लागले तयाचे|
नाही नाही संदेह काही| क्षणोक्षणी कृपेत दर्शन होई||

अशी त्याची अवस्था होते!

काय सांगावी नामाच्या साखरेची करामत!!! बिभीषण – जे रावणाच्या राज्यात राहिले, राक्षस कुळात जन्माला आले, परंतु नामाच्या मस्तीत जगले, भगवंताच्या चिंतनात बत्तीस दातांमध्ये जीभ राहावी तसे राक्षस समुदायामध्ये राहून Untouched राहिले. त्यांची ही नामाची साखर चाखायला कोण आले? प्रत्यक्ष हनुमंत! सर्व सत्संगतीचा पाया आणि कळस आहेत हनुमंत. वरच्या वचनात महाराज म्हणतात तसेच बिभीषणाचे झाले नाही का? सततच्या नाम चिंतनाने भल्या पहाटे प्रत्यक्ष हनुमंत विप्रवेषात दारासमोर उभे राहिले. दर्शन झाल्यावर बिभीषण काय म्हणाले? त्यांनी आपल्या नाम साधनेची महती गायली नाही. म्हणाले,
अब मोहि भा भरोस हनुमंता| बिनु हरिकृपा मिलहि नही संता|
जौं रघुबीर अनुग्रह कीन्हा| तौ तुम्ह मोहि दरसु हठि दीन्हा||
-- आता माझा पूर्ण विश्वास बसला की भगवंताच्या कृपेशिवाय संत दर्शन होत नाही. माझ्यावर निश्चितच रामरायाची आत्यंतिक कृपा आहे, ज्यामुळे तुम्ही मला आज दर्शन दिलेत!

त्यामुळे आजच्या वचनात श्रीमहाराजांनी जे सांगितले की नाम घ्या, सद्गुरू आपण होऊन तुमच्याकडे येतील, हे तर खरे आहेच; परंतु एक साधक म्हणून आपल्याला असेच वाटले पाहिजे की नाम मुखात आले ही देखील त्यांची करुणा म्हणून आणि त्यांची हृदय-भेट झाली ती देखील केवळ भगवंताची अपार कृपा म्हणून! असे वाटण्यातच सद्गुरू चरणी झालेल्या समर्पणाचा गौरव आहे!

||श्रीनाम समर्थ||

2 comments: