Friday, May 29, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४३ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४३ –

नाम हे त्याच्या शत्रूला सुद्धा जर मदत करते तर ते आपल्याला मदत करीलच.

श्रीराम!
भगवंताचे वर्णन करताना “समदर्शिनः” असे केले जाते. बापाला जशी सर्व मुले सारखीच तसे भगवंताला कुणी कमी जास्त नाही. एक मनुष्य त्याची भक्ती करतो आहे म्हणून त्याला श्वासाला ऑक्सिजन पुरवतो; दुसरा नास्तिक आहे म्हणून त्याला पुरवणार नाही असे भगवंताच्या न्यायालयात नसते. सूर्योदय, चंद्रोदय, वारा, पाउस, जमिनीतले सृजन असा निरनिराळा सृष्टीचा क्रम लक्षात घेतला तर हे सहजच ध्यानात येण्यासारखे आहे. आणि किती स्वाभाविक आहे हे! शत्रु किंवा मित्र कुणाचे असतात? ज्यांना काही ना काही लहान मोठी अपेक्षा असते त्यांना. जो स्वतः सर्वांग परिपूर्ण आहे, सर्वार्थाने पूर्णकाम आहे, जो स्वतः जनाच्या योग्य अपेक्षांची पूर्ती करणारा आहे, त्याला कुणाकडून काय हवे असणार? आणि म्हणून ‘अंशी परमात्मा’ आपल्या अंशांचे – जीवांचे योगक्षेम चालवण्यात कसूर करत नाही. यासाठीच श्रीमहाराज एकीकडे म्हणतात, आपण जीवन जर सृष्टीक्रमावर सोडले तर निश्चित सुखी होऊ! सर्व गडबड त्या सृष्टीक्रमात आम्ही लुडबुड करून तिच्या कार्यात विघ्न आणल्यामुळे आहे. परंतु तरीही भगवंत आपले चर अचर सृष्टीकार्य अविरत करताहेत!

या भूतलावर भगवंताचे साक्षात स्वयंभू प्रतीक हे त्याचे नाम आहे. म्हणून नामचंद्रिका म्हणते,
“नामैव परमो देवो सम्यक् कल्याणकारक:” सम्यक रूपाने सर्व जीवांचे कल्याण करणारे असे हे भगवंताचे नाम प्रत्यक्ष भगवंत स्वरूपच आहे! जसे वर आपण भगवंताचे समदर्शित्व बघितले, त्याच धर्तीवर संतश्रेष्ठ तुलसीदास आपल्या रामचरितमानस मध्ये म्हणतात,
भायँ कुभायँ अनख आलसहूँ| नाम जपत मंगल दिसि दसहूँ||
-- प्रेमाने, वैराने, क्रोधाने किंवा आळसाने देखील जर नाम जपले तर दाही दिशांना कल्याणच होते.

अजून एकीकडे रामाच्या सगुण रूपापेक्षाही त्यांचे नाम श्रेष्ठ कसे ते सांगताना तुलसीदास म्हणतात,
सबरी गीध सुसेवकनि सुगति दीन्हि रघुनाथ|
नाम उधारे अमित खल बेद बिदित गुन गाथ||”
-- श्री रघुनाथांनी (सगुण रूपात) शबरी, जटायू इत्यादी उत्तम सेवकांनाच मुक्ती दिली, परंतु नामाने असंख्य दुष्टांचा देखील उद्धार केला; अशा नामाच्या गुणांच्या (परिणामांच्या) अनेक कथा वेदांमध्ये प्रसिद्ध आहेत.

आजच्या बोधवचनात एक वेदांतिक उपदेश महाराज आम्हाला करतात की ‘पूर्णाला’ धरलेला ‘अपूर्ण’ कसाही असला तरीही पूर्णच बनतो! महत्त्वाचा शब्द आहे, “धरणे!” जसे, पारस लोखंडाच्या मध्ये एका केसाएवढे अंतर असले तरी ते लोखंड सोने बनू शकत नाही; मात्र एका स्पर्शात त्याचे सोने बनते! अग्नी माझ्यात कोण प्रवेश करतो आहे हे बघत नाही, काहीही जरी अग्नीच्या संपर्कात आले तरी भस्म होणे हाच त्याचा परिणाम. विष कसेही खाल्ले तरी प्राण घेणे हाच त्याचा धर्म! तसे, नामाचा ‘वस्तुधर्म’च हा आहे की नामाला – भगवंताला कोणत्याही भावातून धरलेला वाया जात नाही! पण ‘धरणे’ या शब्दाला भेसळ चालत नाही. म्हणजे काय? तर कोणत्याही भावाने धरले परंतु जर भाव शुद्ध नसला तर मात्र अनन्यता छेदली जाते आणि काम होत नाही.

मग तो अगदी वैर-भाव, भयाचा भाव, असे विपरीत भाव असले तरीही. रावण, शिशुपाल कोण होते? भगवंताचे ‘अनन्य’ वैरी होते. रावणाला दिवसरात्र श्रीरामप्रभूंशी शत्रुत्व करण्याशिवाय दुसरा कसला विचारच नव्हता. कंस श्रीकृष्णाच्या भयाने त्याच्या जन्माच्याही आधीपासून केवळ त्याचेच भीतीच्या भावाने दिवसरात्र स्मरण करीत होता. म्हणून श्रीमहाराज रामपाठात म्हणतात, “विरोध भक्तीने रावण वैकुंठपदी पावविला!” याला विरोध भक्ति म्हणतात. परंतु अशा विरोधातही दंभ विरहित अनन्य भावाने तो विरोध घडल्याने भगवंत त्यांनाही मुक्ती देतात. भगवंतांइतका दयाळू कोण आहे? स्वतःच्या छातीवर प्रहार करणाऱ्या भृगुंचे पाऊल भक्ताचे पाऊल म्हणून मिरवणाऱ्या करुणानिधान भगवंताच्या करुणेचा पार लागणे अशक्य!

श्रीमहाराज आजच्या वचनात एक मोठा विश्वास आमच्याबद्दल दाखवत आहेत की, आम्ही भगवंताचे शत्रु नाही! म्हणजे भाव काही असो, निदान शत्रुत्वाचा भाव तरी नाही. खरेच आहे. आम्ही आमचेच शत्रु आहोत, की अजूनही आम्हाला संपूर्णपणे कुणाला धरायचे याचे आकलन झालेले नाही व त्यामुळे आम्ही निरनिराळ्या आसक्तींमध्ये आमचा वेळ आणि शक्ती वाया घालवत आहोत. मात्र हे देखील खरेच की संपूर्णपणे भगवंताला – सद्गुरूंना धरणे ही जीवाच्या अखत्यारीतली गोष्ट नाही. मात्र प्रयत्न करणे व चहूकडे भटकणाऱ्या मनाला वरचेवर चुचकारून केंद्राकडे आणणे हे नक्कीच करू शकतो – केले पाहिजे. यासोबत जर आम्ही सद्गुरूंची निरंतर मनापासून प्रार्थना केली की, काहीही करा पण मला तयार करा! मग त्या गुरुमाऊलीचे अंतःकरण द्रवते व आम्हाला गुरूंना पूर्णपणे धरता यावे यासाठी सत्संग आणि अध्यात्मिक बळाचे दान सद्गुरू करतात!

आजच्या वचनातली मेख म्हणजे, “नाम मदत करीलच!” असे म्हणतात महाराज. खरे आहे की जो नामात राहिला त्याच्या प्रपंच – परमार्थ दोन्हीची जबाबदारी नामावर – गुरूंवर – भगवंतावर जाते; परंतु खरी जबाबदारी जी त्यांच्याकडे जाते ती म्हणजे, या जीवाचा उद्धार कसा होईल याची! प्रपंचाची जबाबदारी या अर्थाने जाते की ज्याने नामाला ‘धरले’ त्याची संसार आसक्तीच कमी होऊन जाते व जी परिस्थिती येईल त्यात तो आनंदाने हसत खेळत संसार करतो. मात्र पारमार्थिक जबाबदारी ही थोडी थोडकी गोष्ट नव्हे. सद्गुरू ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतात! मग कसली भीती? “रघूनायकासारिखा स्वामी शिरी| नुपेक्षी कदा राम दासाभिमानी||”!!!

महाराज म्हणतात, जो गुरूचा झाला, जो नामात राहिला त्याला शेवटपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी गुरूवर जाते! या भूमीवर जन्म घेतलेल्या जीवासाठी याहून मोठी मदत ती कोणती? आज आम्हाला याची खरेच उत्कटता, महत्त्व कळत नाही इतके आम्ही स्वतःमध्ये मश्गुल आहोत. यासाठीच महाराजांवर, त्यांच्या वचनांवर संपूर्ण निष्ठा ठेवूनच आम्हाला वाटचाल केली पाहिजे; म्हणजे मग नामाने केलेली मदत म्हणजेच नामाचे अनंत, अपार, गूढ आणि अक्षय्य प्रेम मिळणे होय, याची खात्री एक दिवस आम्हाला गुरुकृपेने पटेल! कान्हनगडचे स्वामी रामदास म्हणतात,

"God is all mercy, all love, all joy, all wisdom and all peace. Be conscious always that you are repeating His Name and it is bound to purify you and remove all the restlessness of mind."

||श्रीनाम समर्थ||

No comments:

Post a Comment