Thursday, May 7, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र २१ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र २१ –

तुम्हाला नीति – अनीति, न्याय – अन्याय हे कळते. नाम तेवढे बळजबरीने घ्या. श्रद्धेने घेतले तर जास्त बरे आणि वृत्ति सांभाळून नामात राहिलात तर त्याहूनही जास्त बरे!

श्रीराम!
जसजसा मनुष्य लौकिक दृष्ट्या प्रगत होत चालला तसतसा त्याच्या बाह्य पोशाख, आचार-विचार, राहणीमान यात बदल होत गेला. जो मनुष्य गुहेत रहात होता तो घर बांधण्यास शिकला. जो पानेफुले अंग झाकण्यासाठी वापरत होता, तो उंची वस्त्रे परिधान करू लागला. बाह्यतः हे होण्यामागे यातून माझी उन्नती होणार आहे, नवनवीन शोधांमधून मला सुख लाभणार आहे हाच हेतू कळत नकळत होता. शोध लागण्या अगोदर त्यातून काय, कसे व किती सुख लाभणार आहे याची शाश्वती माणसाला नसते. त्या शोधाचा व्यवहारात उपयोग केल्यानंतर त्याची Utility Value ठरते. पण मला त्याचे उपयुक्ततामूल्य कळल्याशिवाय मी ते वापरणार नाही असे जर मनुष्य म्हणता तर त्याला ते कधीच समजले नसते व तो आताच्या प्रगत स्थितीत न पोहोचता.

हाच न्याय अक्षरशः भगवंताच्या नामाला लागू आहे. म्हणून महाराज वरच्या वचनात सांगतात, जगात कसे जगावे, नीति, न्यायाने सद्वर्तन कसे असावे हे आपल्याला समजते. यामागे आपण तसे राहतो आहोत हे त्यांनी गृहीत धरले आहे. अनेकदा ते म्हणायचे, तुम्हाला माहित सगळे आहे; फक्त वेळेवर ते आठवत नाही. आणि ही आठवण करून देण्याचे काम ही त्यांची वचने करतात.

संत आपल्याला जागे करण्याचे काम करतात. आमच्यासारख्या अध्यात्मदृष्ट्या मृतवत जीवांना अमृत संजीवनी असे नाम देऊन आम्हाला अ-मृत – अमर करण्याचा – आत्मा अमर आहे आणि तू देह नसून आत्मा आहेस या बोधाप्रत आम्हाला नेण्याचा त्यांनी जणू चंग बांधला आहे. आणि म्हणून बहुतेक ठिकाणी जितके होईल तितके तरी नाम जपा असे अजीजीने सांगणारे महाराज इथे आम्हाला थोडी बळजबरी करताना दिसत आहेत. कारण श्रीमहाराजच म्हणायचे की सुरुवातीला नाम घेताना त्याला स्वतःची अशी चव नाही; अजून इतर वस्तूंची चव आमच्या जिभेवर इतकी रेंगाळते आहे की खऱ्या अमृताची चव न चाखल्यामुळे आम्हाला त्याची गोडी माहीतच नाही. पण आई जशी एखाद्या चांगल्या पदार्थाची गोडी लेकराला लागावी म्हणून त्याला आधी थोडी बळजबरी करून ते खायला लावते, त्याला गोडीगुलाबीने समजावते तसे इथे आमची सद्गुरू माऊली आम्हाला मनधरणी करते आहे, आमचे थोडे कौतुकही करते आहे की आम्हाला नीति-न्याय समजतो पण पुढे सांगते आहे की नाम तेवढे बळजबरीने घ्या.

श्रीमहाराजांची करुणा इतकी आहे की ते आम्हाला अक्षरशः हात धरून एकेक पायरी चढवतात पण त्यांच्यातला गुरु सदा सर्वदा जागा असतो आणि म्हणून पायरी हळूहळू का होईना पण चढलीच पाहिजे याकडे त्यांचे लक्ष असते. श्रद्धा हा भक्तिमार्गाचा पाया आहे म्हटले आहे; परंतु सुरुवातीला नामाच्या शक्तीवर जरी श्रद्धा नसली तरी निदान गुरूने सांगितले आहे म्हणून जबरदस्तीने नाम जपण्यास महाराज सांगतात. यात मुळात गुरूंवरची श्रद्धा अनुस्यूत आहेच. जर कुणी कोणती कामना मनात न ठेवता केवळ गुरूंनी सांगितले आहे या भावनेने नामस्मरण सुरु केले तरी देखील ते नामच हळूहळू त्याची श्रद्धा पुष्ट करते हा सार्वजनिक अनुभव आहे. कारण त्या नामामध्ये सद्गुरूंचे संपूर्ण अध्यात्म तेज सम्मिलित असते.

गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवंतांनी स्पष्ट सांगितले, श्रद्धावान् लभते ज्ञानम्” त्यामुळे, ज्याची श्रद्धा आहे, त्याच्या नामाची पातळी साहजिकच उंचावते. भाव हा श्रद्धेवर अवलंबून आहे आणि नामात सद्गुरूंचे – भगवंताचे अस्तित्व जाणवून देण्याचे सामर्थ्य त्या भावामध्ये आहे. म्हणून श्रद्धायुक्त नाम जपण्याचा फायदा साहजिकच जास्त मिळतो असे महाराज सांगताहेत.

ही झाली दुसरी पायरी. इथून हात धरून आपले श्रीमहाराज आपल्याला तिसऱ्या आणि अतिशय महत्त्वाच्या पायरीवर चढवू बघत आहेत – ‘वृत्ति सांभाळणे!’ मनात उठणाऱ्या निरनिराळ्या वृत्ति आमच्या बहिर्मुखतेमुळे बहुतेक वेळा कोणतीतरी फलाशा मनात ठेवूनच उठतात. मग त्या संसारिक कामना असोत, देहाला पोषक वासना असोत वा तामसिक विकार असोत. जर वृत्ति आल्याबरोबर त्याची जाणीव झाली तर त्या वृत्तीचे ऊर्मीत व कृतीत रूपांतर होऊ द्यायचे की नाही यावर आमचे प्रभुत्व येईल. यालाच वृत्ति सांभाळणे असे श्रीमहाराज म्हणतात. सर्व बहिर्मुख वृत्तींचा लय करून जेव्हा आम्ही ‘आत’ उतरू, तेव्हा खरी नामाची लज्जत चाखता येईल हे त्रिवार सत्य आहे. आणि म्हणून महाराज वृत्ति सांभाळण्यावर भर देतात. आता तुमची श्रद्धाही आहे तर सद्गुरू आमच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत ही भावना तर आहे असे गृहीत धरले आहे इथे, कारण ही भावना असेल तेव्हाच वृत्तींवर लक्ष ठेवणे शक्य होईल व त्यापुढे त्या सांभाळणे. आणि त्या आलेल्या वृत्ति सांभाळण्यासाठी पुढे महाराज सांगतात, वृत्तींच्या तोंडी नाम द्यावे! वृत्ति उठली रे उठली की नामस्मरण सुरु केले तर त्या वृत्तीची ऊर्मी लटकी पडते हा अनुभव आहे.

कसे आहे, तुकाराम महाराज म्हणतात तसे, “जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी!” नाम तेवढे आम्ही घेऊ पण त्याला अनुकूल असे आमचे आचरण नसेल, तर ते नाम खोल जाणार नाही. ते वाया निश्चित जाणार नाही पण ज्या शाश्वत समाधानाचा मार्ग आम्ही आक्रमत आहोत तिथवर पोहोचण्यास विलंब लागेल. श्रीमहाराज जेव्हा म्हणतात, तुम्ही फक्त नाम घ्या, ते विवेक आणि वैराग्य मी बघून घेईन, यामागे साधक बाधक गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले नाही, तर नामाची शक्ती सांगितलेली आहे. जो मनापासून नाम घेईल त्याच्या विवेक-वैराग्य मागे लागतील, कारण ‘मनापासून’ नाम घेणाऱ्याच्या हातून दुष्कृत्य, दुर्व्यवहार होणारच नाही.

अशा या नाम साधनेच्या पायऱ्या आपल्याला सद्गुरूंनी या ठिकाणी सांगितल्या आहेत. त्यांच्यावर पूर्ण निष्ठा ठेवून जो त्यांचे आचरण करेल त्याला नामैव परमानंदो, नामैव भगवान् स्वयम्” हा अनुभव आल्यावाचून राहणार नाही!

||श्रीनाम समर्थ||

1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete