Monday, December 7, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७६ --

श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७६ –

 

नाम हे शाश्वत आहे. ते पूर्वी टिकले, आता आहे आणि आपण गेल्यावरही ते राहणार आहे.

 

श्रीराम!

समर्थ रामदास स्वामी म्हणाले,

“माझे सर्व जावो| नाम तुझे राहो||

हाचि माझा भाव| अंतरीचा||

रामदास म्हणे देवा तुझी आण|

ब्रीदासाठी प्राण देई जेतो||”

सत्य काय? याचे उत्तर देताना उपनिषदे सांगतात, “स्थळ, काळ, निमित्त यांच्या परिघातून जे अलिप्त असते, जे कशावरही अवलंबून नसते, सर्वतोपरी स्वतंत्र असते त्याला शाश्वत सत्य असे म्हणतात.” जे सदैव आहे ते! आणि असे सत्य नामाशिवाय दुसरे काहीही असूच शकत नाही हे तार्किक दृष्ट्या देखील सहज लक्षात येण्यासारखे आहे. सामान्य मनुष्याचे नाव देखील त्याच्या चांगल्या वाईट कर्मानुसार पुढे अनेक वर्षे लक्षात ठेवले जाते तर जो पूर्णकाम परमात्मा – त्याच्या सगुण अवताराचे नाम हे केवळ सगुण भक्तीलाच सहाय्यक आहे असे नव्हे तर तेच नाम निर्गुण निराकार आत्मतत्त्वापर्यंत साधकाला पोहोचवते हा सर्व संतांचा अनुभव आहे.

 

आजच्या वचनाला सहजरीत्या मांडुक्य उपनिषदातील मंत्राशी जोडता येईल. त्यामध्ये ॐकाराला, म्हणजेच नामाला “अक्षरब्रह्म” म्हटले आहे. अ-क्षर! ज्यावेळी विश्वनिर्मिती झाली तेव्हा जे शाश्वताचे स्फुरण झाले त्या हुंकारालाच नाम असे म्हणतात. जेव्हा याचे मूळ शोधायचा प्रयत्न होतो, तेव्हा ते शोधता येत नाही व ॐकाराच्या (अ – उ – म) तिसऱ्या मात्रेसोबत ज्या अखंड शांतिकडे आपण जातो तिथे ते स्फुरणरूपी आत्मतत्त्व – परमात्मा – परब्रह्म आहे. आता पुन्हा आजचे वचन बघितले तर लक्षात येईल, ते पूर्वी टिकले – म्हणजेच ते अनादि आहे, त्याचा उगम शोधता येत नाही, जो शोधू जातो, तो त्या उगमातच विलीन होतो. या दृष्टीने आजच्या वचनातील दुसऱ्या वाक्याचा पहिला भाग स्पष्ट होतो.

 

दुसरा भाग आहे – नाम आता आहे – भक्ति मार्ग आणि ज्ञान मार्ग यांची हातमिळवणी इथे होते. या विश्वाच्या संपूर्ण पसाऱ्यात असे एकच आहे ‘जे कधीही नाही असे होत नाही’. ते आहेच, आताही आहे, प्रत्येक क्षणाला आपण सर्व त्याची अनुभूती घेत आहोत – ते म्हणजे आत्मतत्व आणि हे आत्मतत्त्व म्हणजेच ॐकार आहे, नाम आहे असे उपनिषद स्पष्टपणे सांगते. मांडुक्य उपनिषदात ॐकाराच्या पहिल्या मात्रेला (अ) जागृती सोबत, दुसऱ्या मात्रेला (उ) स्वप्नावस्थेसोबत आणि तिसऱ्या मात्रेला (म) सुषुप्ती सोबत – म्हणजेच गाढ झोपेसोबत योग्य रीतीने जोडले आहे. हे सांगण्याचे कारण वेदांत देतो की या तीनही अवस्था प्रत्येक जीव दररोज अनुभवतो. या तीनही अवस्था ज्यामुळे दृग्गोचर होतात ती चवथी अवस्था किंवा तुरीया ही त्या सर्वांना सांधून पुन्हा अव्यक्त राहते. ती खरे तर चौथी अवस्था नसून तीच एकमेव अवस्था आहे जिथे त्या ॐकाराची शांति अनुभूतीत येते. पुढे सांगितले आहे की, या ॐकारात सर्वच्या सर्व सामावलेले आहे. सर्व अक्षरे देखील याच तीन मात्रांमध्ये सामावलेली आहेत; या दृष्टीने देखील भगवंताची सर्वच्या सर्व नामे ही ॐकाररूपाच आहेत. आणि त्यामुळेच या वरच्या स्पष्टीकरणातून “नाम आता आहे” हे स्पष्ट होते.

 

आपण गेल्यावरही नाम राहणार आहे... याला स्पष्टीकरणाची गरजच नाही. जे शाश्वत आहे त्यात कोणत्याही दृष्टीने घट संभवतच नाही. इथे देवर्षी नारदांचे भक्तिसूत्र आठवते, जे नामाच्या शाश्वतपणाला ज्ञानपूर्वीच्या आणि ज्ञानोत्तर भक्तीशी सहज जोडते. नारद महर्षी भक्तीचे एक सूत्र सांगताना म्हणतात,

“गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानं अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपम्||”

सर्व संतांनी नाम आणि नामी मध्ये जे अभेदत्त्व सार्थ रीत्या प्रतिपादन केले आहे, त्यानुसार वरील भक्तिसूत्र नामीलाच नव्हे तर नामाला देखील तंतोतंत लागू होते, ज्यायोगे ते सगुण निर्गुण ब्रह्माला सांधते. आजच्या वचनात जे श्रीमहाराज आपल्याला नामाचे त्रिकालाला लांघून असलेले शुद्ध स्वरूप सांगू इच्छित आहेत, ते स्वरूप वरच्या भक्तीसूत्राप्रमाणे “गुणातीत, संपूर्णपणे निष्काम, ज्याची महती क्षणोक्षणी वर्धमान आहे, ज्याला छेद जाऊ शकत नाही, जे अत्यंत सूक्ष्म तत्त्व आहे आणि जे अनुभवण्यासाठी तद्रूपच व्हावे लागते” असे आहे! ज्या भक्ताने असे सर्वांगाने नामाला वरले, त्याला आजच्या वचनात वर्णन केलेला नाम महिमा अनुभूतीत आल्याशिवाय कसा राहील?

 

परंतु हे शाश्वतपण भक्तासाठी तोवर आनंद देत नाही, जोवर त्याला त्यामध्ये त्याच्या रघुपतींचे दर्शन होत नाही. त्यासाठी श्रीमहाराज आम्हाला सतत सगुण भक्तीसहित नामाचा आग्रह करताना दिसतात. त्या माऊलीला आपल्या लेकरांना या भ्रमित संसारातच आनंद मिळावा याची कोण तळमळ! यासाठीच ज्या हनुमंताने हे सगुण रामनाम अखंड हृदयाशी जपले, त्याची महती वर्णन करणारे सुंदरकांड रचताना संतश्रेष्ठ तुलसीदासांनी देखील या अखंड – शाश्वत अशा नामाची जोडणी त्या रघुनंदनाशी यथार्थपणे केली आहे –

 

शांतं शाश्वतं अप्रमेयम् अनघं निर्वाणशान्तिप्रदं

ब्रह्माशम्भुफणींद्रसेव्यं अनिशं वेदान्तवेद्यं विभुम्|

रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं

वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिम्||

 

||श्रीनाम समर्थ||