Wednesday, April 7, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७७ --

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७७ –

म्हैसूरकडला एक गृहस्थ नेहमी नाम घेत असे; परंतु आपल्या मुलांना त्यांची सालटी निघेपर्यंत मारीत असे. हे कसले नामाचे प्रेम? नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने आलेले प्रेम नामात पाहिजे.

 

~ श्रीराम.

जे संत एकांतात राहतात आणि जे लोकांतात राहतात त्यांच्यात एक मुख्य फरक हा आढळून येतो की लोकांतातले संत नेहमीच आपला प्रपंच परमार्थरूप करण्यावर भर देतात. श्रीमहाराज म्हणतात, तसेही प्रपंच सोडा म्हणुन कुणी सोडत नाही; त्यामुळे प्रपंचात राहूनच परमार्थ कसा करावा हे शिकावे. यावर सांगताना पूज्य बाबा बेलसरे सांगायचे, “Head as high as you please; but may the feet always be on the ground!” व्यवहार, संसार किंवा देहादिक गोष्टी त्रास देत नसतात, त्यामधली आपली आसक्ति आड येते हे महाराजांचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे नवरा – बायको, सासू – सून, वडील – मुलगा वगैरे नात्यांबद्दल महाराजांनी कधीही नाराजीचा सूर काढला नाही. किंबहुना परमार्थाची शाळा म्हणजे प्रपंच हे वारंवार सांगण्यास विसरले नाहीत.

 

एकीकडे परमार्थाची व्याख्या करताना महाराज म्हणतात, “संपूर्णपणे निस्वार्थ बनणे याचे नाव परमार्थ आणि या निस्वार्थतेची सुरुवात घरापासून करावी.” पूज्य बाबा देखील आपल्या प्रवचनात हा मुद्दा हिरीरीने मांडत की सध्या माणूस दुःखी असण्याचे मुख्य कारण म्हणजे घरातले एकमेकांवरचे प्रेम कमी झाले. प्रत्येक मनुष्य आत्मकेंद्री (स्वार्थी या अर्थाने) बनला आणि त्यामुळे एक तर तो आत्यंतिक आसक्ति किंवा आत्यंतिक द्वेष या दोन बिंदुंमध्ये हेलकावे खात राहिला. स्वार्थरहित प्रेम या भावनेपासून दूर जात राहिला. या सांगण्यामध्ये या संतांचा मुख्य उद्देश हा की जोवर समोर दिसणाऱ्या भगवंतांच्या अंशांवर तुम्ही निस्वार्थ प्रेम करू शकत नाही, तोवर अंशीवर निष्काम प्रेम बसणार कसे? गंमत अशी आहे की आम्ही म्हणतो, आमच्या आयुष्यात गुरू किंवा भगवंत यांना सर्वोच्च स्थान आहे आणि ज्यांच्या योगे आम्हाला या मनुष्य देहासकट जगातल्या वस्तु - व्यक्ति प्राप्त झाल्या, त्यांचा द्वेष करतो, हा किती मोठा विरोधाभास आहे!

 

आजच्या वचनात देखील आम्हाला महाराज आमच्या आयुष्यातल्या कमालीच्या विरोधाभासाचे एक उदाहरण सांगत आहेत. जर आम्ही महाराजांनी सांगितलेले नाम साधन करीत आहोत, तर आमच्यात अंतरंग परिवर्तन किती झाले आहे, किती होत आहे व काय होणे अभिप्रेत आहे या प्रश्नांची उत्तरे अगोदर आम्ही आमच्याशी देणे जरूर आहे. महाराजांच्या चरित्रातली काळे साहेबाची गोष्ट आम्हाला माहित आहेच. महाराज घरी जेवायला आलेले असताना केवळ तूप वाढण्यास उशीर झाला म्हणुन पत्नीवर संतापणारे काळे साहेब! महाराजांचा केवळ एक कटाक्ष त्यांना आजीवन क्रोधावर नियंत्रण आणण्यास उपयोगी ठरला. श्रीमहाराजांची ही वचने म्हणजे महाराजांचे अक्षरशः कटाक्ष आहेत... कृपाकटाक्ष आहेत. जो त्या नजरेतला अर्थ समजून त्याप्रमाणे आपले आयुष्य घडवेल त्याचा प्रत्येक श्वास परमार्थ बनेल याची ग्वाही महाराजांनी दिली आहे!

 

म्हणजेच जे काही साधन सद्गुरूंनी दिले आहे, ते केवळ साधन म्हणून आचरणात आणणे महाराजांना अभिप्रेत नाही. त्या साधनातून आम्हाला प्रेम साधले तरच त्याला महाराजांचे approval मिळते. नारद भक्तिसूत्रात भक्तिप्रेमाची एक व्याख्या करताना देवर्षी म्हणतात, “गुणरहितं कामनारहितं”... भागवतात एकीकडे प्रेमाची व्याख्या करताना म्हटले आहे,

“सर्वथा ध्वंसरहितं सत्यपि ध्वंसकारणे|

यद्भावबंधनं यूनो: स प्रेमा परिकीर्तित:”

ईश्वरीय भक्ति किंवा प्रेम कसे हवे? तर ते प्रेम कमी होण्याला किंवा ते नष्ट होण्याला सर्व कारणे असावीत; परंतु तरीही ते प्रेम थोडे देखील कमी होऊ नये, वाढत राहावे. त्याला सद्गुरुंवरचे वा भगवंतावरचे प्रेम म्हणता येईल. पण हे प्रेम या जगात व्यक्त होण्यासाठी खूण कोणती? तर जे काही आयुष्य, त्यातल्या व्यक्ती, वस्तु, परिस्थिती वाट्याला आलेली आहे त्याचा राम कर्ता मानून आनंदाने स्वीकार करणे ज्याला जमेल तो या वरच्या भक्तिप्रेमाच्या व्याख्येत बसेल.

 

अनेकदा आम्ही बघतो, ज्या घरांमधून महाराजांनी देहात असताना वा वाणी रूपात असताना दिलेल्या काही गोष्टी आहेत (पादुका / कुबडी / जपमाळ वगैरे) त्या सर्वांना त्याचा यथार्थपणे कोण आनंद वाटतो! अगदी स्वाभाविकच आहे हे असे आम्हाला वाटते ना! मग आमच्या आयुष्यातल्या गोष्टी आम्हाला महाराजांनी दिल्या आहेत असे आम्हाला convincingly का वाटत नाही? त्यांची किंमत महाराजांनी दिलेल्या वस्तूंइतकी देखील का वाटत नाही? याचे मुख्य कारण म्हणजे जिथे आमच्या अहंकाराला अडथळा येणाऱ्या व्यक्ती वा परिस्थितीच्या प्रतिक्रिया आम्हाला लगेच मिळतात तिथे आम्हाला ठेच बसते व आम्ही आमचा स्वार्थ जपत आयुष्यभर एका मोहनिद्रेत जगतो. महाराजांची / भगवंतांची / त्यांच्या प्रतिरूप वस्तूंची reaction – प्रतिक्रिया आम्हाला आम्ही चर्मचक्षूंनी बघत असल्यामुळे कळत नाही आणि त्यामुळे आम्ही आमचे त्यांच्यावर प्रेम आहे या भ्रमात जगतो!

 

आजच्या वचनात महाराज आम्हाला जागे करतात व सांगतात, नाम साधनात आहात याचा अर्थ तुमचा विवेक आणि विचार शाबूत असावा. एका थोर तत्त्वज्ञान्याने म्हटले आहे, भगवंत – जो सच्चिदानंद (सत – चित – आनंद) आहे तो कुठे आहे? You will not find God separately but He is looking at you through the apertures around you. तुमच्या आजूबाजूच्या लोकांमधून, वस्तूंमधून, परिस्थितीमधून तुमचा भगवंत तुमच्याकडे बघत असतो. सर्वांभूती भगवंत ही संतांची अनुभूती असेल पण साधकासाठी तो अभ्यास आहे. त्या अभ्यासातूनच त्या अतिदिव्य अनुभूतीचे अधिकारी आम्ही बनू.

 

महाराजांचे नेहमीच एक म्हणणे आहे, तुमचा परमार्थ अथवा वेदांत रोजच्या आचरणात आला पाहिजे. सिद्धांत व्यवहारात आणणे म्हणजे परमार्थ असे ते म्हणतात. आणि प्रेमाशिवाय कोणत्याच सिद्धांताला काहीही किंमत नाही हे त्रिवार सत्य सर्व संतांनी सांगितले. जो याचा आसक्तिरहित अर्थ समजून आचरणात आणेल त्याला परमार्थासाठी निराळे कष्ट करण्याची फारशी गरज भासणार नाही, कारण आपण सर्वार्थाने अतिश्रीमंत, ऐश्वर्यसंपन्न अशा श्रीमहाराजांची लेकरे आहोत आणि त्यांच्या प्रेमाच्या जहागिरीचे वंशपरंपरेने अधिकारीही! हे समजून, त्यावर दृढ विश्वास ठेवून नाम जपणाऱ्या साधकाचे साधन ते फुलाप्रमाणे जपतात हे निश्चित!

 

|| श्रीनाम समर्थ ||