Friday, July 31, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६३ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६३ –

निद्रानाशाचा रोग झाला तर झोप लागेपर्यंत जसे झोपेचे औषध आपण घेतो, तसे आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतले पाहिजे.

श्रीराम!
मागच्या वचनामध्ये श्रीमहाराजांनी आम्हाला “नाम ही महौषधी आहे” असे सांगितले आणि पथ्य सांभाळून घेणाऱ्याला त्याचा गुण लवकर येईल असेही सांगितले. आजच्या बोधवचनात ‘गुण येणे’ म्हणजे काय हे महाराज विशद करताहेत. जसे आपण आधीच्याही बऱ्याच वचनांमध्ये बघितले, श्रीमहाराज आधल्या मधल्या अनुभवांबद्दल बोलणे पसंत करत नाहीत. त्यांचे असे स्पष्ट मत आहे की थोड्या थोडक्या नामाच्या अनुभवांमध्ये जो अडकला तो शाश्वताला मुकला. अनुभव केवळ मैलाचे दगड आहेत आणि आम्ही मार्गावर आहोत हे दाखवतात; मात्र त्याचे महत्त्व तेवढेच. जसे, नासाग्री दृष्टी ठेवून साधन करणाऱ्याला सहजच काही महिन्यात सुगंध येऊ लागतो. काहींना ज्योत दर्शन होते, विविध Mystic Experiences येणाऱ्यांची कमी नाही. पण आमचे महाराज मात्र या सर्व अनुभवांमधून दोन महत्त्वाच्या गोष्टी तपासायला सांगतात –
१) आमची वृत्ति शुद्ध होत गेली का? जेणेकरून विकार आणि विचार कमी होऊन विचारांची दिशा भगवंताकडे वळली का?
२) कोणत्याही परिस्थितीत आम्ही क्षोभित न होता मनाची सम स्थिती टिकली का?
यांना श्रीमहाराज खऱ्या अर्थाने नामाचे अनुभव म्हणून संबोधतात.

म्हणून आजच्या वचनात श्रीमहाराजांनी “स्वाभाविक समाधान” ही शब्दयोजना केली आहे. महाराजांचा एकही शब्द उगीच वापरलेला नसतो. त्यामागे त्यांची दृढ अध्यात्मिक भूमिका आणि केवळ अंतिम सत्याबद्दल असलेली आस्था प्रतीत होते. स्वाभाविक म्हणजे जे स्वभावतःच आहे ते. मनुष्य स्वतःचे समाधान स्वरूप विसरल्याने इतस्ततः धावतो आहे असे महाराजांचे म्हणणे आहे. मूळ सच्चिदानंद (Being – Consciousness – Bliss) असलेला जीव पंचमहाभूतांना त्या शाश्वताचा विलास न मानता त्या भूतांनाच खरे मानू लागला आणि त्यायोगे त्यांमध्ये गुरफटला. नाम हेच ते सच्चिदानंद परब्रह्म आहे हा अनुभव संतांनी घेतला आणि म्हणून मुळात सर्व शक्तींचा साठा असलेले नाम त्यांच्या आत्मिक प्रेमशक्तीने युक्त करून आम्हाला दिले व कृतकृत्य केले. परंतु सुरुवातीला बहुतेक नामधारकांना त्या नामाच्या शक्तीची – त्याच्या खऱ्या स्वरूपाची कल्पना नसते आणि ते साहजिक आहे, कारण आम्हाला लौकिक मोजमापात प्रत्येक गोष्ट मोजण्याची सवय झालेली असते व सद्गुरू प्रदत्त नाम हे सगळ्याच्या पलीकडचे असे आत्मतत्त्व असल्याने देहबुद्धीत असेतोवर नामाचे खरे महत्त्व कळणे दुरापास्त आहे.

म्हणून आज श्रीमहाराज सांगताहेत, नाम कधीपर्यंत घेणे जरूर आहे? तर जोवर तुमचा असमाधानाचा रोग पूर्णपणे नाहीसा झाला नाही, तोवर घेणे जरूर आहे – समाधान मिळेपर्यंत घेणे जरूर आहे. आजच्या घडीला आम्हाला प्रत्येकालाच हा अनुभव आहे की असमाधान हे सर्व शारीरिक व मानसिक रोगांचे मूळ आहे. असमाधानाचे मूळ कशात आहे याचा विचार केला तर सहज समजून येते, की ते आमच्या विविध प्रकारच्या वासना व कामना यांमध्ये आहे. या वासनांचे मूळ कशात आहे? तर आमच्या अपूर्णपणाच्या भावनेत आहे. अमुक वस्तू, व्यक्ती, परिस्थिती मिळाली तर मी सुखी होईन ही भावना या सर्व वासनांचे मूळ आहे. मात्र श्रीमहाराज म्हणतात तसे, “शंभर वेडे एकत्र केले तर एक शहाणा तयार होईल का?” हे जसे शक्य नाही, तसे कितीही अपूर्ण वस्तु एकत्र केल्या तरी त्यातून एक पूर्ण वस्तु संभवत नाही आणि त्यामुळे जीव कधीही समाधान पावत नाही.

त्यामुळे आजच्या वचनात श्रीमहाराज आम्हाला खरे तर आम्ही योग्य मार्गावर आहोत किंवा नाही हे तपासण्याची खूण सांगताहेत.
१) आमचे लौकिक गोष्टींबद्दलचे समाधान वर्धिष्णू होत असेल,
२) कोणत्याही बाबतीत आमच्या तक्रारी कमी कमी होत असतील,
३) मनाचा क्षोभ आणि संसारिक विचार व विकार कमी कमी होत असतील,
४) आमची स्वार्थबुद्धी कमी होऊन आम्ही इतरांच्या हिताचा विचार आमच्या हिताच्या आधी करत असू आणि याची सुरुवात घरापासून करत असू,
५) मनाची एक स्वाभाविक स्थिर वृत्ति जाणवत असेल,
६) कोणत्याही बाबतीतले भय उरले नसेल,
७) आमची उपासना वाढत्या अंगाने निष्काम होत असेल,

तर आम्ही महाराजांनी वर्णन केलेल्या “स्वाभाविक समाधानाच्या” निकट चाललो आहोत असे म्हणावयास हरकत नाही. यामध्ये आमच्या भाग्याची परमावधी ही आहे की सद्गुरूंनी दिलेले नाम आम्ही जर मनापासून पथ्य सांभाळून जपले, तर त्या एका नामात वरील सर्व साधण्याची शक्ती आहे. इतर साधनाची आटाआटी करणे महाराजांना पसंत नाही. ते म्हणतात एके ठिकाणी,
“अनेक मते अनेक साधने| हजारो प्रकारच्या क्रिया जाण||
एकच त्यांचा हेतू| एकच त्यांचे कारण|
घडावी दोषनिवृत्ति| व्हावी परमेश्वरप्राप्ति||”
त्यामुळे ते म्हणतात, “सत्याची ही खाण रामनाम!”

ज्याने यावर श्रद्धा ठेवून नाम जपण्यास सुरुवात केली, त्याच्या या श्रद्धेचे रूपांतर “नाम हेच ते अंतिम सत्य आहे या “ज्ञानात” झाल्याशिवाय राहणार नाही हा महाराजांचा दावा आहे. त्यांच्या कृपेवर दृढ निष्ठा ठेवून त्याची अनुभूती घेण्यासाठी आसुसणे यासारखे पुण्य नाही!

||श्रीनाम समर्थ||

Thursday, July 30, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६२ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६२ –

विद्वान आणि अडाणी, श्रीमंत आणि गरीब, सर्वांना नाम हे औषध सारखेच आहे. पण जो पथ्य सांभाळून औषध घेईल त्याला गुण लवकर येईल. नाम महौषधि आहे.

श्रीराम!
जे भेदरहित असते त्यालाच ज्ञान म्हणतात. समुद्रातली लाट एकदा गर्वाने फुगली. आपल्या समोरच्या लहान लाटेला म्हणाली, मी बघ किती मोठी आहे आणि तू इवलीशी! एवढ्यात तिच्याहून मोठी लाट तिला दिसली आणि मग तिचा मत्सर जागृत झाला. ती स्वतःच्या रूपाकडे बघू लागली व जळू लागली. असे वेगवेगळे मनाचे भाव तिच्यात उदय अस्त पावत असतानाच तिला अचानक किनारा दिसू लागला आणि ती आपल्या मृत्युच्या भीतीने घाबरली. आता माझा अंत होणार असे वाटून जेव्हा ती समुद्राला शरण आली तेव्हा समुद्र तिला म्हणाला, अगं, ती मोठी लाट, ही लहान लाट, तू आणि मी या सर्वात काय आहे? तिला उमजेना तेव्हा तो सागर म्हणाला, “पाणी” हेच ते एकमेव सत्य आहे जे तुझ्यात, त्यांच्यात आणि माझ्यात भरून आहे. आपले वेगळे अस्तित्व आहे कुठे पाण्याशिवाय? पाणी आहे म्हणून आपण आहोत आणि वर, खाली, आतमध्ये फक्त पाण्यानेच भरलेले आहोत; मग तुझ्यात आणि त्यांच्यात आणि माझ्यातही भेद राहिला कुठे? त्या लाटा म्हणजे आम्ही सगळे आणि तो समुद्र म्हणजे सद्गुरू, जे आम्हाला आमच्या एकत्वाची आठवण आणि अनुभव देतात. आमच्या आजाराचे मूळच या भेद्पूर्ण नजरेमध्ये आहे आणि त्यामुळेच आम्हाला आमच्या अंतिम अनुभूतीपर्यंत पोहोचवणारे, आमच्या आजारातून कायमचे मुक्त करणारे औषध असेच हवे जे भेदरहित आहे.

त्याच औषधाला श्रीमहाराज “नाम” असे म्हणतात. म्हणून आजच्या वचनात श्रीमहाराज आम्हाला नामाच्या भेदरहित संज्ञेची ओळख करून देताहेत. श्रीमंत गरीब, विद्वान अडाणी हे तर केवळ स्थूल भेद झाले. अगदी सूक्ष्म भेदांमध्ये देखील नामात फरक नाही. पूज्य बाबा नामचंद्रिकेत म्हणतात ना,
“सर्व साधन हीनानां नामैव आलम्बनं परम्|
सर्व साधन मुक्तानां नामैव आलम्बनं पुनः||”
-- महाराज जे म्हणताहेत की नामसाधनेला कोणताही भेद नाही, तो स्थूल भेद तर आपण बघितला परंतु या वरच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे सूक्ष्म भेद देखील नाही. अजूनही साधनाला सुरुवात केलेली नाही त्याने तर नामाचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे; परंतु, जो सर्व साधन करून मुक्कामी पोहोचला त्याला देखील नामाशिवाय गत्यंतर नाही – चैन पडणार नाही. अशा रीतीने सर्वार्थाने भेदरहित असेल तर ते नामसाधनच आहे, कारण नाम हेच ते परम सत्य साध्य आहे!

हे आम्हाला कळण्यासाठी श्रीमहाराज आजच्या वचनात आम्हाला हे देखील सांगताहेत की, जो पथ्य सांभाळून औषध घेईल, त्याला गुण लवकर येईल. आमचे तुकाराम महाराज म्हणतातच, “जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी| तेणे पथ्येही सांभाळावी||” वैद्यक शास्त्रात कितीही औषध योजना करून गुण येईनासा झाला की डॉक्टर लोक maintaining cause काय आहे याचा शोध घेतात. म्हणजे, जर सर्दी झालेली असेल आणि औषध घेऊन पुन्हा तो रोगी पावसात जाऊन उभा राहिला तर त्याच्या बरे ना होण्यामागे पाऊस हा maintaining cause झाला. तद्वत, कितीही नाम घेऊन आम्हाला साधत नाही, मनाचे समाधान वर्धिष्णू होत नाही असे वाटत असेल तर कोणतातरी maintaining cause आहे जो त्या समाधानाच्या आड येतो आहे हे निश्चित असे श्रीमहाराज म्हणतात. आता हे ओळखायचे कसे? तर जे गुरूंना आवडते ते करणे, जे गुरूंना आवडत नाही ते टाळणे हेच पथ्य म्हणता येईल.

श्रीमहाराजांना काय आवडते आणि काय आवडत नाही याचा योग्य अभ्यास करून ते आचरणात आणणे हाच एक उपाय आहे.

तदनुसार –

या वरच्या गोष्टी जर आम्ही लक्षात ठेवल्या व साधन दृष्टीने त्यांचे महत्त्व ध्यानात घेतले तर आम्हाला आमच्या नामात एकाग्रता साधेल. मात्र साधन दृष्ट्या त्यांचे महत्त्व समजून घेणे म्हणजे खऱ्या अर्थाने श्रीमहाराज म्हणतात तसे “परमार्थ समजून” करणे होय. उदाहरणार्थ, सर्वांबरोबर गोड बोलणे आणि लोक जोडण्याची कला ही लौकिक दृष्टीने फक्त सांगितलेली नाही, तर आमच्या चित्तशुद्धीसाठी सांगितली आहे, ज्यायोगे चुकीच्या कर्माने आमचे मन दुषित न होता, लोकांबद्दल आमच्या व्यवहाराचा विचार आमच्या मनात गर्दी न करता आमचे लक्ष साधनाकडे लागावे. हे समजून ते आचरणे म्हणजे नामाचे पथ्य पाळणे होय. प्रामुख्याने साधनाच्या सुरुवातीच्या काळात या वरील गोष्टींचे महत्त्व जास्त आहे. एकदा साधन सुरु झाले, म्हणजे खऱ्या अर्थाने दोनच मुख्य पथ्ये श्रीमहाराज सांगतात, ती म्हणजे, अखंड भगवंताचे स्मरण टिकवणे आणि विस्मरण सावधपणे टाळणे. या अनुषंगाने ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या पथ्यामधे मोडतात. म्हणजेच बहिर्मुखता कमी कमी होते आहे की नाही याकडे लक्ष ठेवणे आणि अंतर्मुखता वाढून नामात मन गोळा होते आहे की नाही याबद्दल जागरुकता. असे पथ्य पाळणाऱ्या साधकास नामाचा अनुभव – म्हणजे समाधान – लवकर साधेल असा विश्वास श्रीमहाराज आम्हाला देतात. त्यांचे म्हणणे हेच की नाम हीच ती महौषधी आहे जी तुम्हाला या अशाश्वत विश्वातून मनाने बाहेर काढून शाश्वताची ओढ लावेल आणि एकदा ओढ लागली की तेच नाम साध्यरूपाने – नामीच्या – अंतिम सत्याच्या - रूपाने तुमच्या हृदयाकाशी स्थित होईल!

||श्रीनाम समर्थ||

Tuesday, July 28, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६१ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६१ –

नामाचे औषध थेंब थेंब पोटात घेत असावे. ऑफिसमध्येसुद्धा आपण ते बरोबर घेऊन जावे. इतर औषधे (म्हणजे साधने) आपल्याला लागू पडणार नाहीत. ती वेळच्या वेळी घेतली पाहिजेत आणि बरोबर पोटात गेली पाहिजेत. तसेच ती कडू असली तरी आपल्याला रुचली पाहिजेत. शिवाय, ती रक्तामध्ये मिसळायला वेळ लागणारच. पण नामाचे तसे नाही. ते ताबडतोब रक्तामध्ये मिसळते.

श्रीराम!
जशी व्याधी तसा उपचार हवा हे सार्वकालिक सत्य आहे. या भवामध्ये आमची खरी व्याधी एकच आहे आणि ती म्हणजे अज्ञान! ज्ञान होते म्हणजे काय होते? काही नवीन गोष्ट मिळते का? तर नाही. ज्ञान होते याला वेदांतात व्याख्या आहे, “प्राप्तस्य प्राप्ति: निवृत्तस्य निवृत्तिः”. म्हणजे जे सदा सर्वकाळ आहेच तेच (सत्य आहे हे कळल्यामुळे) प्राप्त होते व जे नव्हतेच ते निघून जाते – नाहीसे होते. खऱ्या ‘मी’ ची ओळख होणे हे सर्व परमार्थाचे सार आहे. तू हा देह अथवा मन नसून आत्मा आहेस, त्या सच्चिदानंद परमात्म्याचा अंश आहेस याची शब्दापलीकडील अनुभूती म्हणजे ज्ञान! मग आमच्या अज्ञानाची व्याधी ही ज्ञानानेच नाहीशी होईल हे सत्य यातून आम्हाला उमगले. मग हे ज्ञान होण्याला बाधा कोणती आहे? दोन बाधा आहेत असे उपनिषदे सांगतात – १) विक्षेप (आमच्या मनाचे चांचल्य किंवा विखुरलेपणा) आणि २) अंतःकरणाची अशुद्धी. याचाच अर्थ या अज्ञानाच्या व्याधीपासून मुक्तता होण्यासाठी त्याच्या कारणांवर घाव घालणे जरूर आहे. अगदी शारीरिक रोगांच्या उपचारशास्त्रात देखील ‘रोगाच्या कारणमीमांसेला आणि तदनुरूप केलेल्या उपचारालाच’ अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे आजच्या वचनात श्रीमहाराज भवरोगाच्या कारणमीमांसेला तर्कसंगत असे औषध सांगतात.

डॉक्टर जेव्हा औषध देतात, तेव्हा ते केवळ औषध घ्या असे सांगत नाहीत तर कसे घ्यायचे, केव्हा घ्यायचे, पथ्य काय करायचे या गोष्टीही सांगतात. आमचे श्रीमहाराज केवळ शरीराचेच नव्हे तर मन बुद्धी अंतःकरणाचे डॉक्टर आहेत आणि त्यामुळे ते औषधासोबत ज्याला आधुनिक वैद्यकशास्त्र Auxiliary Regimen म्हणते, ते जास्त महत्त्व देऊन सांगतात. “नामाचे औषध थेंब थेंब पोटात घेत असावे!” हे एक वाक्य जो आचरणात आणू शकेल त्याला इतर काहीही करण्याची आवश्यकताच नाही. सबंध अध्यात्मिक आयुष्याचे सार आहे हे वाक्य. पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, साधकाने एखादा दिवस भरपूर दिवसभर नाम जपले व पुढे काही दिवस काहीच झाले नाही असे उपयोगाचे नाही. नामाचा अभ्यास हा दृढ नेमाने नित्यक्रमात दैनंदिनीत बसवला पाहिजे. एवढेच नव्हे तर महाराज म्हणतात, दिवसाकाठी काही वेळ नाम जपले आणि पुन्हा आता दुसऱ्या दिवसापर्यंत नामाचा आणि माझा संबंध नाही असे होता कामा नये. यालाच नामाचे अनुसंधान टिकवणे म्हणता येईल. गुरु नानक जसे म्हणत, “भांग तमाखू धत्तुरा उतर जात परभात| नाम खुमारी नानका चढी रही दिनरात||अशी नामाची खुमारी चढण्याकरिता थेंब थेंब नाम सदोदित जिभेवर रेंगाळले पाहिजे. असे झाल्याशिवाय स्थळ- काळ- निमित्त यांच्या पलीकडे असलेल्या परमात्म्याशी संधान कसे शक्य आहे असे संत विचारतात. गुरुदेव रानडे आपली अवस्था सांगताना एकदा म्हणाले, “न कळे दिवसराती| अखंड लागलीसे ज्योती||” नामाच्या अखंड नेमाचा – कट्टाच्या नामाचा प्रभाव आहे हा!

अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे श्रीमहाराज नामाचे औषध “पोटात” घ्यायला सांगत आहेत; त्यांनी मनात घ्यावे, हृदयात घ्यावे म्हटलेले नाही. याचे कारण काय? केवळ औषधाची उपमा आहे म्हणून ते तसे नाही. महाराज म्हणायचे, वासना बेंबीपाशी असतात. त्यामुळे नामाचे अखंड स्मरण – चिंतन हे बेंबीपर्यंत पोहोचले की वासना नाहीशा व्हायला सुरुवात होते. आपण वर जी विक्षेप आणि चित्ताची अशुद्धी ही अज्ञानाची कारणे बघितली ती नाहीशी करण्याचा मार्ग जणू महाराज यातून आम्हाला सांगत आहेत. परंतु, असे नाम घ्यायचे कसे? तर, आत्यंतिक त्रासात, संकटात किंवा भयग्रस्त अवस्थेत जसा मनुष्य देवाचा धावा करतो, बेंबीच्या देठापासून त्याला साद घालतो, तसा भाव नाम घेताना – मी या भवामध्ये अडकलो आहे, सोडव मला यातून आणि तुझ्या चरणांचे प्रेम दे अशी साद भगवंताला जो घालेल त्याचे नामाचे औषध “पोटात” जाईल व वासनांचा समूळ नायनाट करेल!

हे सांगून महाराज आम्हाला नामाच्या सुलभतेबद्दल सांगत आहेत. इतर साधने तुम्हाला पचणार नाहीत असे आमच्या आजच्या दैनंदिन कामकाजाला, आमच्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीला बघता महाराज आम्हाला सांगत आहेत. त्या ऐवजी कोणतीच उपाधि नसलेले नाम आम्ही कुठेही कधीही आमच्या सोबत घेऊन जाऊ शकतो. महाराज ऑफिसला घेऊन जायला सुचवताहेत. ते म्हणायचे, “कोणतेही काम सुरु करण्या अगोदर आणि कामाच्या शेवटी नामाचे स्मरण करावे – नाम जपावे, म्हणजे मग कामाच्या मध्ये नाम टिकते.” यातून अजून एक महत्त्वाची गोष्ट साधते, ती म्हणजे, नामाच्या संगतीने आमचे काम झाल्याने ते कर्म सहजच भगवंताला अर्पण होते व त्यातील ‘मी कर्ता’ हा भाव जाऊन ‘राम कर्ता’ हा भाव मनात उमटतो.

जसे डॉक्टर पथ्य सांगतात, तसे श्रीमहाराज आम्हाला हे देखील सांगताहेत की इतर साधने – इतर औषधे घेऊ नयेत. ती आपल्याला लागू पडणार नाहीत. ती आपल्याला रुचणार नाहीत; कारण आज आमचे जीवन ऋषीमुनींच्या जीवनाएवढे पवित्र, शांत, निर्दोष नाही. त्यामुळे ज्या साधनांमध्ये बऱ्याच विधि-निषेधांचे पालन आवश्यक आहे, ती साधने आम्हाला फारशी उपयोगाची नाहीत. कारण अनेकदा त्या उपाधींमध्येच मन अडकल्याने इतर मार्गांचे साधक अंतःकरणाची शुद्धी सहज प्राप्त करू शकत नाहीत. या उलट अंतःकरणाची शुद्धी ही नामाच्या – भगवंताच्या स्मरणाने मीपणा हळूहळू गळून गेल्यामुळे शरणागत भावाने सहजच साधते. सद्गुरूंनी दिलेल्या नामाची शक्ती आहे ही आणि केवळ अनुभूतीनेच त्याचे महत्त्व कळू शकते. आणि म्हणून श्रीमहाराज शेवटी सांगताहेत, नाम रक्तात लवकर मिसळते. कारण रक्तच काय पण शरीरातला, शरीरा बाहेरचा, अवकाशातला अणुरेणु नामानेच भरून आहे हे त्रिवार सत्य आहे! “Silence of the Universe” म्हणजे इतर काही नसून सर्वत्र भरून उरलेले नाम आहे! त्यामुळे ज्याने नामाचा आश्रय घेतला, त्याला त्या शाश्वत शांतीची चुणूक आल्याशिवाय राहत नाही. मग जी भवरोगाच्या व्याधीची कारणे आहेत, विक्षेप आणि अशुद्धी ती सहजीच त्या नामाच्या स्पंदनांमध्ये विरून जातात व तो साधक शुद्ध आत्मतत्त्वात विलीन होतो!

||श्रीनाम समर्थ||

Monday, July 20, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६० --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६० –

भगवंताचे नाम हे औषध समजावे; भगवंताची प्राप्ति हे त्याचे फल; जरूर तेवढे करणे, म्हणजेच सांगितलेले तेवढेच करणे आणि जास्त न करणे, हे त्याचे अनुपान होय. औषध मात्र थेंबथेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे!

श्रीराम!
संतश्रेष्ठ तुलसीदास रामचरितमानस मध्ये म्हणतात,
“जासु नाम भव भेषज हरन घोर त्रय सूल|
सो कृपाल मोहि तो पर सदा रहउ अनुकूल||”
-- ज्या प्रभू रामचंद्रांचे नाम हे भवताप निवारणारे सिद्ध औषध आहे, त्रिविध (आधिभौतिक, आधिदैविक, अध्यात्मिक) ताप दूर करणारे आहे, असे ते कृपाळू प्रभू आपल्यावर सदा सर्वदा अनुकूल राहोत.

समुद्रमंथनामध्ये जेव्हा धन्वंतरी प्रकट झाले, तेव्हा त्यांनी देवता आणि ऋषींना वेगवेगळी औषधी, रोगांचे निदान आणि उपचार यांबद्दल सांगितले. तेव्हा सर्व रोगांवर समान आणि सफलतापूर्वक काम करणाऱ्या महौषधी बद्दलही सांगितले. म्हणाले,
अच्युतानन्तगोविन्द नामोच्चारणभेषजात् |
नश्यन्ति सकला रोगाः सत्यं सत्यं वदाम्यहम् ||”

अशा रीतीने लौकिक व अलौकिक सर्व व्याधींवर रामनाम हेच औषध आहे असे सर्व संतांनी आपल्या दिव्य अनुभूतीने सांगितले. श्रीमहाराजांनी नेहमीच निष्काम भक्तीचे प्रतिपादन केले व म्हणाले, निष्कामतेशिवाय परमार्थ नाही. आणि त्यामुळेच आजच्या वचनात श्रीमहाराज म्हणतात, या औषधाचे फळ कोणते? तर – भगवंताची प्राप्ती. अनेक ठिकाणी श्रीमहाराजांनी सांगितले, अखंड समाधान हेच ईश्वर दर्शन. त्यामुळे या रामबाण औषधाचा परिणाम म्हणजे कोणत्याही परिस्थितीत अभंग राहणारे समाधान.

मात्र आजच्या वचनात श्रीमहाराजांनी साधक आणि बाधक गोष्टी थोडक्यात सांगितल्या. या गोष्टी समजून घेण्याचे मूळ कोणते? तर, “सदगुर बैद बचन बिस्वासा| संजम यह न बिषय कै आसा|| (संत तुलसीदास)” – सद्गुरू रूपी वैद्याच्या शब्दांवर विश्वास ठेवावा; विषयांची आशा धरू नये, हेच पथ्य आहे. आमची पंचाईत ही आहे की आम्हाला फक्त शरीराचा रोग तेवढाच दिसतो, मन बुद्धी चित्ताला जडलेला जन्मोजन्मीचा रोग न दिसल्यामुळे सद्गुरूंची कृपा आम्हाला फक्त तेव्हाच जाणवते जेव्हा कोणत्याही गोष्टीत या जगामध्ये आम्हाला सुख-समाधान लाभते. आजच्या घडीला जेव्हा सबंध जग विषाणूच्या विळख्यात अडकलेले आहे, तेव्हा देखील जर ती बाधा झाली नाही तर आमच्यावर महाराजांची कृपा या संकुचित विचारापर्यंत आम्ही येऊन ठेपतो. आजच्या वचनात रामनामाचा परिणाम सांगून श्रीमहाराज आम्हाला या तथाकथित गोष्टींपासून दूर राहण्यास सांगतात. अधल्यामधल्या कृपेबद्दल, परिणामांबद्दल आमचे श्रीमहाराज बोलतच नाहीत; किंवा कुणीही संत बोलत नाहीत. त्यांचे म्हणणे एकच. नश्वर गोष्टीत कमीजास्त व्हायचेच; जे शाश्वत आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करा, तरच कायमचे समाधान लाभेल; नाही तर भयाच्या विळख्यातून तुम्ही कधीही बाहेर पडू शकणार नाही!

आजच्या वचनाची गंमत अशी की श्रीमहाराज आम्हाला “सांगतो तेवढेच करा” असे सरळ सरळ सांगत आहेत. ते अनेकदा म्हणत, “मी सांगतो त्यापेक्षा जास्त तरी करतात नाहीतर कमी तरी करतात; सांगतो तेवढेच कुणी करत नाही.” आजच्या वचनात यालाच श्रीमहाराज अनुपान - पथ्य म्हणताहेत. सद्गुरूंची वचने म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची वचने. आपले पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, ‘त्यातला एक शब्द देखील इकडचा तिकडे होऊ नये; त्यासारखे पाप नाही!’ सद्गुरूंच्या वचनांची किंमत त्यांच्या अशा थोर सत्शिष्यानाच असते. शब्दच नव्हे तर प्रत्येक अक्षर त्यांच्यासाठी ‘चिदानंदमय सत्प्रकाश’ असतो. त्यामुळेच त्या वचनांना अक्षरशः पाळणे व त्यांवर चिंतन करणे या गोष्टी त्यांच्या साधनेला बळकटी आणतात.

पूज्य कुर्तकोटी म्हणायचे, श्रीमहाराज प्रत्यक्ष वेदांत बोलायचे; मात्र ते इतक्या साध्या आणि सोप्या भाषेत असायचे की वरवर ऐकणाऱ्याला वाटे, हे तर साधा प्रपंच बोलत आहेत. पण जेव्हा त्यावर विचार व्हायचा तेव्हा समजायचे. सद्वस्तु एकच आहे ना? ॐकारातून उगम पावलेले भगवंताचे नाम हीच ती सद्वस्तु होय असे श्रीमहाराज परोपरीने सांगत. परमार्थात अनन्यतेला महत्त्व आहे ना? त्याशिवाय परमार्थ पथिक मुक्कामी काय पण मार्गस्थ देखील होऊ शकणार नाही. मग ही अनन्यता त्या सद्वस्तुच्या प्रति असल्याखेरीज आम्ही मार्गावर चालणार कसे? आणि ही अनन्यता त्या नामाप्रती दृढ होण्याकरिता श्रीमहाराज सांगत आहेत, “औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे.” याला संत तैलधाराव्रत नामस्मरण असे म्हणतात. श्रीमहाराज याबाबत खूप सावध राहावयास सांगतात. म्हणजे, दिवसातील काही वेळ आम्ही आमचा नामाचा नेम पूर्ण केला, आता पुन्हा दिवसभर नामाचा आणि माझा संबंध नाही, असे होऊ नये. तरच नाम भावनेत – भगवत भावनेत राहणे शक्य होईल. परमार्थ हा जोड धंदा नसून मुख्य धंदा आहे असे श्रीमहाराज सांगतात. नामाभोवती आमच्या सर्व वृत्ति घुटमळत राहणे आवश्यक आहे. तरच वृत्ति उठतील त्या नामाला घेऊन उठतील अशी सर्व संतांची अनुभूती आहे. आणि हे होण्यासाठी उगीच साधनेचा व्याप वाढवून साधकाला चालणार नाही असेच श्रीमहाराज आज आम्हाला सांगत आहेत. व्याप वाढला की ताप वाढतो, कारण तो व्याप पचवण्याची शक्ती आमच्यात नसते. त्या ऐवजी जर केवळ गुरुवचन हेच प्रमाण मानून आम्ही मार्गक्रमण केले तर मात्र सहजच आणि लवकरच आम्ही नामात दृढ होऊ. जे काही वाचन / श्रावण / मनन करायचे ते करताना त्यातून आमचे नाम साधन आणि भगवंताचे स्मरण दृढ होते आहे की नाही याचा सूक्ष्म विचार प्रत्येकाने करणे अनिवार्य आहे. हे करणाऱ्याला सहजीच नाम भावनेत स्थिरावणे जमेल.

पुन्हा तुलसीदासच आठवतात,
“रघुपति भगति सजीवन मूरी|
अनूपान श्रद्धा मति पूरी||
एहि बिधि भलेहिं सो रोग नसाहीं|
नाहिं त जतन कोटि नहिं जाही||”
-- (रामनामाने साधणारी) रघुपतींची भक्ति हीच संजीवनी मुळी आहे. संपूर्ण बुद्धीनिशी यावर श्रद्धा असणे हेच ते साधण्याचे पथ्य आहे असा ‘योग’ ज्याला साधतो, त्याचाच (भव)रोग नष्ट होईल. नाहीतर कोट्यावधी उपाय करून देखील रोग नाहीसा होणार नाही!

||श्रीनाम समर्थ||

Wednesday, July 15, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५९ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५९ –

‘भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही’, असे ज्याला कळले त्याला सर्व कळले.

श्रीराम!
पूर्वीच्या काळी (काही ठिकाणी अजूनही) पहाटे ‘वासुदेव’ यायचे. निद्राधीन लोकांना जणू जागे करून भक्तिरसात न्हाऊ घालण्याचेच त्यांचे काम. पारमार्थिक जगात संत या वासुदेवाचे कार्य करतात. दृश्याच्या निद्रेत निजलेल्यांना जागे करून शाश्वत प्रकाशाचा मार्ग दाखवतात. आपल्या श्रेष्ठ संतांनी असे काही अभंग रचले, ज्यांना देखील ‘वासुदेवी अभंग’ म्हटले गेले. संतश्रेष्ठ नामदेव अशाच एका वासुदेव अभंगात म्हणतात,

“बाबा अहंकार निशी घनदाट|
गुरुवचनी फुटली पहाट||
भक्ति भेटली बरवंट|
तिने मार्ग दाविला चोखट गा||”

आजच्या श्रीमहाराजांच्या वचनात “कळणे” हा शब्द तीन वेळा आला आहे. म्हणजेच भगवंताचे स्वरूप ‘न कळणे’ हीच परमार्थ मार्गातली धोंड आहे. वेदांत ज्याला ‘अज्ञान – Ignorance’ म्हणतो तो हाच. आणि नामदेव महाराज म्हणताहेत, हे जे अज्ञान आहे, ते अहंकाराच्या घनदाट अंधःकारामुळे आहे. मात्र या घनदाट अंधःकारावर एक चोख इलाज आहे – “गुरुवचन”!
सद्गुरू लीलामृतात चवथ्या अध्यायात आपण वाचतो,
“गुरुवचन तो वेदांत| गुरुसेवा हा धादांत|
गुरुकृपा तोचि सिद्धांत| गुरुपुत्रासी||”
म्हणजेच तथाकथित मायेचा पडदा भेदण्यासाठी केवळ गुरुवचन प्रमाण मानून जो शिष्य मार्गक्रमण करेल त्यालाच “कळेल”!

आणि श्रीमहाराज म्हणतात,
“नामापरते सत्य न मानावे!”

असे म्हटले जाते, संत आयुष्यभर जे बोलतात ते तर महत्त्वाचे असतेच; परंतु या भूलोकातील देहाचे कार्य संपवताना ते जे बोलतात, त्याला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. श्रीमहाराज देह त्याग करताना म्हणाले,
“जेथे नाम तेथे माझे प्राण| ही सांभाळावी खूण||”

या सर्व गोष्टी एकाच दिशेकडे बोट करतात – नाम हेच भक्ताचे सर्वस्व आहे – असावे – व्हावे. परमार्थ मार्ग अनेक आहेत. मात्र सर्व मार्गातील संत एका गोष्टीवर ठाम आहेत, की शरणागती शिवाय ज्ञान नाही. आणि जेव्हा या शरणागती बद्दल शास्त्रीय दृष्टीने विचार झाला तेव्हा देखील सर्व संतांच्या लक्षात एकच गोष्ट आली जी त्यांनी अनुभवली - भगवंताचे नाम, ज्याचा उगम परा वाणीतल्या ॐकारापासून झाला, ज्याने सगुण साकार भगवंताला त्याच्या निर्गुण निराकार स्वरूपाशी सांधले, त्याचाच आधार घेणे क्रमप्राप्त आहे. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महायोग्याने ग्वाही दिली, “म्हणोनि नाम वज्रकवच| तोचि निर्गुणाचा अभ्यास||” आणि स्पष्ट सांगितले, “नाम अनुभव वेदांचा!” श्रीमहाराज म्हणतात, तुम्हाला नामाचे – खऱ्या साधन मार्गाचे व साध्याचे सम्यक ज्ञान देण्यात संतांचा काय स्वार्थ होता? ज्याचा त्यांना फायदा झाला व ते “जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनं” यातून मुक्त झाले, त्याचा फायदा जगताला मिळून अनेकांचा उद्धार व्हावा ही एकच तळमळ त्यांना होती! आम्ही न बघितलेल्या परंतु विज्ञानाने सिद्ध केलेल्या सिद्धांतावर विश्वास ठेवतो, मग संतांनी ज्याचा चोख अनुभव घेतला त्यावर सुरुवातीला विश्वास ठेवून मार्ग अक्रमण्यात गैर काय? नामाशिवाय कोणत्याही साधनाने संपूर्ण अहंकाराचा लय आणि त्यापुढे जाऊन भगवंताचे प्रेम संभवत नाही हे त्रिवार सत्य श्रीमहाराजांनी परोपरीने सांगितले. म्हणूनच आपल्या परमपूज्य ब्रह्मानंद महाराजांनी आपली जिव्हा नामाला विकली व त्यानंतर पुन्हा तथाकथित शास्त्रोच्चार त्या जिव्हेने केला नाही! 

भक्ति महाराणी दैन्यतेच्या सिंहासनावर विराजमान होते! जोवर स्थूल आणि सूक्ष्म अहंकाराने अंतर्याम भरलेले आहे, तोवर भक्ति महाराणीचे आगमन हृदयाकाशी होत नाही. नामाचे महत्त्व इथे आहे. जोवर आम्ही नामाशिवाय इतर साधने ‘करतो’, तोवर आमच्यातला मीपणा विरत नाही. कारण इतर साधनांना बाह्य जगतातून काही ना काही मदत लागते. जसे, योग मार्ग असेल तर या शरीराच्या काही क्रिया व अनुशीलन करणे आवश्यक आहे. ज्ञान मार्ग असेल तर बुद्धीने त्याचे सम्यक आकलन व मनन करणे गरजेचे आहे. ते मार्ग देखील खरे तर शरणागती मध्येच शेवटी स्थिरावतात – स्थिरावावेत; मात्र यात देह मन बुद्धी या उपाधींचा आधार घ्यावा लागत असल्यामुळे साधक ‘कर्मात’ अडकण्याची भीती आहे हे निश्चित. संपूर्णपणे निरुपाधिक साधन, जे साध्यरूपच आहे ते म्हणजे भगवंताचे नामच होय.

तीन गोष्टी आहेत -- कर्म – क्रिया – सहज कर्म. कर्म हे बहुतेक वेळा बाह्य गोष्टींवर आधारित असते. क्रिया ही साध्याप्रत घेऊन जाण्याचे साधन आहे. सहज कर्म मात्र साधकाला कर्म बंधनातून मुक्त करते, कारण सहज कर्मात कर्तेपणाचा संपूर्ण लय होतो. आणि असे सहज कर्म केवळ भक्तीनेच घडू शकते. अशा भक्ताचा प्रत्येक दिवस आणि त्यामधील प्रत्येक कर्म याचा हेतू भगवंत, कर्माचा प्रेरक भगवंत, ज्याच्यासाठी ते कर्म करायचे तो भगवंत आणि अहंकार त्याच्याच चरणी लीन झाल्यामुळे त्या कर्मफलाचा भोक्ताही पुन्हा भगवंतच! अशी निरुपाधिक भक्ति साधण्यासाठी नामाखेरीज अन्य उपाय नाही. अशा भक्ताला कर्मबंधनात अडकण्यासाठी वाव राहिलाच कुठे? म्हणून ज्ञानेश्वर महाराज नामाबद्दल म्हणतात, “सुलभ आणि सोपारे केलेसे दातारे!!!” अहाहा! कुणी सोपे केले? दातारे! ज्याने नाम दिले त्या गुरूने हे सोपे केले आणि म्हणून आम्हाला परमार्थ मार्ग सुलभ झाला म्हणताहेत संतांचे मुकुटमणी ज्ञानदेव! अशा रीतीने नामसाधक आपल्या साधनेचा उगम, मध्य आणि कळस सर्व आपल्या गुरूमध्ये पाहत असल्यामुळे मीपणाला वाव न राहता सहजच हृदयामध्ये पारमार्थिक दैन्य – लीनता प्रकटते आणि भक्ति महाराणीच्या रम्य विलासाने त्या भक्ताचे हृदय भरून जाते!

म्हणून श्रीमहाराज म्हणतात, “अत्यंत कठीण प्रमेये असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे!” वाचावेत का सांगताहेत? कारण, गावाला वळसा मारून आल्याशिवाय काखेत कळसा आहे हे बहुधा कळत नाही! पण ते म्हणतात, हरकत नाही. द्राविडी प्राणायाम केल्याशिवाय तुम्हाला नामाचा सहजपणा मनावर ठसणार नाही. बहुतेक सर्व साधकांचा थोडाबहुत हा अनुभव आहेच. मुळात गुरुकृपेने ज्यांना थोडेतरी नामाचे प्रेम लाभले, त्यांना इतर काहीही केले, वाचले, ऐकले, तरी त्याचा मनबुद्धिला होणारा आनंद हा थोडा काळ टिकतो हे लक्षात येते. जगातली कितीही वेगवेगळी सुंदर ठिकाणे बघितली, तरी जसे आपल्या घरी परत आल्यावर मनाला समाधान वाटते, त्याप्रमाणेच इतर काहीही केले तरी असे नामाचे प्रेम लाभलेला साधक नामाला बसल्यावर त्याला “आपल्या घरी” आल्याचा परमानंद होतो व विश्रांती लाभते. आणि मग “नाम हेच एकमेव सत्य आहे” या उदात्त अनुभूतीत त्याची साधना हा त्याचा स्वभाव बनतो आणि भगवंताचे प्रेम तो प्रत्येक क्षणी अनुभवतो!

||श्रीनाम समर्थ||

Monday, July 6, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५८ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५८ –

भगवंताचे नाम हे बॅटरीसारखे आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा ते प्रकाश देते. ते आपल्या खिशामध्ये, म्हणजे हृदयामध्ये राहू शकते. तिने आपले अंग भाजत नाही, तसे नामाने आपल्याला वैराग्याचे कष्ट नाहीत; आणि कुठेही ते बरोबर नेता येते.

श्रीराम!
महाराजांची वचने दर वेळी नवीन अनुभूती, नवीन अर्थ आणि नवीन आनंद देतात. खरोखर वचनांची संगती हे गुरूंचे अनुसंधान टिकवण्यासाठी श्रेष्ठ साधन आहे यात शंकाच नाही. पुन्हा वचने ही मुख्यतः अर्थरूप असल्यामुळे ती देखील नामाप्रमाणे जणू सगुण सद्गुरू आणि त्यांचे सदा विद्यमान असे निर्गुण रूप या दोन्हींना सांधतात. किती भाग्यवान आपण, ज्यांना आपल्या सद्गुरूंनी हा अनमोल ठेवा दिला! आजच्या वचनात श्रीमहाराज नेहमीप्रमाणे नामाचेच महत्त्व आणि श्रेष्ठत्व सांगत असले तरी ते दोन अंगांनी अतिशय महत्त्वाचे असे वचन आहे. वरवर बघितले तर असे वाटण्याची शक्यता आहे की महाराज इथे आम्हाला नाम हवे तेव्हा उपयोगाला येईल, म्हणजे संकटात काम देईल असे सांगत आहेत. अर्थात ते अयोग्य नाहीच. नामाला शरण गेलेला साधक हा प्रत्येक गोष्टीतच नामाला शरण जातो. जसे, गुरुदेव रानडे म्हणायचे, नामात विश्व निर्माण करण्याची शक्ती आहे, साधा रोग नाही बरा करणार? अनेक असे श्रेष्ठ साधक श्रीमहाराजांच्या चरित्रात देखील वर्णन केले गेले ज्यांनी शारीरिक आजारपणात नाम हेच औषध मानून त्यावरची आपली निष्ठा दाखवून दिली. अशा प्रसंगात, इतर कुणाप्रती शरणागती नसून केवळ नामावर पूर्ण श्रद्धा असल्यामुळे असे अनन्य नामभक्त आपल्या मुक्कामी सहज पोचले. पण अशी निष्ठा अत्यंत कठीण आहे यात शंका नाही. बॅटरी म्हणण्याचे कारण म्हणजे जेव्हा संपूर्ण अंधाऱ्या खोलीत आपण बॅटरी घेऊन जातो तेव्हा हळूहळू त्या खोलीत प्रकाश होतो असे होत नाही. बॅटरी लावल्या लावल्या सबंध खोली एकदम उजळून निघते. तद्वत नामाची बॅटरी ज्याने सोबत बाळगली त्याचे अध्यात्मिक आयुष्य हळूहळू प्रकाशित होते असे त्याला प्रकृतीच्या पडद्यामुळे वाटले तरी देखील नाम मिळणे आणि ते गुरुकृपेने मुखात येणे याचा अर्थच सबंध लौकिक आणि अलौकिक जीवन प्रकाशित होणे होय. श्रीमहाराज म्हणायचे, नाम मुखात येते आहे म्हणजे कुंडलिनी जागृत झाली असलीच पाहिजे. याला म्हणतात नामाच्या शक्तीवरचा विश्वास.

मात्र “आपल्याला पाहिजे तेव्हा नाम प्रकाश देते” हे वचन याहीपेक्षा जास्त अर्थगर्भित आहे. याचा जोड “नामात राहणे” याच्याशी लागतो. नामात राहणे ही ‘सहज प्रक्रिया’ आहे, कारण नाम हे स्वयंभू, स्वयंपूर्ण आणि स्वयंप्रकाशी आहे. जो नामाच्या – नामीच्या – भगवत तत्त्वाच्या चिंतनात निरंतर राहतो, त्याला ‘आता मी नाम घेतो, किंवा आता मी नामाला बसतो’ अशी आठवण स्वतःला करून द्यावी लागत नाही. याचा जोड पुन्हा ‘नाम हेच शुद्ध चैतन्य आहे’ याच्याशी लागतो. जसे, ‘आता मी अमुक गोष्टीबद्दल विचार करतो’ असा मुद्दाम विचार करावा लागत नाही. किंवा ‘माझा हात खाजवत आहे, तर दुसऱ्या हाताला असे सांगावे लागत नाही की खाजव’; ती प्रक्रिया सहज घडते. शुद्ध चैतन्य किंवा ज्याला कृष्णमूर्ती Choiceless Awareness म्हणतात, ते मी आहे, तेच मी आहे, अशी ज्ञानी मनुष्याला आठवण करावी लागत नाही; तो सहजच त्याच्याशी एकरूपत्व अनुभवतो. खूप सूक्ष्म (subtle) आहे हे. ॐकाररूपि तन्नाम हृन्मन्दिर निवासि च” म्हणते पूज्य बाबांची नामचंद्रिका (ॐकार रूप असलेले नाम हृदयाच्या गाभाऱ्यात निवास करते; त्याचा निवास व्हावा म्हटलेले नाही, निवासी आहेच!). गीता म्हणते, “ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति|” (ईश्वर सर्व भूतमात्रांच्या हृदयात राहतो; राहावा म्हटलेले नाही). हे नाम – भगवंत आणि शुद्ध चैतन्य यांचे एकरूपत्व दाखवण्यासाठी पुरेसे आहे. श्रीमहाराजांसारखे संत जे नामरूप आहेत आणि त्याचे श्रेष्ठ शिष्यगण जे नामरूप झाले त्यांना त्या नामरूपत्वाची जाणीव सतत असली तरीही लोककार्य करण्यासाठी, आमच्यासारख्यांना शिकवण्यासाठी त्या वरच्या पातळीवरून खाली येऊन ते आम्हाला सांगावे लागते व याची सुरुवात प्रपंचात देखील नामाचा प्रकाश पडेल हे सांगण्यापासून होते. मग जेव्हा जरूर असते तेव्हा हवा तसा त्या चैतन्याचा ते उपयोग करतात; जणू नाम (जे शुद्ध चैतन्य आहे) ते आपल्या खिशात वागवतात. श्री रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी श्रीमती शारदा माता या त्यांच्या शिष्यांना प्रत्यक्ष माता भवानी स्वरूप होत्या, त्यांना तशी अनुभूती होती. रामकृष्णांनी देह ठेवल्यावर बऱ्याच वर्षांनी एकदा त्यांच्या जवळच्या शिष्याने मा शारदांना विचारले, ‘माता, तुम्ही प्रत्यक्ष शिवा-स्वरूपिणी’ आहात हे तुमच्या सतत अनुभूतीत असते का?’ तेव्हा अगदी सहजपणे त्या म्हणाल्या, “तसे नसते. तसे झाले तर एवढे सगळे काम मी कशी करू शकेन? मात्र जेव्हा जरूर असते, तेव्हा मी त्या मूळ रूपाचा आधार घेऊ शकते.” अजून एक रामकृष्णांचेच थोर शिष्य गमतीने म्हणायचे, “चैतन्य स्वरूप हे आपल्या आवडत्या उशीप्रमाणे असते. जेव्हा वाटेल तेव्हा त्या उशीवर पडून आपण आनंद उपभोगू शकतो!” हे सांगण्याचे कारण, श्रीमहाराज जे म्हणताहेत, नाम आपल्याला पाहिजे तेव्हा प्रकाश देते, याचा अर्थ, ते प्रकाशमानच आहे; फक्त ते नामाचे खरे भगवत स्वरूप आपल्याला हवे तेव्हा (हुकमी) दृग्गोचर होते! यामुळेच नामाच्या दिव्य भव्य शक्तीत सतत राहणारा श्रीमहाराजांसारखा संत देखील लोकांमध्ये राहून अमाप लोककार्य करू शकतो.

अग्नी आणि भाजणे हे एकरूप आहे. मूळ शुद्ध स्वरूपात चैतन्य शक्ती धारण करणे जिवाला जवळजवळ अशक्य आहे, कारण त्यामध्ये वैश्वानर भगवंताचे वैश्विक रूप सामावलेले आहे. मात्र जेव्हा ही वैश्विक शक्ती संतांनी परा शक्तीच्या कृपेने नाम रूपाने हृदयात धारण केली तेव्हा ती शक्ती परमशीतल झाली. संतांच्या प्रेमभावाचे त्यावर गोड सिंचन झाले व त्यामुळे वैश्विक शक्ती बीज रूपाने असलेले नाम आपले शुद्ध चैतन्याचे दाहकत्व विसरून योग्यांच्या देखील हृदयाला गारवा प्रदान करणारे असे झाले. शुकादिक परमहंस देखील नामाची महती भागवतात गातात याचे कारण हेच.

श्रीमहाराज म्हणतात, तुम्ही फक्त नाम घ्या, ते विवेक – वैराग्य मी सांभाळतो आणि म्हणूनच आजच्या वचनात म्हणतात, नामाने वैराग्याचे कष्ट नाहीत. परमार्थ मार्गासाठी दृश्यापासून वैराग्याची आवश्यकता आहे हे खरेच. मात्र वैराग्य मिळवण्यासाठी देहदुःख किंवा ताकदीचे इंद्रियदमन या गोष्टी श्रीमहाराजांना मान्य नाहीत. कारण ते म्हणतात, त्याची आवश्यकताच नाही. जो नाम घेईल, त्याच्या मागे वैराग्य लागेलच. नामाने हळूहळू जगाचे स्वरूप प्रकट व्हायला लागते व जो नामात राहू लागतो, त्याला नामाचे प्रेम आल्याने स्वाभाविकच जगताबद्दल व देहासंबंधी उदासीनता येते. उदासीनता म्हणजे व्यग्रता नसून ‘जे आहे ते असो, जे नाही ते नसो’ अशी भावना होऊन निष्काम कर्मयोगात राहणे होय. असे हे परमसुंदर भगवंताचे नाम आपल्याला कुठेही बरोबर नेता येते, यापेक्षा साधनेची सुलभता अजून कोणती? जे आपले आत्मस्वरूपच आहे असे नाम – त्याला सोडून आपण कुठे जाणार? मात्र हे लक्षात यायला गुरुकृपा भाकून निरंतर नामात ‘राहता यावे’ अशी कृपा करावी अशी मनापासून प्रार्थना करणे जरूर आहे. कारण, पेढा गोड आहे असे नुसते सांगून त्याचा गोडवा कसा कळणार? तोंडात टाकला तरच कळणार. तसा नामाचा पेढा तोंडात धरून या संसारात पद्मपत्राप्रमाणे राहणारा खरा ‘योगी’ होय!

||श्रीनाम समर्थ||

Friday, July 3, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५७ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५७ –

पूर्वीच्या काळी अस्त्रे वापरीत असत, त्यामध्ये एकमेकांना मारक अशी अस्त्रे असत. एकाने सर्पास्त्र सोडले की दुसऱ्याने गरुडास्त्र सोडावे, इत्यादी. याप्रमाणे मायेने आपल्यावर विषयास्त्र सोडले की आपण त्यावर उलट भगवंताच्या नामाचे अस्त्र सोडावे, म्हणजे विषय आपोआपच नाहीसा होईल.

श्रीराम!
कोणत्या गोष्टींनी जीव आपल्या स्वरूपापासून च्युत होतो याचे कारण सांगताना शंकराचार्य म्हणतात, “अविद्या – काम – कर्म” (Ignorance – Desire – Desire prompted action). श्रीमहाराज म्हणतात, परमात्म्याच्या स्वरूपाबद्दल संशय असणे याचे नाव अज्ञान. या अज्ञानातून वासना जन्म घेते आणि वासनेतून जे कर्म घडते ते बंधनकारक झाल्यामुळे जीव आनंदस्वरूप भगवंताचा अंश असूनही दुःख भोगतो. दोन्हीचा अर्थ तत्त्वज्ञान दृष्ट्या एकच. एकीकडे महाराज म्हणतात, “वासना मुळात नव्हतीच. आपण तिला आहे म्हटली की ती अस्तित्वात आली. आता ती नाही असे आपण म्हटले की ती नाहीशी होईल.” हे वचन अक्षरशः ब्रह्मवाक्य आहे. पूर्ण असलेला जीव अविद्येमुळे स्वतःला अपूर्ण समजला, या अविद्येतून वासना उदय पावली की दृश्यातील अमुक गोष्ट मिळाली (पैसा, लौकिक, नातेसंबंध, कीर्ती, वगैरे) तर मी पूर्ण होईन. पण ह्या अपूर्ण वस्तूतून पूर्णता येऊ शकणार नाही ह्याचे आकलन न झाल्याने जीव विषयात गुंतला.

सर्व साधना ही आपल्या मूळ स्वरूपाला मिळवण्यासाठी करायची नाही; ते स्वरूप आपल्याला प्राप्तच आहे. केवळ आम्ही अपूर्ण आहोत आणि वासनेतून आम्हाला पूर्णत्व मिळेल या अविद्येचा समूळ निचरा होण्यासाठी साधन आहे. यालाच आजच्या वचनात श्रीमहाराज अस्त्राची उपमा देतात. श्रीमहाराज एकीकडे ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्गाचे एकत्व स्पष्ट करताना म्हणतात, वेदांती ज्याला ‘ब्रह्म’ असे म्हणतात, त्यालाच भक्त ‘नाम’ असे म्हणतात. आजच्या वचनात विषयाचे अस्त्र मायेने सोडणे म्हणजेच आमच्या अविद्येने आम्हाला ठकवणे होय. कारण मायेचे अस्तित्वच भ्रमात आहे. महाराज म्हणायचे, जी नाही पण आहे अशी वाटते ती माया. “नामापरते सत्य न मानावे” हे महाराज जे म्हणतात त्याचे महत्त्व इथे आहे. मानावे म्हटले आहे खरे, कारण आम्हाला आज त्याची जाणीव नाही. मात्र नामापरते सत्य नाहीच, ब्रह्मापरते सत्य नाहीच; केवळ आमच्या अविद्येने आम्हाला दोरी साप भासते आहे. आणि या अविद्येला समूळ नष्ट करायचे असेल तर त्याला नामाच्या अस्त्रानेच करता येईल असे स्पष्टपणे आजच्या वचनात महाराज आम्हाला सांगत आहेत.

श्रीमहाराज म्हणायचे, विषय त्रास देऊ लागला की समजावे की नाम कमी पडते आहे, याचे कारण हेच की नाम हे एकच असे परम सत्य आहे याची जाणीव नाम घेत गेल्याने जी अध्यात्मिक शक्ती गुरुकृपेने साधकात येते त्या बळावरच तो स्वरूपाच्या जाणीवेत स्थित होऊ शकतो व मायिक भ्रमाचा निरास करू शकतो. विषयाचा उगम कुठे आहे? तर मनात आहे. जोवर ‘मी देह आणि मन आहे’ हा भ्रम जिवंत आहे, तोवर विषय खरे वाटतात असे महाराज म्हणतात. आमची सर्व अविद्या “जे खोटे आहे ते खरे मानण्याने आणि जे खरे आहे ते तितकेसे खरे न वाटण्याने” आहे. मात्र जे सत्य आहे, ते नाम सूर्यप्रकाशासारखे आहे. आम्ही जर म्हणालो, सूर्य मला माहित नाही, मी सूर्याला ओळखत नाही, तरी देखील त्या सूर्याचा प्रकाश आमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. तद्वतच आज आम्ही नामाला हवे तितके सत्यत्व दिले नाही, तरी सत्य वस्तु स्वयंभू, स्वयंपूर्ण असल्यामुळे नाम जपत गेल्यानेच त्याचे सत्यत्व आणि विषयाचे मिथ्यत्व प्रकट होत जाईल हेच महाराजांना आजच्या वचनातून सुचवायचे आहे. म्हणूनच ते म्हणायचे, जे सोडायचे त्याचा जास्त विचार करण्यापेक्षा जे धरायचे ते भगवंताचे नाम, त्याचे अखंड स्मरण हे धरावे म्हणजे सोडण्याच्या गोष्टी आपोआप सुटून जातील. वैराग्य ही अवस्था वासनेच्या कायमच्या मुक्तीपासून अनुभवण्याची गोष्ट आहे, वैराग्य म्हणजे बाहेरून काही सोडणे नव्हे तर आतून त्या गोष्टीची इच्छाच न होणे होय. अशा रीतीने नामप्रेम आणि विषयप्रेम या एकमेकांना मारक गोष्टी आहेत असे महाराज म्हणतात.

वेदांतात ‘साधनेने काय साधते’ या प्रश्नाचे उत्तर आहे, “प्राप्तस्य प्राप्तिः निवृत्तस्य निवृत्तिः||” -- जे तुम्हाला कायम प्राप्तच असे सत्य आहे तेच तुम्हाला दृष्टिगोचर होते व जे कधी नव्हतेच ते नाहीसे होते. म्हणून श्रीमहाराज म्हणतात, नामात जो मनापासून राहील, त्याला नाम हेच परम सत्य आहे याची अनुभूती येईल, नाम हेच साध्य आहे हे कळेल. म्हणजेच हे नव्याने कळायचे आहे असे नव्हे. जे आहेच त्याची प्रचीती म्हणजे ‘दर्शन’ आणि जे नव्हतेच ते ‘देह – मनाचे व्यापार’ ते नाहीसे होऊन स्वरूपानंदात सु-स्थित होणे म्हणजेच “नामाचे खरे दर्शन” होय!

||श्रीनाम समर्थ||