Friday, July 3, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५७ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५७ –

पूर्वीच्या काळी अस्त्रे वापरीत असत, त्यामध्ये एकमेकांना मारक अशी अस्त्रे असत. एकाने सर्पास्त्र सोडले की दुसऱ्याने गरुडास्त्र सोडावे, इत्यादी. याप्रमाणे मायेने आपल्यावर विषयास्त्र सोडले की आपण त्यावर उलट भगवंताच्या नामाचे अस्त्र सोडावे, म्हणजे विषय आपोआपच नाहीसा होईल.

श्रीराम!
कोणत्या गोष्टींनी जीव आपल्या स्वरूपापासून च्युत होतो याचे कारण सांगताना शंकराचार्य म्हणतात, “अविद्या – काम – कर्म” (Ignorance – Desire – Desire prompted action). श्रीमहाराज म्हणतात, परमात्म्याच्या स्वरूपाबद्दल संशय असणे याचे नाव अज्ञान. या अज्ञानातून वासना जन्म घेते आणि वासनेतून जे कर्म घडते ते बंधनकारक झाल्यामुळे जीव आनंदस्वरूप भगवंताचा अंश असूनही दुःख भोगतो. दोन्हीचा अर्थ तत्त्वज्ञान दृष्ट्या एकच. एकीकडे महाराज म्हणतात, “वासना मुळात नव्हतीच. आपण तिला आहे म्हटली की ती अस्तित्वात आली. आता ती नाही असे आपण म्हटले की ती नाहीशी होईल.” हे वचन अक्षरशः ब्रह्मवाक्य आहे. पूर्ण असलेला जीव अविद्येमुळे स्वतःला अपूर्ण समजला, या अविद्येतून वासना उदय पावली की दृश्यातील अमुक गोष्ट मिळाली (पैसा, लौकिक, नातेसंबंध, कीर्ती, वगैरे) तर मी पूर्ण होईन. पण ह्या अपूर्ण वस्तूतून पूर्णता येऊ शकणार नाही ह्याचे आकलन न झाल्याने जीव विषयात गुंतला.

सर्व साधना ही आपल्या मूळ स्वरूपाला मिळवण्यासाठी करायची नाही; ते स्वरूप आपल्याला प्राप्तच आहे. केवळ आम्ही अपूर्ण आहोत आणि वासनेतून आम्हाला पूर्णत्व मिळेल या अविद्येचा समूळ निचरा होण्यासाठी साधन आहे. यालाच आजच्या वचनात श्रीमहाराज अस्त्राची उपमा देतात. श्रीमहाराज एकीकडे ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्गाचे एकत्व स्पष्ट करताना म्हणतात, वेदांती ज्याला ‘ब्रह्म’ असे म्हणतात, त्यालाच भक्त ‘नाम’ असे म्हणतात. आजच्या वचनात विषयाचे अस्त्र मायेने सोडणे म्हणजेच आमच्या अविद्येने आम्हाला ठकवणे होय. कारण मायेचे अस्तित्वच भ्रमात आहे. महाराज म्हणायचे, जी नाही पण आहे अशी वाटते ती माया. “नामापरते सत्य न मानावे” हे महाराज जे म्हणतात त्याचे महत्त्व इथे आहे. मानावे म्हटले आहे खरे, कारण आम्हाला आज त्याची जाणीव नाही. मात्र नामापरते सत्य नाहीच, ब्रह्मापरते सत्य नाहीच; केवळ आमच्या अविद्येने आम्हाला दोरी साप भासते आहे. आणि या अविद्येला समूळ नष्ट करायचे असेल तर त्याला नामाच्या अस्त्रानेच करता येईल असे स्पष्टपणे आजच्या वचनात महाराज आम्हाला सांगत आहेत.

श्रीमहाराज म्हणायचे, विषय त्रास देऊ लागला की समजावे की नाम कमी पडते आहे, याचे कारण हेच की नाम हे एकच असे परम सत्य आहे याची जाणीव नाम घेत गेल्याने जी अध्यात्मिक शक्ती गुरुकृपेने साधकात येते त्या बळावरच तो स्वरूपाच्या जाणीवेत स्थित होऊ शकतो व मायिक भ्रमाचा निरास करू शकतो. विषयाचा उगम कुठे आहे? तर मनात आहे. जोवर ‘मी देह आणि मन आहे’ हा भ्रम जिवंत आहे, तोवर विषय खरे वाटतात असे महाराज म्हणतात. आमची सर्व अविद्या “जे खोटे आहे ते खरे मानण्याने आणि जे खरे आहे ते तितकेसे खरे न वाटण्याने” आहे. मात्र जे सत्य आहे, ते नाम सूर्यप्रकाशासारखे आहे. आम्ही जर म्हणालो, सूर्य मला माहित नाही, मी सूर्याला ओळखत नाही, तरी देखील त्या सूर्याचा प्रकाश आमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. तद्वतच आज आम्ही नामाला हवे तितके सत्यत्व दिले नाही, तरी सत्य वस्तु स्वयंभू, स्वयंपूर्ण असल्यामुळे नाम जपत गेल्यानेच त्याचे सत्यत्व आणि विषयाचे मिथ्यत्व प्रकट होत जाईल हेच महाराजांना आजच्या वचनातून सुचवायचे आहे. म्हणूनच ते म्हणायचे, जे सोडायचे त्याचा जास्त विचार करण्यापेक्षा जे धरायचे ते भगवंताचे नाम, त्याचे अखंड स्मरण हे धरावे म्हणजे सोडण्याच्या गोष्टी आपोआप सुटून जातील. वैराग्य ही अवस्था वासनेच्या कायमच्या मुक्तीपासून अनुभवण्याची गोष्ट आहे, वैराग्य म्हणजे बाहेरून काही सोडणे नव्हे तर आतून त्या गोष्टीची इच्छाच न होणे होय. अशा रीतीने नामप्रेम आणि विषयप्रेम या एकमेकांना मारक गोष्टी आहेत असे महाराज म्हणतात.

वेदांतात ‘साधनेने काय साधते’ या प्रश्नाचे उत्तर आहे, “प्राप्तस्य प्राप्तिः निवृत्तस्य निवृत्तिः||” -- जे तुम्हाला कायम प्राप्तच असे सत्य आहे तेच तुम्हाला दृष्टिगोचर होते व जे कधी नव्हतेच ते नाहीसे होते. म्हणून श्रीमहाराज म्हणतात, नामात जो मनापासून राहील, त्याला नाम हेच परम सत्य आहे याची अनुभूती येईल, नाम हेच साध्य आहे हे कळेल. म्हणजेच हे नव्याने कळायचे आहे असे नव्हे. जे आहेच त्याची प्रचीती म्हणजे ‘दर्शन’ आणि जे नव्हतेच ते ‘देह – मनाचे व्यापार’ ते नाहीसे होऊन स्वरूपानंदात सु-स्थित होणे म्हणजेच “नामाचे खरे दर्शन” होय!

||श्रीनाम समर्थ||



2 comments: