Sunday, June 28, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५६ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५६ –

भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. दुःखाची जाणीव नसल्यावर मग दुःख असले म्हणून बिघडले कुठे?

श्रीराम!
“यत्न कसून करीन मी यश दे रामा, न दे, तुझी सत्ता|
हाचि निरोप गुरूंचा मानावा राम सर्वदा कर्ता||”
या निरोपाच्या वचनात श्रीमहाराज आम्हाला प्रयत्नाचे महत्त्व आणि रामाची सत्ता या दोन्ही गोष्टी सांगताहेत. याचे कारण - आम्ही देहात असल्या कारणाने आमचे सुख आणि दुःख हे देहावर अवलंबून आहे असे आम्ही समजतो, कारण आमचा आणि इतरांचा देह आणि त्याच्याशी निगडीत व्यवहार हे आमच्या ज्ञानाचे क्षेत्र आहे. त्यामुळेच श्रीमहाराज एकीकडे म्हणतात, “देहबुद्धी असेपर्यंत प्रयत्नच श्रेष्ठ आहे.” हे सांगण्याचे कारण म्हणजे आजच्या वचनात ज्या दुःखाचा उल्लेख श्रीमहाराज करत आहेत, ते या देहबुद्धीच्या क्षेत्रातले दुःख आहे. समर्थ दासबोधात जे आधिभौतिक, आधिदैविक आणि आधात्मिक तापांचे (दुःखांचे) वर्णन करतात ती सर्व प्रकारची दुःखे आजच्या व्च्नातल्या ‘दुःख’ या संज्ञेत समाविष्ट होतात. आमच्या समजुतीनुसार ही दुःखे बहुतेक वेळा आमच्या प्रयत्नांवर अवलंबून असल्यामुळे ‘अमुक गोष्ट केली असती तर बरे झाले असते’ असे आम्हाला देह, वस्तु, व्यक्ती, नातेसंबंध, परिवार, कामकाज, धंदा – व्यवसाय अशा अनेक बाबतीत वाटते आणि जेव्हा आमच्या अपेक्षेनुसार परिणाम या दृश्य क्षेत्रात दिसत नाही तेव्हा आम्हाला दुःख होते.

सर्व अध्यात्म शास्त्र हे या पायावर आधारित आहे, की या दृश्य जगात जे जे आहे त्यात शाश्वत सुख नाही. ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे’ हे वाटणे देहबुद्धीत जगणाऱ्या मनुष्यासाठी अगदी स्वाभाविक आहे. कारण त्याचे सुख आणि दुःख दोन्ही बाह्य गोष्टींवर अवलंबून असते आणि बाह्य गोष्टींवर आमचा बहुतांशी ताबा नसतो. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात,
“जो त्रिविध तापे पोळला तोचि अधिकारी झाला परमार्थासी” कारण हे मायारूपी दुःख आल्याशिवाय शाश्वत समाधान नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे, तिचा अनुभव संत समाजाने घेतलेला आहे, हे आमच्या गावीही नसते आणि आम्ही आमचेच दुःख कवटाळून बसतो. सबंध गावाने वाळीत टाकून सुद्धा आमची ज्ञान माऊली म्हणते, “अवघाचि संसार सुखाचा करीन| आनंदे भरीन तिन्ही लोक||” कुठून आली ही गर्जना?? जगाच्या दुःखमय असण्याशी हे विपरीत नाही का असे वाटणे स्वाभाविक आहे. या गर्जनेचा उगम आहे, “शांतीची पै शांती निवृत्ती दातारू| हरिनाम उच्चारू दिधला तेणे||” ज्ञानेश्वर महाराज सांगताहेत, शांतीचे आगर असलेल्या सद्गुरूंनी (निवृत्तीनाथांनी) हरिनाम दिले (नाममंत्र दिला) आणि तेणे जाहले सकळ काम!

‘सदगुरूंकडून नाम मिळणे’ याचे महत्त्व काय आहे हे ज्याला समजले त्याचे जग बदलले नाही तरी जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. प्रारब्धाने येणारी दुःखे भोगावी लागली तरी त्याची झळ नाम जणू शोषून घेते हा सर्व नाम साधकांचा अनुभव आहे. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात,

आनंदे करूनि संसारी असावे| नाम आठवावे श्रीरामाचे||
नामाचिया योगे संसार तो चांग| येरव्ही ते अंग व्यर्थ जाय||
ऋषीमुनी सिद्ध संत महानुभाव| रामनामे भाव सुखे केला||
नामे होय सुख, नामे निरसे दुःख| रामनाथ एक हृदयी धरा||

अगदी हेच श्रीमहाराज आजच्या वचनात सांगत आहेत. फक्त अट आहे, नामाचा “नाद” लागला पाहिजे! ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात,
“आवडी आणि लाजवी| व्यसन आणि शिणवी|
पिसे आणि न भुलवी| तरी तेचि कायी||”
नामाची – भगवंताची – परमार्थाची आवड कशी हवी? तर त्या आवडीची लाज वाटता कामा नये. त्यापुढे जाऊन त्याचे रूपांतर व्यसनात झाले तर त्याचा कंटाळा कधीही येता कामा नये. त्या व्यसनाने इतके भुलवले पाहिजे की त्याचे वेड लागले पाहिजे म्हणतात ज्ञानदेव. याला “नामाचा नाद” लागणे म्हणतात.

नाम पूर्ण असल्यामुळे ज्याला असा नामाचा नाद लागला तो साहजिकच त्या नामाच्या धुंदीत स्थिरावतो. त्याचे मन बुद्धी कर्म ही सर्व नामाच्या अवतीभोवती घोटाळतात. उत्तर भारतात काही घरांतून बाळकृष्णाची उपासना चालते. घराच्या मुख्य खोलीत मध्यभागी याचा दरबार असतो. सकाळी उठल्यापासून बाळकृष्णाला उठवणे, स्नान घालणे, मग नैवेद्य बनवून त्याला खाऊ घालणे या गोष्टी रात्री त्याला झोपवेपर्यंत नित्यकर्मात मोडतात. असे नामाच्या अवतीभोवती आमचा दिवस घोटाळू लागला की आम्हाला नामाचा नाद लागला असे म्हणावयास हरकत नाही. असा जो नामाच्या नादात स्वतःला विसरतो त्याला साहजिकच या देहाशी संलग्न दुःखांचा विसर पडतो. सुरुवातीला तो नाम घेताना तात्कालिक असतो; मात्र जर सततच्या अभ्यासाने आणि गुरुकृपेने हे नाम सहज चालू लागले की मग मात्र त्याचा देह मन बुद्धीशी त्रयस्थासारखा संबंध राहून तो अलिप्तपणे साक्षीभावात राहतो. कर्तव्य कर्म उत्तम करताना देखील हे साधू शकते हे आम्हाला सर्व प्रापंचिक संतांनी दाखवून दिले आहे, त्यामुळे त्याबाबतीत तक्रार करण्यासाठी आम्हाला कुठेही जागा नाही.

हे वचन श्रीमहाराजांनी आमच्यासारख्या देहाला केंद्र करून राहणाऱ्या लोकांसाठी सांगितले खरे, मात्र यातून त्यांना आम्हाला त्यापलीकडे नेण्याची इच्छा आहे, जेथे प्रापंचिक दुःख हे देखील सुखाचे वाटू लागते आणि सुखामध्ये तो हरखून जात नाही. गीतेत स्थितप्रज्ञाची व्याख्या करताना भगवंत म्हणतात, “दुःखेषु अनुद्विग्न मनः, सुखेषु विगतस्पृहः||” – कोणतेही दुःख ले असता जो उद्विग्न होत नाही वा सुखात देखील स्थिरबुद्धी राहतो, “आत्मन्येवात्मना तुष्टः!”- जो स्वतःमध्ये (बाहेरील कोणत्याही आलंबाशिवाय समाधानी – आनंदी राहतो तो स्थितप्रज्ञ होय. आणि हे होण्यासाठी भगवंताच्या नामाचा सर्वतोपरी आधार घेणे, त्यात टिकून राहणे, तो अनुभवणे आणि त्यात मस्त होणे हा राजमार्ग आहे.

एकदा श्रीमहाराजांनी विचारले, “भगवंत प्रकट झाले तर काय मागाल?” जेव्हा अपेक्षित उत्तर आले नाही तेव्हा ते स्वतःच म्हणाले, “मी माझेपणाची जाणीव काढून घे, असे मागीन” काय ज्ञान भक्ति वैराग्याचा सागर भरला आहे या एका उत्तरात! आजच्या वचनात महाराज आम्हाला हेच सांगत आहेत की एकदा नामाच्या अभ्यासाने, त्याला अनुसरून गुरुकृपेने आलेल्या नामाच्या प्रेमाने दुःखाची जाणीवच कमी होईल, कारण दृश्य विश्वाचे नश्वरपण मनावर ठसून भगवंताची लीला म्हणून आम्ही आमच्या आयुष्याकडे बघू शकू आणि सुख दुःखाचा एकाच पद्धतीने आनंद लुटू शकू. चित्रपटात जर फक्त एकाच तऱ्हेचा आनंदाचा बाजार दाखवला तर आम्ही कंटाळतो ना, तसेच भगवंताच्या चित्रपटातील पात्रे त्याच्या दिग्दर्शनाखाली सुख दुःखाची पात्रे रंगवताहेत या सत्य जाणीवेत नाम मग्न करते व तो संसारात राहून सर्वतोपरी त्यावर तरंगत राहतो; कारण तो नामात – भगवद्भावात बुडून गेलेला असतो!

||श्रीनाम समर्थ||

1 comment: