Wednesday, June 24, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५५ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५५

अत्यंत कठीण प्रमेये असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे.

श्रीराम!
नाथपंथीय योगीराज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज रामनामाबद्दल म्हणतात,

रामनाम मुखी तो एक संसार| एऱ्हवी अघोर नरक हा||
संसार नरक रामनाम सार| तरले पामर पतित देवा||
अजमिळा नामे तरला पतित| नारायण त्वरित आले तेथे||
“हरिनाम हेच शास्त्र पै जयाचे|” तयासी यमाचे भय नाही||

परमार्थाला “Path of Enquiry” असेही म्हटले जाते. हा शोधमार्ग आहे, ज्यामध्ये साधक परमात्म तत्त्वाचा शोध घेतो. या जगात जन्म घेतल्यानंतर जे चार पुरुषार्थ वेदांमध्येही सांगितले गेले, त्या सर्व पुरुषार्थांचे सार असेल तर हा शोध घेणे होय. किंबहुना त्या चारही पुरुषार्थांचा सुयोग्य वापर करून मनुष्याने आपल्या मूळ पुरुषाचा शोध घ्यावा, जेणेकरून त्याला आपल्या जन्माचे सार्थक करून घेता येईल अशी वेदांची योजना आहे. याचे कारण हेच की जोवर हा शोध पूर्ण होत नाही, तोवर मनुष्याला पुन्हा पुन्हा देह धारण करून देखील अखंड समाधान मिळणार नाही आणि दुःख निवृत्ती – आनंद प्राप्ती साधणार नाही. म्हणून विविध मार्गांनी हा शोध घेण्याचे कार्य अखंडपणे या मृत्युलोकात चालू आहे. आम्हाला जाणीव नसली तरी हा शोध घेणाऱ्या महात्म्यांच्या पुण्यांशामुळेच थोडी सकारात्मकता कलियुगात देखील इथे टिकून आहे.

मुमुक्षुत्व असलेल्या शिष्याच्या या शोधाची सुरुवात सद्गुरू भेटीपासून खऱ्या अर्थाने होते. श्रीमहाराज म्हणतात तसे “परमार्थ समजून करावा” हे वाक्य ज्याने हृदयी धरले त्याला सद्गुरू उपदिष्ट मार्गात स्थिरावल्याशिवाय चैन पडत नाही. मग अनेक अंगांनी याच मार्गावर राहून तो या शाश्वत तत्त्वाचा माग घेतो. परंतु, जशी घार अनेक दिशांना जाते, आपल्यासाठी भक्ष्य शोधते पण तिचे सर्व लक्ष तिच्या घरट्यातील पिल्लांकडे असते, तशाच रीतीने जो सद्गुरू उपदिष्ट मार्गात राहतो तो विविध मार्गांनी समजून घेण्याचा प्रयत्न जरी करत असला तरी त्याचा खुंटा हा एकच असतो – असावा आणि तो खुंटा म्हणजे सद्गुरूंनी दिलेले नाम!

खरे बघायला गेले तर हा खुंटा इतका ताकदवान आहे की एकदा त्या खुंट्याला चिकटले तर अजून काही करण्याची आवश्यकताच नाही. परंतु श्रीमहाराज म्हणतात, वाचनापासून साधनेला जोर येतो. त्यामुळे नामस्मरणाला पूरक असे वाचावयास हरकत नाही. याबरोबर प्रत्येक साधकाची एक पूर्वावस्था असते, या जन्मातीलच नव्हे तर मागील अनेक जन्मांची. त्यानुसार त्याचा स्वाभाविक कल हा भक्तिमार्ग, योगमार्ग किंवा ज्ञानमार्ग यांपैकी एकाकडे जास्त असतो. अर्थातच हे त्या साधकांबद्दल खरे आहे ज्यांच्या मनातून सांसारिक आसक्ती नाहीशी नाही तरी निदान क्षीण होऊ लागली आहे. हे होईपर्यंत स्वाभाविक कल कळणे शक्य नाही. सांसारिक आसक्ती आहे तशीच आहे आणि तत्त्वज्ञानाचे ग्रंथच्या ग्रंथ वाचत असू तर देहबुद्धीच पोसली जात नाही ना याकडे साधकाने जागरूक राहणे आवश्यक आहे. हे कळावे कसे हे सांगताना श्रीमहाराज म्हणतात, ‘जे वाचतो ते आचरणात येते की नाही हे जो सतत तपासत राहतो त्याला वाचलेले पचते आहे म्हणायला हरकत नाही, त्यानेच वाचावे.’  

आजच्या वचनात तर श्रीमहाराज म्हणतात, अत्यंत कठीण प्रमेये असलेले ग्रंथ वाचण्यास देखील हरकत नाही. सद्गुरू हे आम्हाला खुबीने समजावतात, त्यांची खुबी ज्याला कळली त्याला सद्गुरूंची अशी वचने जाणून मौज वाटते की कसे महाराज दोन्ही गोष्टी एकत्र सांधतात. आधी महाराज म्हणतात, कठीण प्रमेये असलेले ग्रंथ वाचावे पण सोप्यातले सोपे नाम घ्यावे. कसे आहे, ही वचने आमच्यासाठी तेव्हाच आहेत, जेव्हा आम्ही त्यांचे तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करतो. जो असे करील तो वाचनासोबत नाम सांभाळील हे निश्चित. आणि असे नाम जो सांभाळील ना, त्याचे वाचन एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच राहील. त्याबरोबरच जे जे तो वाचेल त्याचा अन्वयार्थ तो महाराजांच्या – आपल्या सद्गुरूंच्या वचनांशी, त्यांनी दिलेल्या साधनेशी लावेल. म्हणून श्रीमहाराज हे सांगण्याची रिस्क घेताहेत की ग्रंथ वाचा पण नाम सांभाळून वाचा, म्हणजे त्या नामाची शक्ती – त्या नामाचे हळुवार निपजणारे प्रेम जे वाचन तुम्हाला नामाशी – तुमच्या गुरूंशी जुळवणार नाही त्याकडे जाऊच देणार नाही. नाम हेच सत्य आहे ही जाणीव नामच दृढ करील. जसे तुकाराम महाराज म्हणाले, “तुका म्हणे नाम| तेणे पुरे माझे काम||” मूळ सत्य हेच आहे की कोणतेही सद्ग्रंथ एकच गोष्ट सांगतात, त्यामध्ये भेद नसतोच; आमची पृथक बुद्धी संतांच्या सांगण्यामध्ये भेद शोधते आणि मग बुद्धी भ्रमित होऊन गुरूंनी दिलेल्या साधनेला दुरावते.

यासाठीच सद्गुरू सांगतात, एक तर वाचताना नाम न सोडता वाचावे किंवा ते वाचन आमच्या साधनेला पोषक असेच असावे. भक्तिमार्गी संताचा शिष्य जर खूप जास्त योगशास्त्र वाचू लागला तर अजून देहबुद्धीत असल्यामुळे त्याला ज्या साधनेद्वारा ‘मी देह नाही’ हे समजून घ्यायचे आहे, तोच देहाला जास्त महत्त्व देऊन देह-साधनेला लागेल. वास्तविक योगातले देहाचे कष्ट देखील देहबुद्धीतून बाहेर पडण्यासाठीच आहेत हे लक्षात न घेतले तर केवळ देह-पोषण होईल. यासाठी वाचन सावधानतापूर्वक झाले पाहिजे असे श्रीमहाराज सांगतात.

मार्गातली विविधता ही भगवत् प्राप्तीच्या शोधाला वास्तविक रम्यता आणते. कोणतेच ‘वाद’ खरे नसून सर्व मार्गातला ‘संवाद’ महत्त्वाचा आहे हेच खरे संत ग्रंथ सांगतात. त्यामुळे तो संताने लिहिलेला ग्रंथ असेल आणि तो योग्य व्यक्तीकडून समजून घेतला तर त्यात बुद्धिभेद होण्याचा धोका नसतो. भक्तिमार्गी साधकांसाठी तर रामायण – भागवतासारखे सद्ग्रंथ नामाचे महत्त्व आणखी दृढ करणारे आहेत.

भगवंतांनी गीतेत “गिरामस्म्येकमक्षरम् असे सांगून ॐकार रूपी नाम म्हणजे मूळ तत्त्व आहे हे स्पष्ट केले. त्याच मूळ तत्त्वाचा भक्तिरूपी विकास म्हणजे सद्गुरूंनी दिलेले सगुण ब्रह्माचे नाम होय. त्यामुळे दोन्हीत भेद नाही. हे सांगण्याचे कारण म्हणजे ज्या मूळ तत्त्वाबद्दल विविध ग्रंथांमध्ये विविध ग्रंथकारांनी आम्हाला सांगितले, ते तत्त्वच आम्हाला सद्गुरूंनी नाम रूपाने दिले आहे हे शास्त्रीय सत्य आहे. म्हणून श्रीमहाराज म्हणताहेत, शेवटी सोप्यातले सोपे नामच घ्यावे, कारण ते साधना दृष्टीने सोपे असले तरी तेच एक अंतिम सत्य आहे!

गीतेत भगवंतांनी अनन्यतेचे महत्त्व सांगितले आणि ती अनन्यता गुरूपदिष्ट नामाबद्दल असणे हेच भक्तिमार्गाचे सार आहे. म्हणूनच श्रीमहाराज म्हणतात, काहीही करा, काहीही वाचा पण नाम सोडू नका, कारण संत एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे,

योग याग व्रत नेम दान धर्म|
नलगे साधन जपता हरि||
साधनाचे सार नाम मुखी गाता|
हरि हरि म्हणता कार्यसिद्धी||

||श्रीनाम समर्थ||



2 comments:

  1. श्रीराम! चिंतनातील एक एक वाक्य मुमुक्षूमध्ये साधकत्व चेतवण्यासाठी आणि साधकातील साधकत्व टिकवण्यासाठी खुप जास्त प्रेरक आहे! या आरशात आमच्यासारख्यांना आमचे अंतरंग स्पष्ट दिसून दोष निवृत्तीची तळमळ लागेल!🙏🌿🙏

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete