Sunday, June 21, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५४ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५४ –

भगवंताचे नाम ही ठिणगी आहे. ती फुलवली तर सबंध जग भरून जाईल येवढी मोठी होऊ शकते. ज्याप्रमाणे अग्निहोत्र्याच्या कुंडातला अग्नि थोडा धुगधुगीमध्ये असतो, त्यावर फुंकर घालून त्याचा जाळ करता येतो. त्याप्रमाणे आपण नामाची ठिणगी जागृत ठेवू; त्या ठिणगीचा जाळ करणारा उत्पन्न होईल आणि तो जाळ जगभर पसरेल.

श्रीराम!
एक तत्त्वज्ञानी म्हणतो, “डोळ्याची एक पापणी हलली तरी त्याचा परिणाम दूरच्या आकाशगंगेतल्या चांदणीवर होतो.” हे सांगण्यामागचा हेतू हा की कोणतेही सामान्यातले सामान्य कर्म देखील त्याचा परिणाम दाखवल्याशिवाय राहत नाही. याचे कारण ज्याला वेदांतामध्ये Eternal Consciosness किंवा Awareness म्हणून संबोधतात, त्यायोगे सबंध विश्वात एकच तत्त्व भरून आहे. ज्ञानमार्गी त्याला तत्त्वरूपाने बघतात तर भक्तिमार्गी रामरूपाने बघतात. ॐकार हे त्याच ज्ञानाचे मूळ तर नाम हे त्या रामतत्त्वाचे मूळ; त्यामुळे दोन्हीत भेद नाही. आणि जे ब्रह्मांडी तेच पिंडी या न्यायाने – “ॐकाररूपि तन्नाम हृन्मन्दिरनिवासि च|” (नामचंद्रिका) – तुझे जे नाम ॐकार रूप आहे तेच हृदयाच्या गाभाऱ्यात वसलेले आहे. सबंध विश्वाचे साम्राज्य त्या नाम धारकाच्या हृदयात आहे ज्याला नामात सर्वतोपरी प्रीति आहे.

जर एखादे सामान्य कर्म त्याचा परिणाम या जगावर सोडल्याशिवाय राहत नाही तर नाम, जे विश्वाचा उगम आहे, ते परिणाम दाखवल्याशिवाय राहील? मांडुक्य उपनिषद सांगते,
ओमित्येतदक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानं भूतं भवद्भविष्यदिति सर्वमोङ्कार एव|
यच्चान्यत्त्रिकालातीतं तदप्योङ्कार एव||”
-- एकमेव नित्य वस्तु ॐकारच आहे. जे काही जगात दिसते आहे, ते सर्व प्रकाशित करणारा हाचकार (नाम) आहे. जे घडून गेलेले आहे, जे घडते आहे, जे घडणार आहे, तो कारच (नाम) आहे. या तीनही काळाच्या पलीकडे जे सर्वव्यापी तत्त्व (भगवंत) आहे, तो देखील कारच आहे.
हा एकच उपनिषदातील श्लोक श्रीमहाराज नामाला ठिणगी का म्हणत आहेत हे सांगायला समर्थ आहे. सर्वव्यापक तत्त्व जे नाम आहे; तेच नाम सगुण ब्रह्माच्या अनुषंगाने संतांच्या वैखरीत सदा सर्वकाळासाठी स्थानापन्न झाले. जे ब्रह्मांडी होते ते पिंडी विराजले म्हणून विश्व चेतवणाऱ्या वन्हीचे रूपांतर ठिणगीत झाले, त्याशिवाय नामाला धारण करणे आमच्या सारख्या जीवांना अशक्य आहे. म्हणून श्रीमहाराज म्हणताहेत, ही ठिणगी फुलवणे म्हणजे त्या सर्वव्यापी ईश्वराला साद घालणे होय आणि जेव्हा जेव्हा ही साद शुद्ध चित्ताने घातली गेली तेव्हा तेव्हा सबंध जग भरून जाईल इतकी ती ठिणगी मोठी झाली आणि तो नामधारक विश्वरूपच बनला!

अजून एके ठिकाणी श्रीमहाराज म्हणतात, “जसा मारुतीमध्ये देव – अंश होता तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला, आपण तो झाकून विझवून टाकला.” आजच्या वचनात जे श्रीमहाराज म्हणतात, त्या ठिणगीचा जाळ करणारा उत्पन्न होईल... तो साधक किंवा सिद्ध असाच असेल ज्याने मारुतीचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवले. भक्तिमार्गाचा उद्गाता आहे हनुमंत! श्रीमहाराजच एके ठिकाणी म्हणतात, “हनुमंताचे ब्रह्मचर्य, भक्ति, दास्य आणि परोपकार या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल!” खरोखर ज्या साधकाला आजच्या वचनाप्रमाणे त्या नामाच्या ठिणगीचा जगभर पसरलेला जाळ – म्हणजेच नामाचे सर्वव्यापित्व अनुभवायचे आहे, त्याने हनुमंताचे चरित्र अभ्यासले पाहिजे. काय आहे हनुमंताच्या चरित्रात? आपण जेव्हा कुणाचेही चरित्र बघतो, तेव्हा त्यात त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या निरनिराळ्या घटना दिसतात. मात्र जेव्हा हनुमंताचे चरित्र बघतो, तेव्हा मात्र त्याच्या लहानपणच्या काही बाललीला वगळता संपूर्ण आयुष्यात केवळ आणि केवळ राम भक्ती, राम नाम, राम कार्य आणि राममय जीवन हेच दिसून येते. हनुमंताला श्रीरामाशिवाय बघणेच शक्य नाही, त्याची तशी इच्छाच नाही! हे होणे म्हणजे भक्तिमार्गात पाय रोवून स्थिर होणे आहे.

नामाची ठिणगी म्हणण्यामागे नामाच्या अभ्यासाने निर्माण होणारी भगवत्प्राप्तीची तळमळ देखील अभिप्रेत आहे. नाम हे साधन म्हणून जेव्हा सद्गुरू आम्हाला देतात, तेव्हा त्यात सद्गुरूंची संपूर्ण अध्यात्मिक शक्ती साठवलेली असल्याने मुळातच ते शक्तिरूप असते. मात्र आमची ग्रहण क्षमता कमी असल्याने आम्ही ते नाम सर्व शक्तीनिशी धारण करण्यास असमर्थ होतो व आमची देहबुद्धी आणि त्याला लागून असलेल्या कामना त्या शक्तीच्या अभिव्यक्तीच्या आड येतात. तरी देखील त्याच्या प्रचंड शक्तीमुळे धुगधुगी असतेच. जर त्यावर सतत सत्संगाची फुंकर घातली गेली तर त्या धुगधुगीचे रूपांतर खऱ्या तळमळीच्या अग्नीत होते हे सर्वसंतमान्य असे सत्य आहे. आणि श्रीमहाराज आम्हाला म्हणूनच सांगतात की नामाचा संग हाच खरा सत्संग आहे, ज्यायोगे तुम्हाला ही तळमळ लागेल. ज्याला खरी तळमळ लागली त्याच्या मनातून विषय आणि संसारासक्ती स्वाभाविकच हद्दपार होते व तो साधक शुद्ध साधनेस लागतो. शुद्ध साधनेचा प्रारंभ हीच नामाच्या ठिणगीवरची फुंकर आहे.

मात्र जीवाची शक्ती अपूर्ण आहे; त्यामुळे खरा शरणागत साधक म्हणतो, महाराज, मी तुम्हाला धरले आहे असे मला वाटते; परंतु माझ्या शक्तीने मी तुम्हाला धरणे मला शक्य वाटत नाही. त्यामुळे तुम्हीच मला धरावे आणि माझ्यात ती तळमळ जागी करावी. ही प्रार्थना जो मनापासून करतो, त्याच्या नामाच्या ठिणगीवर फुंकर घालण्याचे काम सद्गुरूच करतात. गंमत अशी की ही फुंकर परमदिव्य, परमशांत आणि परमतेजस्वी अशा भगवद्रूप सदगुरूंकडून आलेली असल्याने ती तळमळीच्या अग्नीचे रूपांतर देखील परम सौम्य आणि मृदु अशा अनुभूतीत करते आणि साधकाला अंतर्बाह्य गुरुप्रेमात न्हाऊन टाकते. जो गुरूच्या प्रेमात बुडाला त्याची साधना – नामस्मरण ही एक दिव्य परंतु सहज अनुभूती होते व बघता बघता सगुण निर्गुणाला लांघून तो नामाच्या परम दिव्य प्रकाशात गुरुकृपेने स्थिरावतो!

||श्रीनाम समर्थ||


1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete