Sunday, June 7, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४९ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४९ –

भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे.

श्रीराम!
संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचा प्रारंभच शब्दब्रह्म नामापासून केला. म्हणाले,
“ॐ नमो जी आद्या| वेदप्रतिपाद्या|
जय जय स्वसंवेद्या| आत्मरूपा||”
ॐकार हे शब्दब्रह्म नाम आत्मरूप ईश्वर आहे असा सरळ सरळ निर्वाळा ज्ञानेश्वरीसारख्या महानतम ग्रंथाच्या पहिल्या ओवीत आपल्याला मिळतो. या ॐकाराला वंदन करून माऊलींनी त्याला या गूढ आणि रम्य अशा भावार्थ दिपिकेचा उगम म्हटले आहे. यातच शब्द आहे, “स्वसंवेद्य”... जो स्वतःच स्वतःला जाणतो आणि जो इतर कोणत्याही गोष्टीने निर्देशित करता येऊ शकत नाही, तो स्वतःच स्वतःचा निर्देश आहे. हाच वेदांमधला प्रतिपादित निर्देश श्रीमहाराजांच्या स्वयंभू शब्दातून अभिप्रेत होतो. गुरुदेव रानडे यथार्थ रीत्या नामाला विश्वाचा उगम म्हणतात ते याच कारणामुळे. ‘ॐ इत्येकाक्षरं ब्रह्म’ असे भगवंतांनी गीतेत म्हटले आहे. दहाव्या विभूती योगात ‘गिरामि अस्मि एकं अक्षरम्’ असा स्पष्ट संकेत – शब्दब्रह्म नाम मीच आहे – असे भगवंतांनी सांगितले. जगद्गुरू शंकराचार्यांनी भगवंताचे स्वरूप यथार्थ जाणण्यासाठी ‘विवेकाचे’ महत्त्व प्रतिपादन केले आणि सांगितले, विवेकाच्या सामर्थ्याने भगवंताचे स्वरूप यथार्थपणे जाणणे यामध्येच मनुष्याचे थोरपण आहे. आणि हे जे भगवंताचे स्वरूप तेच हे आत्मस्वरूप, स्वयंभू आणि स्वाभाविक नाम होय. किंबहुना, भगवंताला जाणणे हे त्याच्या नामाचे सामर्थ्य जाणल्याशिवाय कलियुगात अशक्य आहे असे पुराणांमधूनही सांगितले गेले. आणि खरोखर नामाचे सामर्थ्य, सर्वव्यापित्व, सर्वसाक्षित्व जाणणे म्हणजेच विवेकाचा सुयोग्य उपयोग होय.

श्रीमहाराज वेदांतले गुह्य साध्या सोप्या भाषेत सांगतात ते हे असे! महाराजांचा ‘स्वाभाविक’ शब्द नामाची खोली दाखवतो. मानव जीवाला कोणतेतरी प्रतीक असल्याशिवाय सत् रूप परमात्म्याला शुद्ध स्वरूपात धरणे शक्य नाही. मात्र प्रतीक हे बहुधा उपाधिसहित असते. उपाधिसहित असलेल्या प्रतीकांमधून द्वैत बुद्धी, वेगळेपणा, दृश्याशी संलग्नता या गोष्टी वाढतात. जसे विविध धर्मांमध्ये विविध गोष्टींची उपासना प्रतिपादन केली गेली. या विविधतेमुळे ईश्वरप्राप्तीत रम्यता आली हे निश्चित; मात्र त्याच वेळी त्या मार्गांमधल्या मायिक गोष्टींत अडकण्याची शक्यता वाढली. हे होऊ न देता जितका ईश्वर उपाधिरहित, तितकेच त्याचे प्रतीक देखील उपाधिरहित असले तर जीव मायासागराला ओलांडून सरळ त्या तत्त्वाप्रत जाईल, याच आत्मानुभूतीने युक्त अशा सिद्धांतावर सर्व संतांनी नामाचे प्रतिपादन केले. आणि म्हणूनच, ईश्वराची ओढ जशी आणि जितकी जीवाला स्वाभाविक, तितकीच त्याची नामाची ओढ देखील स्वाभाविक आहे असे श्रीमहाराज आजच्या वचनातून आम्हाला सांगत आहेत. कारण प्रत्येक जीवाची ओढ, त्याला माहित असो वा नसो, त्या आनंदाच्या शाश्वत तत्त्वाकडे आहे, ज्याला ईश्वर वा भगवंत म्हणून ज्ञानी वा भक्त संबोधतात. आणि नाम या शुद्धतम अशा नादब्रह्मातून सर्वव्यापी ईश्वराचा आणि प्रेमस्वरूप भगवंताचा साक्षात्कार अनुक्रमे ज्ञानमार्गी आणि भक्तीमार्गी साधकाला गुरुकृपेने होतो. स्वाभाविक का? तर कोणताही साधक, मग मार्ग कोणताही असो, आजवर शरणागती शिवाय मायेच्या पार पोचला नाही. दोन गोष्टी आहेत – मायेच्या पलीकडे शाश्वत तत्त्वात स्थिर होणे, ज्यायोगे संपूर्ण दुःखनिवृत्ती होते. इथे रजतमात्मक मायेचा निरास होतो. मात्र सत्वगुणी माया इथेही साधकाला व्यापून असतेच असे मुख्यतः भक्तिमार्गी संतांनी प्रतिपादन केले आहे. तिचा निरास हा भगवंताला शरण गेल्यानेच होतो आणि म्हणूनच आत्मज्ञानानंतर देखील शंकराचार्यांनी ‘भज गोविन्दम् मूढ मते’ असे परोपरीने सांगितले! आणि हे झाले (जे होणे ‘स्वाभाविकच’ आहे) म्हणजे तो आत्मज्ञानी महात्मा ब्रह्मज्ञानी संत बनतो, जिथे त्याला अखंड आनंदाचे निजधाम प्राप्त होते!

नाम स्वयंभू असल्यामुळेच त्याचा सार्वकालिक संबंध आत्मस्वरूपाशी आहे. केवळ शुद्ध आत्मस्वरूप प्रतिपादन करणारे रमण महर्षी देखील नामाला यासाठी महत्त्व देतात. ते म्हणतात, “ईश्वराचे नाम पक्के धरले की कोणत्याही कल्पना किंवा विचार जरी मनामध्ये आले, तरी ते भगवंताचे रूप, गुण, कीर्ती, सामर्थ्य यांचेच येतात, त्यामुळे ईश्वरावर मन केंद्रित व्हायला मदत होते. इतर विचार हळूहळू लुप्त होतात. मग ईश्वरातून आत्मतत्त्वाकडे वाटचाल चालू होते व मी कोण आहे (कोSहं) याचा बोध घेता येतो.” म्हणूनच भक्तिमार्गीच काय पण योगी जन देखील भगवत नामाचा आश्रय घेतात असे प्रतिपादन अनेक ठिकाणी केले गेले आहे. पद्मपुराण सांगते,
“रमन्ते योगिनोSनन्ते सत्यानन्द चिदात्मनि|
इति राम पदे नासौ परं ब्रह्माभिधीयते||”
-- योगी जन देखील परमसत्यापासून, ब्रह्मतत्त्वापासून प्राप्त होणाऱ्या अपरिमित आनंदाचा उपभोग घेतात आणि म्हणूनच त्या परब्रह्माला ‘राम’ असेही म्हणतात.

असे हे नाम चिदानंद देणारे, स्वयंभू आणि जीवासाठी स्वाभाविक असल्यामुळेच वैश्वानर संहिता सांगते,
“न देश काल नियमः, शौचाशौच निर्णयः|
वरं संकीर्तनात् एव रामरामेतिमुच्यते||”
-- नाम हे स्वाभाविक असल्यामुळेच त्याला स्थळ काळ शौच अशौच कोणतेही बंधन नाही. केवळ राम राम असे संकीर्तन करावे हेच बरे!

“समाधी साधन संजीवन नाम” या प्रसिद्ध अभंगात संत ज्ञानेश्वर म्हणतात, “तृण अग्निमेळे समरस झाले| तैसे नामे केले जपता हरि||” नाम जपता जपता जीव भगवंताशी एकरूपच झाला, जसे गवत अग्नीमध्ये अग्निरूपच होते. इथे माऊली नामच आत्मनिवेदन भक्ती आहे असे सांगत आहेत आणि म्हणूनच नवविधा भक्तीबद्दल श्रीमहाराज म्हणतात, “तीन मैल चालून गेल्यावरच (श्रवण, कीर्तन, स्मरण) जर हवी ती व्यक्ती (भगवंत) भेटली, तर मग नऊ मैल जायचे कशाला?” म्हणजेच नामाच्या स्मरणातच भगवंत भेट आहे.

साधनेच्या दृष्टीने हे वचन मनावर बिंबवावे असे आहे. जर नाम स्वाभाविक आहे, तर माझे मन नामात लागत नाही ही तक्रार ही मायेची परमावधी होय. आम्ही या नकारात्मक मायिक चिंतनातच जास्त रमलो, म्हणून आम्हाला माया त्रास देते. मला सद्गुरूंनी दिलेले नाम मायेच्या पलीकडे आहे आणि त्यामुळे मायेतली कोणतीही व्यक्ती वस्तु मला यात बाधा पोहोचवणे केवळ अशक्य आहे या दृढ भावनेने जो नामाला धरेल व अभ्यास करेल त्याला गुरुकृपा दूर नाही आणि ही गुरुकृपा म्हणजेच अखंड अबाधित अविरत चालणारे भावयुक्त, प्रेमयुक्त नामस्मरण!

||श्रीनाम समर्थ||

1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete