Wednesday, June 28, 2023

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८५ -

 श्रीमहाराजांचे बोधवचन ८५ -

"


विषयरूपी सापाचें विष उतरलेलें नसल्यामुळे भगवंताचें अमृतासारखें गोड नाम आपल्याला गोड लागत नाहीं."


जय श्रीराम 🙏


दोन प्रकारचे बदल माणसाला नेहमीच त्रासदायक ठरतात. पहिला प्रकार असा की ज्यामध्ये इच्छा असूनही तो बदल करू शकत नाही. जसे, जोराच्या फ्लू च्या साथीत तोंड कडू झाले की थंडीताप उतरल्यावर सुद्धा अनेक दिवस आपल्याला अन्न गोड लागत नाही.


दुसऱ्या प्रकारचा बदल असा ज्यामध्ये आपल्या प्रयत्नांच्या जोरावर बदल घडवण्यासाठी मनुष्य धडपड करतो. जसे, मोठ्या शहरात अनेक वर्षे राहिल्यावर खेड्यातला साधेपणा काही दिवसांपलिकडे रुचत नाही. 


अशा अनेक 'सवयी' आहेत ज्या बदलण्यास आपले सवयींच्या आधीन असलेले मन कचरते, सहजासहजी स्वीकारत नाही. थोडक्यात आपण त्या सवयींना शरण जातो आणि सवयी घट्ट होऊन चित्तात संस्कार रूपाने अनंत जन्म वास करतात. अनेक संशोधनांअंती हे स्पष्ट झाले आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी या केवळ या जन्मातल्या परिस्थितीवरच अवलंबून असतात असे नाही. काही आवडीनिवडी अशा का आहेत असा प्रश्न संशोधकांना व त्यात भाग घेतलेल्यांना पडला. त्याचे कारण पूर्वजन्मांतल्या संस्कारांमध्ये आहे हे मानण्यास त्यांची तार्किक बुद्धि तयार झाली नाही; परंतु उत्तर देखील मिळाले नाही. 


हे जर साध्या सामान्य अशा लौकिक सवयींच्या बाबतीत, तर जो परमात्मा या सगळ्याच्या पलीकडे आहे, त्याचे संस्कार मनबुद्धिमध्ये होण्यास वेळ हा लागणारच. त्यातही पुन्हा सगुण भगवंताहून त्याचे नाम सूक्ष्म असल्याकारणाने 'नामाचा संस्कार' होण्यास नामाचा संस्कार झालेल्याचा दैहिक-मानसिक सहवास हाच उपाय आहे हे त्रिवार सत्य आहे! त्यामुळे आजच्या वचनात महाराज आम्हाला याच आमच्या विषयरूपी संस्कारांची आठवण करून देत आहेत. एक प्रकारे आम्हाला चेतावणी देत आहेत. 


अनेकांना नामस्मरण किंवा भगवद्भावना ही दिवसभरातल्या अनेक कर्तव्यांपैकी एक कर्तव्य असे वाटते. त्यामुळे मनुष्याच्या अंतःकरणात वास करणाऱ्या लोभ, मोह, काम, ईर्षा या भावना त्या नामासही ग्रासतात. आणि जोवर लौकिक व्यवहाराचा किंचितसा स्पर्श देखील नामाला आहे, तोवर दैनंदिनीत नामास अग्रक्रम मिळू शकत नाही. सर्व करून जमल्यास करण्याची गोष्ट असे त्याचे स्वरूप बनते आणि तरीही नामाने मनःशांती देखील का मिळत नाही हा प्रश्न मनात रुंजी घालतो! 


नाम राहो कंठी हेचि माझे कर्म।

वाहिला संसार पायी कळले त्याचे वर्म।।

असा शुद्ध भाव बनण्यासाठी महाराज सांगताहेत की नाम अमृतासारखे वाटण्यास अगोदर विषयरूपी सापाचे विष उतरले पाहिजे. पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, 'अमुक केलं तर काय झालं, तमुक केलं तर काय झालं' असे वाटत आहे तोवर साधणार नाही. म्हणजे, विषयाचे विष उतरण्यासाठी अगोदर ते विष आहे हे कळले पाहिजे, त्याशिवाय सांसारिक रागद्वेषातून मुक्त व्हावे ही इच्छाच होणार नाही. मग हे ओळखावे कसे तर संत सांगतात,

देह माझा मी देहाचा, तोवरी नसे मी देवाचा! जोवर मनबुद्धीचा मोहरा सर्व या देह आणि देहाला लागलेल्यांच्या ठायी आहे, तोवर विष कोणते याचे आकलन होणे शक्य नाही. यावर आम्ही मखलाशी करतो, पण जर हे सर्व त्यांनीच दिले आहे, तर मग त्याकडे लक्ष पुरवायला नको का? पण आम्ही 'त्यांनी दिले आहे म्हणून, ते त्यांचेच आहे' या भावनेने संसार करतो का? असे जो करील त्याला काहीच बाधणार नाही वा बांधणारही नाही! 


लौकिक विषाचे परिवर्तन अमृतात करता येत नाही; परंतु परमार्थात एक मोठा दिलासा असा आहे की या लौकिक विषयांचा मोहरा सद्गुरूंकडे - भगवंताकडे वळवला की तेच विषरूपी विषय अमृतात परिवर्तित होतात!! मग संत छातीवर हात ठेवून म्हणू शकतात, "विषय तो त्यांचा झाला नारायण"! 


हा झाला पहिला भाग की विषय विषरूपी आहेत हे कळले; परंतु आता दुसरा भाग हा अधिक महत्त्वाचा आहे की 'भगवंताचे नाम हेच अमृत आहे' याचा मनबुद्धीने कायमस्वरूपी स्वीकार! आम्ही पारायण करतो, ग्रंथ वाचतो, तीर्थक्षेत्री जातो, दानधर्म करतो, नीतिधर्माने वागतो, तरीही नाम जरुरीचेच आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. ज्ञानेश्वर महाराज, श्रीमहाराज, सर्वच संत म्हणतात, भगवंताच्या अनुसंधानाशिवाय असणारी नीती ही पोरकी आहे. तिला मायबाप हवेत ना! हे मायबाप म्हणजे 'भगवंताचे नाम' आहे. नामाच्या गोडीची खरी कल्पना ही नामच आयुष्य बनलेल्या साधकांना येते. महाराजांनी अमृताची उपमा देण्यामागचे कारण हे की नामाने मनुष्याला आपल्या अजर-अमर आत्मस्वरूपाचे यथार्थ दर्शन होते. नामाने अमृतस्वरूप भगवंताची प्रेमप्राप्ति होते, नामाने पंचकोष पंचक्लेश यांपलिकडे साधक जातो व कायमची दुःखनिवृत्ती आणि अखंड आनंदप्राप्तीचा अधिकारी सद्गुरू कृपेने बनतो!


सद्गुरूंनी उपदेशिलेल्या आजच्या वचनाचे चिंतन करता सहज स्पष्ट होते की, 

# सर्व विषांचा संग्रह या 'खोट्या मी' मधे आहे. 

# खोट्या मी चे प्रकटीकरण 'अहंकार' रूपात होते. 

# त्याचे बीज आहे वासना. 

# वासनेचे बी अहंकाराचा जमिनीत रोवले गेले की त्या बीजातून जन्ममरण आणि त्यामधल्या भोगांना सामोरा जाणारा वृक्ष वाढत जातो.

# त्याला स्वसमर्थनाचं पाणी सतत घालत गेलं की बीचा केव्हा वृक्ष झाला कळतही नाही.

# या वृक्षाला लोभ-मोहाची फळे येऊन पुन्हा त्यांचे बी तयार होते व नवीन जन्माचा वृक्ष फोफावतो. 


मात्र,

वासनेचे बी आणि वृक्ष दोन्ही परिणामहीन ठरतात सद्गुरुंच्या शक्तीपुढे! हे होण्यासाठी -

# बी सद्गुरुंच्या नामाचे हवे

# वासना सद्गुरूंना आनंद देण्याची हवी

आणि

# अहंकार सद्गुरूंच्या मोठेपणाचा - थोरवीचा हवा!

# समर्थन सद्गुरूंनी उपदेशिलेल्या आज्ञेचे हवे.


हे होण्यासाठी सद्गुरूंना संपूर्ण शरण जाण्याची शुद्धबुद्धी प्रदान करावी अशी करुणा त्यांच्या चरणी अखंड भाकावी! 


त्यांच्या कृपेने हे घडले की मग मात्र कितीही विषयाच्या जालीम विषाच्या सान्निध्यात साधक राहिला तरी त्याचे अंतरंग नाममृताने दुथडी भरून वाहील व केवळ त्याला स्वतःलाच नव्हे तर त्याच्या सान्निध्यात येणाऱ्या असंख्य जनांना अमृतरूप करेल यात शंका नाही! 


संत चरण रज लागता सहज।

वासनेचे बीज जळुनी जाय।।

मग रामनामी उपजे आवडी।।

मग रामनामी उपजे आवडी।। 


।।श्रीनाम समर्थ।। 🙏

Tuesday, June 27, 2023

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८४ -

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८४ -


"नामानें दुरित नाहींसें झालें की भगवंत हवासा वाटेल आणि मग त्याच्या नामांत प्रेम येईल. नामांत प्रेम आल्यावर समाधान आपोआप लाभेल. म्हणून, आधी भगवंताची खरी भूक लागली पाहिजे."


जय श्रीराम 🙏


सनमुख होइ जीव मोहि जब ही।

जन्म कोटि अघ नासहिं तबहीं।।

हे भगवंताचे वचन आहे की, जेव्हा जीव माझ्या सन्मुख झाला तेव्हाच त्याच्या करोडो जन्मांच्या पापांचा नाश होतो. आजच्या वचनाच्या पहिल्या भागात श्रीमहाराज आम्हाला याच प्रभुवचनावर सही करून सांगत आहेत की, 'नामाने दुरितांचा नाश होतो', कारण नाम आणि भगवंत हे एकरूप आहेत. त्यामुळे भगवंतांना सन्मुख होणे म्हणजेच त्यांच्या नामाला सन्मुख होणे होय व नामाला सन्मुख होणे म्हणजेच भगवंतांना सन्मुख होणे होय.


दुरिते ही आपल्याच कर्मांचा परिपाक असतो. मग ती दुरिते ही कोणत्याही भोगांच्या स्वरूपात आपल्यासमोर येऊ शकतात. लौकिक सुख आणि दुःख असो वा परमार्थ मार्गावर चालताना येणारे अडथळे असोत. दोन्हीकडे आपल्याच कर्मफळानुसार गोष्टी घडतात. परंतु, परमार्थ मार्गात एक मोठा फरक आणि अमोघ असा दिलासा आहे की जर आम्ही सद्गुरूंना शरण जाण्याकडे आमची बुद्धि वापरली तर मात्र ते आम्हाला या कर्मफळांच्या पलीकडे नेऊन देखील साधनेत स्थिर करू शकतात. मात्र अशी शरणागती इतकी सोपी नाही. तिच्यासाठी ज्या मीपणाला आयुष्यभर मी पोसले त्याचा पूर्ण बळी देण्याची इच्छा व तयारी लागते. 


मग हे होईतोवर नामाचा परिणाम दिसतच नाही का? याचे उत्तर आज महाराज देत आहेत.


अनेक साधक शिष्यांचा हा प्रश्न असतो की आम्हाला अजून नामाची प्रचिती येत नाही. त्यांना महाराज सांगताहेत की अगोदर तुमचं पूर्व दुरित, पूर्व पाप, पूर्व कर्म यांचा नाश करण्यामध्ये नामाची शक्ती कार्य करते. ते झाल्यावर मग 'भगवंत हवासा वाटेल!!' यामध्ये महाराजांनी हे देखील सूचित केले आहे की पुन्हा तुमचे नाम दुरित नाहीसे करण्यात खर्ची पडू नये वाटत असेल आणि नामाने वाढीस लागणारी भगवद्भक्ति अनुभवायची असेल तर यापुढे तुमची सर्व कर्मे शुद्ध, गुरू-भावनेने प्रेरित आणि नितीधर्माच्या चौकटीत बसणारी असावयास हवी. 


हे सर्व कशासाठी आवश्यक आहे हे सांगताना महाराज म्हणताहेत की 'भगवंताची भूक' हे खरं पुण्य आहे मनुष्यदेहात आल्यानंतर. ज्याला ही भूक लागली तो त्याच्या निकट जाण्यास तयार झालाच! पण ही भूक लागल्याचे लक्षण आहे, इतर भूक व तहान कमीकमी होत जाणे. *भूक लागली पोटी। जेणे विठ्ठल विठ्ठल ओठी।।* अशी आस लागली की मग महाराज म्हणताहेत की 'मग त्याच्या नामात प्रेम येईल'. जेव्हा आम्ही म्हणतो, आमचं नाम mechanical होते, त्यात कोरडेपणा जाणवतो, त्याचे कारण महाराज स्पष्ट करत आहेत की अजून आम्हाला भगवंताची भूक नाही आणि इतर भूक भागली नाही! आणि हेच खरे दुरित जे भगवंताच्या भुकेविना साठत साठत संचित प्रारब्ध बनून पुन्हा पुढच्या जन्मी आमच्या वाट्याला येते! 


कसे सांगितले आहे पहा महाराजांनी. खरे बघू जाता परमार्थात प्रत्येकच गोष्ट गुरुकृपेने होत असते, त्यांच्या दयेने होत असते. परंतु आम्हाला महाराज जो पुरुषार्थ आम्ही प्रपंचात हिरिरीने वापरतो असे म्हणतो, त्याची दिशा परमार्थाकडे वळवून *'भगवंताची भूक लागेल असे करावे'* असे जणू सांगितले आहे. हे लक्षात आले की मग साधक खऱ्या अर्थाने 'धारणेचा' अभ्यास करण्यास सिद्ध होतो. एकाच गोष्टीने मन व्यापून असणे याचे नाव धारणा! ही धारणा ज्यावेळी सद्गुरुंच्या विचारांनी, आज्ञेने, भावनेने, वृत्तीने आणि कर्माने संचलित होते, तेव्हा खऱ्या अर्थाने साधक सद्गुरू प्रदत्त नामाच्या 'मागे लागतो!' 


आणि श्रीमहाराज म्हणताहेत की जो असा नामाच्या दिशेने आपली संपूर्ण मनोवृत्ती स्थिर करण्याचा प्रयत्न करतो, त्याला नामाचे प्रेम येतेच - म्हणजे ते नामाचे प्रेम आपल्याला देतात. आणि म्हणतात की नामाचे प्रेम आल्यावर समाधान आपोआप लाभेल. किती स्पष्टपणे सांगितले आहे इथे की नामाच्या प्रेमाची परिणती समाधानात होणे हा नियमच आहे, त्यात बदल संभवतच नाही. म्हणून आमचे संत चोखा महाराज म्हणाले,

नाम जाळी संचिताचा पूर्ण बडीवार।

आहे बुडत्याला नौका जीवनी आधार।।


पण हे कधी होईल सांगताना म्हणाले,

नाम जपो वाचा नित्य श्वासातही नाम।

नाममय होवो देवा माझे नित्य कर्म।।

नामाच्याच संगे लाभो प्रेम रे अपार।।

नामाच्याच संगे- हे होण्यासाठी इतर संग मनाने सुटणे गरजेचे आहे आणि हे व्हावे याची करुणा जो गुरुचरणी भाकेल त्याला 'भगवंताची खरी भूक' तेच प्रदान करतील!


।।श्रीनाम समर्थ।। 🙏