Tuesday, June 27, 2023

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८४ -

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८४ -


"नामानें दुरित नाहींसें झालें की भगवंत हवासा वाटेल आणि मग त्याच्या नामांत प्रेम येईल. नामांत प्रेम आल्यावर समाधान आपोआप लाभेल. म्हणून, आधी भगवंताची खरी भूक लागली पाहिजे."


जय श्रीराम 🙏


सनमुख होइ जीव मोहि जब ही।

जन्म कोटि अघ नासहिं तबहीं।।

हे भगवंताचे वचन आहे की, जेव्हा जीव माझ्या सन्मुख झाला तेव्हाच त्याच्या करोडो जन्मांच्या पापांचा नाश होतो. आजच्या वचनाच्या पहिल्या भागात श्रीमहाराज आम्हाला याच प्रभुवचनावर सही करून सांगत आहेत की, 'नामाने दुरितांचा नाश होतो', कारण नाम आणि भगवंत हे एकरूप आहेत. त्यामुळे भगवंतांना सन्मुख होणे म्हणजेच त्यांच्या नामाला सन्मुख होणे होय व नामाला सन्मुख होणे म्हणजेच भगवंतांना सन्मुख होणे होय.


दुरिते ही आपल्याच कर्मांचा परिपाक असतो. मग ती दुरिते ही कोणत्याही भोगांच्या स्वरूपात आपल्यासमोर येऊ शकतात. लौकिक सुख आणि दुःख असो वा परमार्थ मार्गावर चालताना येणारे अडथळे असोत. दोन्हीकडे आपल्याच कर्मफळानुसार गोष्टी घडतात. परंतु, परमार्थ मार्गात एक मोठा फरक आणि अमोघ असा दिलासा आहे की जर आम्ही सद्गुरूंना शरण जाण्याकडे आमची बुद्धि वापरली तर मात्र ते आम्हाला या कर्मफळांच्या पलीकडे नेऊन देखील साधनेत स्थिर करू शकतात. मात्र अशी शरणागती इतकी सोपी नाही. तिच्यासाठी ज्या मीपणाला आयुष्यभर मी पोसले त्याचा पूर्ण बळी देण्याची इच्छा व तयारी लागते. 


मग हे होईतोवर नामाचा परिणाम दिसतच नाही का? याचे उत्तर आज महाराज देत आहेत.


अनेक साधक शिष्यांचा हा प्रश्न असतो की आम्हाला अजून नामाची प्रचिती येत नाही. त्यांना महाराज सांगताहेत की अगोदर तुमचं पूर्व दुरित, पूर्व पाप, पूर्व कर्म यांचा नाश करण्यामध्ये नामाची शक्ती कार्य करते. ते झाल्यावर मग 'भगवंत हवासा वाटेल!!' यामध्ये महाराजांनी हे देखील सूचित केले आहे की पुन्हा तुमचे नाम दुरित नाहीसे करण्यात खर्ची पडू नये वाटत असेल आणि नामाने वाढीस लागणारी भगवद्भक्ति अनुभवायची असेल तर यापुढे तुमची सर्व कर्मे शुद्ध, गुरू-भावनेने प्रेरित आणि नितीधर्माच्या चौकटीत बसणारी असावयास हवी. 


हे सर्व कशासाठी आवश्यक आहे हे सांगताना महाराज म्हणताहेत की 'भगवंताची भूक' हे खरं पुण्य आहे मनुष्यदेहात आल्यानंतर. ज्याला ही भूक लागली तो त्याच्या निकट जाण्यास तयार झालाच! पण ही भूक लागल्याचे लक्षण आहे, इतर भूक व तहान कमीकमी होत जाणे. *भूक लागली पोटी। जेणे विठ्ठल विठ्ठल ओठी।।* अशी आस लागली की मग महाराज म्हणताहेत की 'मग त्याच्या नामात प्रेम येईल'. जेव्हा आम्ही म्हणतो, आमचं नाम mechanical होते, त्यात कोरडेपणा जाणवतो, त्याचे कारण महाराज स्पष्ट करत आहेत की अजून आम्हाला भगवंताची भूक नाही आणि इतर भूक भागली नाही! आणि हेच खरे दुरित जे भगवंताच्या भुकेविना साठत साठत संचित प्रारब्ध बनून पुन्हा पुढच्या जन्मी आमच्या वाट्याला येते! 


कसे सांगितले आहे पहा महाराजांनी. खरे बघू जाता परमार्थात प्रत्येकच गोष्ट गुरुकृपेने होत असते, त्यांच्या दयेने होत असते. परंतु आम्हाला महाराज जो पुरुषार्थ आम्ही प्रपंचात हिरिरीने वापरतो असे म्हणतो, त्याची दिशा परमार्थाकडे वळवून *'भगवंताची भूक लागेल असे करावे'* असे जणू सांगितले आहे. हे लक्षात आले की मग साधक खऱ्या अर्थाने 'धारणेचा' अभ्यास करण्यास सिद्ध होतो. एकाच गोष्टीने मन व्यापून असणे याचे नाव धारणा! ही धारणा ज्यावेळी सद्गुरुंच्या विचारांनी, आज्ञेने, भावनेने, वृत्तीने आणि कर्माने संचलित होते, तेव्हा खऱ्या अर्थाने साधक सद्गुरू प्रदत्त नामाच्या 'मागे लागतो!' 


आणि श्रीमहाराज म्हणताहेत की जो असा नामाच्या दिशेने आपली संपूर्ण मनोवृत्ती स्थिर करण्याचा प्रयत्न करतो, त्याला नामाचे प्रेम येतेच - म्हणजे ते नामाचे प्रेम आपल्याला देतात. आणि म्हणतात की नामाचे प्रेम आल्यावर समाधान आपोआप लाभेल. किती स्पष्टपणे सांगितले आहे इथे की नामाच्या प्रेमाची परिणती समाधानात होणे हा नियमच आहे, त्यात बदल संभवतच नाही. म्हणून आमचे संत चोखा महाराज म्हणाले,

नाम जाळी संचिताचा पूर्ण बडीवार।

आहे बुडत्याला नौका जीवनी आधार।।


पण हे कधी होईल सांगताना म्हणाले,

नाम जपो वाचा नित्य श्वासातही नाम।

नाममय होवो देवा माझे नित्य कर्म।।

नामाच्याच संगे लाभो प्रेम रे अपार।।

नामाच्याच संगे- हे होण्यासाठी इतर संग मनाने सुटणे गरजेचे आहे आणि हे व्हावे याची करुणा जो गुरुचरणी भाकेल त्याला 'भगवंताची खरी भूक' तेच प्रदान करतील!


।।श्रीनाम समर्थ।। 🙏

No comments:

Post a Comment