Monday, November 15, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८३ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८३ –

भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे.

श्रीराम!

श्रीमहाराजांची बहुतेक वचने साधनेच्या प्रत्येक स्तरावर अत्यंत बोधक अशी असतात, त्यातलेच हे आजचे वचन. ‘अभिमान’ या एका शब्दात परमार्थ मार्गावरचे सर्व अडथळे एकत्र गुंफलेले आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. परमार्थात अभिमानाचे स्थूल आणि सूक्ष्म असे सर्वसामान्य वर्गीकरण केले जाते. बुद्धिमत्ता, मान, कीर्ती, पैसा, रूप, स्थावर मालमत्ता, जीवन जगण्याचा लौकिक स्तर वगैरे अनेक गोष्टी स्थूल अहंकारात येतात; परंतु हा स्थूल अहंकार ज्यातून जन्म घेतो त्यास सूक्ष्म अहंकार म्हणतात. हा सूक्ष्म अहंकार म्हणजेच देहबुद्धी; मी हा देहच आहे आणि त्यामुळे या देहाला लागलेले सर्व व्यक्ती, वस्तू, पदार्थ, उपाधी म्हणजेच ‘मी’ हे झालेले false identification. वेदांतात यालाच अध्यारोप – अपवाद असे म्हणतात. जे नाही ते आहे असे वाटणे; यालाच महाराज ‘माया’ असे म्हणतात. आत्मरूप असलेला जीव मायेच्या क्षेत्रात आल्याबरोबर जे स्फुरण येते तोच अहंकार, ज्यातून मग चित्त, बुद्धी आणि मन आभासात्मक जन्म घेते. याच आभासात जगता जगता जेव्हा या आभासात्मक जगाच्या बाहेर पडण्याची खूण – भगवंताचे स्मरण - सद्गुरूंच्या भेटीने मिळते त्यामुळे जीव हळूहळू या नसलेल्या परंतु तरीही जीवास ग्रासलेल्या मायेतून केवळ त्या परम सत्तेने बाहेर पडू शकतो व पुन्हा आपला आत्मानंद भोगू शकतो, आत्मानंदरूप होऊ शकतो.

 

आपल्या पुराणांमधून आणि विविध ग्रंथांमधून अशी अनंत उदाहरणे आहेत, जिथे साधनेच्या अगदी खालच्या थरापासून अतिशय उत्तम स्तरापर्यंत हा ‘अभिमान’ कसा जीवाला बंधनात पाडतो हे कळते. दोन टोकाची उदाहरणे बघितली तर लक्षात येईल. अर्थात, जेव्हा आपण उच्च स्तरातील व्यक्ती – महात्म्यांमध्ये अशी उदाहरणे बघतो, त्यावेळी त्यांची नेमणूक आपल्याला त्यातून बोध घेता यावा यासाठी असते हेही खरे.

 

देवर्षी नारद ‘मी काम जिंकलेला आहे’ असे अभिमानाने जेव्हा सर्वत्र असे सांगू लागले, त्यावेळी भोलेनाथांनी त्यांना सावधान केले, माझ्यासमोर बोललात ठीक आहे परंतु भगवान श्रीहरींसमोर याबद्दल उच्चार करू नये. परंतु, ‘संभु दीन्ह उपदेस हित नहिं नारदहि सोहाना!’- त्यांनी दिलेला उपदेश नारदांना भावला नाही आणि त्यांनी ते श्रीहरींना सांगितले. त्यानंतर आपल्या या आवडत्या भक्ताचा अभिमान – अहंकार हरण करण्याचा घाट श्रीहरींनी घातला व मर्कटरूप त्यांना देऊन कसे ‘मी काम जिंकला’ या अभिमानास मरण दिले हे सर्वविदित आहे. यातून महाराज ज्याला ‘मीपणाचा अभिमान’ म्हणतात, तो किती घातक आहे हे आपल्या सहज लक्षात येते. मुख्यतः भक्तिपंथामध्ये जोवर किंचित देखील ही मीपणाची भावना आहे तोवर आम्ही ‘भक्त’ म्हणवून घेऊच शकत नाही असे सर्व संतांनी सांगितले. समर्थ तर या अभिमानाला आपल्या मनाच्या श्लोकात ‘पापिणी’ म्हणतात. परंतु समर्थ त्याचा उतार देखील लगेच सांगतात,

“रघूनायकावीण वाया शिणावे|

जनासारिखे व्यर्थ का वोसणावे||

सदा सर्वदा नाम वाचे वसो दे|

अहंता मनी पापिणी ते नसो दे||”

आणि हेच महाराज आजच्या वचनात सांगताहेत, भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे. इथे अजून एक लक्षात येते, की नुसते नाम घ्या असे महाराज इथे सांगत नाहीत तर स्मरण असावे हे सांगत आहेत; कारण तेच म्हणतात तसे, सर्व साधनेचा प्राण असेल तर तो म्हणजे स्मरण. नुसते साधन आनंद देत नाही; तर त्यातले स्मरण आनंद देते. आणि नामातून गुरुकृपेने घडलेल्या साधन त्या आनंदाच्या स्त्रोतापर्यंत नेत असल्याने स्वाभाविकच हा प्रवास अहंकाराच्या पलीकडे वसणाऱ्या आत्मरूपापर्यंत होतो. असा प्रवास घडलेल्या साधकाची मनस्थिती कशी असते हे आपल्याला दुसऱ्या उदाहरणात बघायला मिळेल.

 

‘विदेही’ म्हणून गौरवले जाणारे राजर्षी जनक महाराज जेव्हा अष्टावक्र ऋषींकडे येतात, तेव्हा त्यांना प्रश्न करतात,

“कथं ज्ञानमवाप्नोति कथं मुक्तिर्भविष्यति|

वैराग्यं च कथं प्राप्तं एतद् ब्रूहि मम प्रभो||”

जे जनक महाराज प्रत्यक्ष ज्ञान, भक्ति, वैराग्य आहेत ते इतक्या विनम्रपणे ऋषींना ‘प्रभो’ असे संबोधन करून ज्ञान, वैराग्य, मुक्ती व अंतिम ज्ञानाबद्दल प्रश्न करतात आणि या खऱ्याखुऱ्या लीनतेमुळेच अष्टावक्र ऋषींचा संपूर्ण अनुग्रह त्यांच्यावर झाला आणि जगताला वेदांताचे अंतिम ज्ञान अतिशय थेट पोचवणारा ‘अष्टावक्र गीता’ हा ग्रंथ तयार झाला. म्हणूनच महाराज म्हणत असावेत की भावना मात्र शंभर नंबरी हवी; त्यात भेसळ असून चालत नाही;  . ज्याची भावना शुद्ध आणि खरी, त्याला गुरू न मागता देखील कृपा करण्यास आतुर असतात. कारण तिथे सपशेल शरणागती असते.

 

अशी ही अवस्था साधण्यासाठी स्मरणाशिवाय अन्य उपाय नाही असे महाराज सांगत आहेत. कारण, भगवंताच्या – म्हणजेच गुरूंच्या स्मरणाला कोणतीही उपाधी लागत नाही. महाराज एकीकडे म्हणतात, तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात, समाजात तुमचे स्थान काय आहे, तुमची जात कोणती आहे, या व अशासारख्या कोणत्याच उपाधीचा संबंध भगवत स्मरणाशी शक्य नाही; इतके स्मरण शुद्ध आहे, जे त्या परमपित्याशी संधान साधते व जीवास मुक्त करते आणि म्हणूनच गोचिडासारख्या जीवाला जडलेल्या अभिमानापासून केवळ संपूर्ण उपाधिरहित असे नामस्मरणच मुक्ती देऊ शकते.

 

त्यातल्या त्यात भक्तिपंथी संतांमध्ये तर लीनतेची सहज चढाओढ लागल्यासारखी दिसते, इतके ते स्वतःला दीन-लीन म्हणण्यात धन्यता मानतात. प्रत्यक्ष शंकरसुवन केसरीनंदन जिथे म्हणतात, “सो सब तव प्रताप रघुराई| नाथ न कछु मोरि प्रभुताई||” – जो काही पराक्रम माझ्याकडून घडला तो तुमचा मोठेपणा आहे, तुमची शक्ती आहे; माझे त्यामध्ये काहीही नाही! सूरदास म्हणतात,

“अप बल तप बल और बाहु बल, चौथो बल हैं राम| 

सूर किशोर कृपा ते सब बल, हारे को हरिनाम||” – हे जे हरणे आहे, ते म्हणजे अभिमानाचे मरण आणि हे मरण सततच्या स्मरणाने साधते म्हणून महाराजांचा नामाचा अट्टाहास!

 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज भगवत नामाच्या स्मरणाने घडलेल्या अभिमान त्यागाला साधनाचे सार म्हणतात –

 

“थोडे आहे थोडे आहे| चित्त साह्य जालिया||

हर्षामर्ष नाही अंगी| पांडुरंगी सरले ते||

अवघ्या साधनांचे सार| न लगे फार शोधावे||

तुका म्हणे लटिके पाहे| सांडी देह अभिमान||”

 

|| श्रीनाम समर्थ ||

 

 

No comments:

Post a Comment