Tuesday, November 10, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७५ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७५ –

 

मारुतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरुपाची आठवण झाली. त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे.

 

श्रीराम!

लंकेहून सीता शोधाचे कार्य पार पाडून जेव्हा हनुमंत प्रभू रामचन्द्रांकडे परत आले, तेव्हा प्रभूंनी जेव्हा सीता मातेचा वृत्तांत विचारला तेव्हा हनुमंत सांगतात,

“नाम पाहरु दिवस निशी|

ध्यान तुम्हार कपाट||

लोचन निज पद जंत्रित|

प्राण जाहि केहि वाट||”

हे प्रभू, मातेचा वृत्तांत अत्यंत खेदजनक आहे; परंतु त्यांच्या मुखात सतत राम नामाचा पहारा आहे, तुमचे रूपाचा पहारा हृदयरूपी कपाटावर आहे, मातेचे नयन तुमच्या चरणांवर स्थित आहेत; असे असल्यामुळे त्यांचे प्राण (इतकी विपरीत परिस्थिती असून देखील) कुठून बाहेर पडणार? हा स्वरूपबोध जो श्रीमहाराज आम्हाला आजच्या वचनात सांगत आहेत, तो बोध सीता मातेची दैनंदिनी आम्हाला शिकवते.

 

आजच्या वचनाचा भावार्थ अत्यंत गूढ आहे. यात अनेक गोष्टी साधक दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. मुद्रिका देणारे कोण? हनुमंत! जो दास्याभावात आत्यंतिक संलग्न आहे, ज्याचे मन हे आपल्या अराध्याशी तन्मय झालेले आहे, तोच केवळ आपल्या आराध्याच्या स्वरूपाबद्दल, त्याच्या नाम, रूप, गुणाबद्दल सांगण्याचा अधिकार राखतो; किंबहुना भगवंत त्याला तो अधिकार देतात. सीता माता प्रत्यक्ष भगवती. तिने आमच्यासारख्या जीवांना स्वरूप बोध कसा व्हावा लागतो हे शिकवण्यासाठी अज्ञान्याची भूमिका घेऊन ती राम नामांकित मुद्रिका हनुमंत रूपी गुरुकडून मिळाल्यावर तिला स्मरण झाले असे दर्शवते. याशिवाय स्वरूप कायम स्थिरच आहे. ते आहेच. ते कुठून यायचे नाही. मात्र जोवर सद्गुरू त्याचे बीज आमच्यामध्ये पेरत नाहीत, तोवर ते असूनही त्याचा बोध आम्हाला होत नाही. मुद्रिकेत काय होते? तर रामनाम. नामाशिवाय स्वरूप बोध संभवत नाही; अथवा नामाशिवाय स्वरुपाव्यातिरिक्त अनात्म गोष्टी दूर करणे जीवास अत्यंत अवघड जाते हेच यातून दिसते.

 

प्रभू रामचंद्रांना लंकेस येताना हनुमंतांनी जेव्हा विचारले, “मी मातेला कसे ओळखू?” तेव्हा रघुनंदन म्हणाले, “जिथे आजूबाजूच्या झाडांमध्ये देखील रामनाम ऐकू येईल, तिथे माझी सीता आहे असे समज.” श्रीमहाराज म्हणतात, नाम कुठपर्यंत घ्यावे? तर जिथे नाम साधन म्हणून घेण्याची कृती थांबून, तेच साध्य अशी अनुभूती येऊन सहज नाम स्फुरत नाही, तिथपर्यंत नाम घ्यावे! त्यानंतर ते घ्यावे लागत नाही, ते आपोआप चालते; इतकेच नव्हे तर अशा मनुष्याच्या सान्निध्यात जो येतो, त्याला त्याचा उपयोग होतो. या प्रभू, माता आणि हनुमंतांच्या लंकेतल्या लीलांमध्ये आम्हाला या सर्व गोष्टींचा परिपाठ बघावयास मिळतो.

 

आणि हे सांगून पुढे महाराज आम्हाला सांगतात, “त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे.” अजून एकीकडे श्रीमहाराज जे म्हणतात की, नुसते साधन आनंद देत नाही, त्यातले स्मरण आनंद देते, याचे कारण हेच. आनंदनिधान भगवंताच्या स्मरणातच जीवाच्या मीपणाचे विस्मरण आहे आणि देहबुद्धीच्या विस्मरणाशिवाय स्वरुपबोध संभवत नाही. स्मरण राहणे याचाच अर्थ भगवंताच्या अखंड संन्निध्याची जाणीव टिकणे होय. भक्ताला ही जाणीव द्वैतातून आपल्या सोबत त्याच्या भावाप्रमाणे होते तर ज्ञानी भक्ताला हीच जाणीव आपल्या हृदयकपाटात आत्मरूपाने होते – “जीवू परमात्मा दोन्ही, बैसवूनी ऐक्यासनी| जयांच्या हृदयभुवनी विराजती||” अशी अवस्था आल्याशिवाय जीवाचे जीवपण संपत नाही आणि त्यामुळे जीवाशी निगडीत सुखदुःखांची उपाधीही सुटत नाही. अशा रीतीने आजच्या वचनात महाराजांनी स्वरूप बोधाचा सरळसोट मार्ग सांगितला आहे.

 

श्रीमहाराजांचे नामावरचे प्रेम विलक्षण होते. त्यांचे म्हणणे सरळ सोपे आहे, ते म्हणजे, तुम्ही नुसते नाम घेतले, तरीदेखील त्या नामाच्या शक्तीने रूप प्रकाशित झाल्याशिवाय राहायचे नाही. कारण राम म्हटल्यावर घरातल्या गड्याचे नाव जरी राम असले तरी तो निश्चितच डोळ्यांपुढे येत नाही. त्यामुळे नामात ते मूळ राम रूप अध्याहृत आहेच. या महाराजांच्या अर्थगर्भ वचनात नामाचे आणि तदनुषंगाने प्रकटणाऱ्या रूपाचे, म्हणजेच ईश्वर स्मरणाचे बीज आहे. आजच्या वचनात महाराज ज्या स्मरणाचा उल्लेख करतात तो नामातून ध्यानाचा राजमार्ग आहे म्हटले तर वावगे ठरू नये. आत्मप्रचितीचा मार्ग हा ध्यानातून जातो हे निश्चित – ध्यानेन आत्मनि पश्यन्ति| परंतु श्रीमहाराजांना ध्यान लावणे नव्हे तर सहज ध्यान लागणे किंवा ध्यानात राहणे अपेक्षित आहे. आणि यासाठी नामाव्यातिरिक्त अन्य खात्रीचा उपाय नाही. कारण ध्यान लागण्यासाठी मनाच्या मूलद्रव्यात आमूलाग्र परिवर्तन व्हावे लागते, जेणेकरून ते मन मनरूपाने न राहता आत्मरूपातच स्थित होते. इथेच नामातून भक्ति, भक्तीतून योग, योगातून ज्ञान आणि ज्ञानातून पुन्हा सहज भक्तीकडे साधक पोचतो व सिद्ध बनतो!

 

||श्रीनाम समर्थ||   


Wednesday, November 4, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७३ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७३ –

 

वासनेचा क्षय भगवंताच्या नामात आहे.

 

श्रीराम.

परमपूज्य गुरुदेव रानडे यांचे एक अप्रतिम असे वचन आहे. “हटयोग देहापासून, राजयोग मनापासून सुरुवात करतो. आम्ही (नामसाधक) देवालाच धरून सुरुवात करतो!” सर्व मार्ग एकाच ध्येयाप्रत जाणारे असले तरी भगवंताचे स्मरण हा सर्व साधनांचा प्राण आहे म्हणतात श्रीमहाराज. याचे मुख्य कारण म्हणजे मनुष्याला जीवदशा प्राप्त होण्याचे कारण त्याची या दृश्याशी पडलेली गाठ आणि या गाठीचे मुख्य कारण म्हणजे वासना. ‘जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे’ हे त्रिवार सत्य आहे. वासनेचे मूळ देहबुद्धी आणि त्यामुळे वासना नष्ट करण्यासाठीचे जे साधन हवे ते देहबुद्धीवर घाला करणारे असेच असले पाहिजे. वरच्या गुरुदेवांच्या वचनात नामस्मरणाचे मर्म आले आहे. बाकीची साधने देहबुद्धीपासून सुरुवात करून देहबुद्धीच नष्ट करण्याचे योजतात. मात्र नामस्मरणाचे साधन असे आहे जे देवबुद्धीपासून सुरुवात करून त्यातच स्थित होते व त्यामुळे देहबुद्धी सहजी गळून पडते.  

 

देहबुद्धीचा उगम हा जीवदशेत मनुष्य आल्यानंतर देह मन बुद्धीच्या दृश्याशी संयोगामुळे निर्माण होऊन चिकटणाऱ्या उपाधींमुळे आहे. त्यामुळे, त्या उगमाशी घाला घालणारे साधन हे सर्वथैव उपाधि विरहित असेच असले पाहिजे; नाहीतर अनेकदा साधनाचीच उपाधि पाठीमागे लागते. आणि असे असेल तर ते केवळ भगवंताचे नामच आहे.

दासबोधात समर्थ म्हणतात,

“जेचि क्षणी अनुग्रह केला| तेचि क्षणी मोक्ष झाला| 

बंधन काही आत्मयाला| बोलोचि नये||”

हे मोक्षसुख – मुक्ती ही नामाच्या अनुग्रहाने सुलभ साध्य होते असे सर्व संतांचे म्हणणे आहे, कारण नामाने मनाच्या मूलद्रव्यावर हल्ला होतो. आणि मनाचे मूलद्रव्य हे वासनांनी बनलेले असते. नाना वासना. स्थूल वासना अभ्यासाने आणि विवेकाने काढणे शक्य असते. जसे समर्थ म्हणाले, “कर्तयासी ओळखावे| यास विवेक म्हणावे||” कारण सर्व वासनांचा उदय हा ‘मी कर्ता’ या विपरीत भावनेने होतो. संत आम्हाला थेट उद्दिष्ट दाखवतात व तेच डोळ्यांसमोर ठेवून सुरुवात करावयाला सांगतात. त्यामुळेच पूज्य बाबा बेलसरे नामचंद्रिकेत म्हणतात, “नामानुग्रह युक्तस्य जायते ब्रह्मदर्शनम्||”

 

“वासना मुळीच नको म्हणणे किती सयुक्तिक आहे?” असा लौकिक विचार असणाऱ्यांसाठी ही संत वचने नाहीतच. ती त्यांच्यासाठीच आहेत, ज्यांना या वासनांच्या अग्नीतून सही सलामत बाहेर पडून सहज निष्काम अवस्थेकडे जाण्याची व भक्तीत राहण्याची इच्छा आहे. कोणतीही विषय वासना ही दुःखालाच कारण होते व ईश्वर दर्शन हेच केवळ आनंदाला कारण होते, हे प्रथम बुद्धीला पटल्याशिवाय मनुष्य नामानुगामी किंवा ईश्वरानुगामी होणे शक्यच नाही. गीतेच्या नवव्या अध्यायात भगवंतांनी सरळ सांगितले, “अनित्यं असुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्||”क्षणभंगुर आणि सुखरहित मनुष्यलोक जो मिळालेला आहे, त्यात तू भगवद्भजन कर. (त्याशिवाय सुख लाभणार नाही).                                                           

 

आणि या ईश्वरभक्तीची सुरुवात होण्यासाठी “मला वासनांतून बाहेर पडून वैराग्याकडे जायचे आहे" हा दृढनिश्चय ज्याचा झाला, त्याला गुरुप्रदत्त नाम वासनांचा नायनाट कसा करते याचा अनुभव गुरुकृपेने आल्यावाचून राहत नाही. सर्व वासनांचा उदय हा चित्रविचित्र कल्पनांमधून होतो. दृश्यच जिथे नाशवंत, तिथे त्या कल्पना देखील नाशवंतच असतात हे ध्यानात न आल्याने मनुष्य विविध गोष्टींच्या हव्यासात अडकतो. त्यात पूर्व संस्कारांची भर पडते. त्यावर चिंतन घडल्याने व कृती घडल्याने त्या कल्पना आणि इच्छा दृढावतात, जीव त्यांच्याशी तादात्म्य पावतो; मात्र त्या देखील तकलादू असल्यामुळे टिकत नाहीत. मग जीव नवीन कल्पना आणि नवीन वासना शोधतो व हे दुष्टचक्र संपत नाही. गुरुदेव रानडे म्हणतात, “नामस्मरण म्हणजे ‘जमावबंदी’ चा कायदा आहे. कल्पना जमू लागल्या की नामस्मरण त्यांना ‘चलो हटो’ असा आदेश देते व त्यामुळे त्या कल्पना दुर्बल होतात. मुख्य म्हणजे त्यांचे दृढीकरण होण्याचे टळते.”

 

या सर्वाचा परिपाक काय होतो तर आमचे नामस्मरण दिवसेंदिवस निष्काम आणि निरहंकार होऊ लागते. अनात्म्याचे बंधन हळूहळू क्षीण होऊ लागते व जीव स्वरूपी स्थिरावू लागतो. अगदी सत्वगुणाचे देखील बंधनच असल्यामुळे ते ओलांडण्यासाठी देखील नामावाचून आधार नाही. कारण, निष्काम होण्यामागे “मी विसरणे” हा हेतू आहे. पूज्य ब्रह्मानंद महाराज जे म्हणतात, “गुरुराव माझे रामचि केवळ, वासनेचे मूळ दूर केले!” ह्यातले वासनेचे मूळ दूर केले म्हणजे देहबुद्धीला व खोट्या ‘मी’ ला तिलांजली दिली. इथे गुरु = राम = नाम असे आहे हे वेगळे सांगणे नलगे. एक सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे, नामावाचून सर्व साधने देखील कळत नकळत ‘मी’ शी निगडीत आहेत. नाम मात्र ‘मी’ च्या जाणिवेला चिकटून नाही. त्यामुळे इतर कोणत्याही साधनांमध्ये ‘मी’ चा विसर संभवणे अवघड आहे; परंतु नामामध्ये ‘मी’ चा विसर अंतर्भूतच आहे! गुरुदेव म्हणत, नामाने मुक्तीची सुरुवात झाली! लाकूड जळत्या चुलीत घातल्याने त्याचे टोक पेटले; हे सद्गुरूंच्या नामानेच शक्य होते. इतर साधने लाकूड वाळून पेटण्याला अधिकारी बनवतील पण पेटवणार नाहीत. लाकूड पेटण्यासाठी, मुक्तीची सुरुवात होण्यासाठी नामच हवे!

 

म्हणूनच नामाच्या योगाने तुकाराम महाराजांसारखे संत म्हणू शकतात,

“विषयी विसर पडला निःशेष| अंगी ब्रह्मरस ठसावला||”

या ब्रह्मरसाची नांदी सद्गुरूप्रदत्त नामाने होते हे त्रिवार सत्य आहे!

 

||श्रीनाम समर्थ||