Tuesday, November 10, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७५ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७५ –

 

मारुतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरुपाची आठवण झाली. त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे.

 

श्रीराम!

लंकेहून सीता शोधाचे कार्य पार पाडून जेव्हा हनुमंत प्रभू रामचन्द्रांकडे परत आले, तेव्हा प्रभूंनी जेव्हा सीता मातेचा वृत्तांत विचारला तेव्हा हनुमंत सांगतात,

“नाम पाहरु दिवस निशी|

ध्यान तुम्हार कपाट||

लोचन निज पद जंत्रित|

प्राण जाहि केहि वाट||”

हे प्रभू, मातेचा वृत्तांत अत्यंत खेदजनक आहे; परंतु त्यांच्या मुखात सतत राम नामाचा पहारा आहे, तुमचे रूपाचा पहारा हृदयरूपी कपाटावर आहे, मातेचे नयन तुमच्या चरणांवर स्थित आहेत; असे असल्यामुळे त्यांचे प्राण (इतकी विपरीत परिस्थिती असून देखील) कुठून बाहेर पडणार? हा स्वरूपबोध जो श्रीमहाराज आम्हाला आजच्या वचनात सांगत आहेत, तो बोध सीता मातेची दैनंदिनी आम्हाला शिकवते.

 

आजच्या वचनाचा भावार्थ अत्यंत गूढ आहे. यात अनेक गोष्टी साधक दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. मुद्रिका देणारे कोण? हनुमंत! जो दास्याभावात आत्यंतिक संलग्न आहे, ज्याचे मन हे आपल्या अराध्याशी तन्मय झालेले आहे, तोच केवळ आपल्या आराध्याच्या स्वरूपाबद्दल, त्याच्या नाम, रूप, गुणाबद्दल सांगण्याचा अधिकार राखतो; किंबहुना भगवंत त्याला तो अधिकार देतात. सीता माता प्रत्यक्ष भगवती. तिने आमच्यासारख्या जीवांना स्वरूप बोध कसा व्हावा लागतो हे शिकवण्यासाठी अज्ञान्याची भूमिका घेऊन ती राम नामांकित मुद्रिका हनुमंत रूपी गुरुकडून मिळाल्यावर तिला स्मरण झाले असे दर्शवते. याशिवाय स्वरूप कायम स्थिरच आहे. ते आहेच. ते कुठून यायचे नाही. मात्र जोवर सद्गुरू त्याचे बीज आमच्यामध्ये पेरत नाहीत, तोवर ते असूनही त्याचा बोध आम्हाला होत नाही. मुद्रिकेत काय होते? तर रामनाम. नामाशिवाय स्वरूप बोध संभवत नाही; अथवा नामाशिवाय स्वरुपाव्यातिरिक्त अनात्म गोष्टी दूर करणे जीवास अत्यंत अवघड जाते हेच यातून दिसते.

 

प्रभू रामचंद्रांना लंकेस येताना हनुमंतांनी जेव्हा विचारले, “मी मातेला कसे ओळखू?” तेव्हा रघुनंदन म्हणाले, “जिथे आजूबाजूच्या झाडांमध्ये देखील रामनाम ऐकू येईल, तिथे माझी सीता आहे असे समज.” श्रीमहाराज म्हणतात, नाम कुठपर्यंत घ्यावे? तर जिथे नाम साधन म्हणून घेण्याची कृती थांबून, तेच साध्य अशी अनुभूती येऊन सहज नाम स्फुरत नाही, तिथपर्यंत नाम घ्यावे! त्यानंतर ते घ्यावे लागत नाही, ते आपोआप चालते; इतकेच नव्हे तर अशा मनुष्याच्या सान्निध्यात जो येतो, त्याला त्याचा उपयोग होतो. या प्रभू, माता आणि हनुमंतांच्या लंकेतल्या लीलांमध्ये आम्हाला या सर्व गोष्टींचा परिपाठ बघावयास मिळतो.

 

आणि हे सांगून पुढे महाराज आम्हाला सांगतात, “त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे.” अजून एकीकडे श्रीमहाराज जे म्हणतात की, नुसते साधन आनंद देत नाही, त्यातले स्मरण आनंद देते, याचे कारण हेच. आनंदनिधान भगवंताच्या स्मरणातच जीवाच्या मीपणाचे विस्मरण आहे आणि देहबुद्धीच्या विस्मरणाशिवाय स्वरुपबोध संभवत नाही. स्मरण राहणे याचाच अर्थ भगवंताच्या अखंड संन्निध्याची जाणीव टिकणे होय. भक्ताला ही जाणीव द्वैतातून आपल्या सोबत त्याच्या भावाप्रमाणे होते तर ज्ञानी भक्ताला हीच जाणीव आपल्या हृदयकपाटात आत्मरूपाने होते – “जीवू परमात्मा दोन्ही, बैसवूनी ऐक्यासनी| जयांच्या हृदयभुवनी विराजती||” अशी अवस्था आल्याशिवाय जीवाचे जीवपण संपत नाही आणि त्यामुळे जीवाशी निगडीत सुखदुःखांची उपाधीही सुटत नाही. अशा रीतीने आजच्या वचनात महाराजांनी स्वरूप बोधाचा सरळसोट मार्ग सांगितला आहे.

 

श्रीमहाराजांचे नामावरचे प्रेम विलक्षण होते. त्यांचे म्हणणे सरळ सोपे आहे, ते म्हणजे, तुम्ही नुसते नाम घेतले, तरीदेखील त्या नामाच्या शक्तीने रूप प्रकाशित झाल्याशिवाय राहायचे नाही. कारण राम म्हटल्यावर घरातल्या गड्याचे नाव जरी राम असले तरी तो निश्चितच डोळ्यांपुढे येत नाही. त्यामुळे नामात ते मूळ राम रूप अध्याहृत आहेच. या महाराजांच्या अर्थगर्भ वचनात नामाचे आणि तदनुषंगाने प्रकटणाऱ्या रूपाचे, म्हणजेच ईश्वर स्मरणाचे बीज आहे. आजच्या वचनात महाराज ज्या स्मरणाचा उल्लेख करतात तो नामातून ध्यानाचा राजमार्ग आहे म्हटले तर वावगे ठरू नये. आत्मप्रचितीचा मार्ग हा ध्यानातून जातो हे निश्चित – ध्यानेन आत्मनि पश्यन्ति| परंतु श्रीमहाराजांना ध्यान लावणे नव्हे तर सहज ध्यान लागणे किंवा ध्यानात राहणे अपेक्षित आहे. आणि यासाठी नामाव्यातिरिक्त अन्य खात्रीचा उपाय नाही. कारण ध्यान लागण्यासाठी मनाच्या मूलद्रव्यात आमूलाग्र परिवर्तन व्हावे लागते, जेणेकरून ते मन मनरूपाने न राहता आत्मरूपातच स्थित होते. इथेच नामातून भक्ति, भक्तीतून योग, योगातून ज्ञान आणि ज्ञानातून पुन्हा सहज भक्तीकडे साधक पोचतो व सिद्ध बनतो!

 

||श्रीनाम समर्थ||   


No comments:

Post a Comment