Saturday, July 3, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८१ --

श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८१ –

सत्समागम आणि भगवंताचे नाम| हीच करतात परमार्थाचे काम||

 

श्रीराम!

“अब मोहि भा भरोस हनुमंता| बिनु हरिकृपा मिलहि नहिं संता||”

ज्ञानिनां अग्रगण्यम्’ असलेले हनुमंत जेव्हा लंकेत बिभीषणाला भेटले तेव्हा बिभीषणाने हे उद्गार काढले, की हनुमान महाराज, माझ्या मनात आता विश्वास निर्माण झाला की खरेच प्रभूंचा आशीर्वाद मजवर आहे, कारण त्यांच्या कृपेशिवाय तुमच्यासारख्या संतांचे दर्शन होत नाही. एवढेच म्हणून ते थांबले नाहीत तर म्हणाले, “जौं रघुबीर अनुग्रह कीन्हा| तौ तुम्ह मोहि दरसु हठि दीन्हा||” प्रभू रामचंद्रांचा अनुग्रह माझ्यावर झाल्यामुळे तुम्ही मला हट्टाने दर्शन दिलेत (याला दर्शन द्यायचेच असे तुम्ही ठरवलेत). आणि यावर लीन शिरोमणी हनुमंत म्हणतात, “सुनहु बिभीषण प्रभु कै रीति| करहुं सदा सेवक पर प्रीति||” बिभीषणा, यात माझा मोठेपणा नाही; जो सच्चा सेवक आहे – दास आहे, त्याच्यावर प्रभू अखंड प्रेम करतात.

 

हनुमंत या आधी लंकेत प्रवेश करते झाले, तेव्हा लंकिनी नामक लंका प्रवेशद्वाराचे रक्षण करणारी राक्षसीला त्यांची खरी ओळख पटून जेव्हा ते प्रवेश करू लागले तेव्हा ती राक्षसी त्यांनी म्हणते, “तात मोर अति पुन्य बहूता| देखेउं नयन राम कर दूता||” – माझे पुण्य आज उदयाला आले कारण मी आज प्रत्यक्ष रामचंद्रांच्या दूताला बघितले. असे का बरे? याचे स्पष्टीकरण देताना तुलसीदास लंकिनीच्या तोंडी पुढील दोहा घालतात –

 

“तात स्वर्ग अपबर्ग सुख धरिअ तुला एक अंग|

तूल न ताहि सकल मिलि जो सुख लव सतसंग||”

-- हे कपिश्रेष्ठ, स्वर्ग आणि मोक्ष यांचे सर्व सुख एका पारड्यात घातले तरी ते सर्व मिळून दुसऱ्या पारड्यात ठेवलेल्या क्षणभराच्या सत्संगाच्या सुखाची बरोबरी करू शकत नाही!

 

आणि आजच्या वचनात श्रीमहाराज आम्हाला याच सत्संगाचे महिमान ऐकवत आहेत. आता या वचनात गंमत अशी की सदा सर्वदा नामाचे महिमान गाणारे आमचे महाराज नामाच्या अगोदर सत्संग लिहितात आणि मग नाम लिहितात. याचे कारण अत्यंत स्पष्ट आहे. खऱ्या सत्संगाची आस लागली की मग साधकाला नामाच्या महात्म्याची थोडीतरी कल्पना येते. त्याअगोदर तो नाम घेत नसतो असे नाही; परंतु सत्संग श्रवण केल्यानंतर जी नामाची आस लागते त्याचे स्वरूप म्हणजे नामावाचून त्याची होणारी “जल बिनु मछली” ही अवस्था! संताच्या क्षणमात्रच्या संगाने साधकाचा अक्षरशः कायापालट होऊ शकतो, जर त्याच्या मनात तितकी तीव्र ध्येयाची आस आणि संताबद्दल आदरभावना असेल तर. यापैकी एक वेळ अजून ध्येयाची आस निर्माण झाली नसेल तर ती देखील संत समागमाने निर्माण होते; परंतु जर आदर भावनेत खोट असेल तर मात्र भोक पडलेल्या भांड्यातले पाणी जसे झिरपून जाते तशी ती साधनेची शिकवण झिरपून नाहीशी होते. यासाठीच भगवंत गीतेमध्ये म्हणतात, अत्यंत लीन होऊन जो आपले प्रश्न घेऊन संताला ‘शरण’ जातो, त्याचे काम झालेच पाहिजे. आणि हेच आजच्या वचनात महाराज म्हणतात, “हीच करतात परमार्थाचे काम||”

 

परमार्थाचे काम होणे म्हणजे काय?

परमार्थाचे काम होणे म्हणजेच

-- संपूर्ण निष्काम होणे.

-- अंतिम ध्येय लक्षात येऊन त्यानुसार निष्ठापूर्वक वाटचाल सुरु होणे

-- संताने – गुरूने सांगितलेल्या मार्गावर डोळे झाकून निःसंशय चालणे

-- ध्येयाचा क्षणभरही विसर न पडणे

-- दिवसेंदिवस निष्ठेचे परिणत प्रेमात रूपांतर होणे

-- खोट्या ‘मी’ चे संपूर्ण विसर्जन गुरुचरणी होऊन खऱ्या ‘सर्वांतर्गत मी’ ची ओळखण होणे

 

यातील प्रत्येक पायरीत संत समागमाचे महत्त्व कळून येईल. सद्गुरू अथवा संत यांचा आधार घेणे म्हणजे दुबळेपणा नव्हे. हा तो आधार आहे जो आपल्याला जगाकडून निराश्रित वृत्ति बाळगण्याचा आणि केवळ सच्चिदानंद गुरू अथवा भगवंताच्या ठायी आश्रित राहण्याचा, म्हणजेच अनन्यतेचा मार्ग दाखवतो. अशा अनन्यतेशिवाय खोटा जन्मोजन्मी पोसलेला ‘मी’ किंवा अहंकार गळून पडत नाही. या अहंकाराच्या मुसक्या बांधून त्याला गुरुचरणी मारून टाकण्यासाठी अखंड सत्संग श्रवण व चिंतनाची अति आवश्यकता असते, कारण कोंबडे जसे कितीही झाकले तरी आरवायचे राहत नाही, तसे अहंकाराच्या कितीही मुसक्या बांधल्या – त्याच्यावर साधनेचे पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला, तरी काही ना काही निमित्ताने तो डोके वर काढतोच. त्यातल्या त्यात जर आजूबाजूला साधनेची – ज्ञानाची स्तुती करणारी माणसे असली की मग तर जी आतमध्ये सुखावणारी जाणीव साधकाला होते, त्यामुळे तो कधीच त्या अहंकाराच्या मगरमिठीतून बाहेर पडू शकत नाही. जोवर भगवद् साक्षात्कार झालेला नाही, तोवर म्हणूनच साधकाला अतिशय सावधपणे मार्ग चालण्याचा उपदेश गुरू करतात, जेणेकरून ‘परमार्थाचे काम’ होण्यात अडसर निर्माण होणार नाही.  

 

आणि तुलसीदास म्हणतातच, “बिनु सत संग बिबेक न होई| रामकृपा बिनु सुलभ न सोई||”

परमार्थाचे काम होण्यात सर्वात महत्त्वाचे जर कोणते शस्त्र असेल तर ते म्हणजे विवेकाचे शस्त्र. “प्रेय” आणि “श्रेय” यातला फरक जोवर साधकाला आतूनच कळत नाही व तो त्याप्रमाणे आपल्या साधक जीवनाची आखणी करत नाही, तोवर त्याच्याकडून साधना होणे केवळ अशक्य! आजच्या “Age of distraction” मध्ये, जिथे पावलोपावली मार्ग भटकण्याचे जणू जाळे पसरलेले आहे, त्यावेळी तर साधकाला किती जपून ‘आत्मानात्म विवेकास चिकटून’ असायला हवे हे वेगळे सांगण्याची गरज नाही आणि हा विवेक केवळ ‘खऱ्या’ सत्संगानेच जागृत राहू शकतो.

 

मात्र तुलसीदास म्हणतात तसे, हा सत्संग भगवंताच्या कृपेशिवाय मिळत नाही. आणि म्हणून सत्संग आणि ‘नाम’ म्हणतायत महाराज. कारण नाम हाच भगवंत आहे. कलियुगातील अल्पमती, अल्पविवेकी मनुष्याला साधन सोपे व्हावे म्हणून दयासिंधु करुणाकर प्रभूंनी आपले सर्व सामर्थ्य, आपली सर्व शक्ति, आपले सर्व प्रेम, आपले सगुण निर्गुण स्वरूप असे सर्वच्या सर्व नामामध्ये ठेवले व आपले भाग्य त्याहून मोठे असे की सद्गुरूंनी त्या मुळातल्या शक्तीयुत नामामध्ये आपल्या अमोघ नामप्रेमाची शक्ती ओतून ते आपल्याला दिले. याहून सुंदर संगम तो काय असू शकतो? त्यामुळे जो असे नाम अखंड जपतो त्याला प्रभुकृपा होऊन योग्य सत्संग सहज मिळतो, जेणेकरून त्याची साधना सुफळ संपूर्ण होऊन त्यास अखंड समाधानाचा लाभ गुरुकृपेने होतो.

 

याठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घेणे जरूर आहे. आपल्या महाराजांनी सत्संगाची व्याख्या अतिशय सुरेख केली आहे. त्यांचे म्हणणे असे की सत्संग हा तीन प्रकारचा असतो. एक संताची देहाने संगत. परंतु अशी संगत मिळणे अत्यंत दुर्लभ. त्याहीपेक्षा आज आमची श्रद्धा इतकी डळमळीत असते की संताच्या बाह्य अचरणावरून आम्ही आमचे मत बनवणार आणि बाहेरून संत काळाने केवळ अशक्य. जरी संत कळला तरी त्याची संगत चोवीस तास मिळणे अशक्य. म्हणून सद्विचार हा दुसऱ्या प्रकारचा सत्संग आहे म्हणतात महाराज. आणि खरोखर ज्याला गुरुकृपेने परमार्थ मार्गाची थोडी तरी चुणूक मिळाली त्याच्या हे सहज लक्षात येईल की आमचा सर्व घोळ हा चुकीच्या विचारांनी मनाला जी मरगळ आलेली आहे त्यामुळे आहे. आणि चुकीचे विचार हे दिवसभराच्या चुकीच्या चिंतनाने होतात. त्यामुळे चिंतन सुधारणे म्हणजेच विचार सुधारणे होय हे स्पष्ट आहे. आणि जेव्हा विचार भगवंत – गुरू – साधन याबद्दलचे मनामध्ये स्फुरू लागतात, त्यावेळी आपल्याला आपल्याच मनाचा सत्संग होतो हे लक्षात येते व यातून सर्व काही परमार्थाला लागणारी वस्तु आपल्या आतच आहे हेही लक्षात येते. आणि तिसरा सत्संग महाराज सांगतात तो म्हणजे नामाचा सत्संग. यामध्ये ‘संग’ शब्दाला महत्त्व आहे. आपल्या बाजूला आपल्यासोबर बोलणाऱ्या व्यक्तीचा जसा संग आपल्याला जाणवतो, तसा नामाचा संग जाणवू लागणे म्हणजे नामाचा सत्संग लाभणे होय. मग तो गुरू वा भगवंताचे जिवंत अस्तित्व जाणवणे अशा स्वरूपात असो वा नामाचाच एक दिव्य संग जाणवणे अशा स्वरूपाचा असो. महाराजांना एकांनी विचारले, तुकाराम महाराजांना कुणाचा सत्संग लाभला? तेव्हा महाराजांनी या तिसऱ्या ‘नामाच्या सत्संगाबद्दल’ सांगितले.

 

म्हणून,

 

संग एक नामाचा अनन्य भावे करावा|

तया संगतीने गुरुकृपे देहभाव त्यागावा||

असे घडविता साधनजीवन दिव्यत्व अवतरते जीवनी|

जीवपणे न राहिला ब्रह्मरूप अविनाशी||

 

|| श्रीनाम समर्थ ||