Wednesday, August 2, 2023

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ९० --

 


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ९० - 


"उत्तम वस्तु नेहमी थोडीच असते. श्रीखंडामध्ये चक्का आणि साखर कितीतरी असते; पण केशर किती थोडे घालावे लागते! तसे भगवंताच्या नामाचे आहे. रोज थोडे पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे; ते फार फार काम करील."


जय श्रीराम 🙏


श्रीमहाराज एकीकडे म्हणतात,

"तुम्ही सूज्ञ, माझे प्राण।

नाम करा तेवढे जतन।। 

याहून दुजे मागणे काहीं।

सत्य सत्य त्रिवाचा नाहीं।।


आणि हे त्यांचे सांगणे (खरे तर मागणे) आम्ही मानावे, यासाठी अनेक रीतीने- साम दाम- वापरून ते आम्हाला नामाचे महत्त्व पटवून देऊ पाहतात. जे नामरूप झाले त्यांना नाम घ्यावे लागत नाही, त्यांना प्रपंच सोडावा लागत नाही, त्यांना नामाची वेळ ठरवावी लागत नाही, संकल्प करावा लागत नाही. त्यांना नाम सोडत नाही, प्रपंचात राहूनही प्रपंच त्यांच्या चित्तातून नाहीसा होतो, ते सदा सर्वकाळ नामातच वास्तव्य करतात आणि स्वतःच संकल्परूप झाल्याने त्यांच्या संकल्पाने आमच्यासारखे सामान्य उद्धरून जातात! 


परंतु आमची आज तशी स्थिती नाही. आम्ही अजून स्थळ-काळ-निमित्ताच्या परिघात वावरतो. त्यामुळे आमचे नामस्मरण देखील त्याच परिघात बांधलेले असते.  नामातून काय साधायचे याची कल्पना नसल्यामुळे पण तरीही सद्गुरूंनी सांगितल्यामुळे आम्ही नाम घेण्याचा प्रयत्न करतो. आमचे प्रगाढ अज्ञान आणि प्रापंचिक मायेचा जोर आमच्या सद्गुरूंपासून लपलेला नाही. त्यामुळेच आमच्या परिघात येऊन ही ब्रह्मज्ञानी माय आम्हाला समजावून सांगते आहे. आमची धाव लौकिकातल्या उत्तम वस्तूंकडे आहे हे जाणून इथे महाराज नामाला उत्तम वस्तू म्हणून संबोधत आहेत. उत्तम चा खरा अर्थ आहे - उत्-तम- म्हणजे सर्व गोष्टींच्या वरती जे स्थित आहे ते! म्हणजे, सर्वोत्कृष्ट! आणि आमची 'चवीची' ओढ माहीत असल्यामुळे महाराज श्रीखंडाचे उदाहरण देत आहेत की त्यामध्ये जसे चक्का व साखर जास्त लागत असले तरी केशर अगदी थोडे लागते, वा आम्ही थोडे घालतो, तसे - त्या केशरासारखे नाम आहे. केशर जसे अमूल्य तसे नाम अमूल्य. कोणत्याही गोड पदार्थाला केशराने एक सहज richness येतो, तसे तुम्ही प्रपंचात कितीही काहीही करत असा, नामस्मरणाने तुमचा प्रपंच खऱ्या अर्थाने Rich - श्रीमंत होईल असे महाराजांना सांगायचे आहे. केशर जसे काहीच ठिकाणी पिकते तसे नाम देखील केवळ संत सद्गुरुंच्या ठायीच बहरते.


पण हे नाम जेव्हा सद्गुरूप्रदत्त असते तेव्हा त्या नाम-केशराची गोडी आमच्या अंतरंगाला पवित्र व सिद्ध बनवते. सिद्ध कोण? तांदूळ जेव्हा हवे तेवढे बरोबर शिजतात आणि मोकळा तरीही मऊ असा भात बनतो, त्यावरून हा सिद्ध शब्द आला आहे. तसा नामाच्या स्मरणाने साधक प्रापंचिक जंजाळातून मोकळा आणि तरीही सहृदय असा बनतो! आणि महाराज वचनामध्ये ही नामाची सिद्ध बनवण्याची ताकद विशद करताहेत. प्रपंचात राहूनही जर नामाला (केशरासारखे) सर्वोच्च मूल्य देऊन थोडे का असेना पण मनापासून नाम घेण्याने ते नाम फार फार काम करील, याचा अर्थ हाच आहे की त्या नामाने अंतःकरण शुद्ध आणि मृदु बनून सद्गुरूंची कृपा पचवण्यासाठी सिद्ध बनेल! 


परंतु यात एक अत्यंत महत्त्वाचे नामक्रियाविशेषण महाराजांनी योजले आहे- 'मोबदल्याची अपेक्षा न करता'!  आमची सर्व पंचाईत इथे आहे. निष्काम होणे फार फार अवघड आहे. एक महाराजांचे शिष्य होते, ते म्हणायचे, 'अगदी मनाशी ठरवलेलं असतं की महाराजांकडे काहीही मागायचं नाही; पण गोंदवल्यात पायऱ्या उतरून त्यांच्यासमोर उभं राहिलं की कुठून आतून कामना जन्म घेते कळत नाही आणि ते प्रापंचिक मागणं मागितलं जातं!' निदान या साधकांनी प्रामाणिकपणे सांगितले. आम्ही 'आम्हाला काही नको' म्हणतो आणि मागण्यांची यादी आमच्या चित्तात सतत वास करते. त्यापुढची पायरी म्हणजे लौकिक अनुभव/ मागणे नको वाटू लागले की आमचे अनुभवांना आसुसलेले मन नामाने येणारे पारमार्थिक अनुभव मागू लागते आणि ही देखील मोबदल्याची अपेक्षाच आहे हे विसरून जाते! 


जोवर अनुभवांची आस आहे तोवर मनाचा सूक्ष्मात प्रवेश होऊ शकत नाही. कारण, अनुभव 'मला यावा अथवा येतो' यामध्येही 'मी' उरलेला आहे हे लक्षात येत नाही. खऱ्या साधकाला 'मी' ची शेंडी थोडीशी उरली तरी सहन होत नाही. तो त्या उरल्यासुरल्या मी ला शेंडी धरून बाहेर काढण्यासाठी पुन्हा अजिजीने प्रार्थना करतो व नामात बुडी मारतो! त्यावेळेला खऱ्या अर्थाने आज जे महाराज म्हणताहेत की 'असे नाम फार फार काम करील' म्हणजे काय करील याचे सम्यक आकलन त्यास गुरुकृपेने होईल व सद्गुरुंच्या अखंड सान्निध्याने त्याचे जीवन धन्य होईल! 


अशा नामाने संतश्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतात तसे,

"रूप देखता आनंद। 

जन्मकंद तुटे तेणे।

एका जनार्दनी मन। 

जडोनि ठेले चरणी।।"

अशी अवीट भक्तावस्था भगवत् कृपेने प्राप्त होते!


।।श्रीनाम समर्थ।। 🙏