Friday, November 5, 2021

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ८२ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ८२ –


आपली वृत्ति स्थिर करण्याकरिता आणि उपाधि न लागण्याकरिता आपण नाम घ्यावे. नाम नुसते घेतल्यानेसुद्धा काम होईल; पण आपण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल. एखाद्या सत्पुरुषाची परीक्षा करायची असेल तर तो नामाबद्दल काय बोलतो ते पाहावे.

 

श्रीराम!

नाम आहे आदी अंती| नाम सर्व सार|

आहे बुडत्याला नौका| जीवनी आधार||

हेच ते अंतिम सत्य आहे हे महाराज वरचेवर आपल्याला सांगतात. पण याचा नेमका अर्थ काय? नाम आदि आहे, नामच अंत आहे आणि नाम हाच आधार आहे म्हणजे नेमके काय? याचा उलगडा आज महाराज वरील वचनात करतायत. त्यामध्ये साधनेमधले तीन टप्पे महाराजांनी सांगितले आहेत. ते तीन टप्पे खालीलप्रमाणे –

१) मुमुक्षु अवस्था - नाम नुसते घेतल्यानेसुद्धा काम होईल

२) साधकावस्थेतील २ टप्पे –

  (अ) आपली वृत्ति स्थिर करण्याकरिता आणि उपाधि न लागण्याकरिता आपण नाम घ्यावे

  (ब) आपण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल

३) सिद्धावस्था - एखाद्या सत्पुरुषाची परीक्षा करायची असेल तर तो नामाबद्दल काय बोलतो   ते पाहावे

 

आता गंमत अशी की महाराजांनी परोपरीने सांगितलेला पहिला टप्पा जो कुणी मनासून आचरेल त्याला पुढचे टप्पे येऊन गेल्याचे कळणारही नाही हे देखील महाराज सांगतात. मुख्यतः जो खरा तीव्र मुमुक्षु आहे, म्हणजे ज्याची शाश्वत सुखाचा मार्ग मला हवाच अशी ध्येय निश्चिती झालेली आहे, तोच सद्गुरूंनी दिलेले नाम हृदयाशी जपून नामस्मरण करील असे सर्व संत सांगतात. जोवर ध्येय निश्चिती झालेली नाही, तोवर नामाच्या कडेकडेने परिक्रमा होत राहील आणि ध्येय निश्चिती सरशी तो नामाच्या आतल्या वलयात प्रवेशकर्ता होईल. हे आतले वलय म्हणजेच सद्गुरू आज्ञापालन होय. शाश्वताचा अस्वस्थ शोध (तळमळ) आणि जबरदस्त श्रद्धा या भांडवलावर तो पूज्य बाबा म्हणतात तसे “नामाला लागेल”. महाराज सांगतायत, जो असा नुसता नामाला लागेल त्याचे देखील काम होईलच यात शंका नाही. मग तरी देखील आम्हाला महाराज “समजून घेतले तर काम लवकर होईल” असे का सांगत असावेत हा प्रश्न पडणे साहजिक आहे. त्यातही महाराजांनी दोन टप्पे सांगितले आहेत. पहिला टप्पा - वृत्ति स्थिर करण्याकरिता आणि उपाधि न लागण्याकरिता – हा जो आहे, तो महाराजांचा साधक आणि बाधक बोध आहे. जसे संत तुकाराम महाराज म्हणतात, “जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्येही सांभाळावी” त्याप्रमाणे अनेक ठिकाणी महाराजांनी आम्हाला “नामसाधना सुरळीत चालण्यासाठी” काय करणे जरूर आहे आणि काय टाळणे जरूर आहे हे सांगितले आहे. यात एक खूप मोठी मेख आहे महाराजांची. त्यांनी सांगितलेला कोणताही साधक आणि बाधक बोध यामागे साधन सुरळीत व चपखल चालावे हे कारण तर आहेच; परंतु यापेक्षाही एक दिव्य कारण यामागे आहे आणि ते म्हणजे या सर्व साधक बाधक गोष्टींच्या पालनातून साधक त्या अंतिम बोधाच्या हळूहळू जवळ सरकतो; कसे ते मार्ग चालणाऱ्याला अनुभवता येईल असे महाराज सांगतात.

 

जसे, इथे महाराज म्हणतायत, वृत्ति स्थिर करण्याकरिता – साधनेमध्ये सर्व समस्या असेल तर ती वृत्तीच्या ओढीचीच आहे आणि ही मायेकडची ओढ त्याविरुद्ध दिशेमध्ये परिवर्तित करण्याचे सामर्थ्य फक्त अशाच गोष्टीमध्ये असू शकते जी मायेला भीक घालत नाही आणि अशी गोष्ट नामाशिवाय त्रिभुवनात कोणतीही नाही. ही वृत्ति स्थिर करणे हा साधनातील सर्वात मोठा टप्पा आहे म्हटले तर वावगे ठरू नये. आमच्यासारख्या सामान्य लोकांना रोजच्या कामाच्या धामधुमीत दिवसभरात किती वृत्ति येऊन जातात याचा पत्ताच लागत नाही. त्याचा अंदाज तेव्हा येतो, जेव्हा सतत बदलणाऱ्या – मनाला व्यापून टाकणाऱ्या वृत्तींनी आम्हाला मानसिक थकवा येतो आणि मग दैनंदिन जीवन देखील नीरस आणि कंटाळवाणे वाटू लागते. महाराज सांगतात, कामापेक्षा कामाच्या विचारांनी तुम्ही अधिक थकता. त्यामुळे काम झाले की शांतपणे एका जागी बसून थोडा वेळ नामस्मरण केले की पुन्हा ताजेतवाने व्हाल. हे जे आहे तेच वृत्ति स्थिर करणे आहे, जे नामाने साधते. अर्थात या दैनंदिन व्यापातून जे विविध षड्रिपूंचे तरंग मनामध्ये उठत राहतात ते वृत्तींचे कारण आहे व नाम त्यावर हल्ला चढवते.

 

या सर्व वृत्तींमुळे काय होते? तर आम्ही विविध उपाधींमध्ये अडकतो. सर्व उपाधींचे मूळ कारण आहे देहबुद्धी. या देहाला आम्ही ‘मी’ समजलो आणि त्या देहात कार्य करणाऱ्या मनाला बळी पडलो आणि या जन्मृत्युच्या चक्रात अनंत जन्म अडकलो. चुकीच्या ठिकाणी (देह व मन) जिवाचा अहंकार चिकटल्यामुळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच काय परंतु स्वनाच्या दुनियेत देखील आम्ही उपाधींमध्येच घेरले गेलो व अधिकाधिक देहपाशात गुंतलो. याचे पर्यवसान म्हणजे आम्ही व्यक्ती, वस्तु, पदार्थ, धन, मान, कीर्ती या उपाधींना मानव जीवनाचे इतिकर्तव्य समजत आलो. महाराज आजच्या वचनात सांगतायत, या उपाधि न लागण्याकरिता नाम घ्या. एकीकडे महाराज सांगतात तसे, नामाची गंमत अशी आहे, की नाम मनाला उलटे करते. म्हणजेच मनाच्या आजपर्यंतच्या सवयींच्या विरुद्ध प्रवास करायचा असेल तर नामाला पर्याय नाही. असे का होत असावे? एक वृंदावनचे थोर संत पूज्य प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज अगदी हेच सांगतात की जेव्हा आपण एकच एक गुरुप्रदत्त नाम वरचेवर घेतो, त्यावेळी मन मरते! म्हणजे मनाला दुसऱ्या व्यापाकडे प्रवृत्त करणारी ओढ मरते आणि साहजिकच त्यामुळे देहमनात अडकलेली जीव बुद्धि कमी कमी व्हायला लागून तिथे देवबुद्धीचा प्रवेश सुलभ होतो! त्यामुळे ध्येय निश्चिती नंतरचा टप्पा म्हणजे वृत्ति स्थैर्यासाठी नामाचा उपयोग आणि तदनुसार उपाधीमध्ये अडकलेलो आहोत हे कळायला लागून त्यापासून हळूहळू सुटका.

 

आता अजून काय हवे? हेच नाम समजून घेणे नव्हे का? पण असे असते तर महाराजांनी पुन्हा ‘समजून घेतल्याने काम लवकर होईल’ असे का सांगितले असते असा प्रश्न पडणे साहजिक आहे. कसे आहे, आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे आणि त्यामुळे कोणतीही गोष्ट मान्य करणे इतके सुलभ होत नाही. आणि ज्याची अशी चिकित्सक वृत्ति आहे, त्याने उपनिषदे आणि मूळ भारतीय तत्त्वज्ञाना मधून नाम महिमा जाणून घ्यावा. किंबहुना असे होण्यापेक्षाही जो केवळ अभ्यास म्हणून देखील तत्त्वज्ञान अभ्यासेल परंतु त्याची धाव जर शाश्वत आनंदाकडे असेल तर त्या सर्व अभ्यासातून तो कधी नव्हे एवढा नामाला चिकटेल. अर्थात त्यामध्ये अभ्यासातच वाहवत जाण्याचा खूप मोठा धोका आहे; यासाठी शास्त्रप्रचितीच्या आकलनामधून त्याला गुरुप्रचितीकडे वाटचाल करावीच लागेल, तेव्हाच आत्मप्रचीतीचा मार्ग खुला होईल असे सर्व संत सांगतात. परंतु यातील एक गंमत अशी की, जसे तहानलेल्याला पाण्याचे महत्त्व अधिक, जसे जन्मान्धाला डोळे मिळाल्यावर जग पाहण्याचा आनंद अधिक, तद्वतच अभ्यासाने ज्याने नामाचे परम सत्यत्व जाणून घेतले, नामानेच झालेली विश्वनिर्मिती उपनिषदांमधून चाखली, त्याला कुणाहूनही अधिक नाम-प्रचितीची – नामातून मिळणाऱ्या अढळ, अमर समाधानाची ओढ लागेल हे निश्चित आणि स्वाभाविकच मग महाराज म्हणतात तसे, नकळत घेतलेल्या नामापेक्षा त्याचे काम लवकर होईल!

 

आता शेवटच्या सिद्धावस्थेबद्दल महाराज म्हणताहेत, एखाद्या सत्पुरुषाची परीक्षा करायची असेल तर तो नामाबद्दल काय बोलतो ते पाहावे. परमेश्वराजवळ – त्या अंतिम सत्याजवळ जाण्याचे अनंत मार्ग आहेत. त्या मार्गांमधील साधनेचा प्रकार, त्याला लागणारा वेळ, श्रम, साधकाच्या मनाची धाटणी यांमध्ये फरक असला तरी कोणताही मार्ग चूक नाही. असे असले तरी ज्याने श्रुतिस्मृतिपुराणे, विविध संत साहित्य आणि त्याही पुढे जाऊन आपल्या सद्गुरूप्रदत्त साधनेचा खरा मागोवा घेतला, त्याला नामाचे निर्विवाद वर्चस्व समजणे ही काळ्या दगडावरची रेघ आहे, कारण 'सम्यक' अभ्यासाने चिकित्सक वृत्ति लयास जाऊन तो खऱ्या अर्थाने नामाश्रित आणि गुरुसमर्पित होतो!  त्यामुळे महाराज म्हणतात, सर्व शास्त्र पारंगत आहे असे म्हणतो, गुरुपद चालवतो आणि तरीही जर नामाबद्दल त्याला कळकळ नसेल, जर नाम त्याच्या आयुष्याची इतिकर्तव्यता नसेल तर तो खरा संत असू शकत नाही, कारण ज्याला नामानुभूती नाही, त्याला आत्मानुभूतीही नाही असा सरळ सरळ आलेख महाराज मांडतात आणि सांगतात,

 

“नामापरते न सत्य मानावे!”

 

|| श्रीनाम समर्थ ||


1 comment: