Saturday, June 6, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४८ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४८ –

सत्याला काहीतरी रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. नाम हे त्याचे रूप होय. म्हणून नामाचे अनुसंधान ठेवावे.

श्रीराम!
“यथा देहे तथा देवे” असे म्हटले जाते. आम्ही आमच्या देहाला जे जे म्हणून उपचार करतो, तसे ते देवाला करणे याचे नाव उपासना असे म्हटले आहे. मुळात उपचार हे त्याला आवश्यक असतात जो या देहाच्या मर्यादेत आहे. अमर्याद परमेश्वराला उपचार कसले असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, जोवर जीव देहबुद्धी भेदून पलीकडे गेला नाही, तोवर त्याला निर्गुण निराकार ईश तत्त्वाबद्दल समजणे अशक्य आहे. केवळ शब्दांनी ते स्वरूप माहीत असून उपयोग नाही. त्यामुळे जे आम्हाला देहबुद्धीत असताना देखील श्रद्धेच्या जोरावर कळू शकेल अशी जादू संतांनी केली. खरोखर संतांनीच निर्गुण परमात्म्याला सगुणात आणले आणि भक्तांवर असंख्य उपकार केले. भगवंताचे नाम, लीला, रूप, गुण, धाम, परिकर या सर्व गोष्टींमुळे आज भक्त मालामाल आहेत याचे कारण संत होत! संतश्रेष्ठ तुकाराम छातीवर हात ठेवून आण घेतात –

मोक्षपद तुच्छ केले याकारणे| आम्हा जन्म घेणे युगायुगी||
विटे ऐसे सुख नव्हे भक्तिरस| पुढतापुढती आस सेवावे हे||
देवा हाती रूप धरविला आकार| नेदू निराकार होऊ त्यासी||
तुका म्हणे चित्त निवांत राहिले| ध्याई ती पाउले विटेवरी||
        
पहा भक्तीचा महिमा! आम्ही भगवंताला सगुण रूप धरण्यास भाग पाडले म्हणताहेत तुकोबा आणि त्याला निराकार होऊ देणार नाही असे वर्चस्व ते आपल्या भक्तीने भगवंतावर गाजवतात! श्रीमहाराजांसारखे ब्रम्हज्ञानी संत देखील जे सर्वतोपरी निर्विकार आहेत, तरीही प्रापंचिक माणसांमध्ये राहिले याचे कारण काय? आपण म्हणतो ना,
तो माया मोह पाळी| काय करतील लेकुरवाळी||
पण काम क्रोधा जाळी ऐसा नाही पाहिला||
श्री ब्रह्मचैतन्यासारिखा नाही पाहिला||
बिचारे संसारात अडकलेले जीव काय करतील या आत्मिक कळकळीपोटी माया मोहापलीकडे गेलेले संत देखील माया मोहात राहून, सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगून आमच्यात नामप्रेम जागवण्याचा यत्न करतात. हेच कारण आज आपल्याला श्रीमहाराज वचनात सांगत आहेत. दृश्यात अडकलेले आमचे मन आज दृश्याच्या पलीकडे शाश्वतात विराजमान असणाऱ्या ईश्वराला बघण्यास असमर्थ आहे. गोपी जनांकडे उद्धव जेव्हा या शाश्वतात स्थिर असलेल्या ईश्वराचे ज्ञान सांगण्यासाठी गेले, तेव्हा कृष्ण्प्रेमात गर्क झालेल्या त्या गोपी हसून त्याला विचारतात आणि सल्ला देतात --

“का करे हम ऐसे ईश्वर को, जो द्वार हमारे आ न सके|
माखन की चोरी कर ना सके, मुरली की तान सुना न सके|
मन हर ना सके, छल कर ना सके, दुख दे ना सके, तरसा न सके|
जो हमरे हिरदय लग ना सके. हिरदय से हमे लगा न सके|
ऐसो ईश्वर छोड हमारे मोहन को पहचानो|
प्रेम में का आनंद रे ऊधो प्रेम करो तो जानो||”

याचाच अर्थ मन स्थिर करण्यासाठी प्रत्येक साधकाला एका आलंबाची गरज असते; परंतु भगवंताच्या नामाच्या आलंबाची गंमत अशी आहे की हा आलंब भगवंतापासून भिन्न नाही; त्यामुळे ज्याने नामाच्या आलंबाला धरले तो सरळ तत्क्षणी भगवंताच्या राज्यात पोचला! महाराज म्हणतात ना, सगुण – निर्गुणाला सांधणारे असेल तर ते भगवंताचे नामच आहे. म्हणूनच आपले कर्तव्य कर्म उत्तम करताना देखील गोपिका भगवंताच्या नामाच्या शरणागत होत्या व या नामाच्या आलंबानेच त्या सिद्ध बनल्या (मुळात सिद्ध होत्याच). तद्वतच प्रत्येक जीव देखील सिद्ध आहेच; केवळ त्याचा विसर पडल्याने भगवंताचा शोध सुरु आहे. भगवंतांनी गीतेत सांगितले, “ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेSर्जुन तिष्ठति||” ज्याने या एका वाक्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवली त्याला तात्काळ भगवंताचे दर्शन आहे. मात्र हृदयदेशी विराजमान ईश्वरावर मायेचे पांघरूण आल्याने साधनाची आवश्यकता आहे. साधनाने ईश्वर भेट होत नसते. मायेचा पडदा विरण्यासाठी साधनाचा उपयोग होतो, ज्यायोगे अंतःशुद्धी होऊन अंतःकरणात सदोदित विराजमान असणाऱ्या ईश तत्त्वाचा बोध गुरुकृपेने होतो.

भगवंताचे नाम आणि त्याचे रूप यात द्वैत नाहीच. महाराज म्हणतातच, ज्याने नामाला घट्ट धरले त्याला हळूहळू रूप प्रकाशित होऊ लागतेच. ज्याचा जसा भाव तसे रूप घेऊन करुणानिधान भगवंत – सद्गुरू त्यास दर्शनही देतात. मात्र खरे दर्शन आहे - नामातच भगवंताचे दर्शन होऊन शाश्वत समाधान लाभणे. आणि याचसाठी श्रीमहाराज नामाच्या अनुसंधानाचा आग्रह करतात. एके ठिकाणी महाराजांनी म्हटले आहे, “नामाविण राम| जैसे पाकळ्यांविण फूल जाण||” जो कुणी महाराजांना विचारे, ‘महाराज आम्ही नुसते तुमचे अनुसंधान ठेवतो; नाम घेतलेच पाहिजे का?’ तेव्हा महाराज म्हणत, ‘हो ते खरे; पण मी तुम्हाला जिवंत पाहिजे ना? मग माझा प्राण नाम आहे. म्हणून नामाचे अनुसंधान ठेवावे!’

आणि ज्याने हे केले, त्याला भगवंताचे रूप, लीला, गुण, धाम, आणि भगवंताचे संत जन यांचे आलय (घर) नामच आहे हा अनुभव श्रीमहाराज देतील!

||श्रीनाम समर्थ||  

1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete