Wednesday, June 17, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५३ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५३ –

येथून विलायत हजारो मैल दूर आहे. तेथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तेथल्या गोष्टी ऐकतो. तेथे आपण पायी जाऊ शकत नाही; कारण ते फार दूर आहे. शिवाय वाहनामध्ये बसून जावे म्हटले तर मध्ये मोठा समुद्र आहे. पण पायाला श्रम न होऊ देता, समुद्राचे पाणी पायाला न लावता आणि आपल्याला बुडू न देता समुद्रातून आर नेणारी जशी आगबोट आहे, त्याचप्रमाणे भगवंताचे नाम आहे. भगवंत कसा आहे तो आम्ही पाहिला नाही, पण संत त्याला पाहून आले आणि त्यांनी त्याचे वर्णन आमच्याजवळ केले. आम्ही आमच्या कष्टांनी त्याला गाठू म्हणावे तर ते शक्य नाही. शिवाय, प्रपंचासारखा एवढा भवसागर मध्ये आडवा पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण नाम घट्ट धरले तर सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू.

श्रीराम!
“नाम हाच साधनेचा प्रारंभ, नाम हाच मध्य आणि नाम हाच साधनेचा अंत – म्हणजेच साध्य” हे मनावर बिंबवण्यासाठी श्रीमहाराज आपल्याला अनेक उदाहरणे देऊन समजावतात. त्याच धर्तीवरचे आजचे बोधवचन आहे. श्रीमहाराज म्हणायचे, नामाचे महत्त्व ज्याला कळले तो एक तर बोलणारच नाही, फक्त नाम घेईल किंवा नामाबद्दल बोलतच राहील पण कितीही बोलले तरी नामाचे महत्त्व सांगून संपणार नाही. परंतु अत्यंत सहज, सोपे व कधीही कुठेही ‘साधनात’ ठेवण्याचे सामर्थ्य असलेल्या नामाचे त्याच्या सोपेपणामुळेच आम्ही महत्त्व जाणत नाही हे दुर्दैव आहे. सहजतेने आणि कोणत्याही आडंबराशिवाय हृदयातील नित्यवासी भगवंतापर्यंत पोहोचवणारे फक्त एक नामच आहे. या अंतरीच्या प्रवासाबद्दलच श्रीमहाराज आजच्या वचनात आम्हाला सांगत आहेत.

विलायतेला जाण्याला जशा अनेक अडचणी आहेत, तशाच, किंबहुना त्यापेक्षा अनंतपट जास्त अडचणी हृदयातल्या स्वस्थानी जाण्याला आहेत, त्या केवळ आमच्या अज्ञानामुळे, अविद्येमुळे. आम्ही परदेशी जाण्यासाठी चिकार खटपट करू; परंतु ‘खऱ्या स्वदेशी’ जाण्याबद्दल उदासीन राहू. आमची अडचण ही आहे की या जगातल्या कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीबद्दल आम्ही नेहमीच दुर्दम्य इच्छाशक्तीने, कष्टाने, एकाग्रतेने प्रयत्न करतो, कारण तिथे त्या कष्टाचे फळ आम्हाला खुणावत असते. मात्र हृदयस्थ ईश्वराच्या साक्षात्काराने काय साधणार आहे याची आम्हाला माहिती नसल्याने किंवा विपरीत माहिती असल्याने आम्ही आमची इच्छाशक्ती, कष्ट, एकाग्रता तिकडे लावत नाही.

म्हणून आज आम्हाला महाराज सांगताहेत, हरकत नाही, तुम्ही भगवंत पाहिलेला नाही; पण संतांनी तो पाहिला आहे. एखादा मनुष्य विदेशी जाऊन आला व त्याने आम्हाला त्याबद्दल सांगितले की आम्ही त्यावर विश्वास ठेवतो. अनेकदा असेही काही लोकांच्या बाबतीत घडलेले आहे की अमुक माणसावर विश्वास ठेवून त्याने सांगितल्याप्रमाणे विदेशी जाण्याची खटपट केली परंतु तो मनुष्य स्वार्थी निघाला व त्याने केवळ पैशासाठी फसवले. या अशा बातम्या वाचून ऐकून अनुभवून देखील आमची दृश्याची खेच आणि तिकडे धडपडण्याची वृत्ति कमी होत नाही. हे एकच उदाहरण नाही; अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे मनुष्य दृश्याच्या खेचेला बळी पडतो व हाती काही लागत नाही. म्हणून श्रीमहाराज सांगताहेत, संतांवर विश्वास ठेवा, कारण जे संत आहेत, त्यांच्या मनात कोणताही स्वार्थ नसतो. तुम्हाला शाश्वत शांति – समाधानापर्यंत घेऊन जाण्यात संतांचा कोणता स्वार्थ आहे? असेही महाराज एकीकडे विचारतात. असे असताना देखील आम्ही संतांवर विश्वास न ठेवता सर्व जग ज्या एका दृश्याच्या भोवऱ्यात ओढले जात आहे त्यातच आम्हीही अडकणारच अशा जणू स्पर्धेने त्यात वाहवत चाललो आहोत याचे संतांना वाईट वाटते.

एक तत्त्वज्ञानी म्हणतो, All the problems of life revolve around the problem of distraction of mind. मनाच्या चंचल वृत्तीमुळे कोणताही निर्णय घेण्याची मनुष्याच्या क्षमतेत तूट येते. खरे पाहता, निर्णय घेण्याची क्षमता ही एकच गोष्ट चोवीस तास मनुष्याच्या सोबत आहे, ज्यात त्याला स्वातंत्र्य आहे असे अध्यात्मिक तत्त्वज्ञान सांगते. मात्र दृश्यात - या भवसागरात आमचे मन सतत गोते खात राहिल्याने आम्ही आमच्या हृदयस्थ निजमंदिराकडे कधी मनापासून लक्षच देत नाही. यासाठी श्रीमहाराज म्हणतात, आम्ही आमच्या कष्टाने त्याला गाठू म्हणावे तर ते शक्य नाही. खूप महत्त्वाचे विधान आहे हे. प्रपंचात, या संसारात करावे लागणारे कष्ट आणि परमार्थात करावे लागणारे कष्ट या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. खूप साऱ्या गोष्टी करणे हे प्रपंचातल्या कष्टाचे स्वरूप आहे; तर काहीच वृथा धडपड न करता गुरूच्या चरणांशी पडून राहणे व शांतपणे त्यांनी दिलेले नाम सहजतेने जपणे हे परमार्थातल्या कष्टाचे स्वरूप आहे. त्यामुळे प्रापंचिक कष्टांची सवय असलेल्या आमच्या मनाला या सहजतेच्या नामाच्या आगबोटीत बसण्याची सवय नाही. आणि इथेच सद्गुरूंवरच्या विश्वासाचे महत्त्व आहे, श्रद्धेचे महत्त्व आहे. पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, “हा जन्म दिला नामाला असे म्हणावे, वाया जाणार नाही हे निश्चित.” पण हे परमार्थातले साहस करण्यासाठी पुन्हा त्याच निर्णय क्षमतेकडे आम्हाला यावे लागते.

दुर्योधन आणि अर्जुन दोघेही समस्येत फसले होते. भगवंत जेव्हा दुर्योधनाकडे युद्ध टाळण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेले, तेव्हा दुर्योधन म्हणाला, ‘मला कळत नाहीये असे नाही. “जानामि धर्मं, न च मे प्रवृत्तिः| जानामि अधर्मं न च मे निवृत्तिः||” धर्म काय मला माहिती आहे, अधर्म काय मला माहिती आहे. पण मी माझे मन बदलू शकत नाही, निर्णय घेऊ शकत नाही, त्यासाठी हे केशवा, माझे मन तू वळव.’ यावर भगवंत म्हणाले, ‘तुझे मन तूच वळवायला हवे.’ म्हणजे भगवंतांनी त्याला निर्णय क्षमतेच्या स्वातंत्र्याचीच जणू आठवण करून दिली. अर्जुन देखील असाच द्विधा मनस्थितीत होता. मन चंचल होत होते, निर्णय घेता येत नव्हता, युद्ध करावे की नाही. मग दुर्योधन आणि अर्जुनात फरक काय? तर, दुर्योधन म्हणाला, मला मन वळवणे शक्य नाही! अर्जुन म्हणाला, मला कळत नाहीये; परंतु मी तुझा शिष्य आहे, तर गुरू म्हणून योग्य अयोग्य काय ते तू मला सांग, मी तसे करीन, मी तुला शरण आहे.

दृश्याच्या भोवऱ्यात अडकलेल्या मनुष्याची अगदी अशीच अवस्था आहे. तो म्हणतो, आम्हाला माहीत आहे आम्ही अडकलोय परंतु दृश्याची खेच इतकी आहे की आम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाही. जे भक्त असतात, सत्शिष्य असतात, ते मात्र म्हणतात, हे गुरुदेव, फक्त तुम्ही आमचे आहात, तुम्ही सांगाल ते आम्ही करण्याचा तुमच्याच कृपेने प्रयत्न करू. असे जे म्हणतात ते गुरूंनी सांगितल्याप्रमाणे केवळ नामाला घट्ट धरतात व सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतात. दुर्योधन व्हायचे की अर्जुन आपण ठरवायचे!

ही रामनाम नौका भवसागरी तराया||
सुटले अफाट वारे| मन तारू त्यात बिथरे||
त्या वादळातुनी या नेईल रामराया||
भ्रम भोवऱ्यात अडली| नौका परी न बुडली||
धरुनी सुकाणू हाती बसलेत रामराया||
आम्ही सर्वही प्रवासी जाणार दूर देशी|
तो मार्ग दाखवाया अधिकारी रामराया||

||श्रीनाम समर्थ||


1 comment: