Monday, June 1, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४६ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४६ –

तुम्ही घ्यावे नाम | म्हणजे होईल तुमचे काम ||

श्रीराम!
गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात ना! या जगातले सर्व शोध असेच गरजेतून लागले. गरज कशाची? तर आयुष्य सुसह्य करण्याची. कोणताही शोध याला अपवाद नाही. आता त्याचा उपयोग कसा केला गेला हा वेगळा मुद्दा, मात्र शोधासाठी शास्त्रज्ञांनी केलेल्या खटपटी मागे मात्र दुर्दम्य इच्छाशक्ती होती. अगदी याच धर्तीवर, याहीपेक्षा तीव्र तळमळीने संतांनी खऱ्या अर्थाने जीवन सुसह्यच नव्हे तर आनंददायक करण्याचा शोध लावला. श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतातच, ‘मी समाधानाचा शोध लावला.’ कारण संतांच्या लक्षात आले की बाह्यतः कितीही शोध लावले गेले तरीही जोवर मनुष्य अंतरंगातून सुधारला नाही, तोवर ते शोध त्याला Lasting Happiness देऊ शकत नाहीत. याच ‘अंतरंग परिवर्तनाच्या’ शास्त्राला त्यांनी अध्यात्म शास्त्र म्हटले आणि आपल्या निस्वार्थ अनुभूतीने अनंत जीवांना ते समजावून सांगण्याचा चंग बांधला. आपल्याला माहीत आहेच की ‘Invention’ आणि ‘discovery’ असे दोन शब्द आहेत. Invention म्हणजे ते जे पूर्वी कधीच कुठेच अस्तित्त्वात नव्हते व त्याचा शोध लावला गेला. Discovery म्हणजे जे नेहमी होतेच, केवळ विसरले गेले होते वा त्याकडे लक्ष दिले गेले नव्हते, ते शास्रीय रीत्या समोर आणणे! अगदी अशाच रीतीने संतांनी जे नेहमी होते, आहे व कायम राहीलच असे काहीतरी शोधले, अनुभवले व लोकांसमोर ठेवले. यालाच ते नाम असे म्हणतात. महाराजांनी जो समाधानाचा शोध लावला असे ते म्हणाले तो या नामाद्वारे त्यांनी लावला.

जसे आपण वर बघितले की शोध हा आयुष्याला सोपेपणा आणण्यासाठी लावला जातो. अगदी तसेच अध्यात्मिक आयुष्याला, परमार्थाला आत्यंतिक सोपेपणा आणि सहजता देण्याचे काम “नाम” करते म्हटल्यास वावगे ठरू नये! समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतातच, “मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही!” हे अजून मनावर ठसवण्यासाठी पुढे म्हणतात,

“नव्हे कर्म ना धर्म ना योग काही|
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही||
म्हणे दास विश्वास नामी धरावा|
प्रभाते मनी राम चिंतीत जावा||” (मनाचे श्लोक क्र ७६)

म्हणून श्रीमहाराज आजच्या वचनात स्पष्टपणे, कळकळीने, अगदी सोप्या भाषेत आपल्याला सांगतात, फक्त नाम घे, तुझे सर्व काम होईल. काय जबरदस्त विश्वास आहे संतांचा नामावर! भगवंत कसे आहेत? सर्वव्यापी Omnipresent म्हणतो ना आपण! नाम कुणाचे आहे? भगवंताचे आहे. नाम आणि नामी यांमध्ये अभेद असल्यामुळे नामीचा सर्वव्यापकत्वाचा गुण स्वाभाविकच नामामध्येही आहे. म्हणूनच जीवनाचे असे एकही अंग नाही, ज्याला नामाचा स्पर्श होत नाही. तुलसीदास म्हणतातच,
“राम नाम मानिदीप धरु जीह देहरी द्वार|
तुलसी भीतर बाहेरहुं जौं चाहसि उजियार||”
-- मुखरूपी दाराच्या उंबरठ्यावर जर तुम्ही रामनाम रूपी रत्नदीप ठेवला तर तुम्हाला आत (अंतरंगात) आणि बाहेर (लौकिकात) दोन्हीकडे प्रकाश पडेल.
किती सोपा मार्ग आहे. आणि श्रीमहाराज काय म्हणताहेत, तुम्ही नाम ‘घ्या!’ नामात रहा, एकाग्रचित्ताने घ्या वगैरे काही अटी आपली दयासिंधु माऊली सुरुवातीला तरी घालत नाही. तसेही आम्ही अज्ञानी जीव काय आणि किती लक्ष लावणार? बाह्य उपाधि कमी करणे हे करायचे आहे पण ते मुख्य नाही. अगोदर नामाला धरा म्हणतात महाराज म्हणजे त्या उपाधि सहजच सुटतील. प्रयत्न करणे आपले काम, त्यात यश देणे त्यांचे काम. आम्ही प्रयत्नाला कमी पडू नये एवढीच महाराजांची अपेक्षा आहे. नामाचा स्पर्श झालेली कोणतीही लौकिक गोष्ट देखील उजळून निघेल यात शंका नाही.

मात्र श्रीमहाराजांसारख्या संतांना “काम होणे” म्हणजे आपले अंतिम कल्याण होणे हे अभिप्रेत असते हे निश्चित. कारण बाह्य शोधांप्रमाणे बाह्य आशा, अपेक्षा, हवेपणा याला अंत नाही हे आम्हालाही माहित आहे. एखादी गोष्ट नामाच्या शक्तीने पूर्ण झाली (आणि ती होतेच यात काही विशेष नाही) तरी त्या तथाकथित पूर्ण झालेल्या एका इच्छेतून हजार इच्छा जन्माला येतात हा आमचा अनुभव आहे. पूज्य बाबा बेलसरे प्रवचनात एक मजेशीर उदाहरण द्यायचे. कुणी म्हणतो, मुलीचे लग्न व्हावे, वयात आली मुलगी. झाले लग्न. पुढे आता तिला मूल व्हावे ही इच्छा प्रबळ होते. ही देखील इच्छा पूर्ण झाली तरी शांतता मिळते का? नाही! पुन्हा तिचे बाळंतपण माहेरी की सासरी हा प्रश्न राहतोच! गमतीचा भाग सोडला तरी जे म्हटले जाते “आशा नाम शृंखला” हे या अर्थी निश्चित खरे आहे की अपेक्षांची पिलावळ काही संपत नाही आणि त्यापायी मनुष्याला कधीही खरे समाधान लाभत नाही. यासाठीच “खरे काम होण्यासाठी” निष्काम नाम जपले पाहिजे असे महाराजांना यातून सुचवायचे आहे.

पूज्य ब्रह्मानंद महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, “वासनेचे मूळ दूर केले!” किती महत्त्वाचे आहे हे. वासना खूप खोल दडलेली आहे. वरवर तिच्यावर उपचार करून चालत नाही असे संत ज्ञानेश्वर देखील आपल्या एका ओवीत सांगतात. म्हणतात,
“जैसी वरिवरी पालवी खुडिजे| आणि मुळी उदक घालिजे|
तरी कैसेनि नाशु निपजे| तया वृक्षा||”
हे जिव्हेच्या वासनेसंबंधी लिहिलेले असले तरी सर्वच वासनांना हे लागू होते. कोणतीही वासना दाबून किंवा कोणत्याही अन्य उपायांनी पूर्णपणे ताब्यात येत नाही. त्यासाठी वासनेच्या मुळावर आघात करणाराच उपाय हवा आणि तो आहे भगवंताचे नाम! नामाने वासनेचे मूळ उचकटले गेल्यावर सुरुवातीला वासना बंड करून उठतात, मात्र त्यांच्याकडे त्रयस्थपणे बघणाऱ्याला over a period of time त्या सोडून जातात. हे होणे म्हणजे जीवाचे काम होणे आहे, कारण चौऱ्यांशी लक्ष योनीतून फिरण्याचे कारणच या वासना आहेत. त्याच नाहीशा झाल्यावर भय कसले? मुक्ती मेल्यावर मिळवायची गोष्टच नाही. “आपुले मरण पाहिले म्या डोळा| तो जाहला सोहळा अनुपम्य||” ही संत तुकाराम महाराजांची अनुभूती निष्ठापूर्वक नामसाधन करणाऱ्या साधकाला गुरुकृपेने येतेच येते! हे “काम होणे” आहे.

सद्गुरूंची लेकरे आहोत आपण! त्यांच्या property वर आपला हक्क आहे. वडिलांची इस्टेट मुलांना मिळेल की नाही याबद्दल काळजी का लागावी? फक्त मुलांनी वडिलांनी सांगितलेल्या मार्गावर चालणे आवश्यक आहे. वारसा हक्काने सर्वांसाठी मुक्तहस्ते नामाची अमाप, अद्वितीय, कधीही लय न पावणारी आणि कायमचे समाधान देणारी दौलत वाटताहेत महाराज. घेणारा हवा!

||श्रीनाम समर्थ||



2 comments: