Monday, June 15, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५१, ५२ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५१ –

रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये; पुढे रूप आपोआप येऊ लागेल.

श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५२ –

नाम आणि रूप यांचा संबंध असा आहे – एखाद्या माणसाची आपली ओळख असेल तर पहिल्याने त्याचे रूप पुढे येते आणि नंतर नाम येते; पण आपली त्याची ओळख नसेल, आणि आपण त्याला बघितलेला नसेल, तर त्याचे नाव आधी येते आणि नंतर रूप येते. आज आपल्याला भगवंताची ओळख नाही म्हणून त्याचे रूप माहिती नाही; परंतु आपल्याला त्याचे नाम घेता येईल. आजसुद्धा त्याचे नाम घेताना त्याची आठवण होते हा आपला अनुभव आहेच. समजा, राम या नावाचा आपला एक मित्र आहे आणि राम या नावाचा आपला एक गडी आहे. पण आपण ‘श्रीराम, श्रीराम’ असा जप करीत असताना आपल्याला आपल्या मित्राची किंवा गड्याची आठवण होत नाही, आपल्याला भगवंताची आठवण होते. शिवाय, भगवंताचे एक रूप तरी निश्चित कुठे आहे? एक राम ‘काळा’ तर एक राम ‘गोरा’ असतो; एक राम लहान तर एक राम मोठा असतो. एक राम उग्र तर एक राम सौम्य असतो; पण सर्व रूपे एका रामाचीच असतात. भगवंत स्वतः अरूप आहे, म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते.

श्रीराम!
बोधवचन क्रमांक ५१ व ५२ दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत म्हणून एकत्र घेतली आहेत. किंबहुना ५२ व्या वचनात श्रीमहाराजांनी ५१ वे वचन का सांगितले आहे याचे यथार्थ स्पष्टीकरण दिले आहे. भगवंताच्या ‘नाम रूपाचे धनी’ हे खऱ्या अर्थाने संतच असतात. वेगवेगळ्या नाम रूपांमधे रंगून जाऊन हे संत भक्तिमार्गाला एक दिव्य रम्यता आणतात. याच नाम रूपांमुळे भक्त – भगवंतातला डाव रंगतो. तरीही सर्वच संत रूपापेक्षा नामाला महत्त्व देताना दिसतात व नामाच्या मागून तुझे रूप आलेच पाहिजे देवा, अशी जणू त्या सगुण परमात्म्याला आण घालतात. संतश्रेष्ठ तुकोबा तर म्हणतात,

तुका म्हणे तुम्ही खादली हो रडी|
आम्ही धरली शेंडी नाम तुझे||
नाही तरी तुला कोण हो पुसतो|
निराकारी तेथे एकाएकी||

किती गोड भाव आहे नाही! भगवंताशी या संतांची आगळी जवळीक असते. संत या जगातल्या लोकांशी अंतर ठेवून, एक प्रकारे आदरभावाने बोलतील; परंतु जिथे त्यांच्या जीवीच्या जिवलग भगवंताची बात येते, तिथे मात्र ते अगदी मोकळे होतात व आपल्या सख्याला उद्देशून अगदी जवळिकीने बोलतात. याचे कारण हा संबंध सोडून त्यांच्या आयुष्यात दुसरा संबंध मनातही उरलेला नसतो. आम्ही केवळ संबंध आहे म्हणतो; परंतु देवाजवळ, संताजवळ तक्रार मात्र या जगातल्या गोष्टीची करतो. तुकोबा म्हणतात, अरे पांडुरंगा, तू रडीचा डाव खेळतो आहेस आणि अदृश्य होतो आहेस; पण हरकत नाही. मी तुझ्या नामाची शेंडी माझ्या हातात धरली आहे. जर आम्ही तुला सगुणात आणला नसता तर तू एकाकी निराकार होऊन राहिला असतास, मग तुला कुणी विचारले असते? असा खडा सवाल – यातून तुकोबांचा गोड सख्यभाव व्यक्त होतो! आणि हे देखील दिसते की नाम ज्याच्या हातात आहे त्यामागे रूप धारी भगवंत अवतरलाच पाहिजे. श्रीमहाराज देखील म्हणतात, जर पतंगाचा दोरा हातात आहे तोवर पतंग हातात आहेच! तद्वत जोवर नाम हातात आहे तोवर सगुण रूप धारी भगवंत हातात आहे, संनिध आहे. याहीपेक्षा सगुण व निर्गुण या दोन्हीच्या मधला नाम हा सुवर्णमध्य आहे. नामाने भगवंताच्या सगुण रूपाचे ध्यान व ज्ञान होते व ते होत असतानाच नाम हे ध्वनिरूप असल्यामुळे ते निर्गुण देखील आहे आणि त्यामुळे नामाने मुळातील निर्गुण भगवत् तत्त्वाला धक्का लागत नाही. ॐकार व नाम यात भेद नाही तो यामुळेच. उलट नामामध्ये एक विशेष गुणधर्म आहे की नाम हे भगवंताचे गुणदर्शन देखील घडवते. वरच्या वचनात महाराज म्हणतात त्याप्रमाणे नामामध्ये रूपाचे दर्शन आपोआपच होते. ॐकार जास्त बुद्धीला स्पर्श करतो तर नाम हे भावनेस हलवते. आणि म्हणूनच भक्तिमार्गात नामालाच जास्त महत्त्व सर्व संतांनी दिले.

श्री रामकृष्ण त्यांच्या काली मातेला म्हणत, “आई मला कोरडा साधू करू नकोस. मला रसात ठेव.” आणि या रसाचे आस्वादन बुद्धिवादी अध्यात्म मार्ग करू शकत नाही. त्यासाठीच ‘नामामृत’ म्हटले आहे, ज्यामध्ये सर्वच्या सर्व इंद्रिये सुद्धा आपले लौकिक गुणधर्म विसरून भगवंताच्या लीलेत रममाण होतात. गुरुदेव रानडे म्हणतात, “नाम ही ईश्वर प्रतीत करणारी संज्ञा आहे. ती आत्मतत्त्व संलग्न असल्याने प्रत्येक वेळी नामाच्या स्मरणाच्या प्रक्रियेत परमात्मतत्त्वाशी तादात्म्य होते.

अजून एक महत्त्वाची गोष्ट जी नामाचे श्रेष्ठत्व सिद्ध करते ती म्हणजे, भक्तिमार्गात निष्कामतेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जितकी भगवंत उपासना स्थूलात असेल तितकी ती कामनिक असण्याची शक्यता जास्त. अगदी सर्वश्रेष्ठ मोक्षाची कामना देखील सकाम उपासनेतच मोडते. स्मरण ही एकमेव अवस्था अशी आहे जी पूर्णपणे सूक्ष्मात आहे आणि ज्यामुळे मनाला सूक्ष्मता येतेच. म्हणूनच जे लोक महाराजांना विचारत, “महाराज, जपाच्या वेळी रूप समोर आणावे का?” त्यावेळी महाराज म्हणत, दोन्हीकडे लक्ष कसे लागेल; नुसते नाम घ्यावे; रूप मागून आपोआप प्रकाशित होईल.” म्हणजेच नामातून रूपाचे प्रकटन ही सहज प्रक्रिया आहे; त्यासाठी जर साधक जास्त प्रयत्न करू लागला तर कदाचित तो साधनेतील सहजता हरवून बसेल आणि हे होऊ नये म्हणूनच मानसपूजेची मदत घ्यायला संत सांगतात. रामकृष्ण परमहंस परंपरेत मानस पूजेलाच ध्यानाचा दर्जा दिलेला आहे. कारण मनात आराध्याची पूजा करत करत हळूहळू ती घडू लागते. हेच नामातून रूपाचे प्रकटीकरण म्हणायला हरकत नाही. आणि यामुळेच “मी मनामध्ये भगवंताचे रूप प्रकट करतो” हा अहंकार देखील व्हायची शक्यता नाही. रूपाचे प्रकटीकरण हे कृपाधिष्ठित आहे हा “राम कर्ता” भाव दृढ होणे देखील महाराजांच्या नामाला priority देण्याने साधते. आणि नामाला ही priority भगवंताने स्वतः दिली आहे असे सर्व संत सांगतात. तुलसीदास म्हणतात,
समुझत सरिस नाम अरु नामी|
प्रीति परसपर प्रभु अनुगामी||
नाम रूप दुइ ईस उपाधी|
अकथ अनादि सुसामुझि साधी||
-- नाम व नामी दोन्ही एकरूपच असले तरी त्यांच्यामध्ये स्वामी व सेवक असा संबंध आहे. स्वामीच्या मागे सेवक चालतो. त्याचप्रमाणे नामामागे नामी चालतो. नाम आणि रूप या दोन्ही ईश्वराच्या उपाधि आहे. दोन्ही गोष्टी अनिर्वचनीय आहेत. केवळ शुद्ध बुद्धीनेच यांचे स्वरूप जाणता येते.

म्हणूनच विठ्ठलाच्या सगुण रूपाशी खेळणारे संतश्रेष्ठ नामदेव म्हणतात,

“लपलासी तरी नाम कैसे नेसी| आम्ही अहर्निशी नाम गाऊ||”

||श्रीनाम समर्थ||



1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete