Wednesday, June 3, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४७ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४७ --

श्रीमहाराजांना एकाने एकदा प्रश्न विचारला की, ‘महाराज, सध्या इतकी यंत्रे निघाली आहेत; भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादे यंत्र शोधून काढले नाही का?’ प्रश्न ऐकून श्रीमहाराज झट्दिशी म्हणाले, ‘हो तर! असे यंत्र संतांनी केव्हाच शोधून काढले आहे. त्या यंत्राचे नाव आहे, ‘रामनाम’. हे यंत्र सर्वांना मिळू शकते आणि शिवाय, ते कधीच गंजत नाही!’

श्रीराम!
त्रेतायुगात आणि द्वापारात योग याग तप या मार्गांनी भगवत प्राप्ती होत होती. मात्र कलियुगात हे मार्ग आचरण्यासाठी लागणारी शारीरिक आणि मानसिक क्षमता कलीच्या प्रभावाने कमी कमी होत जाईल असे द्वापाराच्या शेवटी भगवंतांनी सांगितले. मनुष्य आळशी बनेल व त्याची बुद्धी स्थिर राहणार नाही. वातावरणात रजोगुण तमोगुण यांची वाढ होईल. हे झाल्यामुळे मनुष्य प्रत्येक बाबतीत शॉर्टकट च्या मागे लागला. कोणतीही गोष्ट साधण्यासाठी जास्त कष्ट नकोत, खर्च नको आणि तरीही साध्यता सहज झाली पाहिजे अशी मनुष्याची मनोभूमिका झाली. याच लौकिक मनोभूमिकेत मुरलेला मनुष्य हाच नियम परमार्थाकडेही लावू लागला. श्रीमहाराजांची खासियत ही आहे की मनुष्य ज्या भूमिकेतून प्रश्न विचारतो, त्याला ते त्याच्या मनोभूमिकेला अनुरूप असे उत्तर देऊन या मार्गाकडे वळवतात. अशा रीतीने हा आजचा प्रश्न आणि त्याला श्रीमहाराजांनी दिलेले चपखल उत्तर आहे.

कालच्या चिंतनाच्या वेळीच असे वाटत होते की, खरोखर संतच या जगातले सर्वोत्तम शास्त्रज्ञ आहेत. अनेक शोध लौकिक शास्त्रज्ञांनी लावून आयुष्य सुखकर केले; परंतु बहुतेक सर्व शोधांना सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत. अगदी अणुबॉम्बचेच उदाहरण दिले पाहिजे असे नाही. अगदी लहान सहान शोध – जसे – मिक्सर... आज यामुळे आपले स्वयंपाक घरातीक काम किती सहज सोपे झाले आहे; मात्र यामुळे पूर्वीच्या बायकांमध्ये होती ती पाटा वरवंट्यावर काम करण्याची आमची क्षमताच हळूहळू निघून गेली. त्यामुळे हाडातली, स्नायूंमधली शक्तीही कमी झाली असा शास्त्रीय निष्कर्ष आहे. म्हणजेच कोणत्याही आयुष्य सुखकर करण्याच्या शोधात काहीतरी कमीपणाची बाजू आहे. संतांनी जो शोध लावला तो मात्र, आहे तेच आयुष्य असताना देखील कायम आनंद मिळवून देणारा, मनुष्याच्या मनाची पातळी उंचावून त्याला या जगातल्या सुख-दुःखांपासून मुक्त करणारा असा लावला. याच नामाच्या यंत्राच्या शोधातून मनुष्याला “अखंड समाधान” म्हणजेच भगवत्-प्राप्ती होते असा निर्वाळा श्रीमहाराजांनी दिला. म्हणून ते म्हणाले, अशा यंत्राचा शोध संतांनी कधीच लावला! नामाचे यंत्र म्हटले आहे. कारण देहबुद्धीत असताना मनुष्याला सुरुवातीला स्वतःच्या प्रयत्नाने नामाला चिकटण्याचा अभ्यास करावा लागतो व ‘मला सहज नामाला चिकटता यावे’ यासाठी त्यासोबत निरंतर सद्गुरूंची प्रार्थना करावी लागते.

या यंत्राचा गुणधर्म श्रीमहाराज सांगताहेत, हे यंत्र सर्वांना मिळू शकते! म्हटलंय ना, नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम| बाई मी विकत घेतला श्याम! वाह... अक्षरशः नामाच्या यंत्राचा शोध म्हणजे खरोखर भगवंताला वश करून घेणेच आहे. ना काही खर्च, ना काही कष्ट, केवळ मुखाने राम राम म्हणायचे, चित्तात त्याला साठवायचा प्रयत्न करायचा आणि “रामे चित्त लयः सदा भवतु” अशी प्रार्थना गुरुचरणी करायची! बाकी सर्वच्या सर्व साधनांना काही पूर्वतयारी लागते. काही शारीरिक, मानसिक बळ आत्मसात करून, काही विशिष्ट नियम पाळून मगच ती साधने इच्छित फलप्राप्तीसाठी – भगवत प्राप्तीसाठी उपयोगी ठरतात. मात्र नामसाधना सुरु करण्यासाठी अशी कोणतीही अट संतांनी घातलेली नाही. समर्थ म्हणतातच,
चालता बोलता धंदा करिता| खाता जेविता सुखी होता|
नाना उपभोग भोगिता| नाम विसरो नये||
नामाची शक्ती, नामाची पवित्रताच आकाशाला भेदून टाकणारी असल्यामुळे त्याच्यासाठी कर्मकांडात्मक कोणत्या विधीची, कोणत्या विशिष्ट काळाची आवश्यकता नाही. हनुमंत म्हणतात तसे, “कह हनुमंत बिपति प्रभु सोई| जब तव सुमिरन भजन न होई||” विधी ते स्मरण, विस्मरण तो निषेध एवढा एकच नियम पाळायचा. कसे आहे, नामाला कोणत्याच बाधक गोष्टी टाकाव्या लागत नाहीत असे नाही. परंतु श्रीमहाराजांना भगवंताच्या नामावर इतका प्रचंड विश्वास आहे की ते म्हणतात, बाकी आचरणात्मक तुम्ही फार धरायच्या भरीला न पडता केवळ नामस्मरण करा. त्या नामाच्या योगानेच जे बाधक व्यवहार, विचार, आचार असतील ते आपोआप निघून जातील. त्याकडे लक्ष देत बसून वेळ घालवण्यापेक्षा जे करायचे ते केलेले उत्तम हा महाराजांच्या बोलण्याचा स्पष्ट मतितार्थ आहे! खूप सहज आहे हे. जो नामाला मनापासून धरेल, त्याच्याकडून दुर्व्यवहार घडणे अशक्य; जर घडत असेल, अजून नामाला धरण्यात कमतरता आमची आहे, नामात किंवा सद्गुरुंत उणीव नाही!

दुसरा नामाच्या यंत्राचा गुण महाराज सांगतात, ते कधीही गंजत नाही. गंज लोखंडाला का चढतो? त्याचा संपर्क हवेबरोबर आला की. जितके शुद्ध लोखंड तितका गंज जास्त चढतो म्हणतात; हेच जर लोखंडाचे alloy असेल तर गंज चढत नाही. मात्र हे लौकिकातले, दृश्यातले उदाहरण आहे. नाम हे दृश्य अदृश्याच्याही पलीकडे शाश्वतात स्थिर आहे, त्यामुळे त्याच्यावर कशाचा परिणाम होणे शक्यच नाही. मात्र यातून एक बोध घेण्यासारखा आहे. नाम घेणाऱ्या साधकाचे मन जितके जितके सूक्ष्म होत जाते, तितके त्याने स्वतःला बुद्धिभेदाचा, विकल्पाचा, विकारांचा गंज चढण्यापासून सांभाळणे आवश्यक आहे. सूक्ष्म बुद्धीची ग्रहण क्षमता खूप वाढते; त्यावेळी जसा सत्संगाचा परिणाम तत्काळ होतो, तसाच कुसंगाचा परिणाम देखील तत्काळ होण्याचा संभव असतो. जर नाम घेऊन समाधान साधत नसेल, तर यातल्या कोणत्यातरी गोष्टीने आम्हाला गंज चढत आहे हे ओळखून सावध झाले पाहिजे.

जो साधक “आम्हाला केवळ गुरूंची अकारण करुणा म्हणून आमची पात्रता नसताना नाम मिळालेले आहे” हा भाव सतत ताजा ठेवण्याचा प्रयत्न करील, त्याला नामाचा सहजपणा, सुगमता आणि शक्ती यांचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही; मग तो / ती कुणीही असो! कारण नामाला कोणताच विटाळ नाही. “चहू वर्णां नामाधिकार| नामी नाही लाहानथोर| जड मूढ पैलपार| पावती नामे||” कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही समयी, कोणत्याही जागी, कोणत्याही परिस्थितीत नाम घेऊन भगवत प्राप्तीची ज्योत अखंड तेवती ठेवणे आम्हाला जमो हीच प्रार्थना सद्गुरू चरणी वारंवार करणारा साधक या भवसागरातून तर तरून जाईलच; पण त्याहीपेक्षा या इथेच राहून, सर्व परिस्थिती हीच असताना देखील नामाने तो मनाच्या उन्नत अवस्थेत सतत राहू शकेल. आज जी परिस्थिती, माणसे, कमतरता आम्हाला भली मोठी दिसत आहेत, तीच ‘विमानातून जशी खालची शहरे ठिपक्याएवढी दिसतात’ तशी दिसून त्यांचे महत्त्वच नाहीसे झाल्याशिवाय राहणार नाही! म्हणूनच बाकीची सर्व यंत्रे नाहीशी झाली, त्यांचे महत्त्व कमीजास्त झाले, ती काम करेनाशी झाली तरी “नामाचे यंत्र” मात्र कधीही खाडा न करणारे आणि केव्हाही शरीरालाच नव्हे तर मनालाही विश्रांती देणारे असे आहे. यंत्रवत, म्हणजे किंचितही खंड न पडता परंतु त्याला भावनेचे तेल घालून नामस्मरण केले मात्र पाहिजे. म्हणजे नाम हेच रमणस्थान होईल!!!  

||श्रीनाम समर्थ||




1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete