Monday, July 6, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५८ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५८ –

भगवंताचे नाम हे बॅटरीसारखे आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा ते प्रकाश देते. ते आपल्या खिशामध्ये, म्हणजे हृदयामध्ये राहू शकते. तिने आपले अंग भाजत नाही, तसे नामाने आपल्याला वैराग्याचे कष्ट नाहीत; आणि कुठेही ते बरोबर नेता येते.

श्रीराम!
महाराजांची वचने दर वेळी नवीन अनुभूती, नवीन अर्थ आणि नवीन आनंद देतात. खरोखर वचनांची संगती हे गुरूंचे अनुसंधान टिकवण्यासाठी श्रेष्ठ साधन आहे यात शंकाच नाही. पुन्हा वचने ही मुख्यतः अर्थरूप असल्यामुळे ती देखील नामाप्रमाणे जणू सगुण सद्गुरू आणि त्यांचे सदा विद्यमान असे निर्गुण रूप या दोन्हींना सांधतात. किती भाग्यवान आपण, ज्यांना आपल्या सद्गुरूंनी हा अनमोल ठेवा दिला! आजच्या वचनात श्रीमहाराज नेहमीप्रमाणे नामाचेच महत्त्व आणि श्रेष्ठत्व सांगत असले तरी ते दोन अंगांनी अतिशय महत्त्वाचे असे वचन आहे. वरवर बघितले तर असे वाटण्याची शक्यता आहे की महाराज इथे आम्हाला नाम हवे तेव्हा उपयोगाला येईल, म्हणजे संकटात काम देईल असे सांगत आहेत. अर्थात ते अयोग्य नाहीच. नामाला शरण गेलेला साधक हा प्रत्येक गोष्टीतच नामाला शरण जातो. जसे, गुरुदेव रानडे म्हणायचे, नामात विश्व निर्माण करण्याची शक्ती आहे, साधा रोग नाही बरा करणार? अनेक असे श्रेष्ठ साधक श्रीमहाराजांच्या चरित्रात देखील वर्णन केले गेले ज्यांनी शारीरिक आजारपणात नाम हेच औषध मानून त्यावरची आपली निष्ठा दाखवून दिली. अशा प्रसंगात, इतर कुणाप्रती शरणागती नसून केवळ नामावर पूर्ण श्रद्धा असल्यामुळे असे अनन्य नामभक्त आपल्या मुक्कामी सहज पोचले. पण अशी निष्ठा अत्यंत कठीण आहे यात शंका नाही. बॅटरी म्हणण्याचे कारण म्हणजे जेव्हा संपूर्ण अंधाऱ्या खोलीत आपण बॅटरी घेऊन जातो तेव्हा हळूहळू त्या खोलीत प्रकाश होतो असे होत नाही. बॅटरी लावल्या लावल्या सबंध खोली एकदम उजळून निघते. तद्वत नामाची बॅटरी ज्याने सोबत बाळगली त्याचे अध्यात्मिक आयुष्य हळूहळू प्रकाशित होते असे त्याला प्रकृतीच्या पडद्यामुळे वाटले तरी देखील नाम मिळणे आणि ते गुरुकृपेने मुखात येणे याचा अर्थच सबंध लौकिक आणि अलौकिक जीवन प्रकाशित होणे होय. श्रीमहाराज म्हणायचे, नाम मुखात येते आहे म्हणजे कुंडलिनी जागृत झाली असलीच पाहिजे. याला म्हणतात नामाच्या शक्तीवरचा विश्वास.

मात्र “आपल्याला पाहिजे तेव्हा नाम प्रकाश देते” हे वचन याहीपेक्षा जास्त अर्थगर्भित आहे. याचा जोड “नामात राहणे” याच्याशी लागतो. नामात राहणे ही ‘सहज प्रक्रिया’ आहे, कारण नाम हे स्वयंभू, स्वयंपूर्ण आणि स्वयंप्रकाशी आहे. जो नामाच्या – नामीच्या – भगवत तत्त्वाच्या चिंतनात निरंतर राहतो, त्याला ‘आता मी नाम घेतो, किंवा आता मी नामाला बसतो’ अशी आठवण स्वतःला करून द्यावी लागत नाही. याचा जोड पुन्हा ‘नाम हेच शुद्ध चैतन्य आहे’ याच्याशी लागतो. जसे, ‘आता मी अमुक गोष्टीबद्दल विचार करतो’ असा मुद्दाम विचार करावा लागत नाही. किंवा ‘माझा हात खाजवत आहे, तर दुसऱ्या हाताला असे सांगावे लागत नाही की खाजव’; ती प्रक्रिया सहज घडते. शुद्ध चैतन्य किंवा ज्याला कृष्णमूर्ती Choiceless Awareness म्हणतात, ते मी आहे, तेच मी आहे, अशी ज्ञानी मनुष्याला आठवण करावी लागत नाही; तो सहजच त्याच्याशी एकरूपत्व अनुभवतो. खूप सूक्ष्म (subtle) आहे हे. ॐकाररूपि तन्नाम हृन्मन्दिर निवासि च” म्हणते पूज्य बाबांची नामचंद्रिका (ॐकार रूप असलेले नाम हृदयाच्या गाभाऱ्यात निवास करते; त्याचा निवास व्हावा म्हटलेले नाही, निवासी आहेच!). गीता म्हणते, “ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति|” (ईश्वर सर्व भूतमात्रांच्या हृदयात राहतो; राहावा म्हटलेले नाही). हे नाम – भगवंत आणि शुद्ध चैतन्य यांचे एकरूपत्व दाखवण्यासाठी पुरेसे आहे. श्रीमहाराजांसारखे संत जे नामरूप आहेत आणि त्याचे श्रेष्ठ शिष्यगण जे नामरूप झाले त्यांना त्या नामरूपत्वाची जाणीव सतत असली तरीही लोककार्य करण्यासाठी, आमच्यासारख्यांना शिकवण्यासाठी त्या वरच्या पातळीवरून खाली येऊन ते आम्हाला सांगावे लागते व याची सुरुवात प्रपंचात देखील नामाचा प्रकाश पडेल हे सांगण्यापासून होते. मग जेव्हा जरूर असते तेव्हा हवा तसा त्या चैतन्याचा ते उपयोग करतात; जणू नाम (जे शुद्ध चैतन्य आहे) ते आपल्या खिशात वागवतात. श्री रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी श्रीमती शारदा माता या त्यांच्या शिष्यांना प्रत्यक्ष माता भवानी स्वरूप होत्या, त्यांना तशी अनुभूती होती. रामकृष्णांनी देह ठेवल्यावर बऱ्याच वर्षांनी एकदा त्यांच्या जवळच्या शिष्याने मा शारदांना विचारले, ‘माता, तुम्ही प्रत्यक्ष शिवा-स्वरूपिणी’ आहात हे तुमच्या सतत अनुभूतीत असते का?’ तेव्हा अगदी सहजपणे त्या म्हणाल्या, “तसे नसते. तसे झाले तर एवढे सगळे काम मी कशी करू शकेन? मात्र जेव्हा जरूर असते, तेव्हा मी त्या मूळ रूपाचा आधार घेऊ शकते.” अजून एक रामकृष्णांचेच थोर शिष्य गमतीने म्हणायचे, “चैतन्य स्वरूप हे आपल्या आवडत्या उशीप्रमाणे असते. जेव्हा वाटेल तेव्हा त्या उशीवर पडून आपण आनंद उपभोगू शकतो!” हे सांगण्याचे कारण, श्रीमहाराज जे म्हणताहेत, नाम आपल्याला पाहिजे तेव्हा प्रकाश देते, याचा अर्थ, ते प्रकाशमानच आहे; फक्त ते नामाचे खरे भगवत स्वरूप आपल्याला हवे तेव्हा (हुकमी) दृग्गोचर होते! यामुळेच नामाच्या दिव्य भव्य शक्तीत सतत राहणारा श्रीमहाराजांसारखा संत देखील लोकांमध्ये राहून अमाप लोककार्य करू शकतो.

अग्नी आणि भाजणे हे एकरूप आहे. मूळ शुद्ध स्वरूपात चैतन्य शक्ती धारण करणे जिवाला जवळजवळ अशक्य आहे, कारण त्यामध्ये वैश्वानर भगवंताचे वैश्विक रूप सामावलेले आहे. मात्र जेव्हा ही वैश्विक शक्ती संतांनी परा शक्तीच्या कृपेने नाम रूपाने हृदयात धारण केली तेव्हा ती शक्ती परमशीतल झाली. संतांच्या प्रेमभावाचे त्यावर गोड सिंचन झाले व त्यामुळे वैश्विक शक्ती बीज रूपाने असलेले नाम आपले शुद्ध चैतन्याचे दाहकत्व विसरून योग्यांच्या देखील हृदयाला गारवा प्रदान करणारे असे झाले. शुकादिक परमहंस देखील नामाची महती भागवतात गातात याचे कारण हेच.

श्रीमहाराज म्हणतात, तुम्ही फक्त नाम घ्या, ते विवेक – वैराग्य मी सांभाळतो आणि म्हणूनच आजच्या वचनात म्हणतात, नामाने वैराग्याचे कष्ट नाहीत. परमार्थ मार्गासाठी दृश्यापासून वैराग्याची आवश्यकता आहे हे खरेच. मात्र वैराग्य मिळवण्यासाठी देहदुःख किंवा ताकदीचे इंद्रियदमन या गोष्टी श्रीमहाराजांना मान्य नाहीत. कारण ते म्हणतात, त्याची आवश्यकताच नाही. जो नाम घेईल, त्याच्या मागे वैराग्य लागेलच. नामाने हळूहळू जगाचे स्वरूप प्रकट व्हायला लागते व जो नामात राहू लागतो, त्याला नामाचे प्रेम आल्याने स्वाभाविकच जगताबद्दल व देहासंबंधी उदासीनता येते. उदासीनता म्हणजे व्यग्रता नसून ‘जे आहे ते असो, जे नाही ते नसो’ अशी भावना होऊन निष्काम कर्मयोगात राहणे होय. असे हे परमसुंदर भगवंताचे नाम आपल्याला कुठेही बरोबर नेता येते, यापेक्षा साधनेची सुलभता अजून कोणती? जे आपले आत्मस्वरूपच आहे असे नाम – त्याला सोडून आपण कुठे जाणार? मात्र हे लक्षात यायला गुरुकृपा भाकून निरंतर नामात ‘राहता यावे’ अशी कृपा करावी अशी मनापासून प्रार्थना करणे जरूर आहे. कारण, पेढा गोड आहे असे नुसते सांगून त्याचा गोडवा कसा कळणार? तोंडात टाकला तरच कळणार. तसा नामाचा पेढा तोंडात धरून या संसारात पद्मपत्राप्रमाणे राहणारा खरा ‘योगी’ होय!

||श्रीनाम समर्थ||

1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete