Tuesday, July 28, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६१ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६१ –

नामाचे औषध थेंब थेंब पोटात घेत असावे. ऑफिसमध्येसुद्धा आपण ते बरोबर घेऊन जावे. इतर औषधे (म्हणजे साधने) आपल्याला लागू पडणार नाहीत. ती वेळच्या वेळी घेतली पाहिजेत आणि बरोबर पोटात गेली पाहिजेत. तसेच ती कडू असली तरी आपल्याला रुचली पाहिजेत. शिवाय, ती रक्तामध्ये मिसळायला वेळ लागणारच. पण नामाचे तसे नाही. ते ताबडतोब रक्तामध्ये मिसळते.

श्रीराम!
जशी व्याधी तसा उपचार हवा हे सार्वकालिक सत्य आहे. या भवामध्ये आमची खरी व्याधी एकच आहे आणि ती म्हणजे अज्ञान! ज्ञान होते म्हणजे काय होते? काही नवीन गोष्ट मिळते का? तर नाही. ज्ञान होते याला वेदांतात व्याख्या आहे, “प्राप्तस्य प्राप्ति: निवृत्तस्य निवृत्तिः”. म्हणजे जे सदा सर्वकाळ आहेच तेच (सत्य आहे हे कळल्यामुळे) प्राप्त होते व जे नव्हतेच ते निघून जाते – नाहीसे होते. खऱ्या ‘मी’ ची ओळख होणे हे सर्व परमार्थाचे सार आहे. तू हा देह अथवा मन नसून आत्मा आहेस, त्या सच्चिदानंद परमात्म्याचा अंश आहेस याची शब्दापलीकडील अनुभूती म्हणजे ज्ञान! मग आमच्या अज्ञानाची व्याधी ही ज्ञानानेच नाहीशी होईल हे सत्य यातून आम्हाला उमगले. मग हे ज्ञान होण्याला बाधा कोणती आहे? दोन बाधा आहेत असे उपनिषदे सांगतात – १) विक्षेप (आमच्या मनाचे चांचल्य किंवा विखुरलेपणा) आणि २) अंतःकरणाची अशुद्धी. याचाच अर्थ या अज्ञानाच्या व्याधीपासून मुक्तता होण्यासाठी त्याच्या कारणांवर घाव घालणे जरूर आहे. अगदी शारीरिक रोगांच्या उपचारशास्त्रात देखील ‘रोगाच्या कारणमीमांसेला आणि तदनुरूप केलेल्या उपचारालाच’ अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे आजच्या वचनात श्रीमहाराज भवरोगाच्या कारणमीमांसेला तर्कसंगत असे औषध सांगतात.

डॉक्टर जेव्हा औषध देतात, तेव्हा ते केवळ औषध घ्या असे सांगत नाहीत तर कसे घ्यायचे, केव्हा घ्यायचे, पथ्य काय करायचे या गोष्टीही सांगतात. आमचे श्रीमहाराज केवळ शरीराचेच नव्हे तर मन बुद्धी अंतःकरणाचे डॉक्टर आहेत आणि त्यामुळे ते औषधासोबत ज्याला आधुनिक वैद्यकशास्त्र Auxiliary Regimen म्हणते, ते जास्त महत्त्व देऊन सांगतात. “नामाचे औषध थेंब थेंब पोटात घेत असावे!” हे एक वाक्य जो आचरणात आणू शकेल त्याला इतर काहीही करण्याची आवश्यकताच नाही. सबंध अध्यात्मिक आयुष्याचे सार आहे हे वाक्य. पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, साधकाने एखादा दिवस भरपूर दिवसभर नाम जपले व पुढे काही दिवस काहीच झाले नाही असे उपयोगाचे नाही. नामाचा अभ्यास हा दृढ नेमाने नित्यक्रमात दैनंदिनीत बसवला पाहिजे. एवढेच नव्हे तर महाराज म्हणतात, दिवसाकाठी काही वेळ नाम जपले आणि पुन्हा आता दुसऱ्या दिवसापर्यंत नामाचा आणि माझा संबंध नाही असे होता कामा नये. यालाच नामाचे अनुसंधान टिकवणे म्हणता येईल. गुरु नानक जसे म्हणत, “भांग तमाखू धत्तुरा उतर जात परभात| नाम खुमारी नानका चढी रही दिनरात||अशी नामाची खुमारी चढण्याकरिता थेंब थेंब नाम सदोदित जिभेवर रेंगाळले पाहिजे. असे झाल्याशिवाय स्थळ- काळ- निमित्त यांच्या पलीकडे असलेल्या परमात्म्याशी संधान कसे शक्य आहे असे संत विचारतात. गुरुदेव रानडे आपली अवस्था सांगताना एकदा म्हणाले, “न कळे दिवसराती| अखंड लागलीसे ज्योती||” नामाच्या अखंड नेमाचा – कट्टाच्या नामाचा प्रभाव आहे हा!

अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे श्रीमहाराज नामाचे औषध “पोटात” घ्यायला सांगत आहेत; त्यांनी मनात घ्यावे, हृदयात घ्यावे म्हटलेले नाही. याचे कारण काय? केवळ औषधाची उपमा आहे म्हणून ते तसे नाही. महाराज म्हणायचे, वासना बेंबीपाशी असतात. त्यामुळे नामाचे अखंड स्मरण – चिंतन हे बेंबीपर्यंत पोहोचले की वासना नाहीशा व्हायला सुरुवात होते. आपण वर जी विक्षेप आणि चित्ताची अशुद्धी ही अज्ञानाची कारणे बघितली ती नाहीशी करण्याचा मार्ग जणू महाराज यातून आम्हाला सांगत आहेत. परंतु, असे नाम घ्यायचे कसे? तर, आत्यंतिक त्रासात, संकटात किंवा भयग्रस्त अवस्थेत जसा मनुष्य देवाचा धावा करतो, बेंबीच्या देठापासून त्याला साद घालतो, तसा भाव नाम घेताना – मी या भवामध्ये अडकलो आहे, सोडव मला यातून आणि तुझ्या चरणांचे प्रेम दे अशी साद भगवंताला जो घालेल त्याचे नामाचे औषध “पोटात” जाईल व वासनांचा समूळ नायनाट करेल!

हे सांगून महाराज आम्हाला नामाच्या सुलभतेबद्दल सांगत आहेत. इतर साधने तुम्हाला पचणार नाहीत असे आमच्या आजच्या दैनंदिन कामकाजाला, आमच्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीला बघता महाराज आम्हाला सांगत आहेत. त्या ऐवजी कोणतीच उपाधि नसलेले नाम आम्ही कुठेही कधीही आमच्या सोबत घेऊन जाऊ शकतो. महाराज ऑफिसला घेऊन जायला सुचवताहेत. ते म्हणायचे, “कोणतेही काम सुरु करण्या अगोदर आणि कामाच्या शेवटी नामाचे स्मरण करावे – नाम जपावे, म्हणजे मग कामाच्या मध्ये नाम टिकते.” यातून अजून एक महत्त्वाची गोष्ट साधते, ती म्हणजे, नामाच्या संगतीने आमचे काम झाल्याने ते कर्म सहजच भगवंताला अर्पण होते व त्यातील ‘मी कर्ता’ हा भाव जाऊन ‘राम कर्ता’ हा भाव मनात उमटतो.

जसे डॉक्टर पथ्य सांगतात, तसे श्रीमहाराज आम्हाला हे देखील सांगताहेत की इतर साधने – इतर औषधे घेऊ नयेत. ती आपल्याला लागू पडणार नाहीत. ती आपल्याला रुचणार नाहीत; कारण आज आमचे जीवन ऋषीमुनींच्या जीवनाएवढे पवित्र, शांत, निर्दोष नाही. त्यामुळे ज्या साधनांमध्ये बऱ्याच विधि-निषेधांचे पालन आवश्यक आहे, ती साधने आम्हाला फारशी उपयोगाची नाहीत. कारण अनेकदा त्या उपाधींमध्येच मन अडकल्याने इतर मार्गांचे साधक अंतःकरणाची शुद्धी सहज प्राप्त करू शकत नाहीत. या उलट अंतःकरणाची शुद्धी ही नामाच्या – भगवंताच्या स्मरणाने मीपणा हळूहळू गळून गेल्यामुळे शरणागत भावाने सहजच साधते. सद्गुरूंनी दिलेल्या नामाची शक्ती आहे ही आणि केवळ अनुभूतीनेच त्याचे महत्त्व कळू शकते. आणि म्हणून श्रीमहाराज शेवटी सांगताहेत, नाम रक्तात लवकर मिसळते. कारण रक्तच काय पण शरीरातला, शरीरा बाहेरचा, अवकाशातला अणुरेणु नामानेच भरून आहे हे त्रिवार सत्य आहे! “Silence of the Universe” म्हणजे इतर काही नसून सर्वत्र भरून उरलेले नाम आहे! त्यामुळे ज्याने नामाचा आश्रय घेतला, त्याला त्या शाश्वत शांतीची चुणूक आल्याशिवाय राहत नाही. मग जी भवरोगाच्या व्याधीची कारणे आहेत, विक्षेप आणि अशुद्धी ती सहजीच त्या नामाच्या स्पंदनांमध्ये विरून जातात व तो साधक शुद्ध आत्मतत्त्वात विलीन होतो!

||श्रीनाम समर्थ||

No comments:

Post a Comment