Wednesday, July 15, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ५९ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ५९ –

‘भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही’, असे ज्याला कळले त्याला सर्व कळले.

श्रीराम!
पूर्वीच्या काळी (काही ठिकाणी अजूनही) पहाटे ‘वासुदेव’ यायचे. निद्राधीन लोकांना जणू जागे करून भक्तिरसात न्हाऊ घालण्याचेच त्यांचे काम. पारमार्थिक जगात संत या वासुदेवाचे कार्य करतात. दृश्याच्या निद्रेत निजलेल्यांना जागे करून शाश्वत प्रकाशाचा मार्ग दाखवतात. आपल्या श्रेष्ठ संतांनी असे काही अभंग रचले, ज्यांना देखील ‘वासुदेवी अभंग’ म्हटले गेले. संतश्रेष्ठ नामदेव अशाच एका वासुदेव अभंगात म्हणतात,

“बाबा अहंकार निशी घनदाट|
गुरुवचनी फुटली पहाट||
भक्ति भेटली बरवंट|
तिने मार्ग दाविला चोखट गा||”

आजच्या श्रीमहाराजांच्या वचनात “कळणे” हा शब्द तीन वेळा आला आहे. म्हणजेच भगवंताचे स्वरूप ‘न कळणे’ हीच परमार्थ मार्गातली धोंड आहे. वेदांत ज्याला ‘अज्ञान – Ignorance’ म्हणतो तो हाच. आणि नामदेव महाराज म्हणताहेत, हे जे अज्ञान आहे, ते अहंकाराच्या घनदाट अंधःकारामुळे आहे. मात्र या घनदाट अंधःकारावर एक चोख इलाज आहे – “गुरुवचन”!
सद्गुरू लीलामृतात चवथ्या अध्यायात आपण वाचतो,
“गुरुवचन तो वेदांत| गुरुसेवा हा धादांत|
गुरुकृपा तोचि सिद्धांत| गुरुपुत्रासी||”
म्हणजेच तथाकथित मायेचा पडदा भेदण्यासाठी केवळ गुरुवचन प्रमाण मानून जो शिष्य मार्गक्रमण करेल त्यालाच “कळेल”!

आणि श्रीमहाराज म्हणतात,
“नामापरते सत्य न मानावे!”

असे म्हटले जाते, संत आयुष्यभर जे बोलतात ते तर महत्त्वाचे असतेच; परंतु या भूलोकातील देहाचे कार्य संपवताना ते जे बोलतात, त्याला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. श्रीमहाराज देह त्याग करताना म्हणाले,
“जेथे नाम तेथे माझे प्राण| ही सांभाळावी खूण||”

या सर्व गोष्टी एकाच दिशेकडे बोट करतात – नाम हेच भक्ताचे सर्वस्व आहे – असावे – व्हावे. परमार्थ मार्ग अनेक आहेत. मात्र सर्व मार्गातील संत एका गोष्टीवर ठाम आहेत, की शरणागती शिवाय ज्ञान नाही. आणि जेव्हा या शरणागती बद्दल शास्त्रीय दृष्टीने विचार झाला तेव्हा देखील सर्व संतांच्या लक्षात एकच गोष्ट आली जी त्यांनी अनुभवली - भगवंताचे नाम, ज्याचा उगम परा वाणीतल्या ॐकारापासून झाला, ज्याने सगुण साकार भगवंताला त्याच्या निर्गुण निराकार स्वरूपाशी सांधले, त्याचाच आधार घेणे क्रमप्राप्त आहे. ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महायोग्याने ग्वाही दिली, “म्हणोनि नाम वज्रकवच| तोचि निर्गुणाचा अभ्यास||” आणि स्पष्ट सांगितले, “नाम अनुभव वेदांचा!” श्रीमहाराज म्हणतात, तुम्हाला नामाचे – खऱ्या साधन मार्गाचे व साध्याचे सम्यक ज्ञान देण्यात संतांचा काय स्वार्थ होता? ज्याचा त्यांना फायदा झाला व ते “जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनं” यातून मुक्त झाले, त्याचा फायदा जगताला मिळून अनेकांचा उद्धार व्हावा ही एकच तळमळ त्यांना होती! आम्ही न बघितलेल्या परंतु विज्ञानाने सिद्ध केलेल्या सिद्धांतावर विश्वास ठेवतो, मग संतांनी ज्याचा चोख अनुभव घेतला त्यावर सुरुवातीला विश्वास ठेवून मार्ग अक्रमण्यात गैर काय? नामाशिवाय कोणत्याही साधनाने संपूर्ण अहंकाराचा लय आणि त्यापुढे जाऊन भगवंताचे प्रेम संभवत नाही हे त्रिवार सत्य श्रीमहाराजांनी परोपरीने सांगितले. म्हणूनच आपल्या परमपूज्य ब्रह्मानंद महाराजांनी आपली जिव्हा नामाला विकली व त्यानंतर पुन्हा तथाकथित शास्त्रोच्चार त्या जिव्हेने केला नाही! 

भक्ति महाराणी दैन्यतेच्या सिंहासनावर विराजमान होते! जोवर स्थूल आणि सूक्ष्म अहंकाराने अंतर्याम भरलेले आहे, तोवर भक्ति महाराणीचे आगमन हृदयाकाशी होत नाही. नामाचे महत्त्व इथे आहे. जोवर आम्ही नामाशिवाय इतर साधने ‘करतो’, तोवर आमच्यातला मीपणा विरत नाही. कारण इतर साधनांना बाह्य जगतातून काही ना काही मदत लागते. जसे, योग मार्ग असेल तर या शरीराच्या काही क्रिया व अनुशीलन करणे आवश्यक आहे. ज्ञान मार्ग असेल तर बुद्धीने त्याचे सम्यक आकलन व मनन करणे गरजेचे आहे. ते मार्ग देखील खरे तर शरणागती मध्येच शेवटी स्थिरावतात – स्थिरावावेत; मात्र यात देह मन बुद्धी या उपाधींचा आधार घ्यावा लागत असल्यामुळे साधक ‘कर्मात’ अडकण्याची भीती आहे हे निश्चित. संपूर्णपणे निरुपाधिक साधन, जे साध्यरूपच आहे ते म्हणजे भगवंताचे नामच होय.

तीन गोष्टी आहेत -- कर्म – क्रिया – सहज कर्म. कर्म हे बहुतेक वेळा बाह्य गोष्टींवर आधारित असते. क्रिया ही साध्याप्रत घेऊन जाण्याचे साधन आहे. सहज कर्म मात्र साधकाला कर्म बंधनातून मुक्त करते, कारण सहज कर्मात कर्तेपणाचा संपूर्ण लय होतो. आणि असे सहज कर्म केवळ भक्तीनेच घडू शकते. अशा भक्ताचा प्रत्येक दिवस आणि त्यामधील प्रत्येक कर्म याचा हेतू भगवंत, कर्माचा प्रेरक भगवंत, ज्याच्यासाठी ते कर्म करायचे तो भगवंत आणि अहंकार त्याच्याच चरणी लीन झाल्यामुळे त्या कर्मफलाचा भोक्ताही पुन्हा भगवंतच! अशी निरुपाधिक भक्ति साधण्यासाठी नामाखेरीज अन्य उपाय नाही. अशा भक्ताला कर्मबंधनात अडकण्यासाठी वाव राहिलाच कुठे? म्हणून ज्ञानेश्वर महाराज नामाबद्दल म्हणतात, “सुलभ आणि सोपारे केलेसे दातारे!!!” अहाहा! कुणी सोपे केले? दातारे! ज्याने नाम दिले त्या गुरूने हे सोपे केले आणि म्हणून आम्हाला परमार्थ मार्ग सुलभ झाला म्हणताहेत संतांचे मुकुटमणी ज्ञानदेव! अशा रीतीने नामसाधक आपल्या साधनेचा उगम, मध्य आणि कळस सर्व आपल्या गुरूमध्ये पाहत असल्यामुळे मीपणाला वाव न राहता सहजच हृदयामध्ये पारमार्थिक दैन्य – लीनता प्रकटते आणि भक्ति महाराणीच्या रम्य विलासाने त्या भक्ताचे हृदय भरून जाते!

म्हणून श्रीमहाराज म्हणतात, “अत्यंत कठीण प्रमेये असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे!” वाचावेत का सांगताहेत? कारण, गावाला वळसा मारून आल्याशिवाय काखेत कळसा आहे हे बहुधा कळत नाही! पण ते म्हणतात, हरकत नाही. द्राविडी प्राणायाम केल्याशिवाय तुम्हाला नामाचा सहजपणा मनावर ठसणार नाही. बहुतेक सर्व साधकांचा थोडाबहुत हा अनुभव आहेच. मुळात गुरुकृपेने ज्यांना थोडेतरी नामाचे प्रेम लाभले, त्यांना इतर काहीही केले, वाचले, ऐकले, तरी त्याचा मनबुद्धिला होणारा आनंद हा थोडा काळ टिकतो हे लक्षात येते. जगातली कितीही वेगवेगळी सुंदर ठिकाणे बघितली, तरी जसे आपल्या घरी परत आल्यावर मनाला समाधान वाटते, त्याप्रमाणेच इतर काहीही केले तरी असे नामाचे प्रेम लाभलेला साधक नामाला बसल्यावर त्याला “आपल्या घरी” आल्याचा परमानंद होतो व विश्रांती लाभते. आणि मग “नाम हेच एकमेव सत्य आहे” या उदात्त अनुभूतीत त्याची साधना हा त्याचा स्वभाव बनतो आणि भगवंताचे प्रेम तो प्रत्येक क्षणी अनुभवतो!

||श्रीनाम समर्थ||

2 comments:

  1. अद्भुत, अद्वितीय, अनुपम चिंतन!
    नाममहिमा आणि सद्गुरूमहिमा आकाशापलिकडे उदात्त, दिव्य आहे, याचं दर्शन घडवलंत!
    प्रणाम! 🙏🌿📿🌿🙏

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete