Friday, July 31, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६३ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६३ –

निद्रानाशाचा रोग झाला तर झोप लागेपर्यंत जसे झोपेचे औषध आपण घेतो, तसे आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतले पाहिजे.

श्रीराम!
मागच्या वचनामध्ये श्रीमहाराजांनी आम्हाला “नाम ही महौषधी आहे” असे सांगितले आणि पथ्य सांभाळून घेणाऱ्याला त्याचा गुण लवकर येईल असेही सांगितले. आजच्या बोधवचनात ‘गुण येणे’ म्हणजे काय हे महाराज विशद करताहेत. जसे आपण आधीच्याही बऱ्याच वचनांमध्ये बघितले, श्रीमहाराज आधल्या मधल्या अनुभवांबद्दल बोलणे पसंत करत नाहीत. त्यांचे असे स्पष्ट मत आहे की थोड्या थोडक्या नामाच्या अनुभवांमध्ये जो अडकला तो शाश्वताला मुकला. अनुभव केवळ मैलाचे दगड आहेत आणि आम्ही मार्गावर आहोत हे दाखवतात; मात्र त्याचे महत्त्व तेवढेच. जसे, नासाग्री दृष्टी ठेवून साधन करणाऱ्याला सहजच काही महिन्यात सुगंध येऊ लागतो. काहींना ज्योत दर्शन होते, विविध Mystic Experiences येणाऱ्यांची कमी नाही. पण आमचे महाराज मात्र या सर्व अनुभवांमधून दोन महत्त्वाच्या गोष्टी तपासायला सांगतात –
१) आमची वृत्ति शुद्ध होत गेली का? जेणेकरून विकार आणि विचार कमी होऊन विचारांची दिशा भगवंताकडे वळली का?
२) कोणत्याही परिस्थितीत आम्ही क्षोभित न होता मनाची सम स्थिती टिकली का?
यांना श्रीमहाराज खऱ्या अर्थाने नामाचे अनुभव म्हणून संबोधतात.

म्हणून आजच्या वचनात श्रीमहाराजांनी “स्वाभाविक समाधान” ही शब्दयोजना केली आहे. महाराजांचा एकही शब्द उगीच वापरलेला नसतो. त्यामागे त्यांची दृढ अध्यात्मिक भूमिका आणि केवळ अंतिम सत्याबद्दल असलेली आस्था प्रतीत होते. स्वाभाविक म्हणजे जे स्वभावतःच आहे ते. मनुष्य स्वतःचे समाधान स्वरूप विसरल्याने इतस्ततः धावतो आहे असे महाराजांचे म्हणणे आहे. मूळ सच्चिदानंद (Being – Consciousness – Bliss) असलेला जीव पंचमहाभूतांना त्या शाश्वताचा विलास न मानता त्या भूतांनाच खरे मानू लागला आणि त्यायोगे त्यांमध्ये गुरफटला. नाम हेच ते सच्चिदानंद परब्रह्म आहे हा अनुभव संतांनी घेतला आणि म्हणून मुळात सर्व शक्तींचा साठा असलेले नाम त्यांच्या आत्मिक प्रेमशक्तीने युक्त करून आम्हाला दिले व कृतकृत्य केले. परंतु सुरुवातीला बहुतेक नामधारकांना त्या नामाच्या शक्तीची – त्याच्या खऱ्या स्वरूपाची कल्पना नसते आणि ते साहजिक आहे, कारण आम्हाला लौकिक मोजमापात प्रत्येक गोष्ट मोजण्याची सवय झालेली असते व सद्गुरू प्रदत्त नाम हे सगळ्याच्या पलीकडचे असे आत्मतत्त्व असल्याने देहबुद्धीत असेतोवर नामाचे खरे महत्त्व कळणे दुरापास्त आहे.

म्हणून आज श्रीमहाराज सांगताहेत, नाम कधीपर्यंत घेणे जरूर आहे? तर जोवर तुमचा असमाधानाचा रोग पूर्णपणे नाहीसा झाला नाही, तोवर घेणे जरूर आहे – समाधान मिळेपर्यंत घेणे जरूर आहे. आजच्या घडीला आम्हाला प्रत्येकालाच हा अनुभव आहे की असमाधान हे सर्व शारीरिक व मानसिक रोगांचे मूळ आहे. असमाधानाचे मूळ कशात आहे याचा विचार केला तर सहज समजून येते, की ते आमच्या विविध प्रकारच्या वासना व कामना यांमध्ये आहे. या वासनांचे मूळ कशात आहे? तर आमच्या अपूर्णपणाच्या भावनेत आहे. अमुक वस्तू, व्यक्ती, परिस्थिती मिळाली तर मी सुखी होईन ही भावना या सर्व वासनांचे मूळ आहे. मात्र श्रीमहाराज म्हणतात तसे, “शंभर वेडे एकत्र केले तर एक शहाणा तयार होईल का?” हे जसे शक्य नाही, तसे कितीही अपूर्ण वस्तु एकत्र केल्या तरी त्यातून एक पूर्ण वस्तु संभवत नाही आणि त्यामुळे जीव कधीही समाधान पावत नाही.

त्यामुळे आजच्या वचनात श्रीमहाराज आम्हाला खरे तर आम्ही योग्य मार्गावर आहोत किंवा नाही हे तपासण्याची खूण सांगताहेत.
१) आमचे लौकिक गोष्टींबद्दलचे समाधान वर्धिष्णू होत असेल,
२) कोणत्याही बाबतीत आमच्या तक्रारी कमी कमी होत असतील,
३) मनाचा क्षोभ आणि संसारिक विचार व विकार कमी कमी होत असतील,
४) आमची स्वार्थबुद्धी कमी होऊन आम्ही इतरांच्या हिताचा विचार आमच्या हिताच्या आधी करत असू आणि याची सुरुवात घरापासून करत असू,
५) मनाची एक स्वाभाविक स्थिर वृत्ति जाणवत असेल,
६) कोणत्याही बाबतीतले भय उरले नसेल,
७) आमची उपासना वाढत्या अंगाने निष्काम होत असेल,

तर आम्ही महाराजांनी वर्णन केलेल्या “स्वाभाविक समाधानाच्या” निकट चाललो आहोत असे म्हणावयास हरकत नाही. यामध्ये आमच्या भाग्याची परमावधी ही आहे की सद्गुरूंनी दिलेले नाम आम्ही जर मनापासून पथ्य सांभाळून जपले, तर त्या एका नामात वरील सर्व साधण्याची शक्ती आहे. इतर साधनाची आटाआटी करणे महाराजांना पसंत नाही. ते म्हणतात एके ठिकाणी,
“अनेक मते अनेक साधने| हजारो प्रकारच्या क्रिया जाण||
एकच त्यांचा हेतू| एकच त्यांचे कारण|
घडावी दोषनिवृत्ति| व्हावी परमेश्वरप्राप्ति||”
त्यामुळे ते म्हणतात, “सत्याची ही खाण रामनाम!”

ज्याने यावर श्रद्धा ठेवून नाम जपण्यास सुरुवात केली, त्याच्या या श्रद्धेचे रूपांतर “नाम हेच ते अंतिम सत्य आहे या “ज्ञानात” झाल्याशिवाय राहणार नाही हा महाराजांचा दावा आहे. त्यांच्या कृपेवर दृढ निष्ठा ठेवून त्याची अनुभूती घेण्यासाठी आसुसणे यासारखे पुण्य नाही!

||श्रीनाम समर्थ||

1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete