Saturday, August 1, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६४ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६४ –

भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते.

श्रीराम!
योगी अरविंद होते ना, ते म्हणायचे, संत नेहमी Supramental state मधे असतात. म्हणजे या भौतिक मनाच्या पातळीपासून ते खूप वर असतात. तुकाराम महाराज जसे म्हणतात, “अनुहाति गुंतलो, नेणे बाह्य रंग| वृत्ति येता मग बळ लागे||” म्हणजे ते आतमधल्या आनंदात इतके गुंतलेले असतात की बाहेर यायला त्यांना कष्ट होतात. आमच्या स्थितीच्या उलट स्थिती म्हणजे संतांची स्थिती. आम्हाला जसे नामाला बसल्यावर सांसारिक व्यवहार आठवतात तसे संतांना नाम घ्यायचे नाही तर करायचे काय असा प्रश्न पडतो. म्हणजेच संतांना या जगात मिळवायचे असे काहीही उरलेले नसते, ते नित्यतृप्त असतात. मात्र, आमच्यासारख्या जीवांच्या अज्ञानाला बघून, कारण नसताना ‘महाराजां’चे वंशज असलेले आम्ही दरिद्र्यासारखे दुःख भोगताना बघून त्यांना कळवळा येतो. आणि हा कळवळा इतका तीव्र असतो की ते आपल्या सहज समाधी स्थितीतून खाली येऊन आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी प्रवृत्ती मार्गाचा स्वीकार करतात. हे सांगण्याचे कारण असे की आजच्या वचनातला दाखला हा आमच्यासारख्या संसारात अडकलेल्यांसाठी संतांना द्यावा लागतो.

खरे पाहता, भगवंताच्या नामाला उपमा देताच येत नाही असे ते अनुपमेय आहे असे श्रीमहाराज सांगतात. ‘या सम हेच’ असे जे म्हटले जाते ते नामाला चपखल लागू होते. पण असे म्हटले तर ते आम्हाला कळणार कसे? एक शेणात राहणारी अळी होती. एक भ्रमर तिच्याजवळ आला आणि त्याने विचारले, “तुला गोड पदार्थ आवडेल का?” ती अळी गांगरून गेली, तिला कळेना हे गोड प्रकरण काय आहे? आजवर शेण सोडले तर इतर चव माहितच नाही. तेव्हा तो भ्रमर म्हणाला, “चल तुला फुलातला गोड पराग देतो, ये माझ्यासोबत!” ती गेली; परंतु ते गोड ती सहन करू शकली नाही आणि त्या भ्रमराला म्हणाली, “नको बुवा, मला आपले माझे शेणच बरे, त्याशिवाय मी मरून जाईन, माझा जन्म इथलाच आणि यातच राहून मी मरेन.” आमच्यासारख्या अज्ञानी जीवांची तऱ्हा ही अशी आहे असे श्रीमहाराज म्हणतात. पण त्यामुळेच उपमा जी शोधायची ती संतांना अशी शोधावी लागते ज्याबद्दल आम्हाला माहिती आहे. म्हणून आज श्रीमहाराज म्हणताहेत, “भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे.” पैसा म्हटले की लगेच आम्हाला वाटते, “हां, आता मला कळते आहे थोडेफार की नामाचे महत्त्व किती आहे, कारण मला पैशाचे महत्त्व माहित आहे. पैसा असल्याशिवाय आणि नुसता असल्याशिवाय नव्हे तर बँकेत साठवलेला असल्याशिवाय मला माझ्या भवितव्याची निश्चिंती वाटत नाही. पैसा तिथे आहे म्हटल्यावर मला रात्री झोप लागते की उद्या काही कमीजास्त झाले तरी पैशाच्या भरवशावर काहीतरी मार्ग निघू शकतो.” हे किती मूढ मत आहे हे देखील आपल्याला माहिती आहे, कारण नुसता पैसा असून उपयोग नसतो. परिस्थिती, प्रसंग, माणसे एक ना अनेक सर्व अनुकूल असूनही येणारे प्रारब्ध चुकवणे माणसाला शक्य होत नाही हा सर्वसामान्य अनुभव प्रत्येकाच्या गाठीशी असतो. तरीही श्रीमहाराज आम्हाला त्या अनुषंगाने नामाचे महत्त्व इथे पटवून देऊ इच्छितात.

सूरदास म्हणतात,
“माई मेरे निर्धन को धन राम||
रामनाम मेरे हृदय में राखू| जो लोभी राखे दाम||”
सूरदास कि इतनी ही पूंजी| रतन मणी से नहीं काम||”
हेच श्रीमहाराज आम्हाला आजच्या वचनात सांगताहेत की जर राम नाम हीच आमच्या बँकेतल्या पैशासारखी जरी पूंजी आम्ही समजलो, तरी हळूहळू पैशावर अवलंबून असलेलो आम्ही त्या तकलादू अवलंबनाचा त्याग करून जे खऱ्या अर्थाने आश्रयदाता आहे असे भगवंताच्या नामाला आमचे आश्रयस्थान बनवू. महाराज म्हणायचे, पैसा वाईट नाही, पण तुम्हाला त्याचा आधार जो वाटतो, तो परमार्थाच्या आड येतो.

पण तरीही ते आम्हाला समजण्यासाठी सांगतात, की नामाचा balance चांगला असेल तर ते नाम तुम्हाला वेळप्रसंगी निश्चित उपयोगी पडेल. देहबुद्धीत असलेल्या आमच्यासारख्यांची उपासना पूर्णपणे निष्काम होणे अत्यंत अवघड आहे हे त्यांना माहित असल्यामुळे ते सांगतात, हरकत नाही, सकाम भाव ठेवून का होईना, नाम जपण्यास सुरुवात करा, नामाची शक्ती तुम्हाला लहान सहान अडीअडचणींमधून देखील तुमचे प्रारब्ध अनकूल असल्यास सोडवेल आणि हे होत असतानाच ते नामच तुम्हाला हळूहळू निष्काम बनवेल. संतश्रेष्ठ तुलसीदास म्हणतातच,
राम नाम मानिदीप धरी जीह देहरी द्वार|
तुलसी भीतर बाहेरहुं जौं चाहसि उजियार||
-- प्रपंचात आणि परमार्थात दोन्हीकडे तुम्हाला प्रकाश हवा असेल तर तुम्ही मुखरूपी दाराच्या उंबरठ्यावर रामनामरूपी रत्नदीप ठेवा!

हे होण्यासाठी रामनाम हा “रत्नदीप” आहे यावर श्रद्धा दृढ होणे आवश्यक आहे. ही श्रद्धा दृढ होण्याला नामाशी अनन्य होणे जरूर आहे. ही अनन्यता दृढ होण्यासाठी सद्गुरूंना आपले सर्वस्व मानणे आणि त्यानुसार वागणे आवश्यक आहे. हे ज्याने केले त्याचा प्रपंच आणि परमार्थाचेही क्षेम सद्गुरू वाहतील व नामात प्रेम प्रदान करतील हे त्रिवार सत्य आहे!

||श्रीनाम समर्थ||

3 comments:

  1. श्रीराम! श्रीमहाराजांच्या वचनांचा गर्भितार्थ आणि संकेत कळणं किती कठीण पण महत्त्वाचं आहे, हे हे चिंतन वाचल्यावर समजले नाही तरच नवल! 🙏😷🙏

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर 👌
    जो अनुभवेल तो समजेल
    श्री राम 🙏

    ReplyDelete