Friday, August 21, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६९ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६९ –

विषयाची ऊर्मी हे मायेचे स्मरण होय, आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे, म्हणून त्यामध्ये सत्संगति आहे.

श्रीराम!
श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतात, “सोडायच्या गोष्टींपेक्षा धरायच्या गोष्टींचा अभ्यास करावा.” अनेकदा असे होते, की साधक आपल्या पूर्वकर्मांबद्दल खूप जास्त विचार करून दुःखी होतो व हातून घडलेल्या पाप कर्मांबद्दलच विचार करण्यात त्याचा जास्त वेळ जातो. श्रीमहाराजांना हे पसंत नव्हते. ते म्हणायचे, सद्गुरूंच्या पायावर डोके ठेवल्यावर पाप राहीलच कसे? हा भाव साधकाच्या मनात दृढ झाला पाहिजे. आजच्या बोधवचनात केवळ व्याख्या द्यायची म्हणून महाराज आम्हाला ‘विषयाची ऊर्मी हे मायेचे स्मरण होय’ असे सांगत नाहीयेत. तर, त्याचे स्मरण करणे कसे निरर्थक आहे हे सांगत आहेत. माया कुठे आहे? माया ही मनात आहे. आम्ही मायेला भगवंतापासून भिन्न मानली म्हणून माया आम्हाला त्रास देते. साधन आणि गुरुकृपेने ही माया त्या भगवंताचीच शक्ती आहे हे लक्षात आले म्हणजे विषय जे आज आम्हाला त्रास देतात, ते केवळ आमच्या मनाच्या भ्रमित अवस्थेचे फलस्वरूप होते याची अनुभूती साधकास येते व तीच माया भगवंताची ज्ञानशक्ती व प्रेमशक्ती होऊन आमच्या अंतरंगी ज्ञानाचा प्रकाश करते.

परंतु, या स्थितीप्रत जाईतोवर श्रीमहाराज सांगत आहेत की, स्मरणच करायचे ना, मग ते भगवंताचे करा. कारण, एकमेव सत्य तो भगवंतच आहे. ज्याचे चिंतन करावे तसे तुम्ही होता हा महाराजांच्या सांगण्यामागचा भावार्थ आहे. आणि त्या भगवंताचे सर्व स्मरण हे त्याच्या नामामध्ये साठवलेले असल्याने नामाचे स्मरण हेच भगवंताचे स्मरण असे आजच्या वचनात महाराज सांगत आहेत. तत्त्वज्ञान दृष्ट्या आजच्या वचनात ‘नेति नेति’ आणि ‘स इति’ हे दोनही भाव एकत्र आलेले आहेत. साधकावस्थेत मनुष्याला नेति नेति या भावातूनच आत्मप्रचीती पर्यंतचा प्रवास करायचा आहे. जर या घडीला आम्ही सर्व ब्रह्मच आहे असा भाव जागवण्याचा प्रयत्न केला, तर आमच्या विक्षेपी आणि जड मनामुळे आम्ही दृश्य जगतात अडकण्याचा धोका खूप जास्त आहे. त्यामुळेच सगुण भगवंताची उपासना व नामस्मरण हे मार्ग अत्यंत दोषरहित आणि निर्धोक आहेत. त्या सगुण ब्रह्माव्यतिरिक्त सर्व मिथ्या आहे या भावामधूनच त्या भगवंताच्या चरणी संपूर्ण समर्पण शक्य आहे. या समर्पणानंतरच जेव्हा साधकास आत्मदर्शन होते, तेव्हाच ‘स इति’ किंवा ‘वासुदेवः सर्वं इति’ ही अनुभूती त्याला होते. मार्ग कोणताही असला तरी देखील त्या मार्गात महत्त्व असेल तर ते केवळ गुरु-प्रदत्त साधनास व त्याहीपेक्षा अनंतपट अधिक गुरुकृपेस महत्त्व आहे. अर्थात गुरुप्रदत्त साधनात रत राहणाऱ्यासच गुरुकृपेची प्रचीती येते हे निश्चित आणि ही गुरुकृपा म्हणजेच सर्व संशयरहित ज्ञान व भगवत्प्रेम होय.

म्हणून श्रीमहाराज साधन काळात आम्हाला विषयांची वृत्ति न उठण्यासाठी व त्याचे रूपांतर ऊर्मीत न होण्यासाठी व तदनुषंगाने कृती न घडण्यासाठी त्याचे स्मरण आणि वारंवार विचार नकोच असे सांगत आहेत. त्या ऐवजी ज्या स्मरणाने हळूहळू मायाबद्ध जीव त्या मनरूपी मायेच्या कचाट्यातून सुटून त्यावर अधिराज्य गाजवेल अशा भगवंताच्या स्मरणात देहाचे विस्मरण होणे आवश्यक आहे.

नामस्मरणाचे अनन्यसाधारण महत्त्व हे आहे की प्रत्येक नामामागे भगवंताचे शुद्ध सच्चिदानंद स्वरूप साक्षात स्थित आहे. याची अनुभूती घेणे म्हणजे खऱ्या अर्थाने नामात राहणे आहे. पूज्य बाबा बेलसरे म्हणत, “नाम घेताना श्रीमहाराजांच्या – भगवंताच्या अस्तित्त्वाची जाणीव होते की नाही ही परीक्षा साधकाने करत रहावे. जर ही जाणीव झाली नाही तर त्याबद्दल वाईट वाटावे.” कारण, नामस्मरणाचा मुख्य हेतूच भगवंताच्या अथवा भगवत्स्वरुप सद्गुरूंच्या अस्तित्त्वाची जाणीव होणे हा आहे; ज्यायोगे जीवाचा अहंकार गलितगात्र होईल. शरणागतीचे बीज या अस्तित्वाच्या जाणीवेत आहे आणि म्हणून श्रीमहाराज नामाचा इतका आग्रह करतात, कारण शरणागतीशिवाय ब्रह्मदर्शन संभवत नाही.

वचनाच्या शेवटच्या ओळीत श्रीमहाराज पुन्हा खरी सत्संगति कोणती हे आम्हाला पटवून देत आहेत. त्यांचे म्हणणे आहे, की देहाने सत्संगती लाभणे हे उत्तमच यात शंका नाही. परंतु, देहाची सत्संगत मिळणे इतके सोपे नाही. मिळाली तरी ती चोवीस तास मिळणे अशक्य आहे. मिळाली तरी त्यावर (म्हणजे संतावर) आजच्या काळात विश्वास बसणे सोपे नाही. म्हणून महाराज देहाने सत्संगती पेक्षाही सद्विचारांची संगत महत्त्वाची मानतात. कारण सध्या आम्हाला जर कुणी त्रस्त केलेले असेल तर ते म्हणजे आमच्या मनीचे विविध विचार. त्याजागी जर सततच्या नामानुसंधानाने, सद्ग्रंथ वाचन, श्रवणाने आम्ही सद्विचार स्थिर करू शकलो, तर त्या विचारांची संगती आमची चिंतनाची दिशाच बदलते व आमची सत्याकडे म्हणजेच परमात्म्याकडे वाटचाल सुगम होते. मात्र श्रीमहाराजांना आम्ही सांसारिक गोष्टीत व दृश्यात किती मनाने अडकलेलो आहोत याची कल्पना आहे. माऊलीच ती. तिलाच आपल्या लेकरांची काळजी. म्हणून आमच्या मनात सद्विचार रुजणे आजच्या घडीला अवघड होईल हा विचार करून, तरी देखील आम्हाला उद्धाराचे मार्ग सापडावा यासाठी सर्व संतांची संगती आणि सद्विचारांची संगती यांनी अनुस्यूत असे नाम त्यांनी आम्हाला दिले. आणि सांगितले, “नामातच सत्संगती आहे.” कारण सर्व संत आणि सद्विचार यांचे वास्तव्यच नामात आहे.

आणि हे लक्षात येण्यासाठी आजचे वचन आम्ही अंगिकारणे अत्यंत आवश्यक आहे. विषय आणि त्यांची ऊर्मी ही केवळ आमच्या मनात आहे पण मन हे केवळ एक इंद्रिय आहे व मी मन नाही या भावनेत दृढ राहून त्याबद्दल जास्त उहापोह न करता जो शाश्वत सत्य अशा नामाला धरेल त्यालाच नामामध्ये गुरुकृपेने भगवत्दर्शन संभवेल!

||श्रीनाम समर्थ||

2 comments:

  1. श्रीराम! एकच, केवळ एकच चिंतन वाचून त्यावर मनन करत आचरणात आणले तर जीवनाची सार्थकता साधता येऊ शकते, याची जाणीव दृढ करून दिलीत. प्रणाम! 🙏🌿🙏

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete