Tuesday, August 4, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६६ --



श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६६ –

सध्या प्रवेशाला ‘पास’ वापरतात. ज्याच्याजवळ पास आहे त्यालाच आत सोडतात; म्हणजे आमंत्रितांनाच आत सोडतात. तसे, आपण नाम घेतले तर आपल्याला अनुकूल तेवढेच आत येईल.

श्रीराम!
भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात – सांख्ययोगात भगवंत म्हणतात,
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्|
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी||२.७०||
-- ज्याप्रमाणे चोहीकडून पाण्याची भर पडत असतानाही आपली मर्यादा अढळ राखणाऱ्या समुद्रात येऊन मिळणारे पाणी गडप होते, त्याचप्रमाणे सर्व विषय ज्याच्या मनात शांति न मोडता प्रवेश करतात त्याच मनुष्याला खरे शांतिसुख लाभते, भोगाची इच्छा करणाऱ्याला ते शांतिसुख मिळत नाही.

“मर्यादा” हा सर्व साधना मार्गांचा प्राण आहे आणि म्हणूनच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम साधकाचे आदर्श भगवंत आहेत. ही मर्यादा साधन मार्गामध्ये बाह्य जगतातून आम्ही अंतर्जगतात कुणाला घेतो व त्याला किती स्थान देतो यावर अवलंबून आहे असे आजच्या वचनात श्रीमहाराज उदाहरण देऊन आम्हाला समजावताहेत. कोणत्याही महत्त्वाच्या व मोठ्या समारंभांमध्ये जाण्यासाठी आजकाल ‘पास’ ठेवला जातो म्हणताहेत महाराज. कारण काय? तर जे आमंत्रित आहेत, त्यांच्याशिवाय कुणी ऐऱ्यागैऱ्याने त्या समारंभात प्रवेश करू नये. जिथे महत्त्वाचे आदरणीय पाहुणे आहेत तिथे चुकीच्या लोकांनी प्रवेश केल्यास समारंभ निर्विघ्न पार पडणार नाही यासाठी ही व्यवस्था असते ना! त्याप्रमाणेच आमच्या मनामध्ये कुणाला प्रवेश द्यायचा हे ठरवण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये यायला हवे असे श्रीमहाराज सांगताहेत. मन हे देखील एक इंद्रीयच आहे. जसे, हात पाय या कर्मेंद्रियांनी चालता आणि काम करता येते, म्हणून आम्ही चोवीस तास चालतच किंवा काम करतच राहतो का? हे जर वेडेपणाचे वाटते, तर मन आहे म्हणून मी चोवीस तास अनेकविध गोष्टी मनात साठवेनच असे म्हणणे वेडेपणाचे का वाटत नाही? याचे मुख्य कारण मन हे सूक्ष्म इंद्रिय असल्यामुळे त्याचे कार्य देखील सूक्ष्मात आहे आणि आम्ही आमची बुद्धी सतत स्थूलात वागवत ठेवल्यामुळे त्या बुद्धीला सूक्ष्मात जाऊन मनावर वर्चस्व गाजवता येत नाही.

आणि मन बुद्धीला सूक्ष्मता आणण्याचा मार्ग श्रीमहाराज आजच्या वचनात सांगताहेत, तो म्हणजे नामस्मरण! नाम हा मनरूपी हत्तीवर अंकुश ठेवणारा माहूत आहे म्हटले तर वावगे ठरू नये. श्रीमहाराज म्हणतातच, “तुम्ही नामस्मरण करताना तुम्हाला विषय त्रास देऊ शकतच नाहीत; विषय त्रास देताहेत वाटत असेल तर तुमचे नाम कमी पडते आहे हे समजावे.” अजून एके ठिकाणी श्रीमहाराज म्हणतात, “नामाने या जगाचे स्वरूप कळते व ईश्वराचे स्वरूप देखील कळते.”, म्हणजेच या जगाचे अशाश्वत आणि भुलवणारे स्वरूप जे आम्ही खरे मानून सुखदुःख भोगतो, त्या भ्रमाचा निरास करणारे देखील नामच आहे. हे कशामुळे होते? तर नामाच्या पूर्णत्वामुळे होते. आमच्या भ्रमित अपूर्णत्वामुळे आम्ही आनंद बाहेर शोधतो आणि त्या बाहेरच्या गोष्टी चित्तात जाऊन बसल्या की विक्षेप निर्माण करतात. नाम काय करते, तर नामाच्या आणि भगवंताच्या एकरूपत्वामुळे नाम आमची बुद्धी स्थिर करते. बुद्धी स्थिर झाली की अंतर्दृष्टी तीव्र आणि विवेकयुक्त करते. आणि हा विवेक सर्व साधनांचा पाया आहे म्हटले तर वावगे ठरू नये. श्रीमहाराजांच्या नमस्कारत्रयोदशी मध्ये आपण म्हणतो, “विवेके सदा ज्ञान वैराग्य साधी||” -  लहानपणापासूनच श्रीमहाराजांनी विवेकमार्गाने ज्ञान आणि वैराग्य साधलेले होते.

विवेक हा शब्द संस्कृतात ‘विच्’ धातूपासून आहे, ज्याचा अर्थ आहे, निवडणे. याला परमार्थात ‘आत्मानात्मविवेक’ असे म्हणतात. हा विवेक जागृत करण्याचे महत्कार्य नाम करते. यामुळे मुख्यतः काय साधते तेच आजच्या वचनात महाराजांनी सांगितले आहे. भगवंतांनी गीतेत जे सांगितले, “सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो| मत्तः स्मृतिर्द्न्यानपोहनं च|| (भ. गी. 15.15)” – मी सर्वांच्या हृदयात प्रविष्ट झालेलो आहे आणि माझ्यापासूनच स्मरण, ज्ञान आणि अज्ञानाचे निराकरण होते. याचाच अर्थ आपल्या हृदयातल्या मुख्य पाहुण्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला आमच्या मनबुद्धिरूपी दरवाजावर विवेकाचा पहारा बसवायचा आहे. हे कशासाठी करणे जरूर आहे याबद्दल संत तुलसीदास म्हणतात,
“अस प्रभु हृदयँ अछत अबिकारी| सकल जीव जग दीन दुखारी||
नाम निरूपन नाम जतन तें| सोउ प्रगटत जिमि मोल रतन ते||” (रामचरितमानस बालकांड)
-- विकाररहित असे प्रभू हृदयात राहत असून सुद्धा जगातील सर्व जीव हे दीन आणि दुःखी आहेत. नामाचे यथार्थ स्वरूप, महिमा, रहस्य आणि प्रभाव जाणून श्रद्धेने नामजप केल्यामुळे ज्याप्रमाणे रत्न जाणण्याने त्याचे मूल्य कळते, तसे ब्रह्म ज्ञात होते.

या वरील दोन्ही उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की नामस्मरण हे एका दगडात दोन पक्षी मारण्यासारखे आहे. एकीकडून ते मनावर अंकुश ठेवते व नको त्या गोष्टी चित्तात साठवण्यावर नियंत्रण आणते आणि दुसरीकडून त्या हृदयस्थ भगवंताला हलवते व जीवाला तद्रूप करते.

मानसपूजेमध्ये आपण शेवटी सद्गुरूंना – भगवंताला आपल्या हृदयामध्ये विश्रांती ग्रहण करण्यास सांगतो. विश्रांती स्थान कसे हवे हे आम्हाला माहित आहे. जिथे कोणत्याही प्रकाराने त्यांच्या विश्रांतीत बाधा येणार नाही असे तिथले वातावरण असावे, नाही का? नको ते विषयरूपी पाहुणे तिथे प्रवेश करते झाले आणि त्यायोगे हृदयात कंप, क्षोभ निर्माण झाला तर ते निवासस्थान आमच्या सद्गुरूंना कसे बरे विश्राम देईल? या भावनेने जो नामस्मरण करील, त्याला दोन गोष्टी साधतील. महाराज म्हणाले तसे, आमच्या आत नको ते पाहुणे प्रवेश करणार नाहीत हे एक आणि दुसरे म्हणजे आमच्या हृदयस्थ सद्गुरूंच्या विश्रांतीसाठी मी नाम जपतो आहे हा भाव ठेवला तर आमचे साधन हे निष्काम आणि निरहंकार होईल, ज्यामुळे आमचे सद्गुरू सुखावतील.

आणि सद्गुरूंच्या आनंदात आनंद मानणारा तोच नामाच्या प्रेमाचा अधिकारी बनतो हे निश्चित; कारण त्याचे स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही अहंकार सद्गुरूंच्या चरणी विसर्जित होऊन त्याची वृत्ति गुरुकृपेने नामात रंगून जाते!

||श्रीनाम समर्थ||

1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete