Monday, August 3, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६५ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६५ –

एक सुतार घर बांधण्यासाठी आला. त्याच्या हातात एक लहान पिशवी होती. येवढे मोठे घर बांधायचे खरे, पण ते बांधायला लागणारी सर्व हत्यारे त्याच्या त्या लहान पिशवीमध्ये होती. त्या घरामध्ये तशी कितीतरी हत्यारे राहू शकतील! तसे, भगवंत येवढा मोठा खरा, पण तो प्राप्त करून घ्यायला एवढेसे ‘नाम’ पुरे.

श्रीराम!
रोजच्या आयुष्यातल्या घटनांमधून परमार्थ शिकवणे हे श्रीमहाराजच करू जाणतात. कोणत्याही घटनेची, प्रसंगाची सांगड नामाशी कशी घालावी याचा आदर्श म्हणजे श्रीमहाराज. याच धर्तीवर आजच्या वचनात श्रीमहाराज आम्हाला नामाचे महत्त्व समजून सांगत आहेत. मुख्यतः केवळ नाम घेऊन परमेश्वर प्राप्ती साधेल का? या प्रश्नाच्या उत्तरादाखल श्रीमहाराज अशी उदाहरणे देत. संशय हा साधनेतील सर्वात मोठा शत्रु आहे. जोवर साधनाच्या संदर्भात संशय आहे, तोवर साधन आनंदही देऊ शकत नाही आणि त्या साधनाला अनुसरून ध्येय गाठणे देखील अशक्य होते.

उपनिषदांमध्ये ज्ञानाच्या तीन पायऱ्या सांगितल्या.
१) श्रवण
२) मनन
३) निदिध्यासन
यातला पहिला टप्पा जो आहे, श्रवणाचा, तो गुरूंनी सांगितलेले जसेच्या तसे ऐकणे यामध्ये मोडतो. संतांचे शास्त्र आहे, “जानो या मानो”... म्हणजे, अंतिम सत्य काय आहे, ईश्वर काय आहे हे जाणून घ्या किंवा ते ज्ञान होईपर्यंत गुरूंच्या शब्दांना ‘माना’! या मानण्याची सुरुवात श्रवणामध्ये आहे. श्रीमहाराजांनी सांगितले, “नाम हेच ते अंतिम सत्य आहे!” यावर विश्वास ठेवून साधकाचा प्रवास सुरु होतो. गुरूंचे वचन हे शब्दच असले तरी त्याचा भावार्थ शब्दापलीकडे असतो आणि त्यामुळे तो कळण्यासाठी साधकाला त्या शब्दांवर मनन करावे लागते. मनन करणे म्हणजेच श्रीमहाराज म्हणतात तसे, “परमार्थ समजून करणे” होय. या टप्प्यावर काही संत ग्रंथांचे वाचन, त्यावर चिंतन, संत श्रवण, सत्संगती यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे गुरुकृपेने घडले तर साधक या टप्प्यावर पोहोचतो की, आता मला माझ्या गुरूंनी जे सांगितले आहे ते बुद्धीच्या पातळीवर व्यवस्थित समजलेले आहे आणि त्यात मला काही शंका नाही. मात्र या टप्प्यावर जो प्रश्न साधकाला पडतो तो हा, की मला समजले खरे; परंतु त्या समजण्यातून माझ्यात काही फारसा फरक पडलेला नाही. मी जो पूर्वी होतो, तसाच आहे. म्हणजे जे विकार विचार होते त्यामध्ये मुळातून फारसा फरक जाणवत नाही. हे जितक्या तीव्रतेने साधकाला वाटेल, तितक्या तीव्रतेने तो सद्गुरूंना शरण जातो व जे ज्ञान बुद्धीच्या पातळीवर आजवर ग्रहण केले त्याचा त्याला निदिध्यास लागतो. हा ज्ञानाचा साधनातील अंतिम टप्पा होय. जितका तीव्र आवेग असेल तितका लवकर साधक साध्याच्या जवळ पोहोचतो.

हे सांगण्याचे कारण, आजच्या उदाहरणात श्रीमहाराज आम्हाला सांगत आहेत की, भगवत एवढा मोठा आहे, त्याला प्राप्त करून घेण्याच्या साधनांचा अवाका एवढा मोठा आहे; परंतु तो चिद्रूप, चिदानंदमय भगवंत छोट्याशा नामाला वश होतो. तुलसीदास म्हणतात, “जाकर नाम सुनत सुभ होई||” ज्याचे नाम केवळ कानावर पडले असता सर्व शुभच होते, त्या मनुष्याच्या गतीला ऊर्ध्व दिशा मिळते. अशा प्रभूंचे नाम ज्याने मनापासून घेतले, त्याला आपल्या सर्व कर्मबंधनातून मुक्ती न मिळेल तरच नवल! आजच्या वचनातल्या सुताराच्या पिशवीत जशी बरीच हत्यारे आहेत. मात्र ज्या हत्यारांची आवश्यकता आहे तेवढी तो वापरतो. घर किती का मोठे बांधायचे असुदे, त्याच्या छोट्याशा पिशवीत त्याची सर्व तयारी आहे. तसे, हा देह आणि मन ही आमची पिशवी आहे, ज्यामध्ये परमार्थाला आवश्यक असे सर्व काही आहे. श्रीमहाराज म्हणायचेच, “सेल्फ-कंटेंड ब्लॉक (flat) असतो ना, ज्यामध्ये त्या घरात सर्व सोई सुविधा असतात. कोणत्याही गोष्टीसाठी घराबाहेर जाण्याची गरज त्या घरात राहणाऱ्या माणसाला पडत नाही. त्याप्रमाणेच या देहात परमार्थाला आवश्यक असे सर्व काही आहे. आपण कुठेही असलो तरी ती व्यवस्था आपल्या बरोबर असते. त्यामुळे कुठेतरी जाऊन मी परमार्थ करेन ही कल्पनाच चुकीची आहे.” आणि हे सांगून श्रीमहाराज सांगतात, आम्हाला आमच्या अज्ञानामुळे परमात्म प्राप्ती हा मार्ग लांबचा वाटणे साहजिक आहे, मात्र त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. भगवंत मोठा असला तरी त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचे त्याचे नाम मात्र लहानसे आहे. त्याव्यतिरिक्त अजून कशाची जरूरच नाही. म्हटलेच आहे, “सुमिरि पवनसुत पावन नामु| अपने बस करि राखे रामु||”

म्हणूनच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणाले,
“नाममाला घे पवित्र| अंती हेचि शस्त्र||
राम हा महामंत्र| सर्व बाधा निवारी||
भवकर्मविख| रामनामी होय चोख||
हरेल भवव्यथादुःख| पुढे सुख उपजेल||”

कारण जे काही “ज्ञान” आहे, ते सर्व ज्ञान त्याच छोट्याशा नामामध्येच सामावलेले आहे!

“सुमिरत जाहि मिटइ अग्याना|
सोइ सरबग्य रामु भगवाना||”
- ज्यांचे स्मरण होताच अज्ञानाचा नाश होतो, तेच ते सर्वज्ञ भगवंत श्रीराम होत!

||श्रीनाम समर्थ||


1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete