Wednesday, August 19, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६८ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६८ –

आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत.त्याच्या ‘नामाने’ त्याला जवळ जवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल, तितका भगवंत जवळ येईल. भगवंताच्या नामातच संतसंगति आहे.

श्रीराम!
दृश्य हा अदृश्य ईश्वराचाच विलास असला तरी देखील दृश्य हे नश्वर आहे, दृश्याला क्षयाची बाधा जडलेली आहे. त्यामुळे जोवर दृश्याचा संपूर्ण निरास होत नाही, तोवर अदृश्य ईश्वराचा साक्षात्कार संभवत नाही. म्हणूनच आजच्या वचनात श्रीमहाराज म्हणताहेत, ‘आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला आहोत.’ आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आम्ही केवळ देहविचार करत असू, तर देव-विचार संभवत नाही. सकाळी उठल्यावर प्रप्रथम देहाला चहा मागणारे आम्ही दिवसभर या देह आणि मनाला अग्रभागी ठेवूनच आमची दिनचर्या आखतो. अगदी साधन करताना देखील ‘मी’ सुटणे महा कर्मकठीण आहे याचा अनुभव खऱ्या साधकांना येतो. ‘माझे नामस्मरण’, ‘माझे सद्गुरू’, ‘माझ्या साधनातल्या पायऱ्या’, ‘मला साक्षात्कार व्हावा’, ‘माझे भगवंत प्रेम’ यासारख्या मनात उमटणाऱ्या वाक्यांवरून हे स्पष्ट होते की आम्ही परमार्थ देखील दृश्याच्या आणि अहंकाराच्या तराजूवर तोलतो. आणि त्यामुळेच देहाची आणि देवाची दोन ध्रुवांवर असलेली टोके कधी जुळतच नाहीत व समाधान मिळत नाही.

परमार्थ करायचा आहे, भगवंत आपलासा करायचा आहे पण आम्ही आमच्या दैनंदिनी मध्ये, मनामध्ये काहीही बदल करणार नाही या मनोवृत्तीला परमार्थातील disparity म्हणतात. अशी ही विरोधात्मक समजूत होण्याचे मुख्य कारण म्हणजे आम्हाला परमार्थ हा बहुतांशी बाहेरच्या कर्मकांडासारखा वाटतो आणि त्यामुळे परमार्थ म्हणजे आम्हाला काहीतरी विशिष्ट क्रिया करायची आहे अशी आमची भावना होते. परंतु, श्रीमहाराज म्हणतात, ‘परमार्थ हा संपूर्णपणे आतला आहे. बाहेरच्या परमार्थाची किंमत किती? तर आतला परमार्थ वाढीस लागेल, त्याला पोषक होईल, तेवढीच बाह्य परमार्थाची किंमत होय.’ आणि म्हणूनच ते म्हणतात, ‘प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणे म्हणजे परमार्थ.’

आता प्रवाह किती तीव्र आहे यावरून विरुद्ध दिशेला पोहणे अवघड की सोपे हे ठरते आणि आजच्या जबरदस्त बाह्याकर्षणाच्या जगात प्रवाह किती तीव्र आहे याची जाणीव प्रत्येक साधकाला दर दिवशी होते यात शंका नाही. सबंध जग एका तीव्र प्रवाहाच्या भोवऱ्यात अडकून गरगर फिरते आहे. त्याचा जोर इतका विलक्षण आहे की मी मी म्हणणाऱ्या साधकाचा तो कधी बळी घेईल सांगता येत नाही. अशा प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचे म्हणजे त्यातून आम्हाला ओढून काढणारे साधन तितकेच मजबूत हवे आणि त्याच साधनाला सद्गुरू ‘नाम’ असे म्हणतात! जर ‘कालाय तस्मै नमः’ असा पळपुटेपणा करायचा नसेल, तर केवळ या नामाला घट्ट धरलेला साधकच तरून जाऊ शकतो. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज म्हणतातच,
“सदा सर्वकाळ मनी वसे देव| तेथे नाही भेव कळिकाळाचा||
काळ तो पुढारी जोडितसे हात| मुखी नाम गात तयापुढे||”
-- ज्याच्या मनात सदैव भगवंताचा वास आहे, केवळ त्यालाच कळिकाळाचे भय नाही. तो काळच अशा भक्तापुढे हात जोडून उभा असतो आणि त्याच्या समोर हा मुखाने नाम गात असतो!

त्यामुळे आज श्रीमहाराज सांगतात, नामाने त्या भगवंताला जवळ जवळ आणावे. असे वर्णन आहे की, ब्रह्मदेवाने सर्व वेदांचे तीन वेळा मंथन केले आणि त्यातून जे सार निघाले तीच भगवंताची भक्ति आणि ती भक्ति साधण्याचे साधन, नाम! मग नाम तर आम्ही स्मरत आहोत, तरीही भगवंत आम्हाला का भेटत नाही याचे उत्तर देखील श्रीमहाराज आम्हाला आज देत आहेत. भगवंत जवळ जवळ येत आहे याची खूण कोणती? तर प्रपंचाच्या गदारोळात देखील नामाचे यत्किंचितही विस्मरण न होणे व त्याच्या स्मरणात संसार फिका वाटू लागणे. संसार करत असतानाच त्यातली आसक्ति कमी कमी होत जाणे. आणि हे होण्यासाठी आजच्या वचनात जे साधन श्रीमहाराज आम्हाला सांगताहेत, ते म्हणजे, देहाचे विस्मरण. एखाद्या गोष्टीचे विस्मरण केव्हा होते? १) जेव्हा त्या गोष्टीचे महत्त्व मनातून कमी होते तेव्हा व २) त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट मनामध्ये रुजते तेव्हा. दोन्हीपैकी कोणत्याही मार्गाने गेलो तरी आपण देवापाशी पोहोचू. देहाचे नश्वरत्व लक्षात यायला हवे किंवा नामाचे महत्त्व मनात ठसायला हवे. खरे बघू जाता, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु, नामात महत्त्वबुद्धी होण्याचा मार्ग हा संतांनी नावाजलेला, अनुभवलेला राजमार्ग आहे.

पण साधकावस्थेत दोनही बाजूंनी मनावर घाला घालणे आवश्यक असते असे सर्व संत सांगतात. म्हणजेच मुख्य नाम साधन सुरु असतानाच आमचा आचार, विचार, आहार याकडे देखील साधकाने लक्ष पुरवणे आवश्यक आहे. काहीही कधीही कितीही खाऊ आणि मग नाम घेऊ म्हणेल त्याचे साधन कधीही स्थिरावणार नाही असा सर्व संतांचा अनुभव आहे. सद्ग्रंथ वाचन – संत-श्रवण हे करत असतानाच आम्ही विविध प्रकारच्या मनोरंजनात देखील मन रमवू म्हणेल त्याचे मन साधनेसाठी परिशुद्ध होणे शक्यच नाही. आम्ही जगातल्या सर्व प्रकारच्या लौकिक (जरूर नसलेल्या) कार्यक्रमात भाग घेऊच आणि तरीही नाम जपू म्हणणाऱ्याच्या मनात नामाचे काहूर न माजता ज्या भेटीगाठी झाल्या त्याचेच काहूर माजणार हे निश्चित! त्यामुळे “जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्येही सांभाळावी’ हेच खरे. पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, “तुम्हाला परमार्थ करायचा आहे ना, मग हे केले पाहिजे, त्याशिवाय जमणार नाही.” कोणताही प्रकारचे false justification हेच आम्हाला परमार्थ मार्गावर तोंडघशी पाडते. त्यामुळे ज्या ज्या गोष्टींद्वारे आमच्या ‘मी देहच आहे’ या भ्रमित अवस्थेला खतपाणी मिळते ते शक्य तितके टाळणे हे नाम साधनेसोबत आवश्यक आहे असे श्रीमहाराज सांगताहेत. म्हणजे मग आमचे बाहेर धावणारे मन गोळा होऊन आतमध्ये रमेल. जितके आम्ही आतमध्ये रमू, तितकी तितकी देहाची सुखबुद्धी कमी कमी होईल आणि जितकी देहबुद्धी कमी होईल, तितके तितके आम्ही भगवंताच्या सन्निध जात आहोत या अनुभूतीप्रत साधक जाईल. हे जितके होईल, तितका आणि त्या प्रतीचा अनुभव साधकाला येईल की, नामातच संत संगती आहे. कुठे राहतात सर्व संत? कुठे राहतात संतांचे अग्रणी हनुमंत? केवळ भगवंताच्या नामात त्यांची वस्ती आहे. बाहेरून संत संग मिळणे उत्तमच यात शंका नाही पण बाहेरच्या संत संगाचे फलित हेच की ज्यात ते संत रमले त्यात आम्ही रमून त्यांच्याशी तादात्म्य पावणे आणि हे ज्याला साधले त्याला नामातच संत दर्शन आणि भगवंत दर्शन एकत्वाने होईल यात शंका नाही!

||श्रीनाम समर्थ||

3 comments:

  1. सद्गुरूंच्या सत्तेने वरील चिंतन आचरणात आणण्याचा यत्न कसून करीन,आज ना उद्या रामराया यश देईल ही खात्री आहे! 🙏🙏🌿📿🌿🙏🙏

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete