Saturday, August 22, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७० --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७० –

सूर्य हा फक्त प्रकाश देतो, पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसे, नाम हे भगवंताचे प्रेम वाढवते, मग आपले दोष अपोआपच नाहीसे होतात.

श्रीराम!
‘अमृत’ चुकून जिभेवर पडले काय किंवा मुद्दाम घेतले काय, परिणाम अमरत्व आहे.

‘विष’ चुकून पोटात गेले काय किंवा कुणी घातले काय, परिणाम मृत्यू आहे.

‘पारस’ चुकून लोखंडाला लागला काय किंवा मुद्दाम लावला काय, लोखंडाचे सोने बनणारच.

‘संत’भेट सहजच झाली काय किंवा जगभर शोधल्यावर अथक परिश्रमाने झाली काय, परिणाम शांति आहे.

तद्वत, श्रीमहाराज सांगताहेत, प्रकाश देणे हा सूर्याचा धर्मच आहे. अंधार नाहीसा करायचा म्हणून तो प्रकाश देतो असे नव्हे; त्याला प्रकाशाशिवाय दुसरे काही माहीतच नाही; किंबहुना सूर्य अंधार जाणतच नाही. त्याचा उदय झाला की प्रकाश होणारच. तसे नामाला भगवंताच्या प्रेमाशिवाय काही माहित नाही. नाम आणि भगवंत प्रेम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. श्रीमहाराज म्हणायचे, “सगुणाला जुळे झाले – एक नाम आणि दुसरे प्रेम”; इतका त्यांच्यात अभेद आहे. तरीही जसे जुळ्यातले एक जरासे मोठे असते तसे, नाम हा जुळ्यातला मोठा भाऊ आहे आणि तो आला (मुखात नाम आले) की मागाहून प्रेम येणारच!

कालच्या चिंतनात जे आपण बघितले तोच मुद्दा वेगळ्या भूमिकेवरून आज पुन्हा महाराज आम्हाला सांगत आहेत की, तुम्हाला दोष बघत बसण्याची जरूर काय? अमृत ज्याला मिळणार आहे हे निश्चित आहे, त्याने ‘मी मर्त्य आहे’ असा जप करण्याचे कारणच काय? अमृत मिळाले म्हणजे झाले.

प्रेम कशाने वाढते? या प्रश्नावर कुणीही सहज सांगेल की सहवासाने प्रेम वाढते. नामाने काय होते? तर श्रीमहाराजांच्या अस्तित्वाची – सहवासाची जाणीव वाढीस लागते आणि त्यामुळे साधकाला सहजच प्रेम वाटू लागते, कारण नाम हे त्यांचे कायमचे वसतीस्थान आहे. श्रीमहाराज स्वतःच म्हणतात, “ज्याच्या मुखात नाम आहे, त्याच्या मागेपुढे मी घोटाळतो!” हीच त्यांच्या अस्तित्वाची खूण आहे. आणि काय आहे त्यांच्या सहवासात? फक्त प्रेम आणि शांति! तिथे दोषांचे आणि विकारांचे स्थानच नाही, म्हणून ते म्हणताहेत, नामाने आपले दोष आपोआपच नाहीसे होतात. त्यासाठी वेगळे पुरुषप्रयत्न करावे लागत नाहीत. कारण कसे आहे की प्रयत्न आणि प्रेम यांच्यात एक प्रकारचा विरोध आहे. जिथे प्रेम आहे तिथे सपशेल शरणागती असलीच पाहिजे. तिथे श्रीमहाराजांमुळे मला प्रापंचिक अथवा पारमार्थिक आयुष्यात देखील काय मिळणार आहे हा प्रश्नच लोप पावतो, त्यामुळे मग प्रयत्न कसले करणार? याचाच अर्थ –
नाम घ्यावे – प्रेम अनुभवावे – शरणागती साधावी – सहज निजानंदासाठी नामात रहावे... असा सरळ क्रम आहे. यामध्ये कुठेच ‘मी’ चे स्थान नाही आणि म्हणूनच असे नाम आणि प्रेम साधकाला सहजगत्या स्वरूपबोधाकडे घेऊन जाते. जीवाचा मूळ दोष हा आहे की तो स्वतःला हा देह समजला आणि दोष निवृत्ती म्हणजे या देहाभिमानाची निवृत्ती आहे. या निवृत्तीला प्रेमाशिवाय उपायच नाही. इथे आमचा मार्ग कोणता आहे हा देखील प्रश्न नाही. ज्ञान मार्ग असो, योग मार्ग असो किंवा भक्ति मार्ग असो, आमच्या मार्गाबद्दल प्रेम नसल्याशिवाय आम्ही गुरुचरणी शरणागत होणेच शक्य नाही. त्यामुळे भक्तिमार्गाशिवाय इतर मार्गींना प्रेम आणि शरणागती आवश्यक नाही असे मुळीच नाही. पण भक्तिमार्गी नाम साधकांना मात्र प्रेम हाचि पाया आणि प्रेम हाचि कळस अशी गोड स्थिती आहे.

या स्थितीप्रत जाण्यासाठी नामाचा राजमार्ग संतांनी यासाठीच सांगितला, की नामाने अनायासेच दोष निर्मूलन होते. जसे आपण बघितले, मूळ दोष आहे, खोट्या मी ला खरे समजण्याचा आणि त्यातूनच इतर सर्व दोष उदय होतात. हा खोटेपणा नामाने जातो म्हणतात संत. संतश्रेष्ठ नामदेव महाराज तर म्हणतात,
“असत्याचे मळ बैसले वाचे| ते न फिरती साचे तीर्थोदळे||
हरिनामामृत प्रक्षाळी जिव्हेने| पाणिये बहुत काय करीती||
गंगासागरादि तीर्थे कोडीवरी| हरिनामाची सरी न पावती||
हरिनामगंगे सुस्नात पै झाला| नाम्याजवळी आला केशिराजा||”
-- आपल्या जिभेवर खोटेपणाची जी पुटे चढली आहेत, जो मळ बसला आहे, तो तीर्थयात्रेने जात नाही. केवळ हरिनामाने जिव्हेचे प्रक्षालन केले म्हणजे ते पाप जाते, पाण्याचेही तिथे काही चालत नाही. गंगासागरादि तीर्थे आहेत खरी; पण त्यांना हरिनामाची सर नाही. नामदेव हरिनामाच्या गंगेत सुस्नात झाले आणि म्हणून तो केशीराज श्रीहरी त्यांच्या सन्निध आला!

हे होण्यासाठी केवळ नामात आमची मनबुद्धि एकवटणे जरूर आहे. हे एकवटण्यासाठी आमचे संकल्पविकल्प शक्य तितके कमी होणे व ती संकल्प बुद्धी केवळ नामाशी निगडीत होणे जरूर आहे. हे होण्यासाठी सद्गुरू प्रार्थनाच उपयोगी पडते असा सर्वसामान्य अनुभव आहे. संकल्पांचे मूळ आहे स्वार्थ आणि स्वार्थातच आमचा मूळ दोष लपलेला आहे. प्रापंचिक स्वार्थाचे तर स्थान नाहीच; पण पारमार्थिक देखील, मला शांति हवी, मला समाधान हवे यासारखे शब्द ‘मला’ ला लागूनच असतात. संत विचारतात, तुम्ही भगवंताला – सद्गुरूंना काय दिलेत म्हणून तुम्ही या गोष्टींची अपेक्षा करत आहात? अपेक्षाविरहित होणे म्हणजेच पारमार्थिक स्वर्थाच्याही पलीकडे जाणे आहे. सद्गुरूंनी दिलेले साधन कोणताही संकल्प विकल्प ना बाळगता जो त्यांना दत्तक गेला त्यालाच नकळत आनंद – प्रेमाचा अनुभव सद्गुरू देतात. किंबहुना तो अनुभव सांगायला तो उरतच नाही, तो अनुभवरूपच होतो आणि यालाच संपूर्ण दुःख-दोष-निवृत्ती आणि अखंड आनंद-प्राप्ती म्हटले आहे. हे होण्यासाठी नीतीचे शक्य तितके पालन करून जो आयुष्य नामाप्रती समर्पित करू शकेल तोच त्या अनिर्वचनीय गुरुप्रेमाचा अधिकारी बनेल. श्रीमहाराज म्हणतातच,
“हृदयी करता भगवंताचे ध्यान|
नामाविण उच्चार दुजा न जाण||
असा नेम ज्याच्यापाशी|
राम तेथिल रहिवासी||”

||श्रीनाम समर्थ||

2 comments:

  1. गोड गोड चिंतन. थेट गंतव्य स्थानाकडे निर्देश करणारं चिंतन! श्रीराम समर्थ!!! 🙏🌿🙏

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete