Monday, August 17, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ६७ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ६७ –

भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते पूर्ण आहे.

श्रीराम!
अपूर्णपणाचे लक्षण काय? माझ्यात किंवा माझ्याकडे जे काही आहे त्यात काहीतरी कमी आहे असे वाटणे म्हणजे अपूर्णपण. हे मायेचे लक्षण आहे. माणसाची बाहेरच्या बाजूला जी काही धाव आहे त्यामागे हे कारण आहे. प्रत्येक इंद्रियाचा आहार हा बाहेरचा आहे व तो मिळाला तरच ते इंद्रिय तृप्त होईल हा भ्रम या जगाच्या व्यापाला कारणीभूत आहे. या जगाच्या व्यवहारात त्याचे स्थान आहेच. आज ज्या काही विविध गोष्टींचे शोध लागून आमचे जीवन सुसह्य झालेले आहे त्याचा उगम या अपूर्णपणातच आहे. जर मनुष्याला कोणत्याही गोष्टीची जरूर भासलीच नसती तर मग काही शोधण्याचे कष्ट कुणी घेतलेच नसते. व्यवहार दृष्ट्या त्यामुळे आम्हाला वेळ आणि शक्ती वाचवण्यासाठी बऱ्यापैकी फायदा झालेला आहे हे देखील आपण नाकारू शकत नाही. मात्र जशी कोणत्याही गोष्टीला दुसरी बाजू असते तशी या अपूर्णपणातून आलेल्या विविध गोष्टींच्या कामनेला दुसरी बाजू अशी आहे की, कितीही वस्तु - व्यक्ती - ऐश्वर्य लाभले तरी देखील त्या गोष्टीही अपूर्णच असल्यामुळे मनुष्याला समाधान लाभत नाही. आमच्यापैकी प्रत्येकाचा हा अनुभव आहे की, सर्व आहे पण तरी देखील काहीतरी कमी आहे. ते कमी काय आहे हे न कळल्यामुळे अजून काही गोष्टी गोळा करण्याच्या मागे आम्ही लागतो आणि पुन्हा त्याच जाळ्यात गुरफटतो.

या दुष्टचक्राची जाणीव सद्गुरूंपाशी आल्यानंतर होते.
“भूमि जीव संकुल रहे गए सरद रितु पाइ|
सदगुर मिले जाहि जिमि संसय भ्रम सामुदाइ||”
--वर्षाऋतूमुळे पृथ्वीवर जे अनेक जीवजंतू भरलेले असतात, ते जीव शरद ऋतू आल्यावर नष्ट होतात. त्याप्रमाणे, सद्गुरू लाभल्यावर संशय व भ्रम यांचे समूह नष्ट होतात.
गुरु सांगतात, तुला जे हवे आहे ते बाहेर कुठे मिळणार नाही, ते तुझ्या आतच आहे आणि ते एकदा मिळवलेस की अजून काही मिळवावेसे तुला वाटणार नाही. आणि ते कसे मिळवायचे याचा मार्ग मी तुला सांगतो. असे सांगून सद्गुरू आम्हाला नाम देतात आणि सांगतात, तुझ्या कर्मबंधनातून सुटण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि त्यामुळेच तू नामधारक बनलेला आहेस. मात्र त्याचे महत्त्व जाणून नीतीच्या मार्गाने चालून तू साधनात रहा. जे दिलेले साधन आहे ते कसे आहे? ते महाराज आजच्या वचनात सांगत आहेत की, नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते पूर्ण आहे.

वेदांताच्या भाषेत एक सहज सोपा सिद्धांत आहे. त्या सिद्धांतानुसार कोणतीही गोष्ट जी कशावरही अवलंबून आहे ती मिथ्या आहे – Everything that depends upon something is a fallacy. म्हणजेच वर बघितलेल्या सर्व गोष्टी ज्या अपूर्ण आहेत त्या कशामुळे अपूर्ण आहेत? तर त्या स्वतंत्र नाहीत, कशावर तरी अवलंबून आहेत त्यामुळे! जेव्हा मनुष्य एखादी गोष्ट करतो – कोणतेही कर्म करतो, तेव्हा त्या कर्माच्या बदल्यात कोणत्यातरी फळाची – result ची अपेक्षा ठेवूनच ते कर्म केले जाते. मात्र सद्गुरूंनी दिलेले नाम हे सर्वतोपरी स्वतंत्र असे साधन आहे. ते कशावरही अवलंबून नाही. ते पूर्णपणे उपाधिरहित असे साधन आहे. नाम घेण्याला स्थळ, काळ, निमित्त, परिस्थती, धर्म, जात, लिंग, वय कशाचेच बंधन नाही.

नाम आणि नामी यांमध्ये भेद नाही असे जे सत्तत्त्व सांगितले जाते, त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या सगुण अवतारातील सर्व गुण त्यांच्या नामामध्ये देखील विराजमान आहेत. प्रभूंचा सर्वोच्च सहज गुण म्हणजे, “अकारण करुणा”. या करुणेपोटी ते कोणत्याही भावाने – अगदी नकारात्मक भावाने – त्यांच्याकडे वळलेल्यास उत्तम गति देतात. वाली, रावण, पूतना, कंस, शिशुपाल... किती किती उदाहरणे द्यावीत? असे जर आहे, तर मग जो मनापासून त्यांच्यावरच्या भक्तीने नाम स्मरतो, त्याला समाधानाची प्राप्ती सहजीच होणार नाही का? तुलसीदास म्हणतात,
राम राम कहि जे जमुहाहीं|
तिन्हहि न पाप पुंज समुहाहीं||
-- जे लोक जांभई देताना राम-राम म्हणतात, म्हणजेच आळसामध्ये का होईना, ज्यांच्या मुखातून रामनाम येते, त्यांच्यासमोर पापाचे समूह फिरकत नाहीत.
या एकाच गुणामधून राम नामाची अकारण करुणा दिसून येते. समदर्शी प्रभूंचे समदर्शी नाम!

अपूर्ण वस्तूमध्ये आणि पूर्ण वस्तूमध्ये फरक हा, की जी वस्तु अपूर्ण असते, ती मिळाल्यावर अपूर्ण जीव पूर्ण होऊ शकत नाही. मात्र पूर्ण वस्तु – नाम – मिळाल्यावर मात्र अपूर्ण जीव हळूहळू त्या पूर्णतेचे गुण साधतो आणि म्हणूनच तो देखील अपेक्षारहित नामासारखाच निष्काम होतो! हीच नामाची विशेषता होय!

असे जर आहे, तर मग इतर सर्व आधारांचा, आश्रयांचा, साधनांचा त्याग करून केवळ नामाचा अखंड निदिध्यास लागलेल्या साधकाबद्दल काय सांगावे? रघुनाथ म्हणतातच,
“समदरसी मोहि कह सब कोऊ|
सेवक प्रिय अनन्यगति सोऊ||”
-- सर्वजण मला समदर्शी म्हणतात. मला कोणी प्रिय किंवा अप्रिय नाही. परंतु, मला भक्त फार आवडतो, कारण त्याला माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा आधार नसतो!

असा ज्याने सर्वतोपरी नामाचाच आधार घेतला तो देखील मोबदला रहित नामासारखा पूर्णकाम बनतो!

||श्रीनाम समर्थ||


3 comments:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete
  2. श्रीराम! कित्ती महत्वपूर्ण चिंतन! नाम नामधारकाला पूर्णकाम बनवते. 👌👌👌👌

    ReplyDelete
  3. 🙏।। श्रीराम जय राम जय जय राम ।।🙏

    ReplyDelete