Monday, August 31, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७२ --

श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७२ –

‘परिस्थिती चांगली आली तर नाम घेईन’ असे म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नाही.

श्रीराम!
आम्ही श्वास न घेतल्याने गुदमरायला लागलो तरच श्वास घेऊ असे म्हणतो का?
आम्ही भुकेने कासावीस होईपर्यंत खायचे राहतो का?
आम्ही घरात धान्याचा एक दाणा देखील न उरेपर्यंत धान्य भरायचे टाळतो का?
जर आपली मुले वाईट मार्गाला लागली तर ती आपोआप सुधारेपर्यंत हातावर हात धरून बसतो का?
अशी किती उदाहरणे देता येतील जिथे आम्ही कोणत्याही स्थळ काळ परिस्थितीचा जास्त विचार न करता जे करणे उचित आहे ते कर्म करतो. मग जिथे या मनुष्य जन्माच्या इतिकर्तव्याचा प्रश्न आहे, तिथे तुम्ही गाफील कसे काय राहू शकता असे श्रीमहाराजांसारखे संत आम्हाला विचारतात. परंतु सत्यत्वाची कल्पनाच उलट झाल्यामुळे या जगातल्या गोष्टींसाठी आम्ही सर्वस्व पणाला लावून कर्म करण्याचा प्रयत्न करतो, मात्र अध्यात्मिक आयुष्याबद्दल अजूनही मनात स्पष्टता नसल्या कारणाने नामाच्या बाबतीत आमची संकल्पशक्ती दृढता धारण करत नाही. किंवा, श्वासासारखे सहज खरे तर केवळ नाम आहे ही संकल्पना आम्हाला फक्त बुद्धीला संतांनी सांगितलेली म्हणून माहित असल्या कारणाने त्या अनुभूतीला वंचित झालेले आमचे मन बुद्धीचे वर्चस्व झुगारून देते व मनमानी करते.

आजच्या वचनात हाच मनबुद्धीचा गाफीलपणा श्रीमहाराज आम्हाला सांगत आहेत. जोवर आम्ही या देहाला ‘मी’ मानत आहोत, तोवर नामाच्या सत्तेचा सांगोपांग अनुभव आम्हाला येणे शक्य नाही. पण हा अनुभव येणे किंवा या अनुभवात स्थित होणे हे नामाला सर्वस्व मानल्याशिवाय संभवत नाही असे श्रीमहाराज आम्हाला सांगतात.

मुळात नामाचे अस्तित्व कोणत्याही परिस्थितीने बांधण्याजोगे नाही. जे सदा सर्वदा आहेच ते नाम! परंतु हे नामाचे सर्वव्यापी, सर्वसाक्षी अस्तित्व अजून आम्हाला न कळल्यामुळे आमची मनस्थिती आज व्यवस्थित नाही, आज घरामध्ये काही शुभ अशुभ प्रसंग घडला, आज आम्ही गर्दीच्या ठिकाणी आहोत, घरामध्ये नामाला – साधनेला अनुकूल वातावरण नाही, अशी एक ना अनेक परिस्थितीशी निगडीत कारणे नाम साधन न होण्याला आम्ही देत असतो याची जाणीव संतांना असते. म्हणूनच समर्थ म्हणाले,
“आधी आवदसा मग दसा| अथवा दसेउपरी आवदसा|
प्रसंग असो भलतैसा| परंतु नाम सोडू नये||”
हे सांगण्याचे मुख्य कारण पुन्हा हेच की भगवत्प्राप्तीच्या नाम साधनेचे मुख्य वैशिष्ट्यच हे आहे की ते सर्वतोपरी ‘मनाने’ करावयाचे साधन आहे. आपल्या देहाला प्रारब्धानुसार परिस्थितीचे बंधन निश्चित असू शकते. मात्र मनाला बंधन केवळ मनाच्याच क्षुद्र विचारांचे असू शकते. हे मनाचे मनावरचे बंधन मनानेच काढून टाकणे याचे नाव साधना! त्यामुळे आजच्या वचनात श्रीमहाराज सावध करीत आहेत की जर आम्ही परिस्थितीचे कारण सांगत राहिलो तर आमच्याकडून साधन घडणे संभवतच नाही. कारण लौकिक जगाला कोणत्या ना कोणत्या परिस्थितीचा शाप हा असणारच. इथे तथाकथित सुखोपभोग देखील साधन दृष्ट्या शापच आहे हे ज्याला उमजले त्यालाच खऱ्या अर्थाने साधनाची तळमळ लागते. हे लक्षात घेऊन ज्याने परिस्थितीचे बंधन झुगारून आपल्या मनाला तयार केले – करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामागे सद्गुरू कृपा सदैव विलसत राहते हा साधकांचा अनुभव आहे.

इथे अजून एका आपल्या मनाच्या विरोधाभासाबद्दल श्रीमहाराज आम्हाला सावध करीत आहेत. अध्यात्म साधन हे पूर्णपणे अंतरंगातले आहे, बाह्य गोष्टींशी त्याचा संबंध नाही हे आम्हाला माहित आहे; पण जेव्हा आम्ही परिस्थितीचे कारण देतो, तेव्हा साहजिकच साधन देखील बहिर्मुख आहे या चुकीच्या भावात स्थित होतो. जेव्हा हा अंतरंग – बहिरंगातला विरोधाभास तीव्र होतो, तेव्हा अत्यंत हानिकारक जर कोणती गोष्ट होत असेल तर ती म्हणजे आम्ही परमार्थाला प्रपंच बनवतो आणि श्रीमहाराज व संत आम्हाला प्रपंचाला परमार्थ बनवायला सांगतात. परिस्थितीशी आमचे साधन निगडीत झाल्यामुळे याच्या बरोबर उलट गोष्ट घडते आणि आम्ही तथाकथित बाह्यांगालाच सत्य समजून आत्मवंचना करून घेतो.

इथे एक गोष्ट समजून घेणे अत्यावश्यक आहे, जी आम्हाला समजावून सांगण्यासाठी यासारखी वचने श्रीमहाराज आम्हाला देतात. ती म्हणजे, नाम हेच ते अंतिम सत्य आहे, ज्याच्या अनुभूतीने संपूर्ण दुःख निवृत्ती व अखंड आनंद प्राप्ती साधते. तेच अनादि सत् तत्त्व नामरूपाने आम्हाला सदगुरूंकडून मिळालेले आहे. या तत्त्वाचे वैशिष्ट्य काय? ज्या तत्त्वात स्थळ, काळ, निमित्त (परिस्थिती) यांमुळे कसलीही वाढ अथवा घट होत नाही, जे अनिर्वचनीय प्रेमस्वरूप नाम शाश्वत दिव्य तत्त्व आहे, ज्याच्या पार्श्वभूमीवर हा विश्वाचा दृश्य विलास पडद्यावरच्या चित्रपटाप्रमाणे आम्हाला दिसतो आहे, त्यालाच “नामतत्त्व” म्हणतात. जेव्हा आम्ही आमचे नाम स्थळ-काळ-निमित्ताच्या परिघात बसवतो, तेव्हा आम्ही नसलेली उपाधि त्या शाश्वत तत्त्वाला लावून आमचीच दिशाभूल करतो व जे आत्मस्वरूपाचे स्टेशन गाठायचे ते कधी गाठता येत नाही. श्रीमहाराजांचे वचन नेहमीच ‘घागर में सागर’ या पद्धतीचे असते. त्याचा आवाका हा प्रचंड मोठा असतो. त्या वचनामागचा त्यांचा हेतू हा साधन आणि साध्य या दोन्हीला व्यापणारा असा असतो. त्याचे सम्यक आकलन आम्हाला निश्चितच आमच्या साधनेशी एकनिष्ठ ठेवते व छोट्या छोट्या वचनांमधून आम्हाला सतत त्या शाश्वत तत्त्वाच्या - नामाच्या निकट नेण्याच्या आमच्या कृपासिंधु सद्गुरूंच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांच्या चरणी वारंवार नतमस्तक करते!

त्यांचे म्हणणे एकच, नाम हे एकच तत्त्व आहे... दूजा तत्त्व न होई! तुम्ही त्याला माना अगर नका मानू ते आहेच. परंतु जर मानून त्याच्यातच तुम्ही एकरूप झालात तर ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं’ च्या चक्रातून सुटून मुक्त व्हाल... म्हणून सगळी त्यांची धडपड!

||श्रीनाम समर्थ||




1 comment:

  1. शब्दातीत नाममहिमा, शब्दातीत चिंतन!!! 🙏📿🙏

    ReplyDelete