Saturday, August 29, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ७१ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ७१ –

खेड्यातले लोक वयात आल्याबरोबर आपले लग्न करून टाकतात. ते गरीब असले तरी ‘उद्याचे उद्या बघू’ असे म्हणतात; पण शहरातले विद्वान लोक मात्र लवकर लग्न करीत नाहीत. तसे, साधारण आणि अडाणी लोक नाम घ्यायला सांगितले की नाम घेतात, परंतु विद्वान लोक मात्र ‘नामाचे प्रेम असेल तरच नाम घेईन’ असे म्हणतात.

श्रीराम!
भक्तिमार्गी संतांना नेहमीच सरळसोट स्वभावाची साधी भोळी माणसे जास्त आवडतात. याचा अर्थ ते समदर्शी नसतात का? तर तसे नव्हे. त्यांना देखील आवडते नावडते असते का? तर तसेही नव्हे. परंतु जिथे अध्यात्म शास्त्र – भगवत् शास्त्राची बात येते, तिथे मात्र ते spade is spade असे सांगणारे असतात. किंबहुना असे स्पष्टपणे सांगणे व समाजाला योग्य मार्गाकडे वळवणे यासाठीच तर आपला अखंड आत्मानंद सोडून ते आमच्यासारख्या प्रापंचिक माणसांमध्ये पडतात. तद्वत श्रीमहाराजांनी प्रत्येक वचनातून आम्हाला सावध करण्याचा जणू चंग बांधला आहे म्हटले तर वावगे ठरू नये. आजच्या वचनात ते एक अगदी साधे दिसणारे असे उदाहरण देऊन आम्हाला पुन्हा नामाचेच महत्त्व पटवून देत आहेत.

“खेड्यातले लोक वयात आल्याबरोबर आपले लग्न करून टाकतात. ते गरीब असले तरी ‘उद्याचे उद्या बघू’ असे म्हणतात; पण शहरातले विद्वान लोक मात्र लवकर लग्न करीत नाहीत” – साधी माणसे आपले जीवन कसे साधेपणाने, जास्त विचार न करता जगतात हे इथे महाराजांनी सांगितले आहे. वचनाचा दुसरा भाग अर्थातच जास्त महत्त्वाचा आहे; परंतु या भागात देखील ‘विनाकारण विचार’ करण्याच्या आमच्या वृत्तीवर ताशेरे आहेत. श्रीमहाराज आणि सर्व संतांचे असे म्हणणे आहे की आमचे सर्व दुःख आम्ही ‘वर्तमानकाळात न जगल्याने आहे.’ आम्हाला एक तर भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी त्रस्त करतात किंवा भविष्यकाळ चिंतित करतो. त्यामुळे दोन गोष्टींना आम्ही मुकतो – १) वर्तमानात आम्ही निर्णय क्षमता गमावतो आणि २) वर्तमानातला आनंद गमावतो. जसे इथे महाराज म्हणतात, साधी भोळी माणसे फार विचार न करता आलेल्या परिस्थितीचा वर्तमानात विचार करतात आणि त्यामुळे बहुतेकदा त्यांचे आयुष्य फार कटकटीशिवाय बरे जाते. परंतु तथाकथित विद्वान लोक आपल्या बुद्धीवर जास्तच अवलंबून राहतात व कोणत्याही परिस्थिती अती विचार करून लवकर घेण्याच्या निर्णयाला उशीर लावतात व त्यामुळे आयुष्यातल्या लौकिक गोष्टीतच जास्त अडकून पडतात. ही गोष्ट सांगण्याचा महाराजांचा मुख्य हेतू हा, की आम्ही उगीच लौकिक कर्म, त्याचे कारण आणि त्याचा परिणाम यांमध्येच जास्त बुद्धी लावतो व जे खरे सत्कर्म – भगवत कर्म – नामस्मरण – साधना – यांसाठी आम्हाला उशीर होत जातो.

स्वामी माधवनाथ (स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य) म्हणायचे, साधकाने जे काही काम आहे ते लवकर संपवावे. बँकेत पैसे ठेवायचे आहेत ना, जा ठेवून या, आता पुन्हा त्याचा विचार नको. जितका अधिक वेळ आम्ही या विचारांमध्ये घालवू तितका आम्हाला साधनेसाठी वेळ कमी मिळतो आणि मग आम्ही बाकी सर्व करतो पण साधन म्हातारपणासाठी पुढे ढकलतो. हे किती भयंकर आहे याची कल्पना संतांना असते म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आम्हाला समजावतात, “नको नको मना गुंतू मायाजाळी| काळ आला जवळी ग्रासावया||”
नामदेव महाराज सांगतात,
“जळी बुडबुडे देखता देखता| क्षण न लागता दिसेनाती||
तैसा हा संसार पाहता पाहता| अंतकाळी हाता काई नाही||
गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर| तैसा हा संसार दिसे खरा||
नामा म्हणे तेथे काही नसे बरे| क्षणाचे हे खरे सर्व आहे||”
हे ज्याने लक्षात घेतले तो लौकिक गोष्टीत फार अडकत नाही. पण श्रीमहाराज यापुढे जाऊन आम्हाला अजून एका गोष्टीत सावधान करत आहेत. जसे सर्व जुळून येण्याची वाट पहात अतिशहाणा - अतिविचारी लग्न पुढे पुढे ढकलतो, तसा तोच व्यवहारातला नियम साधनेला लावणारा अतिविचारी विद्वान साधनेत कधी स्थिरावतच नाही असे महाराज सांगत आहेत. उतावीळपणा हा साधनाला अत्यंत हानिकारक आहे. शिर्डी चे साईबाबा नेहमी दोन गोष्टी सांगत – श्रद्धा आणि सबुरी! भक्तिमार्गात श्रद्धेशिवाय चालणारच नाही. जर गुरूंनी नाम दिले आहे व त्या एका नामातच सर्व सार साठवलेले आहे असे सांगितले आहे, तर श्रद्धावानाला संशय येण्याचे कारणच नाही. तो मुकाट्याने नामच जपेल. म्हणून श्रीमहाराज नेहमी म्हणत, मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो, कारण तो जास्त चिकित्सा करत नाही आणि मुकाट्याने दिलेले नाम जपतो व लवकर त्यात स्थिरावतो. अर्धवट विद्वान मात्र त्याची चिकित्सा करतो व गुरूने आधी नामामध्ये प्रेम द्यावे आणि मग मी नाम जपेन असे म्हणतो. हा उतावीळपणा त्याला नडतो, साधनेत सबुरीने घेणाराच यशस्वी होतो.

नामामध्ये प्रेम म्हणजे अक्षरशः ईश्वर दर्शनच होय! ही भक्तिमार्गाची अंतिम अवस्था आहे, केवळ एक स्तर नव्हे. नामाशिवाय या अशा साधकाला जगणेच अशक्य होते. जसे आम्ही अन्नावर जगतो, तसा तो नामावर जगतो. जसे प्रेमाचे मायबाप बंधू भ्रतार सुत मेल्यावर सामान्य जनास दुःख होते, तसे नाम सुटल्यावर त्याला दुःख होते. नामात हा उन्मत्त होतो, नामात मस्ती हीच त्याची अखंडावस्था असते आणि ती असल्याचे भान देखील त्याला नसते. यावरून ही किती पुढची स्थिती आहे याचे आकलन होणे अवघड नाही. आणि ही स्थिती – अवस्था प्राप्त होण्यासाठी आमचे मन बुद्धी चित्त अहंकार यांमध्ये किती परिवर्तन होणे आवश्यक आहे हे देखील कळणे अवघड नाही. श्रीमहाराजांना एकदा एका साधकांनी विचारले, “नामाच्या आनंदाचा अनुभव आम्हाला एकदा द्या तरी.” यावर श्रीमहाराज म्हणाले, “मी द्यायला केव्हाही तयार आहे; पण घेणारा पात्र नसेल तर त्याला ते झेपायचे नाही, वेड लागेल.” त्यामुळे नामाच्या प्रेमाचा अनुभव हा देहबुद्धीच्या पलीकडचा अनुभव आहे व तो घेण्यासाठी पात्र बनणे हे देखील केवळ गुरुप्रदत्त नामात राहिल्यानेच साधु शकेल असे महाराज म्हणतात.

आणि म्हणून ते विचारतात, वैद्याकडून औषध घेताना त्याचा गुण आधी यावा आणि मग मी औषध घेईन असे जसे आपण म्हणत नाही व त्या वैद्यावर विश्वास ठेवून औषध घेतो, तसे नामाचा सर्वोच्च अनुभव आल्यावर मी नाम घेईन म्हणणे वेडेपणाचे आहे. त्यासाठी तुझे खरकटे भांडे आगोदर स्वच्छ व्हायला हवे. परंतु हे देखील ज्याची मनापासून इच्छा आहे त्याच्यासाठी अवघड नाही. मुळात खरकटे हे दृश्यातले असल्याने मायिक आहे व सत्य नाही. त्यामुळे जे सत्य आहे ते नाम ज्याने धरले त्याने खरकट्याचा विचार करण्याचे देखील कारण नाही, फक्त नाम जपावे असे महाराज म्हणतात. यावर संपूर्ण विश्वास ठेवून ज्याने नामाला धरले त्याच्यासाठी कसले आले आहे प्रारब्ध आणि संचित? संत एकनाथ महाराजांनी म्हणूनच स्पष्ट सांगितले,

आवडीने भावे हरिनाम घेसी| तुझी चिंता त्यासी सर्व आहे||
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा| पती लक्षुमीचा जाणतसे||
सकळ जीवांचा करितो सांभाळ| तुज मोकलील ऐसे नाही||
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा| हरिकृपे त्याचा नाश आहे||

||श्रीनाम समर्थ||




3 comments: