Monday, May 25, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ३९ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ३९ –

जगात असे कोणतेही पाप नाही जे नामासमोर राहू शकेल. नामाची सत्ता फार बलवत्तर आहे.

श्रीराम!
उपनिषदे, पुराणे यांमध्ये एक संज्ञा आहे, ‘वस्तुधर्म’. जसे, दाहकता हा अग्नी चा वस्तुधर्म, तसेच पापक्षालन हा भगवन नामाचा वस्तुधर्म आहे. म्हणजे त्याशिवाय वेगळे काही असणे शक्यच नाही त्याला वस्तुधर्म म्हणतात. श्रीमहाराज जे सतत सांगत राहिले, “नाम आणि नामी किंवा भगवंत यात भेद नाही” हेच या नामाने होणाऱ्या पाप क्षालनाचे कारण आहे. अग्नी मध्ये काय पडले याची जाणीव अग्नी ला असते का? जशी कोणतीही वस्तु अग्नीमध्ये भस्मसात होते, त्याप्रमाणे भगवत नामाच्या परिघात जे येईल ते शुद्ध होईलच. भगवंताचे सर्वच्या सर्व गुण एकरुपत्वामुळे नामात जसेच्या तसे आहेत. अकारण करुणाकर भगवंत पाप आणि पुण्याच्या पलिकडे आहेत. अर्जुनाला गीतोपदेश देताना ते म्हणतात, “निस्त्रैगुण्यो भवार्जुन”... पाप आणि पुण्य दोन्हीही त्रिगुणात्मक आहेत. सत्व, रज, तमाच्या आपापल्या हिश्शाचे पाप आणि पुण्य जीवाला भोगावे लागते. पाप आणि पुण्य दोन्हीही बंधनकारकच असल्यामुळे भगवंत अर्जुनाला या दोन्हीच्या पालिकडे ‘निश्चल स्मरणाद्वारे’ जाण्यास सांगतात. याचे कारण नाम हे भगवत् रूप असल्यामुळे ते देखील त्रिगुणांच्या पलीकडे आहे व जो त्याला मनापासून धरतो, तो त्या नामाच्या शक्तीने त्रिगुणात्मिका मायेच्या पलीकडे आज ना उद्या पोहोचतोच.

श्रीमहाराज म्हणजे करुणासिंधु. अनेक लोक त्यांच्याकडे यायचे, आपले पाप कबूल करायचे. अशांना महाराज सांगायचे, “रामरायाच्या चरणांवर कबूल कर की पुन्हा ते पाप करणार नाही आणि करू नकोस. मग झालेल्याची जबाबदारी माझ्याकडे लागली!” हा असतो सद्गुरूचा अधिकार-विशेष आणि दया-विशेष! नाही... या जगात कुठेच आम्हाला अशी व्यक्ती सापडू शकत नाही जी आमच्या दुष्कृत्यांची जबाबदारी घेऊन आम्हाला सन्मार्गावर चालवण्यासाठी आसुसलेली आहे! आजच्या वचनात जे श्रीमहाराज सांगतात की कोणतेही पाप नामासमोर टिकू शकत नाही आणि महाराज म्हणतात, मी जबाबदारी घेतो. यावरून तरी कळते ना की महाराजच प्रत्यक्ष नामस्वरूप आहेत! जर तसे नसते तर इतके छातीठोकपणे कसे सांगू शकले असते? फक्त श्रद्धा हवी!

समर्थ दासबोधात म्हणतातच,

नामे पाषाण तरले| असंख्यात भक्त उद्धरले|
परम पापी तेचि जाले| परम पवित्र||
किती उदाहरणे द्यावीत असे संत विचारतात. अजामिळासारख्या दुराचाऱ्याच्या मुखात केवळ नाम आल्याने त्यांची होणारी दुर्गती रोखली गेली व तो महात्मा बनला. बिभीषण जेव्हा प्रभूंच्या दर्शनाला लंकेतून बाहेर काढले गेल्यावर आले, तेव्हा रामराया म्हणाले,
“सनमुख होइ जीव मोहि जबहि| जन्म कोटी अघ नासहि तबहि||” केवळ प्रभू विमुखता सोडून सन्मुख होण्याची गरज आहे आणि ही सन्मुखता केवळ नामच भगव
त् स्वरूप असल्याने साधून देते.

तुलसीदास सांगतात,
रामनाम की औषधी ‘खरी नियत’ से खाय|
अंग रोग व्यापे नहि महारोग (पाप) मिट जाय||

कसे आहे, वेदांमध्ये तपस्या, ध्यान इत्यादी इतर काही मार्ग देखील पापशमनाचे वर्णन केलेले आहेत. मात्र हातून घडलेल्या अनंत जन्मांच्या पापामुळे चित्ताची जी मलीनता आलेली असते ती मात्र नामाशिवाय शुद्ध होत नाही. वृंदावन चे थोर संत पूज्य श्री हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज म्हणतात, भगवंत चिंतन आणि त्याचे नामस्मरण सोडून इतर चर्चा, वादविवाद, मनोरंजन हे जोवर आवडते तोवर अजून जन्मोजन्म साठलेली चित्ताची मलीनता आहे असे समजून साधकाने अधिकाधिक नामजप करावा. चित्तशुद्धी केवळ नामानेच होते. या जगातल्या नश्वर गोष्टींची आसक्ती किती कमी कमी होते आहे व नामाची गोडी किती वाढते आहे, यावरून साधकाने आपल्या चित्तशुद्धीची प्रत ठरवावी व तदनुसार आपले आचरण सुधारावे!

श्रीमहाराज वचनात ‘नामाची सत्ता’ म्हणतात. हे तोच म्हणू शकतो ज्याने नामाला सार्वभौमत्व दिले!
त्रिभुवनाचा सम्राट आहे भगवंताचे नाम!
त्या नामाची उंची, खोली कळण्यासाठी खरोखर गुरुकृपाच हवी.
भगवंत गीतेत जबरदस्त आश्वासन देतात,
“अपिचेत् सुदुराचारो भजते मां अनन्यभाक् |
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः||”
कितीही दुराचारी मनुष्य असो, जर तो मला अनन्यभावाने शरण येऊन नाम भजन करू लागला, तर त्याला साधुच मानावे, कारण त्याची बुद्धी योग्य ठिकाणी स्थित झालेली आहे.
ही आहे नामाची सत्ता! केवळ तो साधकच काय, श्रीमहाराज पुढे जाऊन म्हणतात, त्याचे कुळ देखील धन्य होते. म्हणतात,

नामापाशी सर्व सत्ता| नामे होय ब्रह्मवेत्ता||
नाम धन्य तिन्ही लोकी| नाम घेता होय सुखी||
नामे हरती दोष पाप| नामे होती नामरूप||
दास म्हणे नामी प्रीति| त्याचे पूर्वज उद्धरती||

हा आहे गुरु-प्रदत्त नामाचा महिमा! त्यात गुरूचे संपूर्ण अध्यात्मिक तेज मिसळलेले असते. गुरूची प्रीति, गुरूची कळकळ, अपार दया आणि प्रचंड अध्यात्मिक तेज यांचा मिलाफ म्हणजे नाम! श्री रामकृष्ण परमहंसांकडे आपले आयुष्य सुफळ करून घेतलेल्या ज्या अनेक व्यक्ती होऊन गेल्या, त्यांपैकी गिरीश चंद्र घोष सर्वांना सुपरिचित आहेत. नाम घेणे जमणार नाही असे स्वच्छ सांगणाऱ्या, रात्रंदिवस मदिरा आणि मदिराक्षी यांच्या गराड्यात असलेल्या गिरीश चंद्रांना रामकृष्णांनी आपल्या आयुष्याची मालकी (Power of attorney) फक्त त्यांच्याकडे सोपवण्यास सांगितले व म्हटले, हे केल्यास इतर काही करण्याची आवश्यकता नाही. गुरूंचे अध्यात्मिक तेज असे की हा मालकी हक्क सोपविल्याबरोबर स्व विसर्जित होऊनच गेला आणि अपोआप नामावर श्रद्धा दृढ होऊन आयुष्याची नौका किनाऱ्याला लागली! याचाच अर्थ नाम घेत गेले तर सहज समर्पण भाव येईल आणि जर आधीच समर्पण झाले तर नामात सहज प्रेम येऊ लागेल. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत!

म्हणून श्रीमहाराज आपल्या सही शिक्क्यासह आपल्याला सांगतात,

बाधिजेना तुम्हा संसाराचे दुःख| रामनामसुख घ्या रे तुम्ही|
दीनदास म्हणे माझा रघुनाथ| चौऱ्यांशीचे अनर्थ चुकवील||

अजून काय हवे?

||श्रीनाम समर्थ||  

1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete