Saturday, May 9, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र २३ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र २३ –

किल्लीने कुलूप काढून सरळ खोलीत जाणे हे नामाचे साधन आहे, इतर साधने म्हणजे भिंतीवर चढून आत उडी मारण्याप्रमाणे आहेत.

श्रीराम!
पूज्य बाबा बेलसरे यांनी श्रीमहाराजांना विचारले, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरे किती सहज देता? कुठून येते हे? तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, “समजा एक लोखंडी पेटी आहे आणि तिला कुलूप आहे. ते कुलूप तोडायचे म्हणजे फारच अवघड आहे. पण जर किल्ली असेल तर लगेच उघडता येते. तशी गुरूने मला नामाची किल्ली दिली आणि ती ज्ञानाची पेटी उघडली!

हेच महाराज वरच्या वचनात देखील सांगत आहेत. ते म्हणतात ना, ‘सब दुखों की एक दवा’ त्यात ‘सब सुखों के लिये भी एक ही उपाय’ हे जोडले म्हणजे नामाचे महत्त्व विषद होते. या वचनात अजून एक गोष्ट अध्याहृत आहे, ती म्हणजे, नामाचे साधन त्यालाच भावेल ज्याचा विचार सरळ आहे. महाराज म्हणायचे, जितके अंतःकरण शुद्ध होत जाईल, तितके नामाचे महत्त्व पटत जाईल. आणि शुद्ध अंतःकरणातच सरळ विचार होऊ शकतो. खूप जास्त राजसिक किंवा तामसिक मनोवृत्तीच्या लोकांना नामाची सरलता, सुगमता आणि सहजता भावणार नाही. कारण त्यांचा भर काहीतरी पुरुषप्रयत्नाने करण्यावर असतो आणि नामाला एकच प्रयत्न लागतो, नामाची आठवण ठेवून नाम जपणे! इतर गोष्टीत खूप जास्त गुंतलेल्या लोकांना सुरुवातीच्या काळात नाम साधनाने कंटाळा येण्याचा संभव जास्त असे महाराज म्हणतात.

मनुष्याची विरोधात्मक मनोवृत्ती अशी आहे, की आयुष्य सरळ सोपे जावे, देहाला जास्त कष्ट नकोत म्हणून त्याने अनेक शोध लावले व आपले आयुष्य सोपे केले. पण हीच गोष्ट जेव्हा परमार्थात येते, तेव्हा मात्र साधे सहज नाम त्याला रुचत नाही व तो नाना खटाटोप करत राहतो. श्रीमहाराज सांगतात,

“न लगे खटाटोप काही | नामे सिद्धि लोळे पायी ||”

नामाने काय अशक्य आहे? कोणतीही सिद्धी नामाने अशक्य नाही; परंतु जसजसे नामाचे प्रेम वाढते तसतशी सिद्धींची हाव तर कमी होतेच पण त्यांची किंमतच नाहीशी होते.

त्यामुळे आपण हा उगीच द्राविडी प्राणायाम टाकून साधे सोपे नाम घ्यावे हेच सर्व संतांनी सांगितले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,

समुद्रवळयांकित पृथ्वीचें दान । करिता समान न ये नामा ॥
म्हणऊनि कोणी न करावा आळस । म्हणा रात्रीदिवस रामराम ॥
सकळ ही शास्त्रें पठण करता वेद । सरी नये गोविंदनाम एकें ॥
सकळ ही तीर्थें प्रयाग काशी । करितां नामाशीं तुळेति ना ॥
कर्वतीं कर्मरीं देहासी दंडण । करिता समान नये नामा ॥
तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । नाम हेंचि सार विठोबाचें ॥

ते विचारतात, कशासाठी जास्तीच्या गोष्टींच्या मागे लागतोस? एकच अट सांगितली आहे, नामात आळस नको! प्रपंचात आम्हाला जेव्हा काही हवे असते तेव्हा आम्ही दिवसरात्र एक करून त्यासाठी कष्ट करतो, कारण त्या कष्टांचे काहीतरी फळ मिळणार आहे असा आम्हाला भरवसा असतो. मात्र दर वेळी हा भरवसा प्रपंचात सार्थ होतोच असे मात्र नाही. अनेकदा प्रयत्न फसतो. तरीही नव्या जोमाने आम्ही प्रयत्न करतो. मग परमार्थात जिथे सर्वोच्च प्राप्तव्य आहे, तिथे आम्ही साधे सोपे नाम घेण्यात मात्र आळस करतो, हे टाळले पाहिजे असे ते सांगतात. सर्व साधनांचे सार नाम आहे, सर्व पूर्वसुकृताचे फळ असेल तर मुखात नाम येणे आहे. सर्व संतजनांच्या आशीर्वादाचे फळ आहे नामात प्रेम येणे, कारण नाम हेच सार आहे!

ही नामाची किल्ली गुरूंकडून मिळणे हे कृपेशिवाय अशक्य. ज्याच्यावर ही कृपा झाली त्याचा अर्धा किल्ला सर झाला. आता मिळालेले नाम सर्वस्व वाटून त्याचे सतत अनुसंधान राखणे यासाठी प्रार्थनायुक्त प्रयत्नांची गरज आहे. आणि हा मनीचा भाव स्थिर होण्यासाठी नाम साधनेत अनन्यता येणे जरुरीचे आहे. ‘मी घेईन तर गुरूने दिलेले नामच घेईन आणि तेच माझ्या आयुष्याचे ध्येय असेल’ हा भाव असणाऱ्याला काहीच अशक्य नाही.

पूज्य ब्रह्मानंद महाराजांबद्दल श्रीमहाराज म्हणत, “त्यांनी नामाशिवाय दुसरे काहीच केले नाही. त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले. तुम्ही नाम जपता परंतु तुम्हाला नामापेक्षा इतर गोष्टी श्रेष्ठ वाटतात; तुम्हाला नामापेक्षा राम श्रेष्ठ वाटतो.” काय जबरदस्त वचन आहे हे! नामाची किंमत आपल्या मनात काय आणि किती असली पाहिजे हे लक्षात येण्यासाठी अजून महाराजांनी काय सांगायचे??

||श्रीनाम समर्थ||

1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete