Wednesday, May 13, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र २७ --

श्रीमहाराजांचे बोधवचन क्र २७ –

वनस्पतीच्या पाल्याचा रस काढण्यासाठी कांही पाल्यांमध्ये मध घालावा लागतो, काहींमध्ये दूध किंवा तूप किंवा पाणी घालावे लागते. तसे भगवंताचे प्रेम लागण्यासाठी आणि नामात गोडी उत्पन्न होण्यासाठी त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घाला.

श्रीराम!
रामायणातील बालकांडात म्हटले आहे,
भवानी शंकरौ वन्दे श्रद्धा विश्वास रूपिणौ|
याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धाः स्वान्तस्थमीश्वरम्||
श्रद्धा आणि विश्वास हेच माता पार्वती आणि शिव भगवान आहेत. म्हणजेच श्रद्धेचे महत्त्व इतके आहे की ती प्रत्यक्ष परमात्म स्वरूप आहे. श्रद्धेशिवाय हृदयात स्थित असलेल्या ईश्वराचे दर्शन करणे अशक्य म्हटले आहे. परमार्थात विश्वास – श्रद्धा – निष्ठा अशा पायऱ्या सांगितल्या आहेत. सुरुवातीला भगवत् तत्त्वावर विश्वास असल्याशिवाय परमार्थ मार्गाचा, त्यातही विशेषतः भक्तिमार्गाचा प्रवास सुरूच होऊ शकत नाही. भगवंताला उपनिषदात ‘रसो वै सः’ अशी संज्ञा आहे. असा रसरूप परमात्मा रसस्वरूपात, म्हणजेच आनंद स्वरूपात अनुभवायला श्रीमहाराज म्हणतात, श्रद्धा हवी!

श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतात, भगवंताचे प्रेम ही एक और चीज आहे. हे प्रेम ज्याला लागले तो खरा भाग्याचा! वरच्या वचनात महाराज आपल्याला हेच प्रेम कसे येईल याचे जणू कोष्टक देत आहेत. खरे तर भगवंताचे प्रेम ही ‘परम सिद्धी’ तिकडून येते. या प्रेमराज्यात पोहोचलेले सर्व संत सांगतात, जीवाची ताकद नाही हे प्रेम ‘मिळवण्याची’. हे प्रेम यायला खरोखर कृपा लागते. किंबहुना कृपा शब्द तेव्हाच सार्थ होतो जेव्हा त्यायोगे हे प्रेम जीवाला मिळते. ज्ञानेश्वरीत भगवंत म्हणतात, अत्यंत दुर्लभ असे हे प्रेम मी सहजपणे देत नाही. अगदी मोक्ष देखील मी सहजतेने देईन; पण ‘प्रेमरूपी धन’ मिळवणे तितके सोपे नाही. संपूर्ण शरणागत व एकनिष्ठ भक्तच या प्रेमाचा अधिकारी असतो म्हणतात भगवंत.

परंतु, परमात्मा देईल तेव्हा देईल, तोवर माझ्या हातात काहीच नाही हा विचार मात्र साधन दृष्ट्या घातक आहे. योगवासिष्ठात हाच मुद्दा उचलून धरला आहे की पुरुष प्रयत्नाला परमार्थात अत्यंत महत्त्व आहे. श्रीमहाराज देखील एके ठिकाणी म्हणतात, ‘साधनाने साधत नाही हे कळायला साधन करावे लागते.’ म्हणजेच साधन इतके दृढ बुद्धीने, प्रयत्नाने केल्याशिवाय मीपणा लटका पडत नाही आणि मीपणा लटका पडल्याशिवाय भगवत् प्राप्तीबद्दल शरणागती येत नाही. आणि हे जे साधन करायचे ते श्रद्धापूर्वकच केले गेले पाहिजे हा वरील वचनामागचा मतितार्थ आहे.

एक उदाहरण द्यायचे महाराज. एक साधक होते, त्यांचा देवाधर्मावर फारसा विश्वास नव्हता. ते दररोज एक परिपाठ म्हणून विष्णु सहस्रनाम मात्र म्हणायचे. हे बघून एकांनी त्यांना विचारले, तुम्ही विश्वास नाही म्हणता, मग नामावली कशाला उच्चारता? तेव्हा ते म्हणायचे, ‘खरे आहे, माझा विश्वास नाही; परंतु भगवंत असलाच तर त्याला ऐकू जाईल म्हणून मी म्हणतो.’ हे सांगून महाराज म्हणत, “असे नाम घेऊन कसे चालेल? मी घेतलेले नाम त्याच्यापर्यंत पोहोचते हा विश्वास नको का? तो मुळीच नसेल तर कसा फायदा होईल?” यापुढे जाऊन महाराज अनेकदा म्हणत, “गुरू काम करतच नाही; काम करत असेल तर गुरूवरची शिष्याची निष्ठा काम करते.” म्हणजेच श्रद्धा असेल तर काय शक्य नाही? कारण श्रद्धेनेच निदान कल्पनेत आपण सत्यत्व देतो आणि मग ती कल्पना नसून खरेच सत्य आहे याची प्रचीती गुरुकृपेने मिळते.

याच श्रद्धेच्या संदर्भात म्हणूनच महाराज म्हणायचे, ‘समजा एखाद्याने गुरू केला आणि जर तो पोचलेला नसेल, तरीही जर त्या शिष्याची निष्ठा दृढ असेल तर त्या शिष्यापुरता त्याच गुरूमध्ये भगवंत प्रकट होईल आणि त्याचे काम होईल! इतके जबरदस्त सामर्थ्य श्रद्धेमध्ये आहे.

खरे पाहता भगवंताचे प्रेम व नामाचे प्रेम यात भेदच नाही. एकात प्रेम आले म्हणजे दुसऱ्यात ते आलेच हे निश्चित. तरीही नामाचे प्रेम कळणे अवघड असल्याने सुरुवातीला भगवंताच्या सगुण रूपात अथवा गुरुरूपात जर हे प्रेम आले तर ते सोपे जाते. यासाठीच सर्व संत एका गोष्टीचा आग्रह करताना दिसतात आणि तो म्हणजे सत्संग! श्रद्धा दृढ होण्यासाठी सत्संग हा अतिशय परिणामकारक असा मार्ग आहे. सत्संगतीने मुख्यतः काय होते असे बघितले तर ‘असाधनाचा सहजी त्याग होतो’, म्हणजे, साधनाच्या आड ज्या ज्या गोष्टी येतात त्यांचा मनाने त्याग व्हायला हवा ही भावना आपल्यामध्ये सत्संगाने रुजते. श्रद्धेच्या आड येणारी मुख्य गोष्ट हीच – असाधन! ज्या ज्या लौकिक गोष्टीत आमचे मन गुंतलेले आहे त्या गोष्टीच आमची श्रद्धा डळमळीत करतात आणि या गोष्टी कोणत्या हे सत्संगाने समजते.

त्यामुळेच असाधनाचा त्याग, साधनेच्या नेमाची दृढता, सत्संगती, सद्गुरुंबद्दल अनन्यभाव या गोष्टी थोड्या तरी मनाने धरण्याचा अभ्यास केला तर श्रद्धारूपी आस्था गुरुचरणी दृढ होऊन आमचा परमार्थ मार्ग सुकर होईल. आणि मग भगवंताचे प्रेम आणि नामातली गोडी चाखत ही आनंदयात्रा गुरुसंगतीत निर्विघ्न पार पडेल!

||श्रीनाम समर्थ||           

1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete