Tuesday, May 19, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ३३ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ३३ –

नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्ति सुद्धा सूक्ष्म आहे. दुसऱ्या कशासाठी नाम न घेता ते वृत्ति सुधारण्यासाठी घ्यावे. वृत्ति सुधारली की चित्त शांत होईल, चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल. सगळ्यांचा भावार्थ एकच आहे.

श्रीराम!
मध्यंतरी योगाचार्य अय्यंगार यांचे एक वचन वाचनात आले, Meditation does not calm the mind; but a calm mind can meditate.” हे एक प्रकारे ज्ञानयोग आणि ध्यानयोग त्यांनी एकत्र केल्याप्रमाणे आहे. आधी अष्टांग योगाच्या पायऱ्यांनी मन शांत करायचे व मग त्या शांत मनाने ध्यान लागेल. परंतु रोजच्या व्यवहारात हे निश्चित अवघड आहे. गंमत अशी होते की आपण मन शांत करण्याचा ‘प्रयत्न’ करेन असे सद्गुरूंना सांगतो; पण हा ‘प्रयत्नच’ मन शांत होऊ देत नाही. जिथे प्रयत्न गळून पडतो व सपशेल शरणागती पत्करली जाते तिथून पुढे शांतीचे साम्राज्य सुरु होते.

या आधीच्या वचनांच्या चिंतनात आपण ‘वृत्ति’ बद्दल बघितले आहेच. श्रीमहाराजांचा आत्यंतिक भर हा वृत्ति सुधारण्यावर आहे हे आपल्याला आता लक्षात आलेच आहे. कारण अध्यात्म हे केवळ आणि केवळ ‘आतले विश्व’ आहे, त्यात बाहेरच्या कोणत्या गोष्टीचा खरे तर संबंधच नाही. पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, बाहेरच्या गोष्टीचे महत्त्व तेवढेच जितकी ती गोष्ट आतली वृत्ति सुधारायला मदत करेल. जसा सत्संग... (तो खरा असला तर) त्याचा उपयोग वृत्ति सुधारण्यासाठी होतो. परंतु नाम-धारकांना एक अतिशय सोपी गोष्ट अशी आहे की जे नाम त्यांना गुरुकडून मिळालेले आहे, ते नाम दुहेरी काम करते, किंबहुना अनंत-पदरी काम करते म्हटले पाहिजे. एकीकडून सद्गुरू प्रदत्त नामाने चित्तवृत्ति शांत होऊ लागतात, आयुष्यात अविरोध येतो आणि त्याच नामाच्या सततच्या अभ्यासाने सद्गुरूंचे सान्निध्य जाणवल्यामुळे साधकाची वाटचाल हळूहळू एकनिष्ठ भक्त बनण्याकडे होते.

मात्र हे होण्यासाठी श्रीमहाराज वरच्या वचनात एक अट घालतात, “दुसऱ्या कशासाठी नाम न घेता ते वृत्ति सुधारण्यासाठी घ्यावे”. ही अट घालण्यामागे सद्गुरूंची आत्यंतिक दूरदृष्टी प्रतीत होते. जो नाम काही कामना मनामध्ये ठेवून जपतो, त्याचा संसार मार्गी लागणार नाही असे नाही. त्याने जी कोणती कामना केलेली असेल ती जर त्याच्या हिताची असेल तर सद्गुरू ती पूर्ण करतीलही; परंतु यामुळे त्याची वृत्ति मात्र कदापि सुधारणार नाही. ती कायम लौकिक जगाच्या जंजाळातच अडकून राहील आणि जे नश्वरच आहे तेच भोगण्यासाठी चौऱ्यांशी लक्ष योनीतून त्याची भटकंती थांबणार नाही! पुन्हा मनुष्य जन्मच मिळेल याची काय शाश्वती? तुम्ही ज्या कामनेने भरलेले आहात ती कामना ज्या योनीत पूर्ण होईल अशी योनीच प्राप्त होते यासारख्या अनंत गोष्टी आपल्याला उपनिषदे - पुराणातून सापडतात.

त्यामुळे “दुसऱ्या कशासाठी नाम न घेता” ही महाराजांची अट किंवा इच्छा आपण एक शिष्य म्हणून पूर्ण केली पाहिजे. त्यांची दूरदृष्टी अशी की जर माझा शिष्य हे करण्याची इच्छा जरी मनामध्ये धरेल, तरी देखील त्याच्या वृत्तीत भरलेल्या दृश्य जगाचा हळूहळू निचरा होऊ लागेल. अशी तीव्र इच्छा मनात धरणाऱ्या शिष्याला सद्गुरूंनी हाताशी धरलेच म्हणून समजायला हरकत नाही. श्रीमहाराज जे म्हणतात, “तुम्ही फक्त नाम घ्या, ते विवेक आणि वैराग्य मी बघून घेतो” ते या अशा महाराजांची आज्ञा म्हणून कामनाविरहित नाम घेणाऱ्या शिष्याच्या बाबतीत लवकर फळेल. वृत्ति सुधारणे म्हणजे शेवटी काय? तर अनंत जन्मांच्या आणि याही जन्माच्या कर्म, विचार, दैनंदिन व्यवहार याबद्दलच्या विचारांचे जे अमाप साठे चित्तात आहेत, त्यापासून सुटका होण्याचा विचार व इच्छा मनामध्ये जोर धरू लागणे हे वृत्ति सुधारायला लागल्याचे प्रप्रथम लक्षण आहे. यालाच श्रीमहाराज “सरळ विचार करणे” असे म्हणतात. म्हणजे ज्या विचारत कसली लपवाछपवी नाही, कपट नाही असा विचार. श्रीमहाराजांचा “शुद्ध परमार्थ” याभोवतीच घोटाळतो!

श्रीमहाराजांनी आपल्यासाठी असे उच्चतम ध्येय ठरवणे व त्या ध्येयाप्रत आपल्याला उद्युक्त करणे किती स्वाभाविक आहे! इथे श्रीमहाराजांच्या आराध्याची – प्रभू रामरायाची एक गोड गोष्ट आठवते. तुलसीदासांनी रामचरितमानस मध्ये अतिशय गोड वर्णन या प्रसंगाचे केले आहे. मिथिलेमध्ये जेव्हा विश्वामित्र ऋषी श्रीराम आणि लक्ष्मणांना घेऊन सीता स्वयंवरासाठी आले तेव्हा जनक महाराजांनी दिलेल्या प्रासादात ते राहत होते. रोज प्रभू रामराया विश्वामित्रांची सर्व प्रकारे मनोभावे सेवा, पूजा करीत. एक दिवस सकाळी जेव्हा विश्वामित्रांनी या दोघांना पूजेसाठी फुले आणण्यास पुष्पवाटिकेत पाठवले तेव्हा प्रप्रथम श्री रामराया व सीता माता यांची भेट तिथे झाली. विश्वाची अनादि जोडी ही; स्वाभाविकच दोघे एकमेकांत अनुरक्त झाले आणि त्याच विचारात प्रभू आपल्या बंधूसहित प्रासादात परत आले. जेव्हा विश्वामित्रांनी विचारले, तेव्हा तुलसीदास वर्णन करतात, “राम कहा सबु कौसिक पाही| सरल सुभाउ छुअत छल नाही||” – प्रभूंनी झालेले सर्व विश्वामित्रांना (कोणतीही लपवाछपवी न करता) सहज सांगून टाकले, कारण त्यांचा स्वभाव अतिशय सरळ होता आणि कपट त्यांना शिवत सुद्धा नसे! आणि म्हणूनच रामराया पुढे एका प्रसंगात म्हणतात, “निर्मल मन जन सो मोहि पावा | मोहि कपट छल छिद्र न भावा ||”

आणि हे जे प्रभू रामचंद्रांनी निर्मल मनाचे महत्त्व सांगितले, ते आपल्याकडून झाल्याशिवाय आपल्याला सद्गुरूंनी दिलेल्या नामसाधनेचा हवा तसा पारमार्थिक फायदा मिळणार नाही म्हणून ही आपल्या श्रीमहाराजांची तळमळ, की, वृत्ति सुधारण्यासाठी नाम घ्या! त्याचा परिणाम काय होईल हेही लगेच ते सांगताहेत की वृत्ति सुधारली की चित्त शांत होईल. आपल्यापैकी प्रत्येकाची धाव त्या शांतिकडेच आहे ना! म्हणून महाराज सांगतात, ही शांति तुमच्या आतच आहे; केवळ तुमच्या नको त्या वृत्तींचे पांघरूण तिच्यावर पडल्यामुळे तुम्हाला तिचे अस्तित्व आज जाणवत नाही. याही पुढे जाऊन महाराज सांगतात, एकदा का शांतिची तुम्हाला जाणीव झाली, की मग निष्ठा उत्पन्न होईल. पहा निष्ठा निर्माण होणे किती पुढची पायरी आहे! आम्ही रोज दहा वेळा म्हणतो, आमची नामात निष्ठा आहे, महाराजांवर निष्ठा आहे; पण जेव्हा आम्ही आमच्या आत विचारतो की ‘मी शांत आहे का?’ तेव्हा ‘अजून म्हणावे तितके नाही’ हे उत्तर मिळते. म्हणजेच आमची निष्ठा दृढ नाही. श्रीमहाराज सरळ आलेख दाखवतात आम्हाला. नाम घ्यायला सुरुवात करा, हळूहळू वृत्यंतर होईल, मग आतमध्ये शांती जाणवू लागेल आणि मग त्या नामात निष्ठा दृढ होईल. ही अशी नामनिष्ठा दृढ झाली म्हणजे मग सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने नामाचे प्रेम आम्हाला येईल आणि महाराज “नामापरते सत्य नाही नाही” असे का म्हणतात याची अनुभूतीही आम्हाला त्यांच्या कृपेनेच येईल!

||श्रीनाम समर्थ||  

2 comments:

  1. नामनिष्ठेचा अप्रतिम आलेख मांडलात! केवळ अप्रतिम! 🙏🌿🙏

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete