Monday, May 18, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ३२ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ३२ –

नामाचा संबंध वृत्तीपर्यंत गेला की अनुसंधान टिकले.

श्रीराम!
श्रीमहाराजांनी ‘अनुसंधान’ या शब्दाच्या काही महत्त्वाच्या व्याख्या दिल्या आहेत.
(१) इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे याला अनुसंधान असे म्हणतात.
(२) भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे याचे नाव अनुसंधान होय.
(३) जशी जाणीव देहाला व्यापून असते त्याचप्रमाणे स्मरण मनाला व्यापून असणे याचे नाव अनुसंधान होय.
(४) प्रपंचामध्ये वागताना मनाने जे थोडे लक्ष तिकडे द्यावे लागते, त्याला भगवंताचे अधिष्ठान असणे याचे नाव अनुसंधान होय.

या चारही व्याख्यांमधून श्रीमहाराजांचे आजचे बोधवचन सहज व्यक्त होते. आमची बहुतेकांची तक्रार हीच असते की आमचे अनुसंधान टिकत नाही, किंवा नाम सुरु असते आणि मनात विचार मात्र प्रापंचिक असतात, किंवा नामाचा विसर पडतो. याचे मुख्य कारण आपण आधीच्याही चिंतनातून बघितले आहे. पूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, नामाच्या साधनेला लागणारी शक्ती ही अध्यात्मिक शक्ती आहे; त्यामुळे माझ्या शक्तीने (शारीरिक वा मानसिक) मी नामसाधन करेन हे तितकेसे साधत नाही आणि त्यामुळेच ही शक्ती वाढवण्याचा उपाय पुन्हा नामच! तुलसीदास म्हणाले, बीज कसेही घातले तरीही जसे पीक येतेच तद्वत नाम कसेही घेतले तरी ते वाया जात नाही; हाच मुद्दा श्रीमहाराजांनी देखील सांगितला थोड्या वेगळ्या पद्धतीने. म्हणाले, नाम मुखात येते आहे याचा अर्थच मूळ रूपाचे स्मरण आतमध्ये आहेच. राम म्हटल्यावर घरगड्याचे नाव राम असेल तरी तो डोळ्यांसमोर येत नाही म्हणतात महाराज. म्हणून सुरुवातीला नाम मुखाने – वैखरीने घेण्याचेच महत्त्व जास्त आहे. किंबहुना चारही वाणीत ज्यांचे नाम वसले असे संत देखील वैखरीच्या नामाला अतिशय महत्त्व देताना दिसतात; नाम संकीर्तनाचे महत्त्व यातच आहे.
हे सर्व खरे असले तरी श्रीमहाराज हे देखील सांगतात की जसजसे तुम्ही नामात राहू लागता तसतशा नामाच्या एकेक पायऱ्या चढणे देखील आवश्यक आहे. कधीतरी पहिलीतून दुसरीत गेले पाहिजे ना म्हणत. आणि या पायऱ्या चढण्याचे मर्म म्हणजेच नामाचे अनुसंधान, भगवंताचे स्मरण किती टिकते आहे याचे भान होय. आजच्या बोधवचनात महाराज हेच कसे झाले पाहिजे हे सांगत आहेत.

वृत्ति ही चित्तात निर्माण होते; त्यामुळे चित्तातले व्यापार आणि व्यवहार यांवर सर्व परमार्थ प्रवास अवलंबून आहे. म्हणून महाराज म्हणताहेत, नामाचा संबंध वृत्तीपर्यंत गेला की अनुसंधान टिकले. अतिशय गूढ आणि खोल असे हे वचन आहे. “संबंध” हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. संबंध त्याच्यासोबतच प्रस्थापित होतो ज्याचे आपल्याला प्रेम असते किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला आदर असतो. लौकिक संबंध आपल्या चित्तात किती खोल वसलेले असतात हे आपल्याला कुणीही सांगण्याची गरज नाही. चांगले आणि वाईट अनुभव जे चित्तात वसून नामाला बसलो की आपल्याला त्रास देतात ते याच ‘संबंधा’वर आधारित असतात. नामाला बसलो की कोणतेतरी जुने नातेसंबंधातील दुखणे आठवते व त्रास देते हा सर्वमान्य अनुभव आहे. आता हे सर्व संबंध मनातून – चित्तातून काढून तिथे नामाचा – भगवंताचा – सद्गुरूंचा संबंध प्रस्थापित करायचा आहे. हे होण्यासाठी दोन मार्ग आहेत. ज्ञानमार्गात मन-बुद्धी-चित्तावर ताबा मिळवून मन रिकामे करण्यावर भर असतो. हे अत्यंत कठीण काम आहे. त्यापेक्षा दुसरा मार्ग त्या मानाने सोपा आहे, मन अशा गोष्टीवर वरचेवर स्थिर करण्याचा अभ्यास करायचा जी स्थिर आहे. हा अभ्यास म्हणजेच नामाशी – भगवंताशी – सद्गुरूंशी संबंध प्रस्थापित करणे होय. कारण ही एकच गोष्ट (तिन्ही एकरूपच आहेत) स्थिर आहे, जिला घट नाही, बदल नाही! जीवाची सगळी तगमग अपूर्णतेमुळे आहे. ही अपूर्णता तोवर संपू शकत नाही, जोवर पूर्णाशी संबंध प्रस्थापित झाला नाही आणि हा संबंध प्रस्थापित होण्यास पूर्णाच्या संबंधाने, म्हणजेच सद्गुरूंच्या संबंधाने मनाच्या अपूर्ण – नश्वर – तात्पुरत्या संबंधांवर घाला घालणे जरूर आहे. त्यासाठी अगोदर हे नश्वर संबंध आहेत याची मनाशी खूणगाठ बांधणे जरूर आहे आणि हेच सर्वात अवघड काम आहे. मात्र संत सद्गुरूंच्या सांगण्यावरून एकदा हा मनीचा निश्चय झाला, की मग “अभ्यास” योगे हा संबंध प्रस्थापित होऊ शकतो.

भगवंत गीतेत सांगतात,
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना |
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ||
-- हे अर्जुना, निरंतर अभ्यासाच्या योगाने’ इतस्ततः न भटकणाऱ्या चित्ताने जो अखंड चिंतन करतो, तो त्या परमपुरुषाला प्राप्त होतो.

हेच श्रीमहाराज वरच्या वचनात सांगताहेत की नामाचा (जे आपले सर्वोच्च ध्येय आहे) संबंध वृत्तीपर्यंत गेला की मग अखंड चिंतन चालेल. आता पुन्हा वरच्या चार व्याख्यांकडे गेलो की समजणे सुलभ होईल. एकाच विषयावर मन एकाग्र करायला सतत त्याबद्दल विचार करणे हाच अभ्यास आहे. नाम आणि भगवत चिंतन हे माझ्या आयुष्याचे ध्येय आहे हे एकदा निश्चित झाले म्हणजे मग प्रत्येक गोष्टीचा ‘संबंध’ त्या नामीशी जोडण्याच्या कलेला साधक सरावतो. ही एक कलाच आहे. मग ते समोर दिसणारे दृश्यातले कोणते चित्र असो वा सहज गुणगुणलेले गीत. ही कला कशी साधावी हा प्रत्येक साधकाचा स्वतंत्र विषय आहे. दृश्याकडे जाणारे मन आवरून नामाकडे – सद्गुरुंकडे लावणे हा एक मार्ग व जिथे जिथे मन जाते आहे तिथे तिथे सोबत नामाला – सद्गुरूंना घेऊन जाणे हा दुसरा, खात्रीचा आणि आनंददायक असा मार्ग. या मार्गाची चटक लागलेला साधकाच्या मनात जी जी वृत्ति उठते ती ती नामाला – गुरूंना घेऊनच उठते. अगदी वाईट वृत्ति उठली तरी देखील “हे माझ्या गुरूंना आवडायचे नाही” या भावनेने युक्त होऊनच ती उठते व लवकर विरून जाते. यामुळे सतत सद्गुरू स्मरण आणि सतत त्यांचे सहजी सान्निध्य जाणवणे अशा दोन गोष्टी होण्यास सुरुवात होते. पुढे पुढे साधक त्यात रंगू लागतो. उत्तर प्रदेशात एक थोर राधाकृष्णभक्त होऊन गेले, पूज्य जगद्गुरू कृपालू महाराज. ते सांगत, अगदी आपल्याला कुठे खाजवू लागले तरी असा विचार करावा की तो छोटासा बालगोपाल आपल्याकडे बघून हसतो आहे. म्हणायचे, कुठेही जा, काहीही करा, त्याला डोळ्यांपुढे उभे करा! अशी भावना पुढे पुढे मूर्त रूप घेते हा अनेक भक्तांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. यालाच श्रीमहाराज “स्मरण मनाला व्यापून असणे” असे म्हणतात.

मनातील सुख, दुःख, काळजी, भय, मान, अपमान, हास्यविनोद, राग अनुराग या सगळ्याचे केंद्र जर भगवंत असेल तर त्या साधकाला दुसरे काही कसे आठवेल? आणि सच्चिदानंद परमात्मा व त्याचे नाम जर “पूर्णानंदमय” असे आहे, तर वृत्ति कोणतीही असो, त्याची परिणती आनंदातच होते हा अनुभव आहे. कारण दुःख तेव्हाच होते जेव्हा अपूर्णाशी आपले अनुसंधान असते. आम्हाला सद्गुरूंनी आनंदरूपी शाश्वत सत्याकडे संधान लावायला सांगितलेले असताना आम्ही संधान या संसाराकडे लावतो आणि दुःख का मिळते म्हणून रडतो हे किती विचित्र आहे! त्यामुळे साधकाचा प्रत्येक विचार, कृती यांची दिशा ही केवळ आणि केवळ भगवंत आणि त्याच्याकडे घेऊन जाण्यास साहाय्यभूत होणारे साधन जे नाम याकडेच असली पाहिजे; म्हणजे वृत्तीपर्यंत नाम पोचून प्रत्येक वृत्ति किती सहज आनंदाने युक्त होऊन आपल्याला सदाबहार ठेवेल याचा अनुभव सद्गुरू देतील!!!

||श्रीनाम समर्थ||

1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete