Thursday, May 28, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४२ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४२ –

भगवंताचे नाम हे बाणासारखे आहे. जसा शत्रु तसा बाण. अहंकार मारायला नाम हाच खरा बाण आहे. नाम एका बाजूने शत्रूला मारील तर दुसऱ्या बाजूने आपल्याला तारील.

श्रीराम!
भगवंताचे नाम, रूप, लीला, धाम, त्यांच्या सगुण रूपाची श्री अंगे, त्यांची आयुधे, आणि भगवंतावर प्रेम करणारे संत या सर्वांमध्ये अभेद आहे असे भक्तिशास्त्र सांगते. रामबाण आणि नामबाण यातही तसाच अभेद आहे. रामबाण जसा अहंकारी शत्रूला मारायला सर्व समर्थ आहे, तसाच नाम बाण हा अंतरंगात लपलेल्या आणि देहबुद्धीने पोसलेल्या अहंकाराला मारायला सर्व समर्थ आहे असे महाराज आजच्या वचनात आम्हाला सांगताहेत. “जसा शत्रु, तसा बाण!” रावणासारख्या अत्यंत अहंकारी राक्षसाला आपली घमेंड सोडण्याचा आग्रह करताना त्याची शालीन पत्नी मंदोदरी म्हणते,

“राम बान अहि सरिस निकर निसाचर भेक|
जब लगि ग्रसत न तब लगि जतनु करहु तजि टेक||”
-- मंदोदरी म्हणते, श्रीरामांचे बाण हे सर्पांच्या समूहासारखे आहेत आणि राक्षसांचे समूह त्यांच्यापुढे बेडकांसारखे आहेत. ते बाणरूपी सर्प जोपर्यंत या बेडकांना खाऊन टाकत नाहीत, तोवरच आपला हट्ट सोडून काही उपाय करा!   

संत सत्पुरुष व साध्वी स्त्रिया श्रीरामांचा महिमा जाणून असतात. वरच्या दोह्यात आम्हाला भगवंत आणि त्यांचे शत्रू यात कसा विरोधी संबंध असतो हे तुलसीदासांनी दाखवून दिले आहे. हाच संबंध भगवंताचे नाम आणि आपल्या आतले सहा शत्रू यांमध्ये आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू आम्हाला भगवंताच्या राज्यातून ओढून आणून मायेच्या स्वाधीन करतात. हे कमी म्हणून की काय, या सर्वांवर सोज्वळतेचे खोटे पांघरूण घालायला दंभ सज्ज असतो. दंभ मिसळला की हे षड्रिपू रावणापेक्षाही भयंकर होतात. रावण निदान उघड उघड भगवंतांशी वैर करत होता. दंभाच्या बुरख्याखाली मात्र हे षड्रिपू परमार्थाचे मित्र असल्याचे भासवून त्याच्याशी अंतर्गत Cold war मधे जणू असतात. म्हणून श्रीमहाराज म्हणतात, सर्वात घातक जर काही असेल तर ते म्हणजे ढोंग. “तुम्ही काहीही केले नाहीत तरी चालेल, ढोंग मात्र करू नका” असे महाराज म्हणतात ते यामुळेच! दंभाच्या आहारी गेलेला साधक झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाप्रमाणे आहे. सापाला डब्यात झाकून ठेवले तरी झाकण उघडल्याबरोब्बर जसा तो फुत्कारून बाहेर येतो, तसा दंभाच्या पांघरूणाखाली दबलेला ‘सात्विक थाट’ सतत वर येण्यास धडपडत असतो! तमोगुण, रजोगुण यांच्या अंतर्गत असलेले स्थूल अहंकार ताब्यात येतील कदाचित; पण सत्वगुणाच्या पांघरूणाखाली दडलेल्या मीपणाच्या अहंकारावर मात करणे खरोखर गुरुकृपेशिवाय अशक्य आहे!

आणि ही गुरुकृपा होण्यासाठी खात्रीचा उपाय म्हणजे गुरूंनी दिलेल्या नामाचा प्रेमपूर्वक अभ्यास! म्हणून महाराज म्हणतात, “अहंकार मारायला नाम हाच खरा बाण आहे!”

सहज जाता जाता --
सुंदरकांडात अजून एक अमोघ बाण आहे, सगळीकडे भरून उरलेला आणि तरीही लपलेला!
                          “!!!हनुमंत!!!”
रामाचे चरित्र हनुमंताच्या चरित्राशिवाय अपूर्ण आहे. किंबहुना दोन्ही चरित्रात भेदच नाही इतके हे भक्त आणि भगवंत एकरूप आहेत. परंतु तरीही,
“सो सब तव प्रताप रघुराई| नाथ न कछु मोरि प्रभूताई||” – रघुराई, सर्व प्रताप तुमचा आहे; हे नाथ, यात माझा कोणताही मोठेपणा नाही” असे म्हणून सर्व करून नामानिराळा राहणारा हनुमान! खरे बघू जाता, एक केवळ हनुमंत असे होते, ज्यांच्या सहाय्याची प्रत्यक्ष सगुण रूपधारी भगवंतांना देखील जरूर लागली, एकदा नाही अनेकदा. तरीही भक्ताचा हा सहज स्वभाव असतो की त्याला आपल्याकडून घडणाऱ्या कोणत्याही कर्मात प्रभुकृपेशिवाय काही दिसतच नाही! आणि म्हणूनच हनुमंतासारखा अमोघ असा रघुपतींचा बाण, जो स्वतः नामरूप आहे, तो रामायणात सगळीकडे भरून आहे आणि तरीही आपल्या अंगभूत लीनतेने लपलेला आहे; तसेच राहायला त्याला आवडते... उगीच ‘राम-दुलारा’ नाही तो!
सीता मातेच्या शोधार्थ हनुमंत निघाले, तेव्हा तुलसीदास वर्णन करतात,
“जेहि गिरि चरन देइ हनुमंता| चलेउ सो गा पाताल तुरंता||
जिमि अमोघ रघुपति कर ‘बाना’| एही भाँति चलेउ हनुमाना||”
-- हनुमान समुद्र ओलांडण्यासाठी निघाले, तेव्हा ज्या पर्वतावरून त्यांनी उडी घेतली, तो पर्वत तत्काळ खचून पाताळात गेला. ज्याप्रमाणे श्रीरामांचा अमोघ बाण जावा, त्याप्रमाणे वेगाने हनुमंत निघाले!
खरोखर हनुमंत श्रीरामांचा बाणच होते, ज्यांनी लंकापुरीत जाऊन राक्षसांमध्ये हाहाकार माजवला. या हनुमंतांच्या नामाच्या प्रेमाचे वर्णन करताना आपण म्हणतो,
“पंचप्राण हे पवनसुताचे| ‘राम’ जणू निश्वास तयांचे||”—रामनामात आकंठ बुडालेले हनुमंत हे स्वतः नामरूप असल्यामुळेच अहंकाराच्या राक्षसाचे शत्रू आहेत! त्यांच्या पुण्य पावन चरणांखाली आलेला पर्वताचा देखील अहंकार चूर होऊन तो पाताळी गेला; अशाच रीतीने हनुमत्स्वरूप असलेल्या सद्गुरूंनी दिलेल्या नामाने पर्वतासमान असलेला अहंकार देखील चूर होऊन तो साधक पारमार्थिक दैन्यतेकडे, लीनतेकडे झुकतो. One cannot realize His Grace without becoming smaller than the speck of dust!

श्रीमहाराज जे वचनात म्हणताहेत की “नाम एका बाजूने शत्रूला मारील तर दुसऱ्या बाजूने आपल्याला तारील” याचा अर्थ हाच आहे. नामरूपी बाणाने अहंकार रूपी शत्रू मेला की साधकाचे ‘पात्र’ तयार झाले! सध्या पंचाईत आमच्या पात्राची – भांड्याची आहे. सद्गुरू कृपा करायला तयार आहेत पण आमचे भांडे खरकटे असल्यामुळे ती कृपा सामावून घ्यायला आमच्या भांड्यात जागा नाही. महाराज म्हणूनच म्हणतात, “मी यायला तयार आहे आत पण तुम्ही बाजूला सरकत नाही, मी काय करू?” हे माझ्या ‘मीपणा’च्या अनंत जन्म साठलेल्या खरकट्याला स्वच्छ शुद्ध करण्याचे काम सद्गुरूंनी दिलेले रामनाम करते. सद्गुरूंचा सर्व खटाटोप आम्हाला जवळ बोलावण्यासाठी आहे. आम्ही म्हणतो, आम्हाला महाराजांच्या निकट जाण्याची इच्छा आहे. खरी इच्छा नाहीच ती. इच्छा खरी आहे माझ्या मायबाप गुरूची! ते आम्हाला जवळ बोलावून आमच्या ‘तयार झालेल्या पात्रात’ अखंड समाधानाचे दान देण्यासाठी आसुसलेले आहेत. आम्ही हे जरी लक्षात घेऊन त्यांच्या इच्छेखातर, त्यांच्या आनंदासाठी नाम जपले तर त्यांचा आनंदच माझा आनंद होता, आहे आणि राहील याची प्रचीती ते आम्हाला निश्चित देतील!

||श्रीनाम समर्थ||

3 comments:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete
  2. हनुमंत! सिर्फ नाम ही काफी है।
    🙏👣🙏

    ReplyDelete
    Replies
    1. आपन तेज सम्हारो आपै
      तीनों लोक हाँक तें काँपै
      भूत पिसाच निकट नहिं आवै
      "महाबीर जब नाम सुनावै!!!"

      ☘ ☘ ☘ ☘ ☘ ☘ ☘ ☘

      Delete