Thursday, May 14, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र २८ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र २८ –

एक गृहस्थ गावाला जाण्यासाठी गाडीत बसला. गाडी निघायला वेळ होता तोपर्यंत त्याने मुलाला इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितल्या. ‘बागेला रोज पाणी घालीत जा, मागच्या दाराला कडी लावून निजत जा’ वगैरे वगैरे सांगून झाले; पण गाडी सुटायची अगदी वेळ झाल्यावर त्याने मुलाला शेवटी सांगितले की ‘तिजोरीची किल्ली आपल्या जानव्याला ठेव’, कारण तिजोरीवर सर्व अवलंबून होते. त्याप्रमाणे मला अगदी शेवटी कोणती गोष्ट जर तुम्हाला सांगायची असेल तर ती ही की, प्रपंचामध्ये कसेही प्रसंग येऊ द्या, तुम्ही नामाला सोडू नका!

श्रीराम!
गोंदवल्यात श्रीमहाराजांना खाजगी आयुष्य असे नव्हतेच. सतत लोकांची ये जा सुरु असायची आणि प्रत्येकाला वाटायचे की महाराजांनी आपल्याला विशेष असे काहीतरी सांगावे. असे ज्याला वाटे त्याला गुप्त गोष्ट सांगण्याचे निमित्त करून श्रीमहाराज आपल्या खोलीचे दार लोटून बसायचे; परंतु आतमध्ये इतक्या मोठ्याने बोलायचे की ते दार लोटणे फक्त त्या माणसाच्या समाधानासाठी असायचे हे सर्वांच्या लक्षात येई. एक मनुष्य होता, ज्याने बऱ्याच तीर्थयात्रा केल्या होत्या आणि काही योग साधनही त्याने केले होते. त्याची अशी प्रामाणिक समजूत होती की आपला अध्यात्मिक अधिकार जास्त आहे. श्रीमहाराज देखील त्याला मान देऊन वागवायचे. त्याला असे फार वाटे की महाराजांनी फक्त आपल्याला काहीतरी विशेष सांगावे. एक दिवस नाथषष्ठीच्या दिवशी महाराजांनी त्याला लवकर स्नान करून यायला सांगितले. महाराज देखील लवकर स्नान करून आले. त्या मनुष्याला खूप आनंद झाला की आज महाराज आपल्याला काहीतरी परमार्थातले गूढ आणि उच्च तत्त्व नक्की सांगणार! महाराजांनी त्याला आपल्या खोलीत नेले, खोलीच्या दाराला कडी लावून घेतली, त्याला अगदी आपल्या शेजारी बसवले आणि त्याच्या कानात सांगितले, “मी सहसा कोणाला सांगत नाही ते तुम्हाला सांगतो. माझ्या आयुष्यात नामाशिवाय दुसरे साधन मी केले नाही. माझ्या गुरूने मला नामच दिले, ते नाम मी सर्वांना देत आहे. तुम्ही ते नाम घ्या, तुम्हाला राम खात्रीने भेटेल. तोंडाने ‘राम राम’ म्हणत जा.” त्या मनुष्याचे समाधान झाले व तेव्हापासून योगयाग सोडून तो मनापासून नाम घेऊ लागला. (संदर्भ- चरित्र)

असे आहे श्रीमहाराजांचे नामावरचे प्रेम. आधी मध्ये अंती महाराजांनी एक नामच सांगितले. हेच महाराज आजच्या वचनात सांगत आहेत. वचनात दिलेले उदाहरण रूढार्थाने साधे सहज दिसले तरी भावार्थाने गूढ आहे. तो मुलाला सूचना देणारा बाप म्हणजे सद्गुरू आणि तो मुलगा म्हणजे शिष्य! बागेला पाणी घालणे हे रूपक आपल्या मनातील सद्गुरू – भगवंताच्या चिंतनाला सत्संगाचे खतपाणी घालणे होय. हा सत्संग सद्ग्रंथ वाचन, मनन, चिंतन, संत श्रवण अशा कोणत्याही प्रकारे असू शकतो. मागच्या दाराला कडी लावणे म्हणजे भूतकाळातील आपल्या आयुष्याची साधन दृष्टीने आपल्याला आठवण न राहणे होय. मग ते प्रपंचातील चांगल्या गोष्टींची असो वा हातून घडलेल्या दुष्कृत्यांची असो. सद्गुरुकडे आल्यावर या सर्व गोष्टींची मनाने होळी करणे जरूर आहे; तरच साधनात मन रमेल! आणि तिजोरी आहे आपली मनबुद्धि. तिजोरी यासाठी म्हटले आहे की आपल्या मनाला तिजोरीसारखे कोंडून ठेवता आले पाहिजे, ते अंतर्मुख करता आले पाहिजे. उघडे टाकू, खूप जास्त बहिर्मुख करू, तर बुद्धिभेद निश्चित! त्यापेक्षा जर तिजोरीच्या किल्ल्या जानव्याला असतील तर सर्वात चांगले. मनबुद्धीची किल्ली म्हणूनच सद्गुरू उपदिष्ट मार्गात गुंतवावी, कारण मनबुद्धिरूपी तिजोरीच्या संपत्तीवर सर्व परमार्थ प्रवास अवलंबून आहे.

अशा रीतीने जणू साधनासाठी आवश्यक साधक व बाधक गोष्टी महाराजांनी आपल्याला वचनाच्या सुरुवातीच्या भागात सांगितल्या. मात्र महाराजांना हे एवढेच करणे अपेक्षित नाही, कारण जीवाची ताकद नाही हे स्वबळावर करता येईल. परमार्थ मार्गात शारीरिक किंवा मानसिक बळापेक्षा अध्यात्मिक बळ महत्त्वाचे आहे. आणि हे बळ मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण! महाराज म्हणतातच, सोडण्याच्या गोष्टींचा अभ्यास करण्यापेक्षा ज्या गोष्टी धरायच्या त्यांचा अभ्यास जास्त केला पाहिजे. म्हणजे मग नको त्या गोष्टी आपोआप सुटतील. आणि म्हणूनच वरच्या सर्व साधक बाधक गोष्टींचे सार नामस्मरणाला धरण्यामध्ये आहे असे श्रीमहाराज सांगतात. आणि ते देखील कोणत्याही प्रसंगात! जसे समर्थ म्हणतात,

“संपत्ती अथवा विपत्ती| जैसी पडेल काळगती|
नामस्मरणाची स्थिती| सांडूच नये||


कारण,


साराचेही सार रामनाम!!!

||श्रीनाम समर्थ||

1 comment:

  1. केवळ अप्रतिम आणि कल्याणकारी चिंतन!!!!!! श्रीराम!!!!!
    🙏👣🙏

    ReplyDelete