Tuesday, May 12, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र २६ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र २६ –

चार माणसे होती. त्या सर्वांना एकच रोग झाला होता, पण त्यांची सांपत्तिक स्थिती सारखी नव्हती. वैद्याने त्यांपैकी अगदी गरीब माणसाला एक औषध तुळशीच्या रसात घ्यायला सांगितले; त्याच्यापेक्षा पैसेवाल्याला तेच औषध केशरात घ्यायला सांगितले आणि जो सर्वात श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीमध्ये घ्यायला सांगितले. त्याचप्रमाणे, ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे, पण घ्यावे तर नामच घ्यावे! नाम नुसते तोंडाने घ्यावे; नाम श्रद्धेने घ्यावे; नाम वृत्ति सांभाळून घ्यावे आणि ‘नाम हेच एक त्रिभुवनात सत्य आहे’ म्हणून घ्यावे; सर्वांना फळ सारखेच मिळेल.

श्रीराम!
भगवंताचे नाम ही एक अशी गोष्ट आहे, ज्याबद्दल एक तर बोलताच येत नाही इतकी की गोष्ट अनिर्वचनीय प्रेमस्वरूप अशी आहे किंवा जर बोलू लागलो तर बोलणे थांबवता येत नाही इतका त्याचा महिमा अगाध आहे. श्रीमहाराज म्हणतात, नाम घेऊन माझे मन भरले नाही, म्हणून पुन्हा नाम घेण्यासाठी व त्याबद्दल सांगण्यासाठी मी परत आलो. ते नामरूपच आहेत. श्रीमहाराजांचे अनुसंधान व नामाचे अनुसंधान यांत भेद नाही; म्हणूनच कान्हनगडचे स्वामी रामदास महाराजांना ‘नामावतार’ म्हणत.

पूज्य बाबा बेलसरे विरचित नाम-चंद्रिका आपल्याला सांगते,
“अखंडे परमानंदे नाम्ना जीवो विराजते||” – नामामुळे जीव हा अखंड परमानंदात विराजमान होतो. मात्र हे होताना प्रत्येक जीवाचा प्रवास हा त्याचा स्वतःचा असतो हेच या वरच्या आजच्या बोधवचनात महाराज सांगताहेत. गंमत अशी की मुंगीपासून माणसापर्यंत प्रत्येक जीव हा ‘आनंदाप्रत’ जातो आहे. कुणाही जीवाला दुःख नको आहे आणि ते अत्यंत स्वाभाविक आहे, कारण तो सच्चिदानंदघन परमात्म्याचा अंश आहे. जो आनंदाचाच अंश आहे त्याला दुःख कसे आवडणार? त्यामुळे प्रत्येक जीवाच्या प्रत्येक कृतीची झेप त्या आनंदाकडेच असते. जन्मल्या जन्मल्या मूल रडते ते देखील श्वासोश्वास सहज होऊन आनंदात श्वास घेऊन जगायला जमावे म्हणून. पशुपक्षी त्यांचे instinctive आयुष्य जगतात, ते देखील त्यातून आनंद मिळतो म्हणूनच. मात्र केवळ मनुष्य प्राण्याला त्या आनंदाचा उगम शोधण्याची कला साध्य आहे. आणि या कलेलाच अध्यात्म असे संत म्हणतात. भक्तिमार्गात या कलेचा पाया आणि कळस असेल तर तो म्हणजे भगवंताचे नाम!

जो या नामाच्या कलेच्या अभ्यासासाठी भक्तिमार्गात गुरुकृपेने उतरला, त्या प्रत्येकाचे पूर्वजन्मीचे संस्कार, पुण्यांश, सदसद्विवेक बुद्धीचा निश्चय, त्याने अवलंबलेली जीवन पद्धती, त्याला वाटणारे गुरुप्रेम, त्याने नामासाठी – साधनेसाठी दिलेला वेळ, त्याची बहिर्मुखता वा अंतर्मुखता, त्याची नामाबद्दलची निष्ठा या व अनेक गोष्टींमध्ये भेद असतो. यामुळे सद्गुरू प्रत्येकाला नाम जरी एकच देत असले तरीही त्या नामात रंगून जाण्याची वेळ, अवस्था, तीव्रता, श्रद्धा, अनन्यता यात फरक पडतो. सद्गुरू सर्वज्ञ असल्यामुळे त्यांना या सर्व गोष्टी माहीत असतात. “अधिकार तैसा करू उपदेशु” म्हटले आहे त्याप्रमाणे ते ज्या मनुष्याचा जसा अधिकार त्या धर्तीचा उपदेश त्याला करत असतात. श्रीमहाराज बहुतेक प्रापंचिक लोकांमध्ये वावरले. किंबहुना त्यांच्या गुरूंनी – संतश्रेष्ठ तुकामाईंनी त्यांना प्रापंचिक लोकांमध्ये राहूनच त्यांचे दुःख हरण्यासाठी नामाचा प्रसार करण्याचे महत्कार्य सोपवले. त्यामुळे ‘हाती काम’, ‘मुखी नाम’ व ‘रामकर्ता’ या भावनेचा अभ्यास ही महाराजांच्या सांगण्याची त्रिसूत्री बनली. ते म्हणायचे, “मी प्रपंच सोडा असे सांगत नाही, तसे मी सांगितले तरी तो कुणी सोडणार नाही; म्हणूनच प्रपंचाच्या धकाधुकीतच नाम घ्या असे मी सांगतो.” सामान्य माणसाची प्रपंचाची आसक्ती सुटणे एवढे सोपे नाही हे ते जाणतात आणि म्हणूनच त्यात राहूनच हे मनुष्य जीवन ज्यासाठी आपल्याला दिलेले आहे त्या भगवत् स्मरणाचा आग्रह ते करतात.

एका गृहस्थाने महाराजांना विचारले, “महाराज, मी मनापासून नाम घेण्याचा प्रयत्न करतो; परंतु मला ते घेताना काहीतरी विचित्र भीती वाटते की आपले आता जे प्रपंचात सुरु आहे ते चांगले सुरु आहे; ते सुटून तर जाणार नाही ना?” श्रीमहाराज हसून म्हणाले, “ही जी आत्यंतिक प्रापंचिक आसक्ती आहे ती सुटण्यासाठी तर नाम आहे आणि जर त्याचीच भीती वाटू लागली तर ते किती हास्यास्पद आहे! पण असे होत नसते. ज्याचा जसा अधिकार ते बघूनच सांगितले जाते. स्त्रियांना बहुतेक वेळा भीती वाटते की आपला नवरा जर या मागे लागला तर कसे होईल? पण ही भीती योग्य नाही. मी तुम्हाला सांगतो, कुणीही प्रपंच सोडीत नाही, सोडणारा लाखात एखादा. सर्कशीत आगीच्या चक्रातून उडी मारतात तेव्हा अंगावर ती आग लागू नये म्हणून काही घालतात; तसे या प्रपंचाची झळ तुम्हाला बाधू नये म्हणून नाम घेत तुम्ही त्यात रहा एवढेच माझे सांगणे आहे.”

मात्र वरच्या वचनात म्हटल्याप्रमाणे भवरोगातून मुक्त करणारे सद्गुरूंसारखे वैद्य काहींना मात्र केशरातून किंवा कस्तुरी मधूनही नामौषधी देतात. काही स्वच्छ व स्पष्ट आज्ञा ते अधिकारी शिष्यांना करतात. जसे, श्रीमहाराजांनी पूज्य ब्रह्मानंद महाराज, पूज्य आनंदसागर महाराज, पूज्य रामानंद महाराज यांना एकांतात राहून काही काळ तीव्र नामोपासना सांगितली. याचे कारण त्यांचा अधिकार हे तर होतेच पण त्याबरोबर भगवत्प्राप्तीची त्यांची तीव्र तळमळ हे देखील होते. ते आमच्यासारख्या प्रपंचाला सर्वस्व मानणाऱ्या लोकांना महाराज असे कसे सांगतील? हे सत्शिष्य कस्तुरीचे चाहते होते; त्यांना महाराजांनी कस्तुरी दिली. मात्र सत्य हेही आहे की नामी नाही लहान थोर! म्हणूनच महाराज म्हणतात, वेळ जरी कमीजास्त लागला, तरी सर्वांना फळ सारखेच मिळेल, फक्त नामाला जपा.

दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आजच्या घडीला देखील श्रीमहाराज असा उपदेश करू शकतात याबद्दल आमच्या मनात कोणताही संदेह असू नये. एका थोर संतांकडून नुकतेच ऐकले की, “गोंदवल्यास जाताना महाराजांच्या दर्शनाला जातो आहोत म्हणावं. तिथे खाली जाऊन दर्शन घेताना महाराजांचं दर्शन घेतो आहोत असंच वाटावं; आम्ही समाधी दर्शन म्हणालो तर आम्ही सुरुवातच महाराज आता नाहीत अशी करतो आणि मग त्यांचे सान्निध्य जाणवणे कठीण जाते.” अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. हे ज्याने मानले त्याला महाराजांचे सान्निध्य जाणवणे आणि त्यांनी आपल्याला केलेला उपदेश – आज्ञा समजणे सोपे जाईल. त्यांच्याबरोबर संवाद प्रस्थापित होईल. हे झाले म्हणजे मग आम्हाला ते वरच्या वचनाप्रमाणे ‘नाम कशातून देऊ इच्छितात’ हे देखील लक्षात येईल. याचा मापदंड अर्थातच आमची प्रपंचातील आसक्ती किती कमी झाली आहे व आम्हाला गुरूंनी दिलेले नाम किती प्रिय वाटू लागले आहे हाच आहे.

म्हणून महाराज म्हणतात, नुसते नाम घेणे, श्रद्धायुक्त अंतःकरणाने जपणे, अंतरंगात उठणाऱ्या लौकिक वृत्ति सांभाळून – म्हणजे त्यांना नामाच्या योगे ताब्यात ठेवून घेणे, आणि शेवटी पूज्य ब्रह्मानंद महाराजांसारखे “नाम हेच एक त्रिभुवनात सत्य आहे” म्हणून घेणे या त्या पायऱ्या आहेत. कसेही घेतले तरी ते काम करतेच हे सत्य असले तरीही जर आम्ही या पायऱ्या चढण्याची निदान इच्छा मनामध्ये दृढ धरली तरच “नाम हेच ते परम सत्य आहे” या अनुभूती पर्यंत गुरुकृपेने पोहोचणे शक्य होईल!

||श्रीनाम समर्थ||

No comments:

Post a Comment