Wednesday, May 27, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४१ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४१ –

नामाबद्दल सुरुवातीला सर्वांचीच वृत्ति साशंक असते; पण आपण सतत नाम घेत गेल्याने विकल्प कमी होतात. विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की आपले काम झाले.

श्रीराम!
भगवंतानी ‘संकल्प मात्रे’ या जगाची निर्मिती केली असे म्हटले जाते. ‘सर्वशक्तिसमन्वित:’ अशा भगवंतांना अशक्य काय? जीव देखील त्याचाच अंश असल्यामुळे जे ब्रह्मांडी ते पिंडी या न्यायाने ही संकल्पशक्ती जीवात देखील आली. जसे, वडिलांच्या इस्टेटीवर मुलाचा सहजच हक्क असतो; त्यासाठी त्याला वेगळे काही करावे लागत नाही. तसेच भगवंताच्या लेकरांना काही हक्क जन्मतःच मिळालेले आहेत, त्यामध्ये ही संकल्पशक्ती आहे. अर्थात भगवंतांची शक्ती ही मायेच्या पलीकडे असल्याने शुद्ध आहे; आमची शक्ती मायेत असल्याने व तिचा वापर मायिक गोष्टींसाठी आम्ही करत असल्याने अशुद्ध झाली आहे. किंबहुना या अशुद्ध शक्तीने जेव्हा विकृत स्वरूप धारण केले, तेव्हा त्या संकल्पाचे रूपांतर विकल्पात झाले.

भस्मासुराने जसा त्याला महादेवांकडून मिळालेल्या वरदानाचा उपयोग त्यांनाच मारण्यासाठी करण्याचे ठरवले, तशी ही विकल्प शक्ती आम्ही ज्याच्याकडून आम्हाला संकल्पशक्ती मिळाली त्या भगवंतालाच विसरण्यासाठी करू लागलो. नुसते विस्मरण नव्हे तर त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह या विकल्पामुळे आले. यालाच परमार्थात अश्रद्धा किंवा संशय असे म्हणतात. परमार्थ मार्गाचा समूळ विध्वंस करण्याचे सामर्थ्य या विकल्पात आहे. परंतु, संत याही स्थिती आम्हाला सावरतात.

श्रीमहाराज म्हणतात, सुरुवातीला असे होणारच. कारण तुम्हाला भगवंताचा व त्याच्या नामाचा महिमा कळलेला नाही. म्हणूनच सर्व विकल्प भगवंताच्या संकल्पात बदलण्यासाठी केवळ नाम जपण्याचा अभ्यास करण्यास महाराज सांगताहेत. अनेकदा महाराज म्हणायचे, पूज्य बाबा बेलसरे सुद्धा आपल्या प्रवचनात सांगायचे की सर्व विकल्पांचे एकच कारण आहे, आमचे नाम कमी पडत आहे. प्रत्येकाला त्याच्या पूर्व जन्मींच्या संस्कारानुसार, त्याच्या गुरुभक्तीनुसार, गुरुंवरच्या श्रद्धेनुसार आणि नामासाठी वेळ देण्याच्या तयारीनुसार ‘परिणाम’ कळेल. हा परिणामच महाराज पुढच्या ओळी सांगताहेत, “विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागतील!”

मनुष्याचे मन सतत काही ना काही संकल्प करतच असते. सकाळी उठल्यापासून आज ऑफिसला इतक्या वाजता जायचे, आज स्वयंपाक अमुक करायचा, आज खरेदीसाठी या दुकानात जायचे, काही परीक्षा असेल तर त्यासाठी अमुक वेळ अभ्यासाला द्यायचा वगैरे. संकल्पांशिवाय मन नव्हेच. देहात अडकलेल्या मनाचा तो धर्मच आहे. थोडेसे आपण या मनापासून वेगळे होऊन बघण्याचा अभ्यास केला तर आपल्याला सहज कळू लागेल की दिवसभरात हजारो विचार संकल्प – विकल्पांच्या रूपाने आपण मनात वागवत असतो. हे मनाचे संकल्प चित्तात जाऊन वसले की त्यांना मूर्त स्वरूप येते व सतत त्याबद्दल चिंतन घडते. आपल्या सर्व संसारिक काळजी, चिंता यांचे मूळ या संकल्प – विकल्पात आहे. कोणत्याही गोष्टीचे हवेनकोपण हा देहबुद्धीचा दृश्य परिणाम आहे.

देहबुद्धीत अडकलेल्या मनाचे त्रांगडे असे आहे की रोजच्या व्यवहारात जे संकल्प आपले मन करते, त्याकडे फारसे योग्य अयोग्य न बघता ‘मनात आले म्हणून केले’ अशी बहिर्मुखता आम्ही दाखवतो व मनाचे गुलाम बनतो. मात्र जिथे गुरूंनी दिलेल्या नामाचा प्रश्न येतो, तिथे मात्र आम्ही शंभर वेळा विचार करतो की यातून मला काय मिळणार आहे, हे मला जमेल का?, हे मी केले तर माझ्या संसारात काही फेरफार होईल का?, नुसते नाम घेऊन खरेच भगवंत भेटेल का?, नामात मन लागत नाही तरीही नाम घेऊन उपयोग होईल का? असे एक ना अनेक! प्रत्येक गोष्टीचे कारण आणि परिणाम अशा दोन दृष्टीने विचार केला तर आपल्याला काय केले पाहिजे हे कळेल. या विकल्पांचे कारण आहे माझी देहाला चिकटलेली बुद्धी, आजूबाजूचे विषयी वातावरण आणि त्यामुळे केवळ देहाला प्रधानता देऊन केलेली माझी कर्मे. परिणामतः माझी बुद्धी नामाला कधी चिकटतच नाही. नाम घेतले तरीही केवळ ते एक कर्मच घडते. त्या कर्माची प्रेरणा त्याप्रत असलेल्या प्रेमाने किंवा भगवंताच्या ओढीने फारशी असत नाही आणि म्हणूनच कंटाळा, विसर, झोप अशी दुर्वृत्ती आम्हाला घेरते.

म्हणूनच महाराज आजच्या वचनात आम्हाला चिकाटीचे महत्त्व सांगत आहेत. ‘सतत नाम घेणे’ ही ती चिकाटी होय. पूज्य बाबा बेलसरे म्हणतात, “प्रेम असो वा नसो, जो कोणी चिकाटीने नाम घेईल, त्याच्यावर महाराज पोटच्या पोराप्रमाणे प्रेम करतील.” केवढे आश्वासन आहे हे! ‘प्रेम करतील!!!’ कोण? प्रत्यक्ष भगवद्रूप झालेले महाराज. कसे आहे, आम्ही अनेकदा म्हणतो, आमचे महाराजांवर प्रेम आहे. परंतु प्रेम ही इतकी साधी वस्तु नाही. आम्ही अपूर्ण असल्यामुळे ‘पूर्ण अशा प्रेमवस्तु’ ची आम्हास आज ओळख नाही. खरे प्रेम केवळ सद्गुरूच करू शकतात, त्या प्रेमातून ते आपल्याला ‘प्रेमाची ओळख’ करून देतात. किंबहुना असे म्हणण्यात यत्किंचित देखील अतिशयोक्ती होणार नाही की एक वेळ खरा द्वेष सहन करणे सोपे पण खरे प्रेम सहन करणे अवघड असते. हे कळायला आम्हाला महाराजांचे प्रेम जाणवले पाहिजे. सद्गुरू शिष्याला परम शुद्ध प्रेमात इतके बुडवून टाकतात की शिष्य त्या प्रेमाच्या नुसत्या स्पर्शाने भारावून जातो; मग जो पूर्ण होऊन त्या प्रेमात मस्त झाला त्याची अवस्था काय वर्णावी? आणि आजच्या वचनात महाराज जे आम्हाला ‘भगवंताचे संकल्प’ सांगत आहेत, तो याच प्रेमाप्रत जाण्याचा राजमार्ग आहे!

बहुतेक सर्व नामाबद्दलचे विकल्प संशय रूपाने असतात. महाराज म्हणतात, संशय घ्यायला हरकत नाही पण संशय आहे म्हणून नाम सोडू नका. जितके विकल्प येतात येऊ दे परंतु नाम सोडू नका. कारण केवळ नामच ‘पूर्ण’ आहे आणि संशय छेदण्याचे सामर्थ्य हे केवळ पूर्णातच असते! पूज्य बाबांची नामचंद्रिका नामाचे वर्णन “निःशेषं दोषवर्जितम्” असे करते. म्हणजेच नाम हे देहबुद्धिच्या पलीकडे असल्यामुळे जो नामाला धरतो त्याची बुद्धि ही सत्यसंकल्प बनते! आणि सगळा परमार्थ हा बुद्धीच्या सत्यसंकल्पावर आधारित आहे. एकदा बुद्धी स्थिर होऊन नामाशी निगडीत झाली की जे जे म्हणून संकल्प उठतील ते नामाला घेऊनच उठतील. अगदी लहान लहान गोष्टींना साधक मग नामाशी connect करू लागतो. जसे, आज एवढेच जेवायचे बरंका जेणे करून नंतर मला नामाला व्यवस्थित बसता येईल. आजचे काम इतक्या वेळात इतर कुठे न जाता, काही न करता लवकर आवरले पाहिजे, म्हणजे मला नामाला बसता येईल. ज्या ज्या म्हणून लौकिक जगातल्या गोष्टी माझ्या नामाच्या – साधनेच्या – भगवत अनुसंधानाच्या आड येताहेत त्या मग त्यागाव्या लागणार नाहीत, त्या सहजच सुटतील व त्या सुटल्या याचे देखील भान राहणार नाही! यालाच प्रत्येक कर्म भगवत समर्पित होणे असे म्हणतात. अशा साधकाचे प्रत्येक कर्म हे भगवद्भावनेला धरूनच असल्याने त्याचा प्रत्येक क्षणच त्याची साधना बनते आणि हे होण्यालाच महाराज “काम झाले” म्हणतात!

कसे आहे, नाम घेण्याला सुरुवात करणे हेच अत्यंत महत्त्वाचे आहे. एक श्लोक कर्ता म्हणतो,

गच्छन् पिपीलिको याति योजनानां शतान्यापि|
अगच्छन् वैनतेय: पदमेकं न गच्छति||
-- सतत चालत राहणारी मुंगी शेकडो योजने पार करू शकते. मात्र न चालणारा गरुड एक पाऊल देखील पुढे जाऊ शकत नाही!
आम्ही मुंगीच्या गतीने का होईना नाम घेत राहिलो, तर आज ना उद्या "महाराजांच्या प्रेमाच्या गावाला" नक्की पोहोचू! 

||श्रीनाम समर्थ||

1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete