Saturday, May 2, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र १६ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र १६ –

पोटामध्ये अन्नाची जरूर असताना जर ते तोंडातून जात नसेल, तर नळीने पोटात घालतात. ते लवकर पोटात जाते. तसे भावनेच्या नळीने नाम घेतले, तर फार लवकर काम करते.

श्रीराम!
भक्तिमार्गाचा प्राण आहे भाव. भक्ताच्या संपूर्ण शरणागतीचा पाया आहे भाव. भगवंत अर्जुनाला गुह्यतम ज्ञान सांगताना म्हणतात,

“तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत |
तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ||”

अंतर्यामी भगवंताला शरण कसे जावे हे सांगताना म्हणताहेत, त्याला तू सर्वतोपरी मनोभावे शरण जा. नाम घेणे म्हणजे त्या शरणागतीप्रत वाटचाल करणे होय आणि त्यामुळेच श्रीमहाराज म्हणतात, जर तुला शरणागती लवकर साधायची असेल, तर तू भावनेने ओतप्रोत होऊन नाम घे. संत ज्या गोष्टी सांगतात, त्यामागे त्यांचा अनुभव असतो आणि स्वाभाविकच श्रीमहाराजांसारख्या सिद्ध संतांचा हा उद्गार त्यांच्या सगुण उपासनेचे बल दाखवतो. भक्तिमार्गात श्रद्धेशिवाय पाऊल पुढे पडणार नाही आणि ही श्रद्धा त्या भगवंताप्रति, म्हणजेच सद्गुरूंच्या प्रति असलेल्या भावनेशी निगडीत असते. जितकी भावना शुद्ध, पवित्र, अनन्य आणि तीव्र, तितके नाम उच्चकोटीचे हा नियम आहे. म्हणून महाराज अन्नाचे उदाहरण देत आहेत की जशी अन्नाची देहाला जरूर आहे तशीच नामाची - भगवंताच्या चिंतनाची मनाला, चित्ताला जरूर आहे. त्याशिवाय त्यांचे कार्य यथायोग्य चालणार नाही. कोणत्याही मार्गाने अन्न पोटात गेले तरी हरकत नाही पण जाणे जरूर आहे; परंतु जेव्हा शरीराला आत्यंतिक आवश्यकता आहे; परंतु काही आजारामुळे तोंडाने खाणे शक्य नाही तेव्हा नळीने पोटात घातले तर लवकर शक्तीचा परिणाम दिसून येतो. तसे मनुष्यजन्म मिळालेला असताना जितके शक्य तितक्या त्वरेने साधन करून माणसाला या भवातून मुक्त होणे गरजेचे आहे हे यातून महाराज सुचवीत आहेत. वेळ घालवून चालणार नाही. नुसते तोंडाने रामनाम घेतले तर काम होणार नाही असे नाही; परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे असे असताना जर आपण प्रेमाने ते जपले, त्याहून मौल्यवान काहीही नाही या भावनेने जपले तर आपण लवकर मुक्कामी पोहोचू असे यातून त्यांना सांगायचे आहे.

अनेक ठिकाणी श्रीमहाराज म्हणतात, नाम अनेक लोक घेतात; परंतु काही लोक लवकर मुक्कामी पोहोचतात; म्हणजे नाम हेच आयुष्याचे ध्येय आहे, नाम हीच ती परम शांति आहे, नाम हेच ते परम स्थान आहे, नाम हीच मुक्ती आहे हा अनुभव काहींना लवकर येतो, काहींना मात्र थोडा वेळ लागतो. याचे कारण वरच्या वचनात आपल्याला सापडते. अर्थात इतर काही कारणेही असतात, जसे, श्रीमहाराजांना जेव्हा एकाने विचारले, पूज्य ब्रह्मानंद महाराजांसारखी निष्ठा आणि प्रेम आपल्याप्रती आमची केव्हा होईल? तेव्हा महाराज म्हणाले होते, ते एका जन्माचे नसते. हे जरी खरे, तरीही जर शिष्याची खरी तीव्र इच्छा असेल, जर सद्गुरुबद्दल खरी शुद्ध अनन्य भावना असेल तर एका जन्मात देखील श्रीमहाराज कुणालाही तयार करू शकतात यात शंका बाळगण्याचे कारण नाही. गोकुळीच्या कान्हाचा एक गोड प्रसंग आहे. यशोदा मातेने चरून आलेल्या गाईंना व वासरांना बांधून ठेवले, म्हणजे हा नटखट बाल गोपाल मधूनच जाई. हा गेला म्हणजे याच्याकडे येण्यासाठी वासरे त्या बांधलेल्या दोराशी झटापट करीत आणि मग हा सावळा गुराखी त्यातल्या काही वासरांना दावे सोडून मोकळे करी. याचा भावार्थ हा की जर भगवंताची इच्छा असेल तर ते कुणालाही कधीही मुक्त करू शकतात – “वत्सान् मुञ्चन् क्वचिद् असमये! – त्या वासरांना हा काळवेळ न बघताच मोकळे करून टाकायचा. गरज आहे ती केवळ वासरू बनण्याची. वरच्या बोधवचनात ज्या भावनेबद्दल महाराज सांगत आहेत, तो हा वासरांचा बालभाव, प्रेमभाव, दैन्यभाव, अनन्यभाव! जो नियम भगवंताचा, तोच सद्गुरूंचा – त्यांच्यात भेद नाही! ज्याच्या भावनेत जोर आहे, त्याला सद्गुरू चोवीस तास सन्निध आहेत.

अशा या भावनेच्या नळीने नाम घेणारे शिष्य सत्शिष्य पदवीस पोहोचतात. ही भावनेची नळी म्हणजेच सद्गुरूंशी सर्वात जवळिकीचे नाते. किंबहुना ‘नाते हे फक्त सद्गुरुंशीच’ हा भाव मनात दृढ असेल तरच ते काम करते. हाच अनन्यभाव. महाराज म्हणतात, अनन्यतेशिवाय परमार्थ नाही. जोवर सद्गुरू सोडून इतर कोणत्याही व्यक्ती, वस्तूमुळे मला आधार आहे हा भाव असेल तोवर सद्गुरूंशी अनन्यभाव नाही. इतकेच काय, परंतु जोवर या ‘मला’ देखील महत्त्व आहे, तोवर अनन्यता नाही. “प्रेम गली अति सांकरी| ता में दो न समाई | जब मैं था, गुरु नाही| अब गुरु है, हम नाही” बाकी सर्व व्यक्ती, वस्तू, पदार्थ यांना महत्त्व तेव्हाच, जेव्हा त्यांचा संबंध सदगुरूंकडून येतो. शिष्याला ही सद्गुरूंशी संबंध जोडण्याची सवय अतिशय उपयोगी पडते. ज्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आहेत, ज्यांच्याशी माझा संबंध आहे, जी काही नाती आहेत, ती सद्गुरूंनी – भगवंतानी मला दिलेली आहेत आणि म्हणून मी त्यांच्यासाठी उत्तम कर्तव्य करेन हा भाव असेल तर ती गुरुसेवाच घडेल! इतकेच काय, परंतु जोवर द्वैत भाव आहे, तोवर खरा शिष्य भगवंताला देखील सद्गुरू नंतर स्थान देतो. समर्थ तर म्हणतातच, “सद्गुरूवीण देव मोठा जया वाटे तो करंटा”! ही भावना ज्याला जोपासता आली, त्यालाच चोवीस तास सद्गुरूंशी उघडा व्यवहार जमेल. त्यांची सतत नजर आपल्यावर आहे, या श्रेष्ठ भावाची परिणतीच खरोखरीच्या अनुभूतीत होईल. त्यांचे कृपाछत्र माझ्या मस्तकावर सतत आहे हा भावच त्याला निर्भय बनवेल.

श्रीमहाराजांना कोणतीही काळ्या रंगाची वस्तू आवडत नसे म्हणून पूज्य तात्यासाहेब केतकर कधीही काळ्या रंगाची वस्तू वापरत नसत. त्यांचे वडील पूज्य भाऊसाहेब केतकर रोज तव्यावरचे पिठले खात; कारण काय तर महाराजांना आवडत होते. या दिसायला साध्या साध्या गोष्टी दिसल्या तरी भावनेचे पोषण करण्यास अत्यंत समर्थ अशा या गोष्टी असतात, ज्यामुळे सद्गुरू अनुसंधान सतत राहून साधन घडते. याचाच उच्च पैलू म्हणजे पूज्य भाऊसाहेब केतकर म्हणत तसे, “श्रीमहाराजांना आवडते म्हणून मी नाम घेतो!” नारद भक्तिसूत्रात जे ‘तत् सुखे सुखित्वम्’ हे सूत्र आहे, त्याप्रमाणे, आपल्या आराध्याच्या सुखातच सुख मानणे हीच त्या शरणागतीची परमावधी! इथे मीपणाचा संपूर्ण लय होतो व केवळ श्रीमहाराजांचा जो प्राण आहे तो माझाही प्राण बनावा यासाठी सहज प्रेमातून साधना घडते. आणि जिथे अशी सहजता आहे, तिथे महाराज वरच्या वचनात म्हणतात त्याप्रमाणे ‘फार लवकर काम होते’ यात काय नवल?

आणि हे काम होणे म्हणजेच वरच्या गीतेतल्या भगवंताच्या वचनाप्रमाणे, त्या नामाच्या – म्हणजेच भगवंताच्या – म्हणजेच सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने परम शांती व शाश्वत स्थान (शाश्वत समाधान) प्राप्त होणे. हेच ते परमगुह्य ज्ञान होय जे भावयुक्त अंतःकरणाने जपलेल्या नामामुळे सहजसाध्य होते!

||श्रीनाम समर्थ||

3 comments:

  1. भावबळे अकळे येऱ्हवी नाकळे।
    वरील श्रीगुरूवाक्य अर्थात ब्रम्हवाक्यावरील चिंतनावर चिंतन करून भावजागृतीचे महत्व न पटले तर नवलच!🙏🌿🙏

    ReplyDelete
  2. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete