Wednesday, May 20, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ३४ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ३४ –

मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, वृत्ति सुधारण्यासाठी आणि शांतता वाढवण्याकरिता अकर्तेपणाने नाम घ्यावे.

श्रीराम!
भक्तिमार्गात नामस्मरणाचे महत्त्व आपण जाणतो. किंबहुना भक्ति म्हणजेच नामाचे अखंड अनुसंधान असे श्रीमहाराज म्हणत. भक्तीबद्दल सांगताना श्रीमहाराज म्हणतात, “भगवंताच्या भक्तीने विषय बेमालूमपणे नाहीसा होतो.” याचाच अर्थ जिथे भक्ती आहे, तिथे विषय किंवा कोणतीही लौकिक वासना नाहीच. गंमत अशी आहे की आम्ही बऱ्याचदा जे निर्वासन आहे, जे निष्काम आहे, जे खऱ्या अर्थाने शुद्ध आहे ते सोडून वासना – विषय – इच्छा - कामना यापासून सुटका कशी करावी याचा विचार जास्त करतो. श्रीमहाराज याबद्दल एकीकडे एक गमतीशीर पण अतिशय महत्त्वाचे असे विधान करतात – “वासना मुळात नव्हतीच. आपण तिला आहे म्हटली की ती अस्तित्वात आली. आता ती नाही असे आपण म्हटले की ती नाहीशी होईल!” 

हे विधान या ठिकाणी उद्धृत करण्याचे कारण असे की, आजच्या वचनात श्रीमहाराज आपल्याला ‘मोबदल्याची अपेक्षा न ठेवता’ साधन करण्याचे आवाहन करत आहेत व सर्व मोबदल्याची अपेक्षा ही कोणत्या ना कोणत्या वासनेपायी असते. जर श्रीमहाराजांचे वासनेसंबंधी वर उद्धृत केलेले वचन आपण लक्षपूर्वक अभ्यासले तर आपल्या हे लक्षात येईल की श्रीमहाराज आपल्याला या विश्वातील तीन तत्त्वांबद्दल अत्यंत सोप्या शब्दात सांगत आहेत. ही तीन तत्त्वे आहेत, भगवंत, जीव आणि माया. जी नाहीच पण अज्ञानामुळे दिसते ती माया परंतु जीवदशेमुळे तीच खरी वाटते आणि सगळीकडे व्यापून असलेले एकमेव भगवत तत्त्व सोडून आम्ही मायेचा निरास करण्याच्या मागे लागतो. याची परिणती म्हणजेच विविध वासना आहेत असे आपल्याला वाटते. प्रत्येक जीवाची एकमेव वासना हीच आहे की त्याला आनंदस्वरूप व्हावयाचे आहे, कारण तो त्या सर्वव्यापी, सर्वशक्तिमान अशा आनंदाचा अंश आहे. पण भगवंताच्या मूळ त्रिगुणातीत आनंद स्वरूपाला जिने त्रिगुणात्मक भ्रमाने झाकून टाकले आहे त्या अपरा मायेच्या तावडीत जीव सापडतो आणि सुखदुःख भोगतो. आपल्या सर्वच्या सर्व “मोबदल्याच्या अपेक्षेचे बीज” यामध्ये आहे. मग ते पती-पत्नीमधील अपेक्षांचे डोंगर असोत वा मित्रा मित्रातील, पालक-मुलांतील, समाजातील घटकांतील, सरकारकडून असलेल्या अपेक्षा असोत किंवा मग भक्ताच्या भगवंताकडून असलेल्या अपेक्षा असोत, व्यवहार दृष्ट्या जरी त्यात तथ्य वाटत असेल तरी त्याचे मुळात अस्तित्वच भ्रमामध्ये असल्यामुळे त्या वासनेला – इच्छेला ना शेंडा असतो ना बुडखा! म्हणून श्रीमहाराज म्हणतात, आज आपण वासना आहे म्हणतो आहोत म्हणून ती आहे, ती नाही म्हणा म्हणजे मग ती नाही!

हे ज्याने जाणले, मानले आणि मनामध्ये दृढ केले, त्याचे नामसाधन सहजच निष्काम, निरहंकार आणि निरभिमान असे होईल! म्हणजेच ही एक गोष्ट – निष्कामता – जर जमली, तर वचनातील तीनही गोष्टी – वृत्ति सुधार, शांती आणि अकर्तेपण हे त्यासोबतच असतील. कारण वृत्ति बिघडण्याचे कारण निरनिराळ्या कामना हेच आहे. त्याच नाहीशा झाल्यावर वृत्ति सहजच शुद्ध, सरळ आणि पवित्र होईल. हे झाले म्हणजे मग श्रीमहाराज ज्याला आत्यंतिक महत्त्व देतात, ती ‘रामकर्ता’ ही भावना आपसूक उदयाला येईल.

इथवरच्या भागाला थोडा वेदांतिक शिडकावा आहे. पण जरी आपण भक्तीच्या अंगाने बघितले, तरी देखील श्री नारद महर्षी आपल्याला भक्ती प्राप्त झाल्याचे एक महत्त्वाचे लक्षण भक्तिसूत्रात सांगतात, “यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति, अमृतो भवति, ‘तृप्तो भवति’” यातला ‘तृप्तो भवति’ हा जो भाग आहे तो भक्तीच्या बाबतीत नाही; भक्तीमध्ये तृप्ती नाहीच, भक्त आपल्या आराध्याचे नाम, गुण, लीला गाताना कधीच तृप्त होत नाही. मग ही कसली तृप्ती वर्णन केलीये देवर्षींनी? तर या जगातल्या किंवा परलोकातल्या देखील कोणत्याही वस्तु – विषय – व्यक्तीची किंवा त्याकडून कामना न राहिल्याने भक्तियुक्त महात्मा तृप्त होतो! म्हणजे देवर्षी सरळ सरळ आपल्याला सांगत आहेत की, जोवर कोणतीही इच्छा आहे, मोबदल्याची अपेक्षा आहे, तोवर ती भक्ती नव्हेच. आणि अशा भक्तीचे वर्णन करताना देवर्षी नारद म्हणतात, “यथा व्रजगोपिकानाम्!!” ज्याला भगवंताकडून देखील कसलीच अपेक्षा नाही असा जीव म्हणजे गोपी. ज्याची देह मन बुद्धी केवळ भगवंताच्या सेवेत समर्पित आहेत तो जीव म्हणजे गोपी. भगवंताच्या – सद्गुरूंच्या इच्छेतच आनंद मानून कर्तव्याला न चुकता सदा सर्वदा भगवन्मय जीवन जगणारा जीव म्हणजे गोपी! म्हणून एकीकडे श्रीमहाराज म्हणतात, भगवंत तोच आहे, आम्ही गोपी बनणे जरूर आहे. ही जी प्रेमी भक्त बनण्याची प्रक्रिया तीच आजच्या बोधवचनात महाराजांनी आम्हाला सांगितली आहे.

महाराज म्हणत, व्यवहारातला कर्तेपणा कमी झाला तर परमार्थात कमी होणार. अर्जुनाला भगवंत म्हणाले, “मां अनुस्मर युद्ध्य च”... भगवंताच्या स्मरणात युद्धासारखे कर्तव्य देखील उत्तम कर्मात गणले गेले. कारण स्मरण जिथे आहे तिथे ‘मी केले’ म्हणायला वावच नाही आणि स्मरणानेच प्रत्येक कर्म भगवंत चरणी समर्पित होऊन जीव कर्मबंधनातून मुक्त होतो. पूज्य बाबा बेलसरे नेहमी एक गोष्ट सांगायचे की, ‘नामाला बसताना दर वेळी, तुम्ही करवून घेतलेत तर नाम होईल असे म्हणून सद्गुरूंची प्रार्थना करून मग नामाला बसावे.’ यामुळे दोन गोष्टी होतात. एक तर त्यांच्या अस्तित्वाचे भान टिकते आणि दुसरे म्हणजे आपले कर्तेपण आड येऊन साधन लटके पडत नाही.

आणि म्हणूनच श्रीमहाराज परोपरीने आम्हाला सांगतात, “नामाचा मोबदला नामच!” ज्याने हे जाणले त्याच्या आयुष्यात निष्कामता - निरपेक्षता येऊन सद्गुरू कृपेने अंतरंगात शाश्वत शांतीचे साम्राज्य प्रस्थापित होईल!

||श्रीनाम समर्थ||


1 comment:

  1. गेल्या ३-४ दिवसातील चिंतनात जो वृत्ती सुधारण्यावर भर दिला, त्यात अकर्तेपणाने नामसाधन हा फारच सूक्ष्म पण थेट पोचवणारा मार्ग छान मांडलात! 🙏🌿🙏

    ReplyDelete