Tuesday, May 26, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र ४० --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र ४० –

अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तु म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे.

श्रीराम!
“येच क्षणी मरोन जासी| 
तरी रघुनाथी अंतरलासी|
माझे माझे म्हणतोसी| 
म्हणोनिया||”
आपण जिथे देहाने राहतो आहोत त्याला ‘मृत्युलोक’ असे म्हणतात, जिथे मृत्यू हाच अंतिम परिणाम आहे. जो देहात आहे, त्याला मृत्यू आहे. म्हणजे, जे दिसते आहे ते आज ना उद्या नष्ट होणार आहे. अनंत काळापासून अनंत जीव वेगवेगळ्या योनीत जन्माला आले, जगले आणि मृत्यू पावले. वरच्या दासबोधातल्या ओवीत समर्थ म्हणतात, तुला माहीत आहे की कोणत्याही क्षणी मृत्यू ओढवू शकतो आणि तरीही तू “मी माझे” म्हणतोस आणि रघुनाथापासून दूर जातोस याला काय म्हणावे?

आजच्या परिस्थितीत प्रत्येक मनुष्याने यावर विचार करणे गरजेचे आहे. काय आहे परिस्थिती आज? सबंध जगभर एक टीचभर देखील नसलेला असा कोरोना व्हायरस धुमाकूळ घालतो आहे. माणसे आपल्या आप्तमित्रांपासून दूर जाऊन उपचार मिळून देखील मरत आहेत, अतिशय त्रासात जगत आहेत. ज्या उद्योग व्यवसायांवर आमची भिस्त होती की यामुळे आमचे जगणे सुसह्य होईल ते सर्व बंद पडले आहेत. सर्वत्र आत्यंतिक भीतीचे वातावरण आहे. कधी काय होईल भरवसा नाही यासारखी वाक्ये सर्रास ऐकू येत आहेत. ज्या जगातल्या सृष्टीसौंदर्याचे वर्णन करताना कवींची वाणी थकत नव्हती, त्या जगात कुठेही वावरणे अशक्य होऊन बसले आहे. घराच्या चार भिंतींमध्ये राहून लोकांना मानसिक दुर्बलता सतावते आहे. आपण मृत्यू म्हणजे आयुष्याच्या शेवटी येणारा तो एकच असे समजतो, ते तितके योग्य नाही. मनुष्य जोवर पूर्णाला चिकटला नाही, तोवर प्रत्येक क्षणी त्याचा मृत्यू होत असतो. गेलेला क्षण मृत्यूच पावतो ना? तो परत आणता येतो का? अगदी शरीरातली पेशी देखील सेकंदा सेकंदाला मृत्यू पावते व तिची जागा नवीन पेशी घेते हे शास्त्रीय सत्य आहे. असे असताना मनुष्याला मरणाचे विस्मरण का होते?

याचे कारण - जीव कसा आहे? तर,
“ईश्वर अंश जीव अविनाशी| चेतन अमल सहज सुखराशी||”
जीव त्या अनंताचा अंश असल्यामुळे तो स्वतःला सहजच मृत्युगत समजत नाही. परंतु त्याच्या अपूर्णत्वाचे त्याला विस्मरण झाले आहे व तो या जगात पूर्णत्व शोधायच्या भानगडीत पडल्यामुळे मुळात सुखराशी परमात्म्याचा अंश असून दुःख भोगतो आहे. याला उपाय एकच – त्या भगवंताशी पुनश्च योग आणि हा योग जुळण्याचे साधन - त्याचे अखंड नामस्मरण! म्हणून श्रीमहाराज आपल्याला सतत आठवण करून देतात की जोवर तू नामाला धरत नाहीस, तुला तुझी खरी ओळख होणार नाही. तू स्वतःला देह समजून सुखदुःखाच्या भोगांनी या मृत्युलोकात वरचेवर येत राहिला आहेस. यातून मुक्तीचा उपाय एकच, हा नश्वर देह सोडताना त्या भगवंताचे स्मरण!

भगवंत गीतेत म्हणाले,
“अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्|
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः||”
-- जो मनुष्य मृत्युच्या समयी माझेच स्मरण करीत देह सोडतो, तो माझ्या स्वरूपास प्राप्त होतो ह्यात संशय नाही.

परंतु, श्रीमहाराजांसारखे संत आम्हाला समजावतात, असे अंतकाळी नाम मुखात, स्मरणात येण्यासाठी आयुष्यभर आम्ही त्याचा अभ्यास केला असेल, त्या भगवंताच्या नामात आम्हाला प्रीति वाटू लागली असेल तरच अंतकाळी नाम आठवणार! कारण पुढच्याच श्लोकात भगवंत म्हणतात,
“यं यं वाSपि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्|
तं तं एवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः||”
म्हणजेच अंतकाळी ज्या स्वरूपाचे ‘चिंतन’ असेल, ज्या चिंतनात जीव मग्न असेल, त्याला तो जाऊन मिळतो.
म्हणजेच अंतकाळच्या स्मरणासाठी आयुष्यभराचे चिंतन महत्त्वाचे आहे. खरोखर सर्व परमार्थ हा चिंतनावर आधारित आहे. आम्ही चिंतन संसाराचे, पैशाचे, आप्तांचे करू आणि आम्हाला अंतकाळी मात्र भगवंत आठवू दे हे म्हणणेच विसंगत नाही का? यासाठीच समर्थ आठवण करून देतात, “मरणाचे स्मरण असावे| हरिभक्तीसी सादर व्हावे||” हे स्मरण निकोप असावे असे संत मुद्दाम सांगतात. म्हणजे मरणाच्या स्मरणाने उदास दुःखी होऊन स्मरण असणे योग्य नाही; तर मरण तर निश्चित आहेच, पण जिवंत असतानाच मी सद्गुरूंनी दिलेल्या नामसाधनेच्या मदतीने, त्यांच्याच कृपेने याची देही याची डोळा माझ्या देहबुद्धीचे झालेले मरण बघेन या दुर्दम्य सकारात्मकतेने साधन घडले पाहिजे!

होऊनिया जागे, उठा वेग करा|
शरण जा उदारा| रघुवीरा||

बायजीद नावाचे एक थोर संत होऊन गेले. अंदाजे पंचाहत्तर वय असताना एकाने त्यांना त्यांचे वय विचारले. ते म्हणाले, “चार वर्षे!” तो विचारणारा चपापला. ते म्हणाले, “अहो आयुष्याची सत्तर वर्षे वाया गेली. आता चार वर्षांपासून भगवंताच्या नामात मस्त आहे. त्यामुळे मी चार वर्षांचा आहे”
अल्पायुष्य मानव देह|
शत गणिले अर्धरात्र खाय|
मध्ये बालक पीडा रोग क्षय|
काय भजनासी उरले ते पाहे गा||
खरोखर जो सारासार विवेकाने हा विचार करील त्याचे नाम श्वासोश्वासी चाललेच पाहिजे, इतके या काळाच्या वेगवान गतीच्या आकलनात सामर्थ्य आहे. उगीच म्हणत नाहीत, “शिंक जांभई खोकला| इतुका वेळ वाया गेला||” अभ्यासाने काय अशक्य आहे म्हणतात महाराज?

आणि आपले श्रीमहाराज आपल्याला हा भरवसा देतात की जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने नामाचा अभ्यास आयुष्य अजून असताना केलात, तर तुमच्या अंतकाळी मुखात नाम येण्याची जबाबदारी माझी! किती उदाहरणे आहेत. महाराजांच्या चरित्रात डोकावले तर अशी असंख्य उदाहरणे मिळतात, ज्यात साधक अगदी मृत्युशय्येवर असताना केवळ महाराजांनी शेवटच्या क्षणी त्याच्या मुखातून रामनाम वदवले व त्याला उत्तम गतीस नेले. फक्त विश्वास हवा आणि अजून वेळ असेतोवर प्रेमपूर्वक अभ्यास!

लक्षात घेतले पाहिजे की, We are not human beings having spiritual existence. We are spiritual beings having human existence. आपण स्वतः स्वतःला देहात बघितले म्हणून सगळा घोळ झाला. त्यापलीकडे बघण्याची दृष्टी आपल्याला सद्गुरू देतील जर आम्ही त्यांच्या वचनांवर श्रद्धा ठेवून नामाच्या आनंदासाठी हे जीवन जगलो! अहो, त्यांना काय हवे आहे? केवळ आपला आनंद! असा आनंद जो आजसारख्या भयानक परिस्थिती सुद्धा टिकेल व आयुष्याच्या अंती देखील त्यात किंचितशी देखील बाधा येणार नाही! सबंध आयुष्य जो नामाच्या मस्तीत जगेल ना, त्याला आपल्या आयुष्याच्या अंती आपल्या हक्काच्या घरी जाताना कसले आलेय दुःख? त्याचा मृत्यू हा जीवनापेक्षा मोठा उत्सव होईल यात काडीमात्र शंका नाही!

||श्रीनाम समर्थ||

2 comments:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete
  2. मरणाच्या स्मरणाने उदास दुःखी होऊन स्मरण असणे योग्य नाही; तर मरण तर निश्चित आहेच, पण जिवंत असतानाच मी सद्गुरूंनी दिलेल्या नामसाधनेच्या मदतीने, त्यांच्याच कृपेने याची देही याची डोळा माझ्या देहबुद्धीचे झालेले मरण बघेन या दुर्दम्य सकारात्मकतेने साधन घडले पाहिजे!
    अहाहा! ही तळमळ लागावी, हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना! 🙏📿🙏

    ReplyDelete