Tuesday, May 5, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे बोधवचन क्र १९ --


श्रीमहाराजांचे बोधवचन क्र १९ –

नामाचा अनुभव मागणे म्हणजे त्याच्या किमतीचा दुसरा पदार्थ आहे असे समजणे होय. पण नामाला किंमत किंवा मोबदला नाहीच. नाम म्हणजे भगवंतच होय.

श्रीराम!
मनुष्याला जन्मापासून मोबदल्याची सवय असते. लहान मूल रडते ते देखील त्याच्या रडण्यामुळे त्याला आईने दूध पाजावे म्हणून. पुढे हाच निसर्गनियम जणू मनुष्याच्या अंगवळणी पडतो व कोणतीही कृती करताना किंवा कृती करावी किंवा नाही हे ठरवताना तो त्यातून मला काय प्राप्तव्य आहे याचा विचार करून मग निर्णय घेताना दिसतो. अगदी चोरीसारख्या वाईट कृतीत देखील चोराला त्या वस्तूतून आपल्याला आनंदाचा अनुभव होणार आहे या भावातून तो चोरी करतो. पुस्तक लिखाणासारख्या चांगल्या कृतीत देखील लोकांनी ते वाचावे, निदान त्यांना त्याचा उपयोग व्हावा यासारखे प्राप्तव्य मनात ठेवूनच ते केले जाते. यालाच श्रीमहाराजांसारखे संत व्यवहार म्हणून संबोधतात आणि पुन्हा म्हणतात, जिथे परमार्थाचा - भगवंताचा संबंध आहे, तिथे व्यवहार नाही, कारण व्यवहार म्हणजे स्वार्थ! आणि परमार्थाची सुरुवातच निस्वार्थतेतून होते.

सद्गुरू जेव्हा आपल्याला नाम देतात, तेव्हा ते ज्या भगवत्स्वरूपात तन्मय झाले त्या स्वरूपात आपण तन्मय होऊन शाश्वत समाधान आपल्याला मिळावे हा त्यामागचा हेतू असतो. हा हेतू कोणत्याही स्वार्थाने प्रेरित झालेला नसतो तर केवळ शिष्याच्या कल्याणाच्या भावनेने प्रेरित असतो. परंतु, आम्हाला जी सवय व्यवहारात लागलेली असते तीच आम्ही साधनेत देखील वापरत असल्यामुळे सद्गुरूकडून नाम घेतानाच यातून आम्हाला काय मिळणार आहे याचा विचारच शंभर वेळा करताना दिसतो.

आणि याच टप्यावर ‘नामाचे अनुभव’ हा विचार जो एकदा मनात शिरतो तो बराच काळ लोटला तरीही मनातून जात नाही. त्याची मखलाशी अनेक वेळा ‘तुकारामांसारख्या संतांनी देखील भगवंताजवळ प्रेमखूण मागितली आहे’ अशी होते; ते प्रेम मागण्यामागे त्यांनी काय दिले याचा विचार बहुधा होत नाही. एक ब्रजभूमी मधील थोर संत आहेत, अजूनही देहात आहेत, पूज्य विनोद बिहारी बाबाजी. ते म्हणतात, “कसला सारखा विचार करायचा आम्हाला काय मिळालं? काय अनुभव आला? किती प्रगती झाली? हा विचार कधी करणार की आम्ही काय दिलं? गुरूसाठी, भगवंतासाठी आम्ही काय केलं आयुष्यात? दिवसाकाठी थोडं नाम घेतलं आणि आम्हाला लगेच अनुभव हवा; त्या भगवंताने आमच्यासाठी श्वासासाठी ऑक्सिजन पासून पोटाला अन्न, निवारा अशा कितीतरी गोष्टी पुरवल्या, त्याच्याकडे पुन्हा आम्ही तक्रारच घेऊन जातो की आम्हाला अजून अमुक अमुक हवं आहे, प्रापंचिक असो वा पारमार्थिक!” श्रीमहाराज म्हणतात, अनुभव पाठीशी लागतील पण हे अनुभव ही सिद्धी किंवा प्राप्तव्य नव्हे; ते केवळ मैलाचे दगड आहेत आणि तेही सर्वांना येतील असे नाही.

कसे असते की वस्तु खरेदी करताना आपल्याला त्या वस्तूची किंमत चुकवावी लागते; मग ती वस्तु आपण विकत घेऊ शकतो. पण महाराज वरच्या वचनात म्हणताहेत, नामाचा अनुभव तुम्ही मागत आहात, म्हणजेच त्याच्या किमतीचा अनुभव मागत आहात; परंतु नामाची किंमत करता येणे अशक्य आहे. त्याच्या किमतीचा काय अनुभव असू शकतो असे महाराज विचारतात. केवळ संतच नाम अमूल्य आहे हे जाणतात. एवढेच नव्हे तर तुलसीदास म्हणतात, “रामु न सकहिं नाम गुन गाई!” खुद्द ज्याचे नाम आहे, त्या रघुनंदनाला देखील आपल्या नामाचा पूर्ण महिमा गाणे अशक्य आहे. मग इतरांची काय कथा?

एक कवी भगवंताच्या प्रेमाबद्दल म्हणतो,
‘अजब राज़ है मुहब्बत के फ़साने का|
जिसको जितना आता है गाये चला जाता है|”

आणि वरच्या वचनात म्हणुनच महाराज सांगत आहेत, नामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम यात भेद नाहीच. नाम म्हणजे भगवंतच होय. आणि जिथे त्या परमतत्त्वाची बात आहे, तिथे कोणत्याही लौकिक परिमाणात त्याची किंमत कशी करणार? किंमत कशी करणार त्या तत्त्वाची, ज्याला अजूनपर्यंत कुणीच पूर्ण जाणू शकलेला नाही, त्याबद्दल बोलू शकलेला नाही? श्री रामकृष्ण परमहंस म्हणत, “वेद, पुराणे, तंत्रविद्या, तत्त्वज्ञानाची सहा दर्शने (Six systems of philosophy), हे सर्व जिभेने स्पर्श केलेल्या अन्नाप्रमाणे आहेत, कारण ते जिभेने वाचलेले अगर म्हटलेले आहेत. फक्त एक गोष्ट अशी उष्टी केलेली नाही आणि ती म्हणजे ब्रह्म! कुणीही कधीही ब्रह्म काय आहे हे सांगू शकलेले नाही!” असे जर आहे तर त्या शब्दब्रह्माची किंमत आम्ही जर लौकिक वा अलौकिक अनुभवांमध्ये मागू लागलो तर ते श्रीमहाराजांसारख्या “फक्त नामावर” निरतिशय प्रेम करणाऱ्या महात्म्यांना कसे रुचेल? नाम हाच एक सर्वस्वी स्वयंभू आणि अत्युच्च असा अनुभव आहे हेच ते सतत सांगत राहिले.

असे हे संत जेव्हा आमच्यासारखे लोक फारच ‘अनुभव हवा’ म्हणू लागतो, तेव्हा नामाचा अनुभव काय असतो किंवा काय मागावा हे सांगतात –

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,

नाम आठविता सद्गदित कंठी| प्रेम वाढे पोटी ऐसे करी||
रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्री| अष्टांगही गात्री प्रेम तुझे||
सर्वही शरीर वेचो या कीर्तनी| गाऊ निशिदिनी नाम तुझे||
तुका म्हणे दुजे न करी कल्पांती| सर्वदा विश्रांती संतांपायी||

... कारण, ‘नामाचा’ अनुभव ‘प्रेम’ व ‘प्रेमाचा’ अनुभव पुन्हा ‘नामच’!!!

||श्रीनाम समर्थ||   

1 comment:

  1. जानकी जीवन स्मरण जय जय राम

    ReplyDelete